असं काय घडलं की पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना 'चतुर नेते' म्हणाले?

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यामध्ये पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन करताना भारताचे परराष्ट्र मंत्री

फोटो स्रोत, @ChiefAdviserGoB

फोटो कॅप्शन, बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यामध्ये पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन करताना भारताचे परराष्ट्र मंत्री

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2025 अखेरीस ढाक्याचा दौरा केला.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनी श्रद्धांजली देण्यासाठी जयशकंर 31 डिसेंबरला ढाक्यात गेले होते.

जयशंकर यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आशियातील इतर देशांचे प्रतिनिधीदेखील तिथे आले होते.

यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केलं.

जयशंकर यांचं हे हस्तांदोलनाचं चित्र ढाक्याच्या छोटेखानी दौऱ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलं.

पाकिस्तानमध्ये याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विशेषकरून, असं म्हटलं जात असताना की हस्तांदोलन करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच पुढाकार घेतला होता. अर्थात जयशंकर यांनी ढाका दौऱ्याशी संबंधित जी माहिती सोशल मीडियावर दिली, त्यात अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या प्रसंगाचा समावेश नव्हता.

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीनं या भेटीनंतर एक्स या सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले होते. या फोटोंबरोबर पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की जयशंकर यांनी स्वत:च पुढे येत अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं.

अयाज सादिक यांनी भेटीबद्दल काय सांगितलं?

अयाज सादिक यांनी सांगितलं आहे की खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराआधी बांगलादेशच्या संसदेच्या वेटिंग रूममध्ये जयशंकर यांच्याशी त्यांची भेट कशी झाली आणि तिथे काय झालं.

ते म्हणाले की मे महिन्यात झालेल्या युद्धानंतर पाकिस्तानशी उच्च स्तरावरील संपर्क करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाकडून पुढाकार घेण्यात आला.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजला सादिक म्हणाले की ते खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराच्या नमाजमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते.

ते म्हणाले, "संसदेच्या एका वेटिंग रूममध्ये आधीपासूनच पाकिस्तान, मालदीव, नेपाळ आणि भूतानचे प्रतिनिधी उपस्थित होते. याव्यतिरिक्त बांगलादेशचे अधिकारीदेखील होते. त्याचवेळेस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ तिथे पोहोचलं."

अयाज सादिक यांच्या मते, "खोलीत शिरल्यानंतर जयशंकर यांनी आधी इतर प्रतिनिधींना अभिवादन केलं. त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि हस्तांदोलन करून बोलण्यास पुढाकार घेतला."

सादिक म्हणाले, "मी बांगलादेशातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी बोलत होतो. त्याचवेळेस ते माझ्याकडे आले. त्यांनी अभिवादन केलं आणि त्यांचा परिचय करून दिला. मी जेव्हा माझा परिचय करून देणारच होतो, तेव्हा ते म्हणाले, 'एक्सीलन्सी मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला परिचय करून देण्याची आवश्यकता नाही.'"

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशच्या संसदेतील ज्या वेटिंग रूमध्ये अयाज सादिक यांची भेट घेतली, तिथे इतर देशांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते

फोटो स्रोत, @NAofPakistan

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशच्या संसदेतील ज्या वेटिंग रूमध्ये अयाज सादिक यांची भेट घेतली, तिथे इतर देशांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अयाज सादिक म्हणाले, "भारताच्या मंत्र्यांबरोबर कॅमेरेदेखील उपस्थित होते. यातून याचे स्पष्ट संकेत मिळतात की जयशंकर यांना हे पूर्ण माहित होतं की हे संभाषण रेकॉर्ड केलं जातं आहे आणि प्रसारमाध्यमांमध्ये ते प्रसिद्ध केलं जाईल."

ते म्हणाले, "त्यांना पूर्ण माहित होतं की ते काय करत आहेत. तसंच हेही माहित होतं की प्रसारमाध्यमांमध्ये याचं वृत्तांकन होईल."

सादिक म्हणाले, "मला जाणीव झाली की खोलीत असणाऱ्या सर्वजणांचं लक्ष त्या संभाषणावरच केंद्रित झालेलं होतं."

अयाज सादिक म्हणाले, "जयशंकर एक चतुर राजकारणी आहेत. त्या क्षणाचं महत्त्वं आणि त्याचं 'ऑप्टिक्स' त्यांना चांगल्या प्रकारे समजत होतं."

सादिक जिओ न्यूजला म्हणाले की बांगलादेशच्या दौऱ्याच्या वेळेस त्यांचं अत्यंत उत्साहानं आणि हार्दिक स्वागत झालं.

ते म्हणाले की तिथे उपस्थित असलेले लोक 'पाकिस्तान झिंदाबाद' आणि 'आय लव्ह पाकिस्तान'च्या घोषणा दिल्या जात होत्या.

पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंतच्या त्यांच्या प्रवासादरम्यान लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचादेखील उल्लेख केला.

ते म्हणाले की ज्या गाडीतून ते प्रवास करत होते. त्यावर पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता. झेंडा पाहताच रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक हात हलवू लागले.

'भारत-पाकिस्तानला चर्चेत कोणताही रस नाही'

'जिओ टीव्ही'च्याच एका कार्यक्रमात अमेरिकेत पाकिस्तानच्या राजदूत राहिलेल्या मलीहा लोधी यांना विचारण्यात आलं की जयशंकर आणि सादिक यांच्या हस्तांदोलनाकडे त्या कसं पाहतात?

याला उत्तर देताना मलीहा लोधी म्हणाल्या, "मला वाटत नाही की हस्तांदोलन केल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील कोंडी दूर होते आहे. मला वाटतं की हस्तांदोलन करणं ही एक स्वाभाविक गोष्ट होती. ते ठरवून करण्यात आलेलं नव्हतं. मला याचं कोणतंही महत्त्व दिसत नाही. तुम्ही एकमेकांना पाहिलं आणि हस्तांदोलन केलं. मात्र याचे कोणतेही राजकीय अर्थ नाहीत."

त्या पुढे म्हणाल्या, "जिथपर्यंत अण्वस्त्र प्रकल्पांची यादी शेअर करण्याचा प्रश्न आहे, तर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून ते होतं आहे आणि यावेळेसही तेच घडलं. याला खूप जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही."

"दोन्ही देशांची इच्छा आहे की त्यांच्याकडे जबाबदार अण्वस्त्रसज्ज देश म्हणून पाहिलं जावं आणि ही चांगली गोष्ट आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध नाही आणि शांतता नाही, अशी स्थिती आहे. परिस्थिती निवळत असल्याचं मला कुठुनही दिसत नाही."

पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी मलीहा लोधी यांना वाटतं की भारत आणि पाकिस्तानला सध्या एकमेकांशी चर्चा करण्यात कोणताही रस नाही

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी मलीहा लोधी यांना वाटतं की भारत आणि पाकिस्तानला सध्या एकमेकांशी चर्चा करण्यात कोणताही रस नाही

त्यांना विचारण्यात आलं की, भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये सध्या इतका तणाव आहे की क्रिकेटचे संघदेखील एकमेकांशी हस्तांदोलन करत नाहियेत. मग जयशंकर यांनी याप्रकारे अयाज सादिक यांच्याकडे स्वत:हून जाण्याचा काय अर्थ काढावा. भारताचा दृष्टीकोन आता बदलतो आहे का?

त्या म्हणाल्या, "भारताची भूमिका मवाळ झालेली नाही. उलट अलीकडच्याच काळात भारताच्या संरक्षण मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी आक्रमक वक्तव्यं केली होती. हा पाकिस्तानला घाबरवण्याचा प्रयत्न होता. मला वाटत नाही की जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहतील तोपर्यंत पाकिस्तान आणि भारतामधील तणाव कमी होईल."

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वृत्तपत्रानं लिहिलं आहे की दोन्ही देशांनी एकमेकांच्या अण्वस्त्र प्रकल्प आणि कैद्यांच्या यादीची देवाण-घेवाण केली.

ग्राफिक्स

या वृत्तपत्रानं लिहिलं आहे की हे पाऊल अशावेळी उचलण्यात आलं आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. विशेषकरून सामाईक जल संसाधनांबाबत भारताच्या कारवायांवरील चिंता तशीच आहे.

वृत्तपत्रानं लिहिलं आहे, "ही नियमित डिप्लोमॅटिक देवाण-घेवाण बुधवारी (31 डिसेंबर) ढाक्यामध्ये दोन्ही देशांच्या वरिष्ठ प्रतिनिधींमध्ये झालेल्या एका दुर्मिळ जाहीर बैठकीशी देखील जोडलेली होती."

"बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या राजकीय अंत्यसंस्काराच्या प्रसंगी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हस्तांदोलन करताना दिसले."

अर्थात परराष्ट्र मंत्रालयानं या भेटीला कोणत्याही प्रकारचं राजकीय महत्त्व देण्यास नकार दिला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की या बैठकीबाबत नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांच्या सार्वजनिक वक्तव्यांपलीकडे ते कोणतंही भाष्य करणार नाहीत.

जयशंकर म्हणाले, 'वाईट शेजारी'

दुसरीकडे, बांगलादेशातून परतलेल्या जयशंकर, 2 जानेवारीला आयआयटी मद्रासमधील एका कार्यक्रमात म्हणाले की जिथे चांगल्या शेजाऱ्यासारख्या संबंधांची भावना असते, तिथे भारत मदत करतो. मात्र जेव्हा 'वाईट शेजाऱ्यांचा' प्रश्न येतो तेव्हा भारताला आपल्या लोकांचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शुक्रवारी (2 डिसेंबर) आयआयटी मद्रासच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शुक्रवारी (2 डिसेंबर) आयआयटी मद्रासच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते

भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले, "तुमचे शेजारी वाईटदेखील असू शकतात. दुर्दैवानं, आपले आहेत...जर तुम्ही पश्चिमेकडे पाहिलं..."

जयशंकर म्हणाले, "तुमचे शेजारी वाईटदेखील असू शकतो. दुर्दैवानं, आपले आहेत. जेव्हा तुमचे शेजारी वाईट असतात...जर तुम्ही पश्चिमेकडे पाहिलं, जर एखाद्या देशानं ठरवलं की ते मुद्दाम, सातत्यानं आणि कोणत्याही पश्चातापाशिवाय दहशतवाद सुरू ठेवतील. तर आम्हाला आमच्या लोकांचं दहशतवादापासून रक्षण करण्याचा अधिकार आहे. आम्ही त्या अधिकाराचा वापर करू."

हस्तांदोलनामुळे खळबळ

जयशंकर आणि अयाज सादिक यांनी हस्तांदोलन केल्यावर 2 जानेवारीला डॉन, या पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रानं एक संपादकीय लिहिलं आहे.

डॉननं संपादकीय लेखात लिहिलं आहे, "हे एक असं हस्तांदोलन होतं, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात खळबळ निर्माण झाली. नक्कीच, हा एक महत्त्वाचा क्षण होता. यामुळे तीन देशांमध्ये लक्ष वेधलं. भारतातील प्रसारमाध्यमांनी या घटनेला कमी महत्त्व देत, ही अशा प्रसंगी होणारी एक सामान्य औपचारिक असल्याचं म्हटलं आणि हे महत्त्वाचं नसल्याचं सांगितलं."

"तर पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी हे लक्षात घेऊन की मे महिन्यात झालेल्या चकमकींनंतर दोन्ही देशांमधील हा पहिला उच्च-स्तरावरील संपर्क होता आणि नॅशनल असेंब्लीनं जारी केलेल्या वक्तव्याला प्रामुख्यानं महत्त्व दिलं."

"त्यात या गोष्टीवर जोर देण्यात आला की कथितरित्या हस्तांदोलन करण्याची आणि शिष्टाचारासाठी पुढाकार जयशंकर यांनी घेतला. त्यांनी अनौपचारिक अभिवादनासह सादिक यांच्याशी संपर्क केला."

जयशंकर आणि अयाज सादिक यांच्या हस्तांदोलनाबद्दल 2 जानेवारीला, डॉन या पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रानं एक संपादकीय लेख लिहिला आहे

फोटो स्रोत, @NAofPakistan

फोटो कॅप्शन, जयशंकर आणि अयाज सादिक यांच्या हस्तांदोलनाबद्दल 2 जानेवारीला, डॉन या पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रानं एक संपादकीय लेख लिहिला आहे

'डॉन'नं लिहिलं आहे, "यामध्ये रस घेण्यामागचं एक कारण हे असू शकतं की वर्षातील हा काळ न्यूज रूमसाठी तुलनेनं संथ असतो. दुसरं कारण असंदेखील असू शकतं की पाकिस्तान आणि भारतादरम्यान पुढे काय होणार, याबाबत सातत्यानं उत्सुकता आहे. तरीदेखील, सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन फक्त एका हस्तांदोलनातून खूप जास्त अर्थ काढू नये."

डॉननं लिहिलं आहे, "रंजक बाब अशी आहे की, 'हस्तांदोलना'वर नॅशनल असेंब्लीच्या सचिवालयाच्या वक्तव्यात म्हटलं आहे की पाकिस्ताननं सातत्यानं संवाद, संयम आणि सहकार्यात्मक उपायांवर भर दिला आहे. चर्चेचा मार्ग अजूनही खुला आहे, हा भारतासाठी याचा संकेत मानता येईल का? दुर्दैवानं, शेजारी देशाकडून आक्रमक वक्तव्यं आणि भूमिका बदलण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत."

"परिस्थिती निवळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र फक्त हस्तांदोलन आणि औपचारिक अभिवादनातून असं साध्य होणार नाही. त्यासाठी, विशेषकरून भारताकडून गांभीर्यानं प्रयत्न करण्याची आणि सर्वोच्च स्तरावरील मुत्सद्देगिरीची आवश्यकता आहे. तेव्हाच कोणत्याही प्रकारचं स्थैर्य किंवा मवाळपणाची आशा केली जाऊ शकते."

'हस्तांदोलन या प्रदेशासाठी चांगलं, मात्र यात अनेक जर-तर'

तर इस्लामाबादमधील परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक मुस्तफा हैदर सईद, अल जजीरा या कतारमधील प्रसारमाध्यमाला म्हणाले, "मला वाटतं की नव्या वर्षाच्या सुरुवातीला जयशंकर आणि अयाज सादिक यांच्यामध्ये झालेला हा संवाद ही एक स्वागतार्ह बाब आहे."

ते म्हणाले, "अधिकाऱ्यांचा आदर करणं आणि हस्तांदोलन करणं ही संबंधांमधील मूलभूत गोष्ट आहे. ही तर खूपच सामान्य बाब आहे. दुर्दैवानं ती भारत आणि पाकिस्तानमधील युद्धानंतर गायब झाली आहे."

पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत सरदार मसूद खान यांनी या हस्तांदोलनाला एक सुखद डिप्लोमॅटिक संकेत म्हटलं आहे.

खान अल जजीराला म्हणाले, ही कल्पना करणंही कठीण आहे की भारताचे परराष्ट्र मंत्री, भारताचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाची स्पष्ट परवानगी न घेता, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांना स्वत:हून अभिवादन करतील.

खान, संयुक्त राष्ट्रसंघ आणि चीनमध्ये देखील पाकिस्तानचे राजदूत राहिले आहेत. ते म्हणाले, "यामागे जे काही कारण असेल, मात्र ते या प्रदेशासाठी चांगलं आहे. मात्र पुढील मार्गात अनेक 'जर' आणि 'तर' आहेत."

पाकिस्तानच्या एका माजी मुत्सद्द्याचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असल्यावर भारत-पाकिस्तान तणाव कमी होणं कठीण आहे

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या एका माजी मुत्सद्द्याचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असल्यावर भारत-पाकिस्तान तणाव कमी होणं कठीण आहे

हिंदुस्तान टाइम्स या भारतीय वृत्तपत्राचे परराष्ट्रविषयक बाबींचे संपादक रेजाउल हसन लस्कर यांनी या संवादाला फारसं महत्त्व दिलं नाही.

लस्कर, अल जजीराला म्हणाले, "दोघेही एकाच खोलीत उपस्थित होते. अशा परिस्थितीत दोन देशांचे वरिष्ठ नेते जसं करतात, तसंच त्यांनी केलं. त्यांनी हस्तांदोलन केलं आणि औपचारिक अभिवादन केलं."

ते म्हणाले की हे 'महत्त्वाचं' आहे की या भेटीचे सर्व फोटो बांगलादेश आणि पाकिस्तानच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटमधून समोर आली, भारतातून नाही.

जयशंकर आणि अयाज सादिक यांनी हस्तांदोलन करणं, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जे घडलं त्याच्या अगदी उलट होतं.

त्यावेळेस आशिया कप स्पर्धेच्या वेळेस भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी त्यांच्या समकक्ष पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नव्हतं.

ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आली. भारतानं थरारक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून हा चषक जिंकला होता. या घटनेतून हे अधोरेखित झालं होतं की दोन्ही शेजारी देशांमधील संबंधांमध्ये किती कटुता आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)