कर्नल गद्दाफीच्या मुलाची लिबियातील राहत्या घरातच हत्या; कसे होते त्याचे पाश्चात्य देशांशी संबंध?

फोटो स्रोत, MAHMUD TURKIA/AFP via Getty Images
लिबियाचा माजी नेता कर्नल मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. लिबियामधील वृत्तसंस्थेनं त्यांच्या टीमच्या प्रमुखाचा संदर्भ देत ही बातमी दिली आहे.
एकेकाळी, सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांना त्यांच्या वडिलांचा उत्तराधिकारी मानलं जात होतं.
त्याच्या वकिलानं एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, चार जणांनी लिबियाच्या जिंतान शहरातील सैफ अल-इस्लाम गद्दाफीच्या घरावर हल्ला करून त्याची हत्या केली.
अर्थात, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मात्र, सैफ अल-इस्लाम गद्दाफीच्या मृत्यूबाबत त्याच्या बहिणीनं वेगळाच दावा केला. त्यांनी लिबियातील टीव्हीला सांगितलं की, सैफ अल-इस्लाम गद्दाफीचा मृत्यू लिबिया-अल्जीरिया सीमेजवळ झाला.
कर्नल मुअम्मर गद्दाफीनंतर, प्रदीर्घ काळ सैफ अल-इस्लाम गद्दाफीला लिबियातील सर्वात प्रभावशाली नेता मानलं जात होतं. लोकांमध्ये त्याची दहशत होती.
त्याचे वडील कर्नल मुअम्मर गद्दाफी याने 1969 ते 2011 लिबियावर राज्य केलं होतं. नंतर बंड झाल्यावर त्याला सत्तेतून हटवण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली.
सैफ अल-इस्लामचा जन्म 1972 मध्ये झाला होता. त्यानं 2000 पासून गद्दाफी राजवट संपेपर्यंत पाश्चात्य देशांबरोबर लिबियाचे संबंध सुधारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सैफ अल-इस्लाम गद्दाफीवर सरकारच्या विरोधातील आंदोलनं दडपण्यात मोठी भूमिका बजावल्याचा आरोप होता. मुअम्मर गद्दाफीच्या मृत्यूनंतर एका प्रतिस्पर्धी सशस्त्र गटानं सैफ अल-इस्लाम गद्दाफीला जिंतान शहरात जवळपास 6 वर्षे बंदी बनवून ठेवलं होतं.
मानवतेच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये दोषी
लिबियामध्ये 2011 मध्ये झालेली आंदोलनं दडपल्याबद्दल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला त्याच्या विरोधात मानवतेच्या विरोधातील गुन्ह्यांचा खटला चालवायचा होता.
लिबियातील एका न्यायालयानं 2015 मध्ये त्याला या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून त्याच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
सरकारमध्ये तो कोणत्याही अधिकृत पदावर नव्हता. मात्र, तरीदेखील सरकारची धोरण ठरवण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. अनेकदा उच्चस्तरावर होत असलेल्या चर्चेत देशाचं प्रतिनिधित्व तो करायचे.
यामध्ये अशा करारांचाही समावेश होता, ज्यामुळे त्याच्या वडिलांना लिबियाचा अणु कार्यक्रम थांबवावा लागला होता.

फोटो स्रोत, Mario Tama/Getty Images
या करारांनंतर उत्तर आफ्रिकेतील या देशावर लावण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानंतर काहीजणांनी गद्दाफीला बदलत्या लिबियाचा सुधारणावादी चेहरा मानलं होतं.
सैफ अल-इस्लाम गद्दाफी नेहमी म्हणायचा की, त्याला त्याच्या वडिलांची सत्ता वारसा म्हणून नको होती. त्याचं म्हणणं होतं की, सत्ता म्हणजे एखादं शेत नाही, जे वारशानं मिळतं.
अर्थात, 2021 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, ही निवडणूक नंतर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
वाघ पाळण्याचा होता छंद
सैफ अल-इस्लाम गद्दाफी उत्तम इंग्रजी बोलायचा. तो अतिशय स्टायलिश राहायचा. त्यामुळे त्याला लिबियाच्या सरकारचा सुधारणावादी चेहरा मानलं जात होतं.
सैफ अल-इस्लाम गद्दाफीला वाघ पाळण्याचा आवड होती. वाळवंटात ससाण्यांच्या मदतीनं शिकार करण्याचाही त्याला छंद होता. हे अरब राजघराण्यांचं जुने छंद आहेत. तो हौशी चित्रकारदेखील होता.
त्याला 2008 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पीएचडी केली होती. त्याला राजकीय सुधारणांचा मुद्दा मांडला होता. त्याच्या डॉक्टरेटमध्ये त्याने हाच विषय घेतला होता.

फोटो स्रोत, Reuters
आंदोलकांवर कारवाई करण्यामधील त्याची भूमिका समोर आल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे संचालक हॉवर्ड डेव्हिस यांनी राजीनामा दिला होता. यासाठीचं कारण ठरलं सैफने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सला दिलेली 3 लाख पौंडांची (अंदाजे 3 कोटी 71 लाख 88 हजार रुपये) देणगी.
धर्मादाय संस्थांकडून मिळालेल्या निधीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. सैफची पीएचडी चोरीची होती का? याची चौकशी झाली. मात्र, त्याची पदवी काढून घेतली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. कारण सैफच्या पीएचडीच्या थिसिसमध्ये ठिकठिकाणी सुधारणांच्या आवश्यकतेचा मुद्दा मांडण्यात आला होता.
लिबियाचे पाश्चात्य देशांबरोबरचे संबंध सुधारण्यातील भूमिका
सैफ अल-इस्लाम गद्दाफीने लिबियाचे पाश्चात्य देशांबरोबरचे संबंध सुधारण्यात मोठी भूमिका बजावली.
असं म्हटलं जातं की, सैफ अल-इस्लाम गद्दाफीला त्याच्या वडिलांच्या पैशांद्वारे पाश्चात्य देशांबरोबरचे संबंध सुधारले.
याव्यतिरिक्त, त्याने त्याच्या वडिलांबरोबर अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चा केली.
नंतर त्यांनी 6 बल्गेरियन डॉक्टरांची सुटका करण्यात मदत केली. या डॉक्टरांवर लिबियाच्या हॉस्पिटलमध्ये मुलांना एचआयव्हीची लागण केल्याचा आरोप होता. या पावलांमुळे त्यांची पाश्चात्य देशांशी जवळीक वाढली.

फोटो स्रोत, d MARKUS LEODOLTER/AFP via Getty Images
सैफ अल-इस्लाम गद्दाफीचं लंडनमध्ये देखील घर होतं. तो ब्रिटनच्या राजकारणातील लोकांना भेटायचा. तिथल्या राजघराण्याशी देखील त्याचा संपर्क होता.
त्यांनं ड्यूक ऑफ यॉर्क (ही ब्रिटनच्या राजघराण्यातील एक उच्च स्तरावरील पदवी आहे. ती 15 व्या शतकापासून ब्रिटनच्या राजाच्या दुसऱ्या पुत्राला दिली जाते.) यांची दोन वेळा भेट घेतली होती. एकदा बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणि दुसऱ्यांदा त्रिपोलीमध्ये.
लिबियामध्ये तेलाचे प्रचंड साठे असल्यामुळे पाश्चात्य देशांमधील शक्तिशाली लोकांना सैफ अल-इस्लाम गद्दाफीशी जवळीक साधायची होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











