एकाच जोडीदाराशी बांधील राहण्याची पारंपरिक पद्धत बाजूला सारणारं 'ओपन रिलेशनशिप' नक्की काय असतं?

आपल्या नात्यात मोकळेपणा आणूया असं सेक्सोलॉजिस्ट इलाना ईलिया यांनी आपल्या पतीला सांगितलं.

फोटो स्रोत, Ilana Eleá - Personal Archive

फोटो कॅप्शन, आपल्या नात्यात मोकळेपणा आणूया असं सेक्सोलॉजिस्ट इलाना ईलिया यांनी आपल्या पतीला सांगितलं.
    • Author, मरीना रॉसी
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

लेखिका आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर इलाना ईलिया यांनी लग्नाच्या 10 व्या वाढदिवशी आपल्या पतीसमोर एक आगळावेगळा विचार मांडला.

आयुष्यभर फक्त 'एकाच जोडीदाराशी बांधील राहण्याची' पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून त्यांनी आपल्या नात्यात थोडा 'मोकळेपणा' आणण्याविषयीचं आपलं म्हणणं मांडलं.

म्हणजेच पतीसमोर त्यांनी ओपन रिलेशनशिपचा प्रस्ताव मांडला.

त्यांच्या या एका निर्णयाने त्यांचं वैवाहिक आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे.

मूळच्या ब्राझीलच्या असलेल्या इलाना यांनी सेक्स थेरपीमध्ये शिक्षण घेतलेलं असून त्या 2011 पासून स्वीडनमध्ये राहतात.

त्या जेव्हा 'एम्मा ई ओ सेक्सो' (एम्मा आणि सेक्स ) ही आपली पहिली कथामालिका लिहित होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात 'ओपन रिलेशनशिप'चा विचार घोळत होता आणि त्याबद्दल त्या माहिती गोळा करत होत्या.

पुस्तकातील 'एम्मा' या पात्राच्या निमित्ताने, इलाना यांनी आपल्या मनातील त्या विचारांना पडताळून पाहिलं ज्यावर त्या अनेक दिवस संशोधन करत होत्या.

विशेष म्हणजे, त्यांच्या पतीने ही कल्पना धुडकावून न लावता तिचा स्वीकार केला आणि दोघांनी शॅम्पेन पिऊन या नव्या निर्णयाचा आनंदही साजरा केला.

पाच वर्ष उलटल्यानंतर आता हे पती-पत्नी आपल्या नात्याला एक 'मिश्र स्वरूप' देत आहेत आणि हा बदल त्यांच्यासाठी खूप यशस्वी ठरला आहे, असं मानतात.

पण इलाना या गोष्टीचे उगाच खूप गोडवे गात नाहीत किंवा ते खूप रोमँटिक आहे असं दाखवत ही नाहीत.

त्या स्पष्ट सांगतात, "जेव्हा चालू असलेल्या नात्यात अशी ओपन रिलेशनशिप आणली जाते, तेव्हा 100 पैकी साधारण 33 नाती टिकत नाहीत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पारंपरिक किंवा एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या नात्यांमध्येही घटस्फोटाचं प्रमाण इतकंच आहे.

म्हणजेच नातं टिकणं किंवा तुटणं हे केवळ 'ओपन रिलेशनशिप'वर अवलंबून नसतं. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीच्या नात्यात जास्त समाधान आणि आपलेपणा वाटतो, तोच मार्ग निवडणं कधीही उत्तम.

एकमेकांच्या संमतीने जपलेला मोकळेपणा

इलाना ईलिया 'कन्सेनश्युअल-नॉन-मोनोगामी' या विचारावर विश्वास ठेवतात.

सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांसोबत भावनिक किंवा शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा त्याला हे नाव दिलं जातं.

यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे सर्वांची संमती. यात सामील असलेल्या प्रत्येकाला याबाबतची पूर्ण कल्पना असते आणि कोणाचीही फसवणूक केली जात नाही.

म्हणूनच तज्ज्ञ याला 'धोका देणं' न म्हणता, 'प्रामाणिकपणे किंवा जबाबदारीनं जपलेलं मोकळं नातं' असं म्हणतात.

इलाना म्हणतात, "असं कोणतंही नातं जिथे जोडीदारांनी एकमेकांच्या संमतीने ठराविक नियम शिथिल केले आहेत, त्याचा समावेश यात होतो.

मग ते नातं शारीरिक असो, भावनिक असो किंवा रोमँटिक. यात पारंपरिक बंधने पाळण्याऐवजी एकमेकांच्या सोयीनुसार नात्यात लवचिकता आणली जाते."

ओपन रिलेशनशिप आणि पॉलीएमरी यातील फरक

इलाना 'ओपन रिलेशनशिप' आणि 'पॉलीएमरी' या दोन गोष्टींमधील फरक स्पष्ट करून सांगतात.

त्या म्हणतात, "ओपन रिलेशनशिप म्हणजे सहसा प्रेमात न पडता फक्त शारीरिक स्वातंत्र्य असणं जिथे गोष्टी हलक्या-फुलक्या असतात आणि त्यात भावनिक गुंतवणूक नसते.

पण पॉलीएमरीमध्ये प्रेम आणि ओढ या दोन्ही गोष्टी असतात. यात पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याचा जो उत्साह असतो, तोही अनुभवायला मिळतो."

इलाना 'ओपन रिलेशनशिप' आणि 'पॉलीएमरी' या दोन गोष्टींमधील फरक स्पष्ट करून सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इलाना 'ओपन रिलेशनशिप' आणि 'पॉलीएमरी' या दोन गोष्टींमधील फरक स्पष्ट करून सांगतात.

इलाना स्वतःचं नातं कसं आहे, हे सांगताना म्हणतात की, ते नातं 'समजूतदारपणाचं आणि प्रेमाचं मिश्रण' आहे.

त्या पुढे सांगतात, "मी एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम करण्याच्या विचाराला जास्त महत्त्व देते.

पण माझ्या पतीला मात्र कोणत्याही भावनिक गुंत्याशिवाय असणारे साधे, कॅज्युअल संबंध जास्त आवडतात. आम्ही आमच्या या आवडीनिवडींवर एकमेकांशी सतत संवाद साधत असतो."

आपल्या नात्याचा विचार करा

इलाना यांच्या अनुभवानुसार, जी जोडपी नात्यात असा मोकळेपणा आणू इच्छितात, ते सुरुवातीला एक सोपा नियम पाळतात. 'तू मला काही सांगायचं नाही आणि मी तुला काहीही विचारणार नाही.'

तज्ज्ञ असं सांगतात की, नात्यात ओपन रिलेशनशिप आणण्याआधी जोडीदाराशी बसून नीट मनमोकळं बोलणं खूप महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञ असं सांगतात की, नात्यात ओपन रिलेशनशिप आणण्याआधी जोडीदाराशी बसून नीट मनमोकळं बोलणं खूप महत्त्वाचं आहे.

त्या सोप्या भाषेत सांगतात की, ही जोडपी एकमेकांना असं म्हणतात, "मला वाटतंय की आपण एकमेकांशी पूर्णपणे बांधील राहणं आता शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. पण मला त्याबद्दल काहीच जाणून घ्यायचं नाही. तू मला काही सांगायचं नाही आणि मी तुला काही विचारायचं नाही."

पण इलाना या पद्धतीबद्दल एक इशाराही देतात. त्या म्हणतात की हे मॉडेल सहसा अपयशी ठरतं. कारण, यात प्रामाणिकपणा आणि संवादाची कमी असते.

ज्या गोष्टीमुळे जोडप्याने एकमेकांच्या जवळ यायला हवं, तीच गोष्ट उलट त्यांच्यात अंतर निर्माण करते.

आधी स्वतःच्या मनाचा अंदाज घ्या

जोडीदाराकडे हा विषय काढण्यापूर्वी इलाना स्वतःच्या मनाचा कानोसा घेण्याचा सल्ला देतात.

त्या म्हणतात, "शांतपणे आपल्या नात्याचा विचार करा. या नात्यात आपल्याला नक्की कशाची उणीव भासतेय? तुमच्या नेमक्या इच्छा काय आहेत आणि तुमच्या मर्यादा काय? तुमच्या मनातल्या सगळ्या कल्पना प्रामाणिकपणे कुठेतरी लिहून काढा.

नात्यात असा बदल घडवून आणण्यासाठी संवाद आणि एकमेकांबद्दल सहानुभूती असणं खूप गरजेचं आहे.

डॉक्टर इलाना सांगतात, "असा प्रस्ताव मांडणं हा खरंच एक नाजूक आणि कठीण क्षण असतो. खासकरून अशा लोकांसाठी ज्यांच्यावर लहानपणापासून हेच संस्कार झाले असतात की, 'एकाच व्यक्तीशी आयुष्यभर बांधील राहणं' म्हणजेच खरं प्रेम, आदर आणि निष्ठा होय."

त्या असंही म्हणतात, "असे मोठे निर्णय घेताना एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं खूप गरजेचं आहे. आपण नक्की कुठपर्यंत जाऊ शकतो? आपल्या मर्यादा काय असतील? कोणासोबत नातं ठेवायचं?

या गोष्टी आधीच ठरवून घेतल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकमेकांनी आखून दिलेल्या या मर्यादांचा आदर करायला हवा. त्यांची चेष्टा करू नका."

इलाना यांनी जेव्हा त्यांच्या लग्नातील या बदलाविषयी जगाला सांगितलं, तेव्हा हजारो लोकांनी त्यांच्यावर टीका केली.

फोटो स्रोत, Erik Thor/Personal archive

फोटो कॅप्शन, इलाना यांनी जेव्हा त्यांच्या लग्नातील या बदलाविषयी जगाला सांगितलं, तेव्हा हजारो लोकांनी त्यांच्यावर टीका केली.

इलाना यांच्यामते, अशा बदलांच्या काळात तुम्हाला मानसिक साथ देणारे मित्र किंवा एखादा ग्रुप सोबत असणं खूप मोलाचं ठरतं.

त्या सल्ला देतात की, या विषयावर माहिती देणारी पुस्तकं वाचा किंवा पॉडकास्ट ऐका. तुमच्यासारखाच विचार करणाऱ्या लोकांमध्ये मिसळा.

खरं तर आजही समाज अशा नात्यांकडे विचित्र नजरेनंच पाहतो, हे वास्तव आहे. म्हणूनच, जे तुमच्या भावना समजून घेतील आणि ज्यांना हे मान्य आहे की प्रेम करण्याची ही पद्धत सुद्धा पूर्णपणे योग्य असू शकते, अशा तज्ज्ञांची मदत घ्या.

शेवटी त्या एक लाखमोलाचा सल्ला देतात की, "जर तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही हा मार्ग निवडत असाल, तर त्याचा विचारही करू नका. हा काही नात्यावरचा उपचार किंवा नातं वाचवण्याचा शेवटचा उपाय नाही.

खरं तर, 'ओपन रिलेशनशिप'चा निर्णय तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा पती-पत्नीचं नातं आधीपासूनच खूप छान आणि मजबूत असतं. आणि त्यांना ते अजून जास्त आनंदी बनवायचं असतं."

तिरस्कार आणि नवी आशा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेव्हा इलाना यांनी पहिल्यांदा आपल्या वैवाहिक आयुष्यातील या बदलाविषयी जाहीरपणे सांगितलं, तेव्हा त्यांना हजारो द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला.

त्यातील काही कमेंट्स तर अगदीच विचित्र होत्या उदा. 'तू हे सगळं फक्त तुझ्या पतीला गमावू नये म्हणून करतेयस'. पण दुसरीकडे त्यांना खूप पाठिंबाही मिळाला. अनेक जोडप्यांनी त्यांना पत्र लिहून सांगितलं की, इलाना यांच्यामुळेच त्यांना अशा विषयावर एकमेकांशी बोलण्याची हिंमत मिळाली."

इलाना एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, त्या म्हणतात, "कोणताही माणूस जन्मतः एकनिष्ठ नसतो. आपण असं बनायला हवं की नाही, हे आपल्याला कोणी विचारतच नाही.

आपले कायदे, परंपरा, परीकथा आणि घरच्यांच्या अपेक्षा हे सगळं आपल्याला लहानपणापासून हेच शिकवतं की प्रेम फक्त दोन व्यक्तींमध्येच असायला हवं. इतिहासात पुरुषांना नेहमीच थोडं स्वातंत्र्य मिळालं, पण स्त्रियांनी असं काही केलं तर त्यांना मात्र नेहमी शिक्षाच दिली गेली."

इलाना यांच्या मते, एकाच जोडीदाराशी आयुष्यभर बांधील राहण्याची ही पद्धत केवळ संपत्तीचा वारसा, धर्म आणि आपली वंशपरंपरा जपण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

त्या म्हणतात, "आपल्या समाजात अशी एक ठाम समजूत आहे की, फक्त एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हेच खूप पवित्र आणि चांगलं असतं. त्यामुळे जो कोणी या चौकटीबाहेर जाऊन वेगळा विचार करतो, समाज त्याला 'चूक' किंवा 'वाईट' ठरवतो."

जेव्हा इलाना यांनी पहिल्यांदा आपल्या वैवाहिक आयुष्यातील या बदलाविषयी जाहीरपणे सांगितलं, तेव्हा त्यांना हजारो द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेव्हा इलाना यांनी पहिल्यांदा आपल्या वैवाहिक आयुष्यातील या बदलाविषयी जाहीरपणे सांगितलं, तेव्हा त्यांना हजारो द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला.

मग आता इलाना खरोखरच आनंदी आहेत का?

त्या मोठ्या अभिमानाने सांगतात, "हो, नक्कीच! यात तिळमात्र शंका नाही."

त्या पुढे स्पष्ट करतात, "पण मी आज ज्या परिस्थितीत आहे, त्यानुसार माझा हा विचार आहे. 15 वर्षांपूर्वी जर माझ्यासोबत कोणी फसवणूक केली असती किंवा माझ्या मनाला काही दुखापत झाली असती तर मी या 'ओपन रिलेशनशिप'साठी कधीच तयार झाले नसते.

तेव्हा मला फक्त एकाच जोडीदाराशी बांधील राहण्यात सुरक्षित वाटायचं. पण काळानुसार एकमेकांबद्दलची ओढ कमी होत गेली. हे अगदी नैसर्गिक आहे. जगभरात अशी 40 टक्के नाती आहेत, जी खूप वर्ष एकत्र राहिल्यानंतर केवळ नावालाच उरतात. त्यात शारीरिक ओढ किंवा प्रेम उरलेलं नसतं."

त्यांच्या मते, नात्यात असा मोकळेपणा आणणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि खरं स्वातंत्र्य मिळवणं होय.

त्या शेवटी एक मनाला भिडणारा प्रश्न विचारतात, "फक्त समाज सांगतो तशा एकाच पद्धतीनं आपण प्रेम करत नाही, म्हणून एखाद्याचं प्रेम संपलं असं म्हणता येईल का?"

लग्नाच्या 10 वर्षांनंतर इलाना यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटू शकतो, पण त्यांच्यासाठी तो स्वातंत्र्याचा मार्ग होता. शेवटी सुखी संसाराची व्याख्या समाज नाही, तर आपण स्वतःच ठरवायला हवी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)