नेहरूंचा आदर आणि विरोधही; काँग्रेसला पर्याय हवा म्हणून विरोधी पक्षाला पाठिंबा देणारे जे. आर. डी. टाटा

आर्थिक धोरणांबाबत जेआरडी टाटा आणि नेहरू एकमेकांचा आदर करत असत.

फोटो स्रोत, Tata Memorial Archives

फोटो कॅप्शन, आर्थिक धोरणांबाबत जेआरडी टाटा आणि नेहरू एकमेकांचा आदर करत असत.
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

1 ऑगस्ट 1953 रोजी जेआरडी टाटांची मनःस्थिती बिघडली होती. कारण त्या दिवशी संसदेनं 9 खासगी विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्याचे दोन सरकारी विमान कंपन्यांमध्ये रूपांतर केले होते.

त्या दोन विमान कंपन्या म्हणजे एअर इंडिया इंटरनॅशनल आणि इंडियन एअरलाइन्स होत्या.

या नऊ विमान कंपन्यांपैकी दोनची स्थापना जेआरडी यांनी केली होती. त्यातील एका विमान कंपनीचे मालक घनश्यामदास बिर्ला होते.

कदाचित बिर्ला यांना त्यांच्या भारत एअरवेजला सरकारने ताब्यात घेतल्याची चिंता नव्हती. परंतु, जेआरडी त्या दिवशी खूप दुःखी होते.

जेआरडी यांनी टाटा एअरलाइन्स उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. कंपनीवर सरकारी नियंत्रण येऊ नये यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते.

विमान कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा दुरान्वये संबंध नव्हता. त्यामुळे ती कंपनी कशी चालवावी याची त्यांना माहिती नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता.

"तुम्ही टिस्को, टेल्को आणि टाटा समूहाच्या इतर 50 कंपन्यांपेक्षा विमान कंपनीला जास्त वेळ देत आहात," असं त्यांचे सहकारी त्यांना नेहमी म्हणत असत.

आता तीच कंपनी सरकार ताब्यात घेणार होती. वारंवार दिल्ली वारी करूनही कंपनी वाचवण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न फसले होते.

गीता पिरामल या त्यांचं पुस्तक 'बिझनेस लिजेंड्स' मध्ये लिहितात, "सुरुवातीला रफी अहमद किडवाई, नंतर जगजीवन राम आणि अगदी जवाहरलाल नेहरू यांनीही टाटांचा विश्वासघात केला होता. संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या विरोधात एकत्र आलं होतं."

"फक्त एक गोष्ट मनाला दिलासा देण्यासारखी होती ती म्हणजे, नेहरूंनी जेआरडी यांना विमान उद्योगापासून पूर्णपणे दूर ठेवलं जाणार नाही, याची खात्री केली होती.

त्यांनी जेआरडी यांना एअर इंडियाचे अध्यक्ष आणि इंडियन एअरलाइन्सचे संचालक बनवलं होतं. पण तरीही जेआरडी आणि नेहरू यांच्यातील संबंध कायमचे बिघडले होते."

नेहरू आणि टाटा यांचे एकमेकांना संदेश

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जवाहरलाल नेहरू यांनी टाटांना सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला होता.

राष्ट्रीयीकरण करण्याच्या काही महिन्यांपूर्वी नेहरू यांनी जेआरडी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, "जेव्हा तुम्ही दुपारच्या जेवणासाठी आला होता, तेव्हा तुमचं दुःख पाहून मला खूप वाईट वाटलं.

टाटाबद्दल बोलायचं झालं तर, या कंपनीबद्दल मला किती आदर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु, टाटांना जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा तुम्ही केलेला आरोप ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं."

"माझं मत आहे की, धोरणांनुसार सर्व परिवहन सेवांवर सरकारचं नियंत्रण असायला हवं. हे खूप आधी व्हायला हवं होतं. पण आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते. तरीही, एअर इंडिया इंटरनॅशनलला हात लावायचा आमचा अजिबात विचार नव्हता."

"या विषयावर विचार करण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळाची एक समिती स्थापन केली होती. राष्ट्रीयीकरण करताना एअर इंडिया इंटरनॅशनलला वेगळं ठेवणं कठीण होईल, अशी त्यांची शिफारस होती.

"या प्रकरणात आम्हाला तुमची मदत हवी आहे. यामागे दुसरा कुठलाही हेतू आहे असं समजणं चुकीचं आहे. तुमच्यासारख्या जुना मित्राचा असा गैरसमज झाल्याने मला खूप वेदना होत आहेत."

नेहरूंनी हे पत्र 10 नोव्हेंबर 1952 रोजी लिहिलं होतं. टाटांना पत्र मिळताच त्यांनी तत्काळ तार पाठवून उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं की, "आपल्याला वाटत असेल की, माझ्या अडचणीत मी कोणाबद्दल अन्यायाने बोललो असेल, तर मला त्याचं दुःख आहे. मी आपल्याशी स्पष्ट बोलण्यामागची माझी इच्छा ही परिवहन क्षेत्रातील सरकारी निर्णयांबद्दलचं माझं स्पष्ट मत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता."

त्याच्या 9 महिन्यांनंतर सरकारने सर्व खासगी विमान कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं. घनश्यामदास बिर्ला काँग्रेस नेतृत्वाच्या खूप जवळचे होते. परंतु, जेआरडी यांनी जाणीवपूर्वक आपली कंपनी काँग्रेसपासून दूर ठेवली होती.

जेव्हा जेआरडी टाटा यांनी कराचीहून पहिल्यांदा मुंबईला विमान चालवत आणलं होतं.

फोटो स्रोत, Tata Memorial Archives

फोटो कॅप्शन, जेव्हा जेआरडी टाटा यांनी कराचीहून पहिल्यांदा मुंबईला विमान चालवत आणलं होतं.

अनेक वर्षांनंतर जेआरडी यांनी एका भाषणात मान्य केलं होतं की, "स्वातंत्र्यापूर्वी जवाहरलाल नेहरू हे माझे हिरो होते. त्यांच्याबद्दलचा माझा आदर आणि निष्ठा शेवटपर्यंत कमी झाली नाही. पण ते सत्तेत आल्यानंतर आमच्या विचारांमधला फरक स्पष्ट दिसू लागला."

"नेहरूंनाही माहीत होतं की, त्यांच्या बहुतांश आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांशी मी सहमत नव्हतो. मला आठवतं, एकदा माझा नेहरूंशी जोरदार वाद झाला होता. नेहरू म्हणाले होते की त्यांना 'नफा' (प्रॉफिट) या शब्दाचा तिरस्कार आहे. तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'जवाहरलाल, मी तर सरकारी कंपन्यांनी (पब्लिक सेक्टर्स) नफा कमवावा याबद्दल बोलत होतो.'

यावर नेहरू म्हणाले, 'माझ्यासमोर कधीही 'नफा' हा शब्द वापरू नका. हा एक वाईट शब्द आहे."

नेहरूंसोबतचे संबंध सुधारण्यापेक्षा जेआरडी यांनी स्वतःला देशाच्या राजकारणापासून दूर ठेवलं.

नेहरूंनी 1948 मध्ये पॅरिसमधील संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी जेआरडी यांना भारताचे प्रतिनिधी बनण्याची ऑफर दिली.

त्या वर्षी जेआरडी यांनी नेहरूंचा प्रस्ताव मान्य केला. पण पुढच्या वर्षी नेहरूंनी पुन्हा बोलावले तेव्हा त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही.

त्यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "भारतातच करण्यासारखं खूप काही आहे. बाहेर जाऊन लांबलचक भाषणं ऐकणं म्हणजे वेळ वाया घालणं आहे."

नेहरूंनी त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन रेअर अर्थ कंपनीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला, पण जेआरडी यांनी तो प्रस्तावही स्वीकारला नाही.

गीता पिरामल यांनी लिहिलं आहे की, "कदाचित जेआरडी यांना याबाबत दूरदृष्टी नव्हती. त्यांनी या प्रतिष्ठित प्रस्तावांना नकार देण्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर होणारा परिणाम आणि जो संदेश जात आहेत, याचा अंदाज नव्हता. नंतर टाटांनी असं करून चूक तर केली नाही ना असं स्वतः मान्य केलं."

टीटी कृष्णामचारी होते टाटांचे समर्थक

1953 मध्ये एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणानंतर जेआरडी यांना आणखी धक्का बसला. कारण 1956 मध्ये सरकारने त्यांच्या कंपनीच्या विमा उद्योगाचंही राष्ट्रीयीकरण केलं.

त्याच वर्षी सरकारने काही ऊर्जा कंपन्यांचंही राष्ट्रीयीकरण केलं. पण टाटांच्या वीज कंपन्यांना यातून वगळण्यात आलं.

जेव्हा बिहार भूमी सुधार कायदा संमत झाला, तेव्हा त्यात जमशेदपूरचा समावेश केला गेला नाही आणि टिस्को टाउनशिप टाटांच्याच नियंत्रणात राहिली.

जेआरडी यांनी टिस्कोची क्षमता दुप्पट केली. त्यांच्या कंपनीने ट्रकही बनवायला सुरूवात केले.

नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांमुळे जेआरडी यांचा भ्रमनिरास झाला असला तरीही, नेहरूंच्या मंत्रिमंडळातील एका व्यक्तीचा जेआरडी नेहमी आदर करत असत. त्यांचं नाव होतं टीटी कृष्णामचारी.

नेहरूंनी 1955 मध्ये त्यांना पोलाद मंत्री केलं होतं. नंतर जेआरडी यांनी याबद्दल म्हटलं की, "टीटीके कडक, रागीट होते, पण ते निर्णय घेणारे होते. मी अशा मोकळ्या विचारांचे व्यक्ती आजपर्यंत पाहिले नाहीत.

इतर अनेक बाबतीत ते खूप ठाम आणि जबरदस्त होते. पण त्यांच्या ताकदीमुळेच ते नेहरूंच्या समाजवादी धोरणाचा विरोध करू शकत होते."

"कदाचित यामागचं कारण असंही असेल की, तेही एकेकाळी उद्योजक होते. ते पोलाद मंत्री असताना त्यांनी मला बोलावून जमशेदपूरमधील उत्पादन दुप्पट करण्यास सांगितलं होतं. नंतर ते उद्योग मंत्री झाले तेव्हा त्यांनी आम्हाला ट्रक बनवायलाही प्रोत्साहन दिलं."

जेआरडी स्वतंत्र पक्षाच्या बाजूने उतरले

1961 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांनी जेआरडी यांना पक्षाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

टाटा समूहात मीनू मसानी स्वतंत्र पक्षाच्या बाजूने होते. पण नवल टाटा यांचा सल्ला होता की, जेआरडी यांनी राजाजींना उघडपणे समर्थन देऊ नये. कारण त्यामुळे नेहरू नाराज होऊ शकतात.

जेआरडी यांनी दोन महिने या प्रस्तावावर विचार केला. 15 जुलैला त्यांनी राजाजींना पत्र लिहिले आणि म्हटलं, "आम्हालाही जाणवलं आहे की, कम्युनिस्ट पक्ष हा काँग्रेसचा एकमेव पर्याय नाही. भारत खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने तेव्हाच चालू शकेल जेव्हा इथे एकापेक्षा जास्त विरोधी पक्ष असतील आणि ते ना फार उजवे असतील, ना फार डावे."

"जेआरडी यांनी राजाजींना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं, पण त्यांनी असंही स्पष्ट केलं की, ते काँग्रेसलाही समर्थन देत राहतील, कारण काँग्रेसने देशाला राजकीय स्थैर्य दिलं आहे."

स्वतंत्र पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी टाटांनी इतका वेळ घेतला, कारण ते सर्व गोष्टी पारदर्शकपणे करण्यावर विश्वास ठेवत होते.

जेआरडी यांनी विचार केला की, त्यांच्या या निर्णयाबद्दल नेहरूंना इतरांकडून कळण्यापेक्षा थेट त्यांच्याकडून ऐकलेलं चांगलं. पण हे ऐकताच नेहरू नाराज झाले. त्यांनी जेआरडी यांना पत्र लिहून म्हटलं, 'हे करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही.'

जेआरडी टाटा

फोटो स्रोत, Getty Images

आर. एम. लाला यांनी जेआरडींच्या 'बियाँड द लास्ट ब्लू माउंटन' या चरित्रात लिहिलं आहे की, "जेआरडींना माहीत होतं की, नेहरूंना त्यांचा हा निर्णय आवडणार नाही. पण ते इतके नाराज होतील, याची त्यांना कल्पनाही नव्हती."

"16 ऑगस्ट 1961 रोजी जेआरडींनी नेहरूंना पत्र लिहून स्पष्ट केलं की, स्वतंत्र पक्षाला पाठिंबा देणं म्हणजे काँग्रेसला पाठिंबा थांबवणं नाही. पण काँग्रेस आणि सरकारच्या आर्थिक धोरणांशी मी सहमत नाही. माझ्या मते, स्वातंत्र्यानंतर आपण ज्या प्रकारे एकाच पक्षाच्या राजवटीखाली राहिलो, ते देशासाठी चांगलं नाही."

"काँग्रेसला खरा पर्याय बनू शकणारा एकच पक्ष आहे, आणि तो म्हणजे स्वतंत्र पक्ष. शिवाय या पक्षात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये घालवलं आहे."

"आमच्या विचारांबद्दल किंवा उद्दिष्टांबद्दल तमच्या मनात कोणताही गैरसमज नसावा. माझ्या मनात तुमच्याबद्दलच्या भावनांमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि तुमच्याप्रती माझी निष्ठा तशीच राहील. कृपया या पत्राला उत्तर देण्याची तसदी घेऊ नका."

पण तरीही नेहरू यांनी या पत्राला उत्तर देताना लिहिलं की, "तुम्हाला हवं तसं तुम्ही स्वतंत्र पक्षाला मदत करू शकता, त्यासाठी तुम्ही मोकळे आहात. परंतु मला वाटत नाही की स्वतंत्र पक्ष मजबूत विरोधी पक्ष बनण्याच्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. मला वाटतं, पुढच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तुम्ही तुमच्या निर्णयावर निराश व्हाल."

इंदिरा गांधी यांची टाटांबाबत उदासीन भूमिका

नेहरू योग्य होते. अवघ्या दशकभरातच स्वतंत्र पक्षाला उतरती कळा लागली. नेहरूंप्रमाणेच, इंदिरा गांधींचीही जेआरडी टाटांशी मैत्री होती. परंतु, त्यांच्यात परस्पर विश्वासाचा अभाव होता.

आर. एम. लाला लिहितात, "जेआरडी जेव्हा इंदिरा गांधींशी आर्थिक धोरणांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असत, तेव्हा काही मिनिटांनंतर त्या एकतर कागदावर चित्रं काढायला लागायच्या किंवा पत्रांचे लिफाफे उघडायला लागायच्या."

"जेआरडी यांनी मला सांगितलं की, एकदा त्यांनी असं केल्यावर, त्यांच्यासोबत असलेल्या शरोख साबवाला यांना इंदिरा गांधी यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले की, 'त्यांना आपल्या चर्चेमध्ये काहीच रस नाही, आपण त्यांना बोर (कंटाळा) करत आहोत.' यावर इंदिरा गांधींनी नजर वर करून म्हणाल्या, 'नाही, नाही, मला कंटाळा आलेला नाही. मी ऐकत आहे.'"

पण जेआरडी यांनी आणीबाणीला समर्थन दिले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'आणीबाणीमुळे देशात शिस्त आली आहे, असं सांगितलं. ' अनेक लोकांना टाटांनी इंदिरा गांधींना दिलेला सार्वजनिक पाठिंबा आवडला नाही."

जेआरडी टाटा यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं.

फोटो स्रोत, TATA Memorial Archive

फोटो कॅप्शन, जेआरडी टाटा यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं.

मोरारजी देसाईंनी जेआरडींना पदावरून हटवलं

1977 मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी सर्वात प्रथम जेआरडी यांना अणू ऊर्जा आयोगवरून हटवलं.

मोरारजी देसाईंच्या एका सहीमुळे भारतीय अणू कार्यक्रम आणि टाटांचा 1948 पासून असलेला संबंध तुटला.

दि. 3 फेब्रुवारी 1978 रोजी टाटांना आणखी एक धक्का बसला. माजी हवाई दल प्रमूख एअर मार्शल पी. सी. लाल हे टाटा यांच्या इंडियन ट्यूब कंपनीचे प्रमुख होते. त्यांना सरकारने एअर इंडियाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितल्याचं लाल यांनीच टाटा यांना सांगितलं.

जेआरडी यांना त्यांच्या बडतर्फीची माहिती सायंकाळच्या आकाशवाणीवरील बातमीतून समजली. एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. जी. अप्पूस्वामी आणि त्यांचे उपसंचालक नरी दस्तूर यांनी याचा विरोध म्हणून राजीनामा दिला. दोन्ही विमान कंपनींच्या कामगार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला.

दि. 7 फेब्रुवारी रोजी मोरारजी देसाईंनी टाटांना पत्र लिहिलं, "आम्ही पी. सी. लाल यांना एअर इंडियाचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही पी. सी. लाल यांना चांगलं ओळखता. मला आशा आहे की, तुम्ही आमच्या निवडीशी सहमत असाल, तुम्हाला एअर इंडियाचे अध्यक्षपद सोडावं लागल्याने आम्हाला खूप दुःख होत आहे."

टाटांनी पत्राला उत्तर देत लिहिलं की, "दोन आठवड्यांपूर्वीच मी तम्हाला भेटलो होतो. आपण अनेक विषयांवर चर्चा केली. परंतु, आपण या बदलाबद्दल माझ्याकडे एकदाही उल्लेख केला नाही."

1977 मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी जेआरडी यांना अणू ऊर्जा आयोगवरून हटवलं.

फोटो स्रोत, Tata Memorial Archives

फोटो कॅप्शन, 1977 मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी जेआरडी यांना अणू ऊर्जा आयोगवरून हटवलं.

1992 मध्ये भारतरत्न

इंदिरा गांधींनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत जेआरडी यांना पत्र लिहिलं आणि, "एअर इंडियाच्या विकासात तुम्ही दिलेलं योगदान नेहमी स्मरणात राहील," असं म्हटलं.

1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. तेव्हा जेआरडी त्यांना भेटायला गेले.

त्यांनी इंदिरा गांधींना म्हटलं की, "अत्यंत प्रामाणिकपणे देशाची सेवा करूनही आणि सरकारला सहकार्य करूनही, लागोपाठचे दोन सरकार माझ्याशी अनपेक्षितपणे वागले हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे."

वर्ष 1992 मध्ये जेआरडी टाटा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले.

फोटो स्रोत, Tata Memorial Archives

फोटो कॅप्शन, वर्ष 1992 मध्ये जेआरडी टाटा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी त्यांना आठवण करून दिली की, ते त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरूंच्या खूप जवळ होते. जवाहरलाल नेहरूंसोबत त्यांची मैत्री होती, आणि नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा सगळा स्नेह इंदिरा गांधींकडे गेला, जो आजही कायम आहे. त्यांचा माझ्या आणि माझ्या कंपनीबद्दलचा दृष्टिकोन उदासीन आहे, याचं मला खूप वाईट वाटतं.

इंदिरा गांधी यांचं यावर उत्तर होतं, "आता अशी काही गोष्ट नाही."

काही दिवसांनंतर जेआरडी टाटा यांना पुन्हा एकदा एअर इंडियाचे बोर्ड सदस्य करण्यात आले.

वर्ष 1992 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पी. व्ही नरसिंह राव हे भारताचे पंतप्रधान होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)