लहानपणीचे क्षण आपल्याला आठवत का नाहीत? संशोधन काय सांगतं?

बाळ असतानाच्या गोष्टी आपल्याला आठवत का नाहीत? संशोधकांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मारिया झाक्कारो
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

ज्या दिवशी आपला जन्म झाला, आपलं पहिलं पाऊल, पहिला शब्द या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या असतात. तरीही आपल्याला या गोष्टी आठवत नाहीत. असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

आपल्याला लहानपणीच्या आठवणी आठवतात पण जेव्हा आपण बाल्याअवस्थेत किंवा अर्भक अवस्थेत असतो, तेव्हाचे क्षण आपल्याला आठवत नाहीत.

न्यूरोसायन्टिस्ट आणि सायकोलॉजिस्ट हा प्रश्न अनेक दशकांपासून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्या लहानपणीच्या काही घटनांची आठवण न येणं म्हणजेच याला 'इन्फटाईल अॅम्नेसिया' म्हणतात. याची कारणं समजावून सांगण्यासाठी अनेक सिद्धांत तयार केले गेले आहेत.

अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्र आणि न्यूरोसर्जरीचे प्राध्यापक निक टर्क-ब्राउन म्हणतात की, या विषयावरचा मुख्य वाद दोन प्रश्नांवर केंद्रित आहे: आपण लहानपणी आठवणी तयार करतो, पण नंतर त्या आठवू शकत नाही, किंवा आपल्या फक्त मोठं झाल्या नंतरच्याच आठवणी तयार होतात का?

प्रा. टर्क-ब्राउन यांच्या मते, गेल्या दहा वर्षांपर्यंत संशोधकांनी मुख्यत्वे असं गृहीत धरलं होतं की, लहान मुलं आठवणी तयार करत नाहीत. काही जणांचा असा विश्वास होता की, त्यांना पूर्णपणे 'स्वतःची ओळख' नसल्यामुळे किंवा बोलण्याची क्षमता नसल्यामुळे आठवणी तयार होत नाहीत.

त्यांच्या मते आणखी एक कल्पना अशी आहे की, आपल्याला सुमारे चार वर्षांपर्यंत आठवणी तयार करता येत नाहीत, कारण हिप्पोकॅम्पस- हा मेंदूचा तो भाग आहे जो नवीन आठवणी तयार करण्यासाठी जबाबदार असतो, तो पूर्णपणे विकसित झालेला नसतो.

प्रा.टर्क-ब्राउन म्हणतात, "बालपणात हिप्पोकॅम्पसचा आकार दुप्पट होतो. त्यामुळे कदाचित आपल्या लहानपणीच्या आठवणी किंवा अनुभवांना मेंदूमध्ये जतन करता येत नाही, कारण त्यासाठी लागणारी प्रणाली अजून तयार झालेली नसते."

बाळाच्या मेंदूची तपासणी किंवा स्कॅनिंग

तरीही, प्रा. टर्क-ब्राउन यांनी या वर्षी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ही कल्पना चुकीची असू शकते.

त्यांच्या टीमने 4 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंत वयाच्या 26 बाळांना काही चित्रं दाखवली आणि त्याच वेळी बाळांचे मेंदू स्कॅन करून हिप्पोकॅम्पसची हालचाल मोजली.

नंतर त्यांनी बाळांना आधीच्या चित्रापैकी एक आणि एक नवीन चित्रही दाखवलं आणि बाळांचे डोळे कोणतं चित्र जास्त वेळ पाहतात याच्या हालचाली मोजल्या.

बाळ असतानाच्या गोष्टी आपल्याला आठवत का नाहीत? संशोधकांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

जर बाळांनी जुनं चित्र अधिक पाहिलं, तर संशोधकांनी हे लक्षात घेतलं की बाळांना ते चित्र आठवतं आणि ओळखता येतं, जसं मागील अभ्यासांत सुचवलं गेलं आहे.

संशोधकांना असं आढळलं की, जेव्हा बाळ एखादं चित्र पहिल्यांदा पाहताना त्याचा हिप्पोकॅम्पस जास्त सक्रिय असेल, तेव्हा त्याला नंतर ते चित्र आठवण्याची शक्यता जास्त असते, विशेषतः जेव्हा बाळ 12 महिन्यांपेक्षा मोठं असेल.

यातून असं सूचित होतं की, साधारणपणे एक वर्ष वयाच्या आसपास हिप्पोकॅम्पस काही प्रकारच्या आठवणी तयार करण्यास सक्षम असतो.

आपल्या बालपणीच्या आठवणी कुठे गेल्या?

प्रा.टर्क-ब्राउन म्हणतात की, त्यांच्या टीमचा अभ्यास हा हे तपासण्याचं 'पहिलं पाऊल' आहे की, बाळ खरोखर हिप्पोकॅम्पसमध्ये आठवणी तयार करत आहेत की नाही, आणि यासाठी आणखी बरंच संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

ते विचारतात, "जर आपण त्या आठवणी जतन किंवा संग्रहित करत असू, तर त्या कुठे आहेत? त्या अजून आहेत का? आपण त्या आठवणी कधी तरी पाहू शकतो का?"

2023 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आढळलं की, जे उंदीर लहानपणी चक्रव्यूहातून बाहेर जाण्याचा मार्ग शिकले होते, तो मार्ग ते उंदीर प्रौढ झाल्यावर विसरले होते. परंतु, हिप्पोकॅम्पसच्या त्या भागाला कृत्रिम पद्धतीनं सक्रिय केल्यास ही आठवण परत जिवंत केली जाऊ शकते.

बाळ असतानाच्या गोष्टी आपल्याला आठवत का नाहीत? संशोधकांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मानवी बाळं किंवा अर्भकं काही आठवणी साठवून ठेवतात का, ज्या नंतरच्या आयुष्यात निष्क्रिय होतात, हे अजून ठरवता आलेलं नाही.

यूकेमधील वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीतील न्यूरोसायकोलॉजीच्या प्राध्यापिका कॅथरीन लव्हदे यांच्या मते, बाळांना आठवणी तयार करण्याची क्षमता किमान ते बोलू लागतात तोपर्यंत तरी असते.

त्या म्हणतात, "आपल्याला माहीत आहे की, लहान मुलं नर्सरीतून परत येऊन काही गोष्ट सांगू शकतात, पण काही वर्षांनी ते त्या गोष्टींचं वर्णन करू शकत नाहीत. म्हणजे आठवणी आहेतच, फक्त त्या कायम टिकत नाहीत."

त्या सुचवतात की, "माझ्या मते मुख्य प्रश्न असा आहे की, आपण त्या आठवणी कितपत जपतो, त्या लवकर मिटतात का, आणि त्या जागृत आठवणी आहेत की नाही, ज्याच्याबद्दल आपण खरोखर विचार करू शकतो."

ती खोटी आठवण असू शकते का?

प्रा. लव्हदे यांच्या मते, बालपणीच्या काळाचा विसर पडण्याबाबत समजणं आणखी कठीण होतं, कारण लोकांची जी पहिली आठवण आहे असं त्यांना वाटत असतं, ती खरी आहे की नाही, हे ठरवणं 'जवळजवळ अशक्य' असतं.

काही लोकांना बाळ असताना असताना घडलेली एखादी घटना आठवू शकते.

प्रा. लव्हदे म्हणतात की, अशा आठवणी खऱ्या नसण्याची शक्यता असते.

त्या सांगतात, "आठवण ही नेहमी पुन्हा तयार केली जाते. म्हणजे कोणीतरी तुम्हाला काही सांगितलं आणि तुमच्याकडे त्याची पुरेशी माहिती असेल, तर मेंदू ती अशा पद्धतीने तयार करू शकतो की, ती पूर्णपणे खरी वाटते."

त्या पुढे म्हणतात, "आपण खरोखर पाहत आहोत, ते म्हणजे मनाची जागरूकता, आणि ती समजायला कठीण आहे."

प्रा. टर्क-ब्राउन यांच्या मते, बालपणीच्या काळाचा विसर आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला मदत करतो.

ते म्हणतात, "हे आपल्या ओळखीबद्दल आहे. आपल्याला आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांबद्दल काहीच आठवत नाही. मला वाटतं, हे लोकांच्या स्वतःबद्दलच्या विचारांना आव्हान देण्यासारखं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)