एपस्टीन फाईल्समधील नरेंद्र मोदींशी संबंधित दाव्यांवर परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एपस्टीन फाईल्स'च्या एका ईमेल मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेफ्री एपस्टीन यांच्या भेटीबद्दल असलेले दावे फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेतील लैंगिक हिंसाचारातील आणि मानवी तस्करी प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असल्याचा दावा काँग्रेसनं शनिवारी (31 जानेवारी) केला होता.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलंय की, "ही राष्ट्रीय दृष्टीकोनातून एक लज्जास्पद बाब आहे. पंतप्रधान मोदींनी समोर येऊन आमच्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यावीत."
मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावताना म्हटलं की, "जुलै 2017 मध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्रायलच्या अधिकृत भेटीव्यतिरिक्त उर्वरित ईमेल म्हणजे एका दोषी गुन्हेगाराच्या निरर्थक बडबडीपेक्षा जास्त काहीही नाही."
परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं. "आम्हाला तथाकथित एपस्टीन फाइल्समधून एका ईमेल मेसेजचा रिपोर्ट मिळाला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इस्रायल भेटीचा उल्लेख आहे," असं त्यात म्हटलं आहे.
"पंतप्रधान मोदींनी जुलै 2017 मध्ये केलेल्या इस्रायलच्या अधिकृत भेटीव्यतिरिक्त उर्वरित ईमेल हा एका दोषी गुन्हेगाराच्या निरर्थक बडबडीहून अधिक काहीही नाही. अशा ईमेलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे."
काँग्रेसने काय दावा केला?
शनिवारी (31 जानेवारी) काँग्रेसने 'एक्स'वरून एपस्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदींचं नाव आलेलं आहे, असा दावा केला.
"अमेरिकेतील सिरीयल रेपिस्ट, बाल लैंगिक शोषण करणारा आणि मानवी तस्करीतील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याने 9 जुलै 2017 रोजी एका ईमेलमध्ये लिहिलंय की, भारताचे पंतप्रधान मोदींनी सल्ला घेतला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये डान्स केला आणि गाणंही गायलं. काही आठवड्यांपूर्वी त्यांची भेट झाली होती. आणि त्यांचं त्यामुळे कामही झालं," असं ईमेलमध्ये म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसने लिहिलं की, "एपस्टीन स्पष्टपणे म्हणतो की, मोदींनी माझा सल्ला घेतला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी ते इस्रायल गेले. तिथे जाऊन त्यांनी गाणं गायलं आणि डान्सही केला. त्यांनी असंही म्हटलं की, याचा फायदा झाला."
"पंतप्रधान मोदींनी 4 ते 6 जुलै 2017 रोजी इस्रायलला भेट दिली होती. एपस्टीन यांनी हा ईमेल तीन दिवसांनी लिहिला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. इस्रायल भेटीच्या अगदी आधी, मोदींनी 25-26 जून 2017 रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. जर आपण जेफ्री एपस्टीनच्या ईमेलच्या लिंक्स जोडल्या तर हे स्पष्ट होतं की, मोदी जून 2017 मध्ये अमेरिकेला गेले होते आणि तिथे त्यांनी एपस्टीनकडून सल्ला घेतला होता."
"त्यानंतर, एका आठवड्यानंतर (4-6 जुलै 2017), मोदी इस्रायलला गेले आणि दिलेल्या सल्ल्यानुसार, त्यांनी तिथं गाणं गायलं आणि डान्सही केला. त्याचा त्यांना फायदाही झाला.
आता हे स्पष्ट झालं आहे की, पंतप्रधान मोदींचे जेफ्री एपस्टीनशी जुने संबंध आहेत, जे भारतासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे. याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं पाहिजे," असं काँग्रेसनं म्हटलं आह.
काँग्रेसनं तीन प्रश्न विचारत लिहिलं की, "नरेंद्र मोदी जेफ्री एपस्टीनकडून कोणत्या प्रकारचा सल्ला घेत होते? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कोणत्या फायद्यासाठी मोदी इस्रायलमध्ये नाचत आणि गात होते? एपस्टीनने लिहिलंय, 'याचा फायदा झाला', तर त्याच्या या विधानाचा अर्थ काय?"
"नरेंद्र मोदीजी, देश उत्तरं मागत आहे. सिरीयल रेपिस्ट एपस्टीनशी तुमचं काय नातं आहे?" असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
नव्या एपस्टीन फाईल्समध्ये काय आहे?
अमेरिकेच्या न्याय विभागानं दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित लाखो नवीन फायली प्रसिद्ध केल्या आहेत.
शुक्रवारी (30 जानेवारी) 30 लाख पानं, 1 लाख 80 हजार फोटो आणि 2 हजार व्हीडिओ सार्वजनिकरित्या पोस्ट करण्यात आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्यावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत चुकवल्यानंतर सहा आठवड्यांनी इतक्या मोठ्या संख्येनं या 'फाईल्स' प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कायद्यात स्वाक्षरी केलेल्या अंतिम मुदतीनुसार एपस्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रं जनतेसोबत शेअर करणं आवश्यक होतं.
यात जेफ्री एपस्टीनने तुरुंगात घालवलेल्या काळाची माहिती आहे. त्यामध्ये एक सायकोलॉजिकल रिपोर्ट देखील आहे आणि तुरुंगात असताना त्याच्या मृत्यूबद्दलचे तपशीलही समाविष्ट आहेत.
याशिवाय, एपस्टीन आणि हाय-प्रोफाईल व्यक्ती यांमध्ये झालेले ईमेलचे संवाद देखील समाविष्ट आहेत.

फोटो स्रोत, US Department of Justice
अनेक ईमेल आणि कागदपत्रे एक दशकाहून अधिक जुनी आहेत आणि एपस्टीनच्या कायदेशीर अडचणींदरम्यान त्यांचे असलेले संबंधही ते उघड करतात.
नव्याने प्रसिद्ध झालेल्या फायलींमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शेकडो वेळा उल्लेख आहे, त्यात ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यातील मैत्रीचाही समावेश आहे.
पण ट्रम्प म्हणतात की, त्यांचे संबंध कित्येक वर्षांपूर्वी खराब झाले होते. तसंच त्यांनी एपस्टीनवरच्या लैंगिक गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती असल्याचं नाकारलं आहे.
या कागदपत्रांमध्ये एपस्टीन आणि टेक अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यातील ईमेल संभाषणांचाही समावेश आहे.
या प्रकरणात, इलॉन मस्क यांच्यावर कोणत्याही गैरकृत्याचा आरोप नाही. त्यांनी पूर्वी सांगितलं होतं की, एपस्टीन यांनी त्यांना त्यांच्या बेटावर आमंत्रित केलेलं होतं, परंतु मस्क यांनी नकार दिला होता.
मात्र, एपस्टीन फाईल्स प्रसिद्ध होण्याची ही कहाणी इथेच संपेल की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.
"हा एका अतिशय व्यापक अशा कागदपत्रांची ओळख करणं आणि त्यांची छाननी करण्याच्या प्रक्रियेचा शेवट आहे. यातून हे दिसून येतं की, जिथवर अमेरिकेच्या न्याय विभागाचा प्रश्न आहे, तर त्यांचं काम संपलेलं आहे," असं डेप्युटी अॅटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी म्हटलंय.
मात्र, डेमोक्रॅटीक पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे की न्याय विभागानं कोणत्याही वैध कारणाशिवाय मोठ्या प्रमाणात, सुमारे 25 लाख कागदपत्रं रोखून ठेवलेली आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











