हल्लेखोराच्या जीभेला चावा घेतल्यानं झालेला तुरुंगवास, 61 वर्षांनी लागलेल्या निकालात निर्दोष सुटका

फोटो स्रोत, News1
- Author, केली एनजी
- Role, सिंगापूर
- Author, युजिन चोई
- Role, बीबीसी कोरियन
- Reporting from, सेऊल
दक्षिण कोरियातील एका महिलेची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. काही दशकांपूर्वी एका पुरुषानं तिच्यावर लैंगिक हल्ला केला असताना या महिलेनं त्या पुरुषाची चीभ चावल्याबद्दल देण्यात आलेल्या शिक्षेचा न्यायालयानं पुनर्विचार केल्यावर ही सुटका झाली आहे.
या महिलेचं नाव चोई माल-जा असं आहे. त्या 18 वर्षांच्या असताना त्यांना गंभीर स्वरुपाची शारीरिक हानी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. यासाठी त्यांना 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
तर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या 21 वर्षांच्या व्यक्तीला त्या तुलनेत सौम्य म्हणजे सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या खटल्यातून चोई यांची निर्दोष सुटका करण्यासाठी वर्षानुवर्षे चाललेल्या मोहिमेनंतर, जुलै महिन्यात दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात असलेल्या बुसान शहरात या खटल्यावर पुन्हा सुनावणी सुरू झाली होती.
पहिल्याच सुनावणीत, सरकारी वकिलांनी त्यांची माफी मागितली. आश्चर्यकारकरीत्या त्यांनी न्यायालयाला चोई यांची शिक्षा रद्द करण्याची विनंती केली.
"मी हा खटला असाच सोडू शकत नव्हते. माझ्यासारखीच वेळ आलेल्या इतर पीडितांसाठी मला लढा द्यायचा होता," असं निर्दोष सुटका झाल्यानंतर चोई म्हणाल्या.
किशोरवयात झालेल्या अन्यायासाठी आयुष्यभर लढा
शिक्षा झाली तेव्हा चोई किशोरवयीन होत्या. या घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. "त्या पीडिते ऐवजी आरोपी झाल्या."
"माझ्या जवळच्या लोकांनी मला इशारा दिला होता की हे दगडावर डोकं आपटण्यासारखं असेल. मात्र मी हा प्रकरण सोडून दिलं नाही," असं चोई म्हणतात, आता त्या 79 वर्षांच्या आहेत.
चोई यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसंच त्या म्हणाल्या होत्या की सत्तेत असलेल्यांनी "दुर्बळांना चिरडण्यासाठी आणि कायद्याचा गैरवापर करण्यासाठी त्यांच्या अधिकारांचा, सत्तेचा गैरवापर केला."

चोई यांच्या खटल्याचं उदाहरण आता दक्षिण कोरियातील कायद्याच्या पाठ्यपुस्तकांमध्येदेखील देण्यात आलं आहे. लैंगिक हिंसाचाराच्या वेळेस स्वसंरक्षणाचा अधिकार न मानण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या खटल्याची माहिती देण्यात आली आहे.
न्यायालयाच्या नोंदींनुसार, हल्लेखोरानं दक्षिणेला असणाऱ्या गिम्हे शहरात कुठेतरी चोई यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जमिनीवर पाडलं होतं. त्यावेळेस चोई यांनी स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बचाव करण्याचा प्रयत्न केला.
शेवटी त्या हल्लेखोराची जवळपास 1.5 सेमी (0.59 इंच) चीभ चावल्यानंतरच चोई यांची त्या हल्लेखोराच्या तावडीतून सुटका होऊ शकली होती.
चोई यांना तुरुंगवास, हल्लेखोर मात्र मोकाट
दक्षिण कोरियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या हल्लेखोरानं त्याला झालेल्या दुखापतीसाठी सातत्यानं नुकसान भरपाईची मागणी केली होती. एकदा तर तो चोई यांच्या घरी चाकू घेऊन शिरला होता.
लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत दक्षिण कोरियामधील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एका निकालात, त्या माणसाला घरात घुसखोरी करणं आणि धमकावण्यासाठी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप कधीही ठेवण्यात आला नाही.
ती शिक्षादेखील दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली होती. म्हणजे जर या व्यक्तीनं त्या कालावधीत आणखी गुन्हा केला असता तर त्याला तुरुंगात जावं लागलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्या व्यक्तीला गंभीर शारीरिक दुखापत केल्याबद्दल चोई यांना मात्र कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळेस न्यायालयानं म्हटलं होतं की चोई यांची कृती स्वरसंरक्षणासाठीच्या 'वाजवी मर्यादा' ओलांडणारी होती.
या प्रकरणाचा तपास होत असताना चोई यांना सहा महिने ताब्यात ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांना 10 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली होती.
#MeToo चळवळीनंतर पुनर्विचार याचिका दाखल
2018 मध्ये, #MeToo चळवळीनं दक्षिण कोरियामध्येही जोर धरला होता. त्या चळवळीपासून प्रेरित होऊन चोई यांनी वकिलांच्या गटांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे या खटल्याशी संबंधित पुरावे गोळा केले आणि नंतर पुनर्विचार याचिका दाखल केली.
चोई यांचा दोषमुक्त होण्याचा मार्ग आव्हानात्मक होता. कनिष्ठ न्यायालयांनी त्यांनी याचिका फेटाळली होती. स्वसंरक्षणाचे त्यांचे दावे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्याचं न्यायालयांचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र चोई यांनी त्यांचा लढा सुरूच ठेवला. त्यांना ज्या गोष्टीला सामोरं जाव लागलं तशी वेळ लैंगिक हिंसाचाराच्या इतर पीडितांवर येऊ नये अशी त्यांची इच्छा होती.
"त्यांना एकट्यानं वेदना सहन करायची वेळ येऊ नये," असं चोई यांनी आधीच्या एका मुलाखतीत द कोरिया हेराल्डला सांगितलं होतं.
अखेर, डिसेंबर 2024 मध्ये दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयानं चोई यांची खटल्याचा पुनर्विचार करण्याची याचिका स्वीकारली.
अथक लढ्याला शेवटी आलं यश
बुधवारी (3 सप्टेंबर) चोई आणि त्यांच्या सोबतच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यातील काहींनी फलक हातात धरलेले होते. "चोई माल-जा यांनी मिळवलं!" आणि "चोई माल-जा यशस्वी झाल्या" अशा आशयाचे हे फलक होते.

फोटो स्रोत, EPA
चोई यांच्या वकील किम सू-जुंग यांनी त्यांना आधी झालेल्या शिक्षेचं वर्णन, "लिंगभेद आणि सामाजिक पूर्वग्रहांमुळे देण्यात आलेला चुकीचा निर्णय" अशा शब्दात केलं.
"चोई माल-जा यांनी कधीही हार न मानता अथकपणे दिलेल्या लढ्यामुळे, फिर्यादी पक्ष आणि न्यायव्यवस्थेला त्यावेळेस झालेली चूक आज दुरुस्त करण्याची संधी मिळाली," असं किम म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की या प्रकरणात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सरकारविरोधात दिवाणी खटला दाखल करण्याची चोई यांची योजना आहे.
चोई यांच्या खटल्याचा पीडित महिलांसंदर्भात दूरगामी परिणाम
चोई यांना त्यांच्या या लढ्यात अनेक गट, संस्थांनी पाठिंबा दिला होता. द कोरिया वीमेन्स हॉटलॉइन हा असाच एक गट आहे. या गटाला वाटतं की बुधवारच्या (3 सप्टेंबर) निकालामुळे लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
"यापुढच्या काळात, महिलांच्या स्वसंरक्षणाच्या कृती कायदेशीर समजल्या जातील. मला आशा आहे की याचा अर्थ कमी महिलांना अन्यायाला सामोरं जावं लागेल," असं साँग रॅन-ही म्हणतात. त्या द कोरिया वीमेन्स हॉटलाइन गटाच्या प्रमुख आहेत.

फोटो स्रोत, News1
साँग रॅन बीबीसीसोबत बोलताना म्हणाल्या, "कमीत कमी पीडितांना यातून एक संदेश तरी जाईल. आता जरी तुम्ही ज्या प्रक्रियेतून जात आहात ती वेदनादायी आणि अन्यायकारक असली, तरीदेखील तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे आवाज उठवा."
दक्षिण कोरियात लैंगिक हिंसाचाराच्या वेळेस महिलांनी हल्लेखोराची जीभ चावल्याची किमान दोन प्रकरणं आहेत. यातील एक 1988 मधील अँडाँग शहरातील आहे तर दुसरं प्रकरण 2020 साली बुसानमध्ये घडलेलं आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयानं, महिलांनी केलेल्या कृतींना स्वसंरक्षणाच्या कायदेशीर कृती म्हणून मान्यता दिली आणि त्या महिलांच्याच बाजूनं निकाल दिला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











