प्रबोधनकारांचं पुस्तक अंगावर फेकत नर्स म्हणाली, 'याला हातही लावणार नाही'; कस्तुरबा रुग्णालयात काय घडलं?

- Author, नामदेव काटकर आणि अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकामुळे वादाला सुरुवात झालीय.
आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं एका कर्मचाऱ्यानं सहकाऱ्यांना भेट म्हणून दिलेलं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक महिला कर्मचाऱ्यानं अंगावर फेकत, 'या पुस्तकाला हातही लावणार नाही' म्हटलं.
हा प्रकार मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात घडला. या घटनेचा व्हीडिओ समोर आल्यानंतर वादाला तोंड फुटलंय.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या प्रकरणात आक्रमक झाली आहे. रुग्णालय प्रशासनाला आमचे कार्यकर्ते जाब विचारतील, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
कस्तुरबा रुग्णालयात 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
राजेंद्र कदम हे कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. 31 जुलै 2025 रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता.
त्यापूर्वी, सेवानिवृत्तीवेळी रुग्णालयातील सहकाऱ्यांना काही एक भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. राजेंद्र कदम हे आंबेडकरी विचारांचे असून, कामगार युनियनमध्येही गेली एक-दीड दशक सक्रिय आहेत. त्यामुळे भेटवस्तू म्हणून राजेंद्र कदम यांनी समाजप्रबोधनपर पुस्तकं देण्याचं ठरवलं.
त्यानुसार, 28 जुलै रोजी राजेंद्र कदम यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' आणि दिनकरराव जवळकर यांचं 'देशाचे दुश्मन' ही पुस्तकं आपल्या सहकाऱ्यांना भेट म्हणून दिली. इथूनच वादाला सुरुवात झाली.

प्रबोधनकार आणि दिनकरराव जवळकरांची पुस्तकं भेट म्हणून का दिली, असा प्रश्न उपस्थित करत राजेंद्र कदम यांना निशाणा बनवण्यात आलं.
राजेंद्र कदम यांच्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी कस्तुरबा रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका माया गिरी यांच्या कार्यालयात राजेंद्र कदम यांना बोलावण्यात आलं. तिथं परिचारिका श्रीजा सावंत, ईश्वरी बुरांबे आणि इतर कर्मचारी होते. तिथं राजेंद्र कदम यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं भेट देण्याबाबत जाब विचारण्यात आला.
विशेष म्हणजे, या प्रकाराचा ईश्वरी बुरांबे यांनी व्हीडिओ तयार केला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, अशीही माहिती राजेंद्र कदम यांनी दिली.
परिचारिकेनं काय आक्षेप घेतला?
राजेंद्र कदम यांना जेव्हा सहायक अधिसेविका माया गिरी यांच्या कार्यालयात बोलावून जाब विचारला गेला, तेव्हा श्रीजा सावंत या आक्रमक आवाजात बोलताना व्हीडिओतून ऐकू येत आहे. या व्हीडिओतून आवाज श्रीजा सावंत यांचा असल्याचं राजेंद्र कदम यांनीच बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
हे पुस्तक देण्याचा उद्देश काय आहे? असा प्रश्न विचारताच, राजेंद्र कदम यांनी स्पष्ट करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात श्रीजा सावंत यांनी त्यांना अडवत पुढे म्हटलं की, "ते काहीही असो. हे पुस्तक तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं कारण काय? तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय. अशा पुस्तकाला आम्ही हातही लावणार नाही. तुम्हाला हिंदू धर्माबद्दल इतकं का वाईट वाटतं?
"प्रबोधनकार ठाकरे आम्हाला द्यायला आले का हे पुस्तक? मग तुम्ही का दिले? आमच्या लोकांना हे पुस्तक का दिलं? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला?"
शिवाय, हिंदू धर्माबद्दल तुम्हाला इतकं वाटतं ना, मग हिंदू धर्माकडून तुम्ही सेंडऑफ घेऊही नका, असंही श्रीजा सावंत म्हणाल्या.

फोटो स्रोत, Sanay Prakashan
या दरम्यान, राजेंद्र कदम यांनी माफीही मागितली.
बीबीसी मराठीशी बोलताना राजेंद्र कदम म्हणाले की, "मी तिथे माफी मागितली, ते प्रबोधनकारांची पुस्तकं वाटली म्हणून नाही. तिथे माझेच सहकारी होते, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, म्हणून 'आपलीच माणसं' समजून माफी मागितली. अन्यथा, मी माझ्या विचारांशी अजूनही ठाम आहे."
यानंतर बीबीसी मराठीने श्रीजा सावंत यांची बाजू जाणून घेतली.
श्रीजा सावंत म्हणाल्या की, "माझ्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यात काही तथ्य नाही."
तसंच, या घटनेसंदर्भात आणि होणाऱ्या आरोपासंदर्भात लवकरच आम्ही आमची भूमिका पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट करू, असंही श्रीजा सावंत यांनी म्हटलंय.
'सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर बहिष्कार'
पुस्तक भेट देण्याचा कार्यक्रम 28 जुलैला झाला, त्यानंतर माया गिरी यांच्या कार्यालयात बोलावून राजेंद्र कदम यांना जाब विचारण्याचा प्रकार 29 जुलैला झाला.
30 जुलै रोजी राजेंद्र कदम यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. मात्र, या कार्यक्रमावर रुग्णालयात बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती राजेंद्र कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
राजेंद्र कदम हे गेली एक-दीड दशकं कामगार युनियनमध्येही काम करत आहेत. त्यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांवर आवाज उठवला असताना, त्यांच्याबाबतच असा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यातच राजेंद्र कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, वैद्यकीय अधीक्षकांनी सहायक सुरक्षा अधिकाऱ्याचा अभिप्राय जोडून पोलिसात जा, असं म्हणत आपले हात झटकल्याचा आरोप राजेंद्र कदम यांनी केलाय.
या प्रकरणाबाबत राजेंद्र कदम यांनी भायखळ्यातील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता, केवळ एनसी दाखल करून घेतली.
राजेंद्र कदम यांनीही श्रीजा सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्याची मागणी केलीय.
मनसेनं घेतली रुग्णालय प्रशासनाची भेट
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रशासनाची भेट घेतली.
त्यानंतर मनसेचे पदाधिकारी उत्तम सांडव म्हणाले की, "आम्ही व्हीडिओबद्दल माहिती घेतली आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी केलेली आहे.
"आमचा विषय बाकी कोणताही नाही, व्हीडिओमध्ये एक महिला वारंवार प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव घेताना पाहायला मिळत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आहोत."
या प्रकरणात योग्य ती कारवाई करू असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असं सांडव यांनी सांगितलं.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशननं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात कारवाईची मागणी केलीय.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या, तसंच माजी कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका व संबंधित परिचारिक, महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी या संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापरेकर यांनी केलीय.

प्रबोधनकार ठाकरे आणि 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे'
'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी 1929 साली लिहिलं आहे. 'प्रबोधनकार ठाकरेकृत नवमतवादी माला'अंतर्गत त्यांनी हे पुस्तक लिहिलं.
या पुस्तकातून प्रबोधनकारांनी अत्यंत चिकित्सक भाष्य आणि टीका केलीय. मात्र, धर्मचिकित्सा हा प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचाच गाभा होता.
हिंदू समाजातील अनेक अंधश्रद्धांचे प्रबोधनकार ठाकरे टीकाकार होते.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङमय खंड चार मध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
बीबीसी मराठीसाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखन आणि कार्याचे अभ्यास सचिन परब यांनी सविस्तर लेख लिहिला होता, तो तुम्ही इथे वाचू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











