इस्रायलचा गाझावर बॉम्बवर्षाव; संयुक्त राष्ट्राच्या चौकशी अहवालात इस्रायलवर 'नरसंहारा'चा ठपका

गाझा

फोटो स्रोत, Reuters

इस्रायलने गाझावर सोमवारी (15 सप्टेंबर) रात्री जोरदार बॉम्बहल्ला केला. इस्रायलच्या लष्करानं संपूर्ण शहर ताब्यात घेण्यासाठी जमिनीवरून कारवाईला सुरुवात केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

मध्य गाझामध्येही इस्लायलनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. ज्या भागातून हजारो लोक पलायन करत आहेत, त्याच भागात हे हल्ले झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यातील मृत आणि जखमींचा आकडा सातत्यानं वाढत असल्याचं पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी जेरुसलेमला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना अमेरिकेच्या 'अटल' पाठिंब्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे हल्ले झाले आहेत.

दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी मंगळवारी (16 सप्टेंबर) सकाळी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये "गाझा जळत आहे", असं म्हटलं. तसंच, ही मोहीम पूर्ण होईपर्यंत इस्रायल मागं हटणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

गाझामध्ये इस्रायलचे हल्ले आणि गोळीबार सुरुच असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. हल्ल्यांत उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्यांखाली लोक दबलेले असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी (15 सप्टेंबर) रात्री "गाझामध्ये शक्तिशाली ऑपरेशन" सुरू केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तेल अविव जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या साक्षीवेळी ते बोलत होते.

तसंच, आयडीएफचे प्रवक्ते अविकय अद्राई यांनीही एक्सवर पोस्ट करत, "लष्कराने गाझा शहरातील हमासच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यास सुरुवात केली आहे," असं म्हटलं.

"हे शहर धोकादायक क्षेत्र असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी इथून निघून जावं," असंही त्यांनी म्हटलं आहे.

'इस्लायलचा गाझामध्ये नरसंहार'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलनं गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या विरोधात नरसंहार केला असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या चौकशी आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नरसंहाराच्या पाच कृत्यांची जी व्याख्या करण्यात आली आहे. त्यापैकी चार कृत्य 2023 पासून हमास विरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धात केली असल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी कारणं असल्याचं, याबाबतच्या एका नवीन अहवालात म्हटलं आहे. ही चार कृत्य खालीलप्रमाणे आहेत.

  • एखाद्या गटातील लोकांना मारणे

संरक्षित वस्तूंवर हल्ले विशिष्ट गटाच्या सदस्यांना मारणे : नागरिकांसह इतर संरक्षित व्यक्तींना लक्ष्य करणे आणि मृत्यू होतील अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करणे.

  • गंभीर शारीरिक आणि मानसिक हानी पोहोचवणे

गंभीर शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणे : कैद्यांशी गंभीर गैरवर्तन करणे, बळजबरीने विस्थापन करणे आणि पर्यावरणाचा नाश करणे.

  • गट नष्ट व्हावा म्हणून मुद्दाम अटी, नियम लादणे

संपूर्ण किंवा अंशतः गटाचा नाश करण्यासाठी जाणूनबुजून जीवनावश्यक परिस्थिती लादणे, पॅलेस्टिनींसाठी गरजेच्या संरचना आणि वास्तूंचा नाश करणे, वैद्यकीय सेवांपासून वंचित ठेवणे, जबरदस्तीने विस्थापन करणे, पॅलेस्टिनींना आवश्यक मदत, पाणी, वीज आणि इंधन पोहोचण्यापासून रोखणे, हिंसाचाराद्वारे बाळांचे जन्म रोखणे, मुलांवर परिणाम होईल अशी विशिष्ट परिस्थिती निर्माण करणे.

  • नवीन जन्म रोखणे

बाळांचे जन्म रोखण्यासाठी उपाययोजना लादण्यात आल्या. त्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये गाझाच्या सर्वात मोठ्या प्रजनन केंद्रावर हल्ला करण्यात आला. त्यात सुमारे 4000 भ्रूण आणि 1000 शुक्राणूंचे नमुने तसंच गोठवलेली अंडी नष्ट झाल्याचे वृत्त आहे.

इस्रायलचा गाझावर हल्ला

फोटो स्रोत, EPA

इस्रायलच्या नेत्यांनी केलेली विधानं आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्तन हाच नरसंहारासाठीचा पुरावा असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनं 2021 मध्ये पॅलेस्टाईनच्या ताबा मिळवलेल्या भागात झालेल्या मानवाधिकार कायद्याच्या संबंधित सर्व कथित आंतरराष्ट्रीय उल्लंघनांची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाची स्थापना केली होती.

या तीन सदस्यीय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष नवी पिल्ले आहेत. त्या दक्षिण आफ्रिकेचे माजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख आहेत. तसेच रवांडाच्या नरसंहाराशी संबंधित आंतरराष्ट्रीय लवादाच्याही त्या अध्यक्ष होत्या.

नरसंहाराला चिथावणी दिल्याचा तिघांवर ठपका

बीबीसीचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन यांचं विश्लेषण :

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (डावीकडे), अध्यक्ष आयझॅक हर्झोग (मध्यभागी) आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट (उजवीकडून दुसरे) यांच्यावर नरसंहाराला चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये नरसंहाराला चिथावणी देण्याचा ठपका इस्रायलच्या तीन नेत्यांवर करण्यात आला आहे.

यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांचा समावेश आहे. इस्रायल 'मानवी प्राण्यांशी' लढत आहे, असं वक्तव्य त्यांनी त्यांनी 9 ऑक्टोबर 2023 रोजी केलं होतं. पंतप्रधान नेतन्याहू यांच्याप्रमाणेच गॅलंट हेही आधीच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंटचा सामना करत आहेत.

इस्रायलचा गाझावर हल्ला

फोटो स्रोत, AFP via Getty Images

नेतन्याहू यांच्यावरही चिथावणीचा आरोप करण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे, त्यांनी गाझा युद्धाची तुलना अमालेक नावाच्या शत्रूविरुद्धच्या एका यहुदी युद्धाच्या कथेशी केली होती. बायबलमध्ये देव ज्यू लोकांना सर्व अमालेकी पुरुष, महिला आणि मुलं तसेच त्यांची मालमत्ता आणि त्यांचे प्राणीही नष्ट करण्यास सांगतो, अशी ती कथा होती. याद्वारे चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

तर यातील तिसरं नाव म्हणजे, अध्यक्ष आयझॅक हर्झोग हे आहे. त्यांनी या युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात गाझातील पॅलेस्टिनी नागरिक हमासविरुद्ध उठाव करत नसल्याबद्दल त्यांचा निषेध केला होता. त्यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी 'यासाठी संपूर्ण देश जबाबदार' असल्याचं म्हटलं होतं.

इस्रायलने फेटाळला अहवाल

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा अहवाल स्पष्टपणे फेटाळला आहे. हा अहवाल "विकृत आणि खोटा" असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

या आयोगातील तीन तज्ज्ञ हे हमासचे प्रॉक्सी म्हणून काम करत असल्याचा आरोप एका प्रवक्त्यांनी केला आहे.

इस्रायलचा गाझावर हल्ला

फोटो स्रोत, Reuters

हमासने सांगितलेल्या पूर्णपणे खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणं आणि इतरांनी यापूर्वी केलेले आणि आधीच चुकीचे ठरलेले आरोप पुन्हा करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

"अहवालातील या खोट्या मुद्द्यांच्या अगदी उलट हमासनंच इस्रायलमध्ये नरसंहार करण्याचा प्रयत्न करत 1200 जणांची हत्या केली आहे. तसंच महिलांवर बलात्कार, कुटुंबांना जिवंत जाळणं अशा कृत्यांबरोबरच प्रत्येक ज्यू व्यक्तिला मारण्याचं ध्येय त्यांनी अगदी उघडपणे मांडलं आहे," असंही या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

रहिवाशांनी केले 'नरक रात्री'चे वर्णन

बीबीसीचे गाझामधील वार्ताहर रुश्दी अबलुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार :

गाझा शहरात सुरू करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर रहिवाशांनी या रात्रीचं वर्णन नरकासमान असं केलं आहे.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा शहरात रात्रभर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. त्यात शहरातील मध्यवर्ती अल-दराज परिसर, पश्चिमेकडील किनारपट्टी आणि निर्वासित छावणीसह उत्तरेकडील शेख रदवानला लक्ष्य करत हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यांसह तोफांचा मारा, ड्रोन हल्ले आणि हेलिकॉप्टर गनशिप हालचालींमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

उत्तर गाझातील विस्थापित रहिवासी गाझी अल-अलौल बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले की, ते आता नैऋत्य गाझाच्या तेल अल-हवामधील अल-कुद्स रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झोपले आहेत. "मी हे स्वतःच्या मर्जीनं केलेलं नाही. तर मला त्यासाठी भाग पाडण्यात आलं आहे. उत्तरेकडून पळून गेल्यानंतर जवळपास एक महिना माझं कुटुंब जिथं आश्रयाला होतं, ते घर मला सोडावं लागलं," असं ते म्हणाले.

"गेल्या काही तासांपासून बॉम्बहल्ला सुरू असून लष्करी परिसरातील अनेक रहिवासी इमारती पाडण्याची धमकी दिल जात आहे," असंही ते म्हणाले.

इस्रायलचा गाझावर हल्ला

फोटो स्रोत, AFP

मध्य गाझाच्या अल-दराजमधील सामी अबू दलाल त्या रात्रीचं वर्णन करताना म्हणाले की, "रहिवाशांना सतत हल्ले, ड्रोन गोळीबार आणि स्फोटकांचा मारा सहन करावा लागला. इमारती रहिवाशांवर कोसळल्यानं अनेक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमीही झाले."

7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखालील अभूतपूर्व हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कराने गाझामध्ये मोहीम सुरू केली, ज्यामध्ये सुमारे 1200 लोक मारले गेले आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आले.

तेव्हापासून गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 64 हजार 905 लोक मारले गेले आहेत, असे हमास-संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

बहुतेक लोकसंख्या वारंवार विस्थापित झाली आहे; 90 % पेक्षा जास्त घरे खराब किंवा नष्ट झाल्याचा अंदाज आहे; आरोग्यसेवा, पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता व्यवस्था कोलमडल्या आहेत; आणि संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने अन्न सुरक्षा तज्ञांनी गाझा शहरात दुष्काळ जाहीर केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)