कॅन्सर होण्याची 'कदाचित शक्यता' अशी ओळख मिळूनही अस्पार्टेमबद्दलचा इशारा कायम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कॅन्सर म्हणजे कर्करोगासाठी कदाचित कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादीत अस्पार्टेमचा समावेश असला तरी ते रोजच्या आहारात किती असावं याबद्दलच्या सूचना-इशारा कमी करण्यात आलेला नाही.
सध्या तज्ज्ञांचे दोन गट जागतिक आरोग्य संघटनेमध्ये हजारो शास्त्रीय अभ्यासांचा आढावा घेत आहेत.
‘Possibly carcinogenic’ म्हणजे ‘कॅन्सरसाठी कदाचित कारणीभूत’ अशा वर्गवारीमुळे थोडी भीती आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. यातील घटक कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात याबद्दल पटेल असा पुरावा नसल्यामुळे या यादीत टाकलेले आहेत.
या यादीत अस्पार्टेम आहे. बहुतांश लोक आपल्या रोजच्या आहारात अस्पार्टेमच्या सुरक्षित मानलेल्या कमाल पातळीपेक्षा कमी प्रमाणात अस्पार्टेम घेतात. परंतु त्याचं जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांना हे प्रमाण कमी करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं आहे.
अस्पार्टेम हे शर्करामुक्त (शुगरफ्री) पदार्थांमध्ये-पेयांमध्ये गोडवा येण्यासाठी वापरलं जातं. हे रसायन पदार्थात साखरेपेक्षा 200 पट जास्त गोडवा आणतं. आणि यात साखरेच्या तुलनेत कॅलरीही कमी असतात.
हे स्वीटनर डाएट कोक, कोक झिरो, पेप्सी मॅक्स, सेव्हन अप फ्री अशी पेयं तयार करणारे अनेक ब्रँडस् वापरतात. असं असलं तरी अस्पार्टेम दात घासायची पेस्ट, च्युइंग गम, योगर्ट्स, खोकला आल्यावर चघळायच्या गोळ्या अशा जवळपास 6,000 उत्पादनांमध्ये वापरलं जातं.
इतक्या मोठ्याप्रमाणात हे स्वीटनर वापरलं जात असलं तरी ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? याचा वाद सुरुवातीपासून म्हणजे 1980च्या दशकात ते वापरायला सुरुवात झाली तेव्हापासून आहे.
यासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेचे पोषण आणि आरोग्य सुरक्षा विभागाचे संचालक डॉ. फ्रान्सिस्को ब्रांका यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी साखर किंवा स्वीटनर यातील जास्त आरोग्यदायी पर्याय कोणता असा प्रश्न विचारला.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, कोला असणारी पेयं स्वीटनर घालून घ्यायची की साखर असे पर्याय ठेवले की मी तिसरा पर्याय सुचवेन, तो म्हणजे या दोन्हीपेक्षा सरळ पाणी प्या, असं सुचवेन आणि गोडपदार्थच टाळा असं सांगेन.
ते म्हणाले, अस्पार्टेम आरोग्यासाठी तितकं चांगलं नाही असं अभ्यासातून दिसलं असलं तरी पण जे लोक कधीतरी डाएटपेयं किंवा अस्पार्टेम वापरलेले पदार्थ वापरत असतील तर त्यांच्यासाठी तो काही चिंतेचा मुद्दा नाही. परंतु अतिप्रमाणात हे स्वीटनर वापरण्यांसाठी तो चिंतेचा मुद्दा आहे.
याच्या पुराव्यांचा अभ्यास प्रथम जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या कॅन्सरतज्ज्ञांनी केला.
हा गट चार संभाव्य गटांचा विचार करतो.
त्याने अस्पार्टेमला कदाचित कर्करोगजन्य गटामध्ये अस्पार्टेमला टाकलं आहे. त्या यादीत कोरफड आणि शिस्याचाही समावेश आहे. यकृताच्या एका कॅन्सरशी संबंधीत झालेल्या तीन अभ्यासांमुळे हा निर्णय घेण्यात आला.
अर्थात यातील पॉसिबली म्हणजे कदाचित शक्यता हा शब्दप्रयोग केवळ शास्त्रीय पुरावा किती सबळ आहे याबद्दलच भाष्य करतो. जर हा पुरावा सबळ असता तर अस्पार्टेमला वरच्या गटात टाकलं गेलं असतं.
आयएआरसी 4 संभाव्य शक्यतांचा वापर करतं
- गट 1 - मानवासाठी कर्करोगजन्य पदार्थ
- गट 2ए- माणसासाठी जवळपास निश्चितच कर्करोगजन्य ठरू शकते असा पदार्थ
- गट 2बी- माणसासाठी कदाचित कर्करोगजन्य ठरेल असा पदार्थ
- गट 3- वर्गीकृत न करता येण्यासारखा पदार्थ
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या डॉ.मेरी शुबॉउर-बेरिगन म्हणाल्या, यातील पुरावे पटवून देण्यासाठी तितकेचे सबळ नव्हते, खरंतर आता अशा स्वीटनवर अधिक संशोधन करण्याची ही वेळ आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅन्सरची ही वर्गवारी नेहमीच दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना खाद्य पुरवत आली आहे. अल्कोहोल आणि प्लुटोनिअम हे एकाच गटात ठेवण्यात आले आहेत (या दोन्हींमुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालंय), पण यातील एक दुसऱ्यापेक्षा जास्त घातक आहे.
त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना आणि फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या एकत्र तज्ज्ञ समितीने फुड अॅडिटिव्ह्ज म्हणजे पदार्थांची रुची वाढवणाऱ्या घटकांचे सुरक्षित प्रमाण किती असावे यावर अभ्यास सुरू केला.
या समितीने कॅन्सरचा धोका तसेच इतर हृदयरोग, टाइप टू डायबेटिससारख्या आजारांना आमंत्रण मिळेल अशा धोक्यांच्या दृष्टिने अभ्यास केला. मात्र 1981 साली त्यांनी दिलेल्या सल्ल्यात काही बदल करावा असं कोणतंही पुरेसं कारण त्यांना मिळालं नाही.
त्यामुळे त्याचं सुरक्षित प्रमाण तुमच्या वजनाच्या प्रतिकिलोग्रॅम 40 मिलीग्रॅम इतकं आहे.
हां हे काही टारगेट नाही. तर कमाल पातळी आहे. ही सूचना तुमच्या वजनावर आधारीत आहे, लहान मुलांचं वजन कमी असल्यामुळे ते या पातळीपर्यंत दिवसभरात पोहोचण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ब्रँका म्हणतात, यामुळेच जेवताना असली गोड फेसाळ पेयं जवळ ठेवूच नयेत. त्यामुळे लहान मुलांना गोड खाण्याची सवय लागण्याचा धोका असतो.
लोकांना वजन कमी करण्यासाठी ही स्वीटनर्स मदत करत नाहीत असे पुरावे अनेक अभ्यासात सापडल्याचंही ते विशेष भर देऊन सांगतात.
त्यामुळे प्रत्येकानेच कमी गोड पदार्थांकडे वळलं पाहिजे. साखर आणि स्वीटनर्स दोन्ही कमी केले पाहिजेत. तसेच जे पदार्थ कमी गोड आहेत पण चविष्ट आहेत अशा पदार्थांकडे वळलं पाहिजे असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
अस्पार्टेममुळे कॅन्सर कसा होतो (जर होत असेल तर) हा प्रश्न उरतोच. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आपल्या आतड्यात अस्पार्टेमचं तीन घटकात विभाजन होतं. फिनिलालेनाइन, अस्पेर्टिक अॅसिड आणि मिथेनॉल हे ते तीन घटक.
पण कॅन्सरशी निगडित नसलेल्या अनेक पदार्थांच्या पचनात हे घटक निर्माण होत असतात. तसेच अस्पर्टेममुळे लोकांच्या जनुकांतही कॅन्सरजन्य बदल होत नाहीत असंही संशोधकांना दिसलं आहे. हा पण शरीरात इन्फ्लमेशन म्हणजे दाह वाढण्याचं ते एक कारण असू शकतं.
फ्रान्सीस हंट-वूड हे इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएसनचे सरचिटणीस आहेत. त्या सांगतात, यामुळे अस्पार्टेम सुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
त्या सांगतात, अस्पार्टेम हे कोणत्याही इतर लो कॅलरी किंवा नो कॅलरी स्वीटनरसारखेच आहे. ते चौरस आहाराचा एक भाग म्हणून वापरले तर त्या व्यक्तीच्या आहारातलं साखरेचं प्रमाण ते कमी करण्यासाठी पर्याय म्हणून वापरता येतात.
जगातील काही लोकांना अस्पार्टेम आहारात घेता येत नाही. फेनिलकिटोनुरिया म्हणजेच पीकेयू असणारे लोक अस्पार्टेमचं विघटन झाल्यावर तयार होणारं फेनिलालानाइन पचवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सुरक्षित नाही.
हे ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








