अमेरिकेनं हल्ले केलेल्या आण्विक तळांवर काय स्थिती? इराण कसं प्रत्युत्तर देईल?

अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित तीन ठिकाणांवर हल्ले केले

फोटो स्रोत, Maxar Technologies

    • Author, थॉमस मॅकिन्टॉश आणि नदीन युसिफ
    • Role, बीबीसी न्यूज

इस्रायल-इराण संघर्षात आता अमेरिका प्रत्यक्ष सहभागी झालीय. 22 जूनच्या पहाटे अमेरिकेनं इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांना लक्ष्य केलं.

अमेरिकेनं फोर्दो, इस्फहान आणि नतांझवर बंकर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रं डागली.

अमेरिकेनं इराणमधील तीन अणू तळांवर यशस्वी बॉम्बहल्ला केला असून ती ठिकाणं पूर्णतः नष्ट करण्यात आली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

या हल्ल्याचा नेमका परिणाम समजून घेण्यासाठी काही कालावधी जाईल. तरीही सुरुवातीच्या अंदाजानुसार सर्व ठिकाणांचे अत्यंत गंभीर नुकसान झाल्याचे दिसते, असं पेंटागॉननं सांगितलं.

या हल्ल्यांची योजना आखताना इस्रायल अमेरिकेच्या संपर्कात होते, असं इस्रायलनं स्पष्ट केलं आहे.

तर इराणी अधिकाऱ्यांनी आण्विक सुविधांवर हल्ला झाल्याचे मान्य केलं, परंतु कोणतंही मोठं नुकसान झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशातील हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.

अमेरिकेने कोणती शस्त्रं वापरली?

'ऑपरेशन मिडनाइट हॅमर'मध्ये 125 अमेरिकन लष्करी विमानं सहभागी झाली होती, ज्यात सात बी-2 स्टील्थ बॉम्बर्सचा समावेश होता, अशी माहिती अमेरिकेच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डॅन केन यांनी दिली.

फोर्दो, इस्फहान आणि नतांझ या तीन आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं होतं, असं अमेरिकेनं सांगितलं.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना, केन यांनी सांगितलं की, बॉम्बर्स अमेरिकेहून 18 तासांच्या उड्डाणावर निघाले, त्यातील काही बॉम्बर्स पश्चिमेकडे पॅसिफिकमध्ये 'लक्ष विचलित करण्यासाठी' गेले, तर सात बी-2 बॉम्बर्स हे इराणच्या दिशेनं पुढे गेले.

विमानं इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी, एका अमेरिकन पाणबुडीवरून इस्फहान तळावर असलेल्या लक्ष्यांवर तब्बल 24 टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रं सोडण्यात आली.

बॉम्बर्स इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश करत असतानाच, अमेरिकेनं अनेक युक्त्या वापरल्या, ज्यात लक्ष विचलित करणारी यंत्रसामग्रीही होती. त्याचवेळी, लढाऊ विमानांनी पुढे जाऊन हवाई क्षेत्र मोकळं केले, शत्रूची विमानं आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची तपासणी केली, असं केन यांनी सांगितलं.

अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित तीन ठिकाणांवर हल्ले केले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित तीन ठिकाणांवर हल्ले केले
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या बी-2 बॉम्बरने फोर्दो येथील अणू केंद्रावर दोन जीबीयू-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर्स (एमओपी), ज्याला 'बंकर बस्टर' बॉम्ब म्हणूनही ओळखलं जातं, ते सोडण्यात आले. केन यांनी सांगितलं की, एकूण 14 एमओपींद्वारे दोन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.

इराणमधील तीनही अणू केंद्रांना 18:40 इस्टर्न (पूर्व) टाइम (23:40 बीएसटी) आणि 19:05 इस्टर्न टाइम (00:05 बीएसटी) दरम्यान लक्ष्य केलं गेलं.

त्यांनतर बॉम्बर्स इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडले आणि अमेरिकेकडे परतले.

"इराणच्या फायटर जेट्सनी उड्डाण केलं नाही, आणि असं दिसतं की त्यांच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या (सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टिम्स) क्षेपणास्त्र यंत्रणांना आम्ही दिसलो नाही," असं केन यांनी सांगितलं.

या ऑपरेशनमध्ये इराणी सैनिक किंवा इराणी जनतेला लक्ष्य केले गेले नव्हते, अशी माहिती संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिली.

ही मोहीम इराणमधील "सत्ता बदलण्यासाठी नव्हती", असं त्यांनी पुढं स्पष्ट केलं.

ही मोहीम महिने व अनेक आठवड्यांच्या नियोजनांतर प्रत्यक्षात पार पडली. इस्रायलनं आम्हाला यासाठी पाठिंबा दिला, असं हेगसेथ यांनी सांगितलं.

अमेरिकेनं फोर्दो, इस्फहान आणि नतांझवर बंकर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रं डागली.

फोटो स्रोत, Getty Images / Reuters

फोटो कॅप्शन, अमेरिकेनं फोर्दो, इस्फहान आणि नतांझवर बंकर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रं डागली.

इराणमधील अत्यंत दुर्गम डोंगराळ भागात फोर्दो अणुऊर्जा केंद्र आहे. इथे युरेनियम संवर्धन प्रकल्पाचा समावेश आहे. इराणच्या अणुऊर्जा महत्त्वाकांक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

तेहरानच्या दक्षिणेला असलेले हे तळ ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनेल बोगद्यापेक्षा जास्त खोल असल्याचे बोलले जाते.

फोर्दोची भूमिगत खोली इतकी खोल आहे की, तिथं फक्त अमेरिकेचे बंकर बस्टरच प्रवेश करु शकतं.

हे बॉम्ब 13,000 किलो (30,000 पौंड) वजनाचे असून, तज्ज्ञांच्या मते, सुमारे 18 मीटर (60 फूट) काँक्रीट किंवा 61 मीटर (200 फूट) भूगर्भात घुसू शकतं.

फोर्दोच्या खोल बोगद्यामुळे, एमओपी बॉम्ब यशस्वी होईल याची खात्री नाही, परंतु सध्यातरी तोच एकमेव बॉम्ब आहे, जो या अणू तळाच्या जवळपास पोहोचू शकतो.

सात बी-2 स्पिरिट बॉम्बर्समधून 14 एमओपी बॉम्बसह एकूण 75 अचूक मार्गदर्शित शस्त्रं इराणविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये वापरल्याचे केन यांनी सांगितलं.

हल्ल्यांच्या परिणामांबाबत काय माहिती आहे?

अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचं किती नुकसान झालं, हे समजण्यास काही काळ लागेल. पण सुरुवातीच्या टप्प्यात तीनही अणू तळांचं गंभीर नुकसान झालं आहे. तीनही ठिकाणं नष्ट झाली आहेत, असा दावा जनरल केन यांनी केला आहे.

22 जून रोजी घेतलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये फोर्दो अणू ऊर्जा प्रकल्पावर सहा नवीन खड्डे दिसून आले आहेत. हे कदाचित अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचे बिंदू असावेत. तसेच पर्वतावर धुरांचे ढग दाटले असून जागोजागी अवशेष पसरलेले दिसतात.

22 जून रोजी घेतलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये फोर्दो अणू ऊर्जा प्रकल्पावर नवीन खड्डे दिसून आले आहेत.

फोटो स्रोत, Maxar Technologies

फोटो कॅप्शन, 22 जून रोजी घेतलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये फोर्दो अणू ऊर्जा प्रकल्पावर नवीन खड्डे दिसून आले आहेत.

अमेरिकेनं या हल्ल्यात एमओपी बॉम्ब वापरल्याचे स्पष्ट केल्यानंतर, मॅकेंझी इंटेलिजन्स सर्व्हिसेसचे वरिष्ठ इमेजरी विश्लेषक स्टू रे यांनी 'बीबीसी व्हेरिफाय'ला सांगितलं की, "प्रवेशबिंदूवर मोठा स्फोट दिसणार नाही, कारण हा बॉम्ब तिथे स्फोट होण्यासाठी नव्हे तर भूगर्भात खोलवर जाऊन स्फोट घडवून आणण्यासाठी डिझाइन केलेला आहे."

असं दिसतं की दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन स्वतंत्र स्फोटकं टाकण्यात आली होती, आणि जमिनीवर दिसणारा करडा रंग हे स्फोटामुळे उडालेल्या काँक्रीटच्या अवशेषांसारखं वाटतात, असं ते म्हणाले.

बोगद्यांचे प्रवेशद्वार बंद झालेले दिसतात. तिथे कोणतेही खड्डे किंवा स्फोटाचे ठिकाण दिसले नाही. कदाचित हवाई हल्ल्यातून प्रवेशद्वारांना थेट लक्ष्य होण्यापासून वाचवण्यासाठी इराणकडून केलेला हा प्रयत्न असावा, असं रे यांनी सूचित केलं.

तीन अणू तळांवर बॉम्ब हल्ले करणं हे "क्रूर उल्लंघन" आहे, असं इराणच्या अणू ऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे.

सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्रांची अणू ऊर्जा संस्था (आयएइए) या दोघांनीही हल्ल्यानंतर किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नसल्याचे म्हटलं आहे.

इराणच्या स्टेट ब्रॉडकास्टचे उपराजकीय संचालक हसन अबेदिनी यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी सरकारी टीव्हीवर हजेरी लावली.

इराणनं हे तीनही अणू ऊर्जा तळ 'काही काळापूर्वीच' रिकामे केले होते. तिथलं साहित्य आधीच हलवल्यामुळे इराणाला मोठा फटका बसला नाही, असं ते म्हणाले.

इराण कशाप्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो?

अमेरिकेच्या बॉम्बस्फोटाच्या काही तासांतच, इराणनं तेल अवीव आणि हैफाच्या भागावर नवीन मिसाइल हल्ले केले. अधिकाऱ्यांच्या मते, या हल्यात किमान 86 लोक जखमी झाले आहेत.

अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर द्यावेच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इशारा दिला आहे.

"आम्ही नेहमीच म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करण्यास तयार आहोत, पण आमचे तर्क स्वीकारण्याऐवजी दुसऱ्या बाजूनं इराणी राष्ट्राच्या आत्मसमर्पणाची मागणी केली जात आहे," असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

बीबीसी सुरक्षा प्रतिनिधी फ्रँक गार्डनर म्हणतात की, अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणला आता तीन धोरणात्मक पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागेल:

1) काहीही न करणं - यामुळे पुढील अमेरिकन हल्ल्यांपासून ते वाचू शकतात. ते राजनैतिक मार्ग स्वीकारून अमेरिकेशी पुन्हा चर्चा सुरु करू शकतात. पण काहीही न करणं हे इराणी शासनाला दुर्बल दाखवतं, विशेषतः त्यांनी जे सावधगिरीचे इशारे दिले होते. त्यामुळे ते कदाचित जनतेवर आपला दबदबा कमी होण्याचा धोका पत्करूनही पुढील हल्ल्यांचा धोका टाळण्याचा निर्णय घेतील.

2) कठोर आणि वेगवान प्रत्युत्तर देईल - इराणकडे अनेक वर्षे तयार करून लपवून ठेवलेल्या मोठ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. त्यांच्याकडे सुमारे 20 अमेरिकन लष्करी तळांची यादी आहे, ते मध्य पूर्वेत लक्ष्य करू शकतात. ते ड्रोन आणि वेगवान टोर्पिडो बोटींचा वापर करून अमेरिकन नौदलावर 'एकाचवेळी झुंडीने हल्ले' देखील करू शकतात.

3) आपल्या सोयीनुसार नंतर प्रत्युत्तर देणे - याचा अर्थ सध्याचा तणाव कमी होईपर्यंत थांबणं आणि नंतर अचानक हल्ला करणं. ज्यावेळी अमेरिकेचे लष्करी तळ पूर्ण सज्ज नसतील तेव्हा त्यांना लक्ष्य करणं.

या हल्ल्याचे अमेरिकेत काय पडसाद उमटले?

ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ या सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत फोर्दो, नतांझ आणि इस्फहानवरील हल्ल्याची पुष्टी केली.

हल्ल्याच्या अवघ्या दोन तासांनंतर उपराष्ट्राध्य जेडी व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पीट हेगसेथ यांच्यासह ट्रम्प यांनी टेलिव्हिजनवर भाषण दिलं.

इराणने जर राजनैतिक मार्गानं तोडगा काढला नाही तर भविष्यात त्यांच्यावर "फार मोठे" हल्ले होतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

"लक्षात ठेवा, अजूनही अनेक टार्गेट राहिलेले आहेत," असंही त्यांनी म्हटलं.

टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ यांच्यासह अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांच्या या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.

सिनेटर मिच मॅककॉनेल हे ट्रम्प यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांनी "हा तेहरानमधील युद्धप्रेमींना दिलेला विवेकपूर्ण प्रतिसाद" म्हणून या हल्ल्याचं वर्णन केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प

रिपब्लिकन काँग्रेसमन थॉमस मॅसी, यांनी याच आठवड्यात ट्रम्प यांना कायदेकर्त्यांच्या परवानगीशिवाय इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी एक विधेयक सादर केलं होतं.

त्यांनी एक्सवर या हल्ल्यांना "संविधान विरोधी" म्हटलं आहे. त्यावर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मॅसी यांना "दुर्दैवी लुजर (पराभूत)" असं संबोधलं.

अमेरिकेच्या राज्यघटनेच्या कलम 1 नुसार युद्ध घोषित करण्याचा अधिकार काँग्रेसच्या हातात आहे. म्हणजेच प्रतिनिधी सभेतील आणि सिनेटमधील निवडून आलेल्या विधिमंडळीय सदस्यांच्या हाती तो अधिकार आहे.

पण कलम 2 नुसार राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकेच्या सैन्याचे प्रमुख (कमांडर इन चीफ) असतात आणि देशावर झालेल्या किंवा होण्याच्या शक्यतेनं होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सैन्याचा वापर करण्याचा अधिकार त्यांना दिला आहे.

अमेरिकेतील प्रमुख डेमोक्रॅट नेते हकीम जेफ्रीज यांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला मध्यपूर्वेतील "संभाव्य विनाशकारी युद्धात अडकण्याचा" धोका पत्करला असल्याचे म्हटलं आहे. तर इतरांनी ट्रम्प यांच्यावर नवीन युद्ध सुरू करताना काँग्रेसला बगल दिल्याचा आरोप केला आहे.

या हल्यावर जगातील इतर देशांच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?

इराणनं मध्यपूर्वेत आणखी अस्थिरता निर्माण होईल, असं कोणतंही पाऊल उचलू नये, असं आवाहन ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी केलं आहे.

याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी इराणकडे कधीही अण्वस्त्र असू नयेत, असं आमचं स्पष्ट मत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, इस्रायलच्या सुरक्षेलाही त्यांनी पाठिंबा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना धोकादायक पातळीवरचा वाढलेला तणाव असं म्हटलं. तर युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कॅलास यांनी सर्वांनी मागे हटून पुन्हा एकदा वाटाघाटासाठी एकत्र यावं, असं आवाहन केलं आहे.

सौदी अरेबियाने "गंभीर चिंता" व्यक्त केली आहे, तर ओमाननं हवाई हल्ल्यांचा निषेध करत तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी संवाद साधला असून "आगामी वाटचालीसाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग आहे" असं म्हटलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सहकारी दिमित्री मेदवेदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "ट्रम्प, शांतता प्रस्थापित करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून जगासमोर स्वतःला सादर करत आहेत, त्यांनी अमेरिकेसाठी एक नवीन युद्ध सुरू केलं आहे," असं म्हटलं आहे.

"अशा प्रकारचं यश मिळवून ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

याची सुरुवात कशी झाली?

इस्रायलनं 13 जून 2025 रोजी अनेक इराणी आण्विक आणि लष्करी तळांवर अचानक हल्ला केला. त्यांचा उद्देश इराणच्या आण्विक कार्यक्रमाला तोडणं हा होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण आण्विक बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप केला होता.

इराणनं आपली आण्विक महत्त्वकांक्षा शांततापूर्ण असल्याचे ठामपणे सांगितले आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायलवर शेकडो रॉकेट्स आणि ड्रोन हल्ले केले. दोन देशांमध्ये आता सातव्या दिवसापर्यंत चाललेल्या हवाई युद्धात परस्पर हल्ले सुरू आहेत.

इराणनं अण्वस्त्रं बाळगण्यास आपला विरोध असल्याचे ट्रम्प हे फार पूर्वीपासून सांगत आले आहेत. इस्त्रायलकडे अशी शस्त्रं आहेत असं मानलं जातं. परंतु, इस्रायलनं कधी त्याला नकारही दिला नाही किंवा त्याची पुष्टीही केलेली नाही.

इराणने युरेनियमचा साठा अभूतपूर्व पातळीवर वाढवला असला तरी ते आण्विक शस्त्र तयार करत नाहीत, असं मार्च महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी म्हटलं होतं. मात्र, ट्रम्प यांनी अलीकडेच हे मूल्यमापन "चुकीचे" असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील "मूर्ख आणि अंतहीन युद्धांमध्ये" गुंतवल्याबद्दल मागील (पूर्वीच्या) अमेरिकन प्रशासनांचा निषेध केला होता आणि अमेरिकेला परदेशी संघर्षांपासून दूर ठेवण्याचं वचन दिलं होतं.

इस्रायलच्या अनपेक्षित हल्ल्याच्या वेळी अमेरिका आणि इराण यांच्यात आण्विक चर्चाही चालू होत्या. फक्त दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, महत्त्वाची चर्चा करण्यासाठी इराणला दोन आठवडे देणार आहोत. परंतु, ही वेळमर्यादा खूपच छोटी ठरली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)