आपल्या कार आणि टू-व्हीलरचं उत्पादन करताना कामगारांची बोटं आणि हात का तुटत आहेत?

(सूचना- या लेखातील तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)
"माझा अपघात झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती. प्रेस मशीनने अचानक डबल शॉट मारला. माझ्या डाव्या हाताच्या 4 बोटांचा चुराडा झाला. मला काहीच सुचलं नाही. हात बाहेर काढेपर्यंत 15 मिनिटे गेली. तिथून दवाखान्यात जाईपर्यंत डोळ्यांसमोर फक्त माझी आईच दिसत होती."
साताऱ्याहून पुण्यात एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या सोमनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलेलं हे वास्तव.
पुणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. तिथे जगभरातील नावाजलेल्या ऑटोमोबाईल कंपनींच्या वाहनांचं उत्पादन होतं.
शिवाय, या वाहनांसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी भोसरी, पिंपरी चिंचवड, खेड अशा अनेक ठिकाणी छोटे-छोटे कारखाने आहेत.
तिथं काम करताना सतत अपघात होतात. यामध्ये कामगारांचे हात-बोटं चिरडली जातात. त्यामुळे ते आयुष्यभरासाठी अपंग होतात. सोमनाथ हे त्यापैकीच एक कामगार आहेत.

या कामगारांसाठी काम करणाऱ्या सेफ इन इंडिया फाऊंडेशनच्या (SII) मते, त्यांच्या नोंदीत असलेल्या जखमी कामगारांपैकी तब्बल 78 टक्के केसेस या ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील आहेत.
कामगार सुरक्षा नियमांनुसार पॉवर प्रेस मशीनची नियमित देखभाल आणि आधुनिक तंत्रज्ञानानुसार त्यात बदल होणं अपेक्षित आहे.
मात्र, कंपनी मालकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे या मशीन कामगारांसाठी धोकादायक ठरतायत.
असा प्रकार हा थेट कामगार सुरक्षा कायद्यांचं उल्लंघन असल्याचं सेफ इन इंडियाच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अपघातानंतर या कामगारांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.
SIIने दिलेल्या माहितीनुसार, अशा मशीनवर काम करणाऱ्या महिला अधिक असुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अशा घटना केवळ पुण्यातील एमआयडीसीपुरत्या मर्यादित नाहीत, तर संपूर्ण भारतातील वाहन उत्पादन उद्योगात कामगारांची बोटे आणि हात चिरडले जातायत.
या घटनांमुळे भारत एक जागतिक वाहन निर्मिती केंद्र म्हणून पुढे येत असले तरी या प्रकारांमुळे ते देशाच्या एकंदर प्रगतीला सतत अडथळा ठरत असल्याचं भारत सरकारच्या 2024-25च्या आर्थिक सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.
यातील बरेच कामगारे हे तरुण, स्थलांतरित आणि कंत्राटी तत्वावर काम करतात.
आधीच गरीबीज जगणाऱ्या या कामगारांना आयुष्य बदलून टाकणाऱ्या गंभीर दुखापतींचा सामना करावा लागतोय.
बोटं आणि हात तुटण्याची नेमकी कारणं काय?
बीड जिल्ह्यातील केज गावचे गणेश वैरागे 5 वर्षांपूर्वी पुण्यात आले.
भोसरी येथील एमायडीसीमधील एका कारखान्यात ते प्रेस ऑपरेटर म्हणून काम करायचे.
ते सांगतात, "त्या कंपनीत फोर व्हीलर, टू व्हीलर वाहनांसाठी लागणारे लोखंडाचे पार्ट बनायचे. तिथं मी प्रेस ऑपरेटर म्हणून काम करायचो. एकेदिवशी मी ओव्हरटाईम करत होतो, तेव्हा माझा अपघात झाला, त्यात माझ्या डाव्या हाताची तीन बोटं तुटली. आयुष्याचं नुकसान झालंय. मला आता बहुतांश ठिकाणी जॉब मिळत नाही."

SII च्या पुणे शाखेचे प्रमुख अमितेश सिंह सांगतात, "कामगारांचे बोटे-हात चिरडले जाण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पावर प्रेस मशीनवर होणारा डबल स्ट्रोक. ही समस्या बहुतांश निकामी किंवा तुटलेल्या मशीन पार्ट्समुळे उद्भवते. लूज किंवा तुटलेल्या पिन्स, स्प्रिंग्ज, तसेच खराब झालेले पेडल्स हे त्यामागील प्रमुख कारणं आहेत. त्यातही मशीनमधील वारंवार होणारी बिघाड कामगारांसाठी आणखी धोकादायक ठरते."
SII कडे नोंद झालेल्या काही केसेसनुसार, उत्तर प्रदेशमधील कंत्राटी कामगार रणधीर राम यांची चार बोटं मशीनची स्प्रिंग तुटल्यामुळे गमवावी लागली. एका दुसऱ्या कामगारावर डाई अचानक कोसळली आणि मशीन नीट काम करत नसल्याने तो गंभीर जखमी झाला. तर आणखी एका कामगाराचं बोट मशीन ऑपरेट करताना आणि स्पेअर पार्ट काढताना डाईमध्ये अडकून चिरडलं गेलं.
ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी पॉवर प्रेस मशीनचा वापर होतो. त्याठिकाणी सेन्सर असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिथे ठराविक गतीने काम होतं.
कामगाराचा हात चुकून प्रेस करण्याच्या ठिकाणी आला तर मशीन आपोआप थांबते आणि अपघात टाळला जाऊ शकतो.
पण हीच गोष्ट कारखानदारांना नको असते, असं इथं काम करणारे कामगार सांगतात. कारण सेन्सर काढल्याने किंवा तो झाकल्याने मशीनची गती वाढवता येते.
अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते.

याशिवाय SIIच्या माहितीनुसार, कंपनी मालकांकडून पॉवर प्रेस मशीनचा नियमित मेंटेनन्स केला जात नाही. कामगारांना पुरेसं ट्रेनिंग दिलेलं नसतं.
वार्षिक ऑडिट करताना दिरंगाई होते. महाराष्ट्रात हे उद्योग जास्त असल्याने इथे तुलनेने अधिक अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.
'या क्षेत्रातील महिला कामगार जास्त असुरक्षित'
पॉवर प्रेसमुळे हाताची बोटे तुटलेल्या शीतल रजक सांगतात की, त्यांना बळजबरीने प्रेस मशीनवर काम करायला भाग पाडलं. तेव्हा त्यांना मशीनबाबत कोणतंही ट्रेनिंग देण्यात आलं नाही.
त्यामुळे काम सुरू केल्यानंतर 10 दिवसांमध्येच शीतल यांचा अपघात झाला.
"आम्हाला काही दिवस ट्रेनिंग द्या, असं मी रोज सुपरवायझरला म्हणायचे. मात्र, त्यांनी माझ्याकडं लक्ष दिलं नाही. मला अजूनही वाटतंय की, त्या मशीनमध्येच प्रॉब्लेम होता. कारण ती मशीन हातानं फिरवल्यावरच चालू व्हायची," असं शीतल सांगतात.

सेफ इन इंडिया फाउंडेशनच्या CRUSHED 2025 अहवालानुसार, या क्षेत्रातील महिला कामगार विशेषतः अधिक असुरक्षित आहेत. कारण -
- स्थानिक स्तरावर पर्यायी रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिलांना पॉवर प्रेससारख्या धोकादायक मशीनवर काम करावे लागते.
- घरातील एक महत्त्वाची कमावती व्यक्ती असल्यामुळे त्यांना हे धोकादायक काम स्वीकारावे लागते; त्यांच्यासाठी पर्याय कमी असतो.
- पुरुषांप्रमाणेच काम करूनही महिलांना कमी वेतन दिले जाते. पुरुषांना सुपरवायझर म्हणून पुढे प्रमोशन मिळते, तर महिलांसाठी करिअरमध्ये प्रगतीची संधी जवळपास नसते.
या सर्व घटकांमुळे महिला कामगारांच्या जोखमी वाढतात आणि त्या या क्षेत्रात विशेषतः असुरक्षित ठरतात.
स्थलांतरित आयुष्य, कंत्राटी काम आणि गरिबी
हे अपघात रोखण्यासाठी मशीनमध्ये सेन्सर असणं अत्यंत गरजेचं ठरतं. मात्र, कमी वेळेत जास्त उत्पादनाचं प्रेशर असल्यानं कामगार सुरक्षा नियमांचं उल्लंघन होतं, असा आरोपही कामगारांकडून केला जातो.
उत्तर भारतातून हजारो तरुण पुण्यात कामाच्या शोधात येतात. त्यापैकी उत्तर प्रदेशचे रजनीश कुमार आहेत. त्यांनाही सेन्सर नसलेल्या पॉवर प्रेसमुळे हाताची बोटं गमवावी लागली आहेत.
ते तळमळीने सांगतात, "जर त्या मशीनाला सेन्सर असता, तर आज माझ्या हाताची बोटं वाचली असती. मात्र, उत्पादन वाढवण्यासाठी तिथल्या सुपरवायझरने माझ्या मशीनचे सेन्सर काढून ठेवले."
हे कामगार जेव्हा अपघाताचा प्रसंग सांगतात, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो. प्रेस मशीनमध्ये बोटे चिरडली की ती तिथून ताबडतोब काढता येत नाहीत. कारण त्याच क्षणी मशीनचा बिघाड झालेला असतो. त्यामुळे अडकलेली बोटे काढण्यासाठी किमान 10 ते 30 मिनिटे लागतात. त्यानंतर दवाखान्यात पोहोचायला आणखी वेळ जातो. यात कामगारांना प्रचंड यातना होतात.
मुळचे साताऱ्याचे पण आता पिंपरी-चिंचवड येथे राहणारे कामगार सोमनाथ शिंदे यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्यासोबत असाच प्रकार झाल्याचं सांगितलं.

"माझा अपघात झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती. प्रेस मशीनने अचानक डबल शॉट मारला. माझ्या 4 बोटांचा चुराडा झाला. मला काहीच सुचलं नाही. हात बाहेर काढेपर्यंत 15 मिनिटे गेली. तिथून दवाखान्यात जाईपर्यंत डोळ्यांसमोर फक्त माझी आईच दिसत होती," सोमनाथ सांगतात.
पुण्यात लहान भावासोबत भाड्याच्या एका रूममध्ये सोमनाथ राहतात. खर्च टाळण्यासाठी ते बरीच कामे स्वत: करतात.
एवढंच नाही तर एका हाताला बोटे नसतानाही ते स्वयंपाक करतात.
दुसरीकडे, अपंग झालेल्या अविवाहित तरुण कामगारांना लग्न जमवणं फार कठीण जात आहे.
"आता माझ्या लग्न करायला मुली तयार होत नाहीत. जरी काही मुलींनी होकार दिला तरी, मला वाटत नाही मी तिला आणि आमच्या भविष्यातील मुलांची काळजी घेऊ शकेन," उत्तर प्रदेशतून पुण्यात आलेला स्थलांतरित कामगार धारासिंह याने बीबीसी मराठी बोलताना सांगितलं.

दरम्यान, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, वाहनांचे सुटे भाग तयार करताना कामगारांचे अपघात झाल्याच्या घटना सरकारच्या निदर्शनास आल्या आहेत. अशावेळी संबंधित कंपनी मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अशा घटना रोखण्यासाठी सरकार अनेक पातळीवर प्रयत्न करत असल्याचा दावाही राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी केला.
फुंडकर म्हणाले, "कामगार विभागातर्फे सीआयएसप्रणालीप्रमाणे सर्व कंपन्यांची तपासणी होते. त्यांचं ऑडिट होत असतं. तसंच आम्ही बाहेरच्या लोकांकडूनही ऑडिट करत असतो."
"यामध्ये जिथे जिथे त्रुटी आढळतात, अशांना त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले जातात. ते पूर्ण न झाल्यास आम्ही त्यांच्यावर खटले दाखल करतो आणि दंडही आकारतो," अशी माहिती फुंडकर यांनी दिली.
सेफ इन इंडिया फाउंडेशनच्या मते, सरकार आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याने अशा अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या अपघातांचा फटका मुख्यतः स्थलांतरित, कंत्राटी आणि अत्यंत गरीब घरातील कामगारांना बसतो.
'मोठ्या कंपन्यांना कामगार सुरक्षिततेबाबत स्टार रेटिंग द्या'
दरम्यान, हे अपघात रोखण्यासाठी ज्या ब्रँडच्या नावानं वाहनं मार्केटमध्ये विकली जातात त्या कंपन्यांवरही जबाबदारी टाकली पाहिजे. ही वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे, असं ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल विन्नी मेहता सांगतात.
त्यांच्या मते, ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात एक मजबूत ऑडिट सिस्टीम असणं अत्यावश्यक आहे. ब्रँड ओनर्सनी टियर-1 आणि टियर-2 स्तरांवर विशेष लक्ष द्यायला हवं आणि अपघात नेमक्या कोणत्या कारणाने घडत आहेत यावर सतत नजर ठेवायला हवी.

मेहता सांगतात की, मोठ्या कंपन्यांना जोवर आर्थिक झळ बसणार नाही, तोवर त्या या समस्येकडे लक्ष देणार नाहीत. जसं की, अपघाताविषयी वाहने विकत घेणाऱ्या ग्राहकांना जागरूक करणं.
"कामगारांच्या सुरक्षिततेसाठी 'स्टार रेटिंग सिस्टीम' लागू करणंही शक्य आहे. जसं की सध्या एनर्जी सेक्टरमध्ये केलं जात आहे. ते रेटिंग वाहने विकत घेणाऱ्या ग्राहकांना सांगितलं पाहिजे जेणेकरून ते विचार करतील की, अशी वाहने खरेदी करायची की नाहीत," मेहता यांनी नमूद केलं.
याशिवाय, या अपघातांमागे आणखी एक कारण असल्याचं मेहता सांगतात. ते म्हणजे, काही कामगार पूर्ण लक्ष न देता काम करतात. कधीकधी मोबाइल फोन वापरण्यात किंवा सहकाऱ्यांशी गप्पा मारण्यात गुंतून राहतात. अशावेळी देखील दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे कामगारांना याबाबत अधिक जागरूक करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, SIIच्या मते, सरकार आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे प्रयत्न पुरेसे नसल्याने हे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. यातील बहुतेक कामगार हे स्थलांतरित, कंत्राटी आणि अत्यंत गरीब घरातील असतात.

अशा घटनेनंतर कामगारांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. ज्याच्या भरवशावर घरचा संसार सुरू आहे, त्यांना आधीपेक्षा जास्त काम करावं लागतंय.
अपघातानंतर आयुष्यावर काय परिणाम झाला याबाबत बोलताना, गणेश वैरागे सांगतात, "आता मी ओव्हरटाईम करतो. गैरहजेर रहात नाही. कारण मुलगा चौथीच्या वर्गात आहे. आणखी एक मुलगी आहे. त्यांच्यासाठी मला जास्त काम करावं लागतं. कारण जास्त पैशाची गरज आहे. त्यामुळे मी त्याच कंपनीत टिकून आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











