उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तापलं असताना, राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोडी घडलीय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील, तर इतर महापालिकांबाबल लवकरच जाहीर केलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि तो आमचाच होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी या युतीची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "ते असं वातावरण तयार करत आहेत, जणू काही रशिया आणि युक्रेन एकत्र आले आणि झेलेन्स्की व पुतिन चर्चा करत आहेत."

राज-उद्धव

लांगूलचालनाच्या राजकारणामुळे दोन्ही पक्षांनी स्वतःला कमकुवत केले असून त्यांनी आपला मतदारसंघ (व्होट बँक) गमावला आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत आणि या युतीमुळे काहीही फरक पडणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, "105-107 आणि त्याहून जास्त मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. दोघंही आम्ही ठाकरे बंधू इथे बसलेलो आहेत. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे त्यात पहिल्या त्या पाचमध्ये होते. म्हणजे ठाकरे कुटुंब त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होतं. पुढे उपरे इथे आले, त्यानंतर मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला."

मुंबईला महाराष्ट्रपासून जो तोडण्याचा प्रयत्न करेल, त्यांचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच, "भाजपने अपप्रचार केला होता की, बटेंगे तो कटेंगे. आता मी मराठी माणसाला सांगतो, चुकाल तर संपाल. आता फुटाल संपून जाल. मराठीचा वसा टाकू नका. मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही आणि त्याच्या वाटेला कोणी गेलं तर सोडत नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, "माझी एक मुलाखत झाली होती. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं मी म्हटलं होतं. या वाक्यापासून सुरूवात झाली."

त्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, "मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार.

राज-उद्धव युती

हिंदी सक्तीविरोधातल्या आंदोलनानं सोबत आणलं!

जुलै महिन्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा पार पडला.

मुंबईतल्या वरळी डोममध्ये राज-उद्धव एकत्र दिसले. यावेळी व्यासपीठावर कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, मात्र ठाकरे बंधूच केवळ व्यासपीठावर असल्यानं राजकीय आडाखे सुद्धा बांधण्यास सुरुवात झाली.

यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणातही म्हणाले होते की, "एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी."

त्यानंतर जुलैमध्येच राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या.

सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते.

राज ठाकरे, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे, उद्धव ठाकरे

महापालिका निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली.

या दोन्ही भावांनी 19 एप्रिलला काही वक्तव्यं केली. तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

राज ठाकरे यांनी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे."

"या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं- एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे."

"हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा," असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले...

फोटो स्रोत, Shivsena UBT

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले...

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं.

"किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे त्यांना (भाजपाला) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करणं असं चालणार नाही."

"महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही. त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली, पण आधी हे ठरवलं पाहिजे."

"माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची, मग टाळी दिल्याची हाळी द्यायची," असं ते म्हणाले होते.

आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी "संदेश कशाला आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ", असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)