2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखी किती वाढतील? - सोपी गोष्ट
2025 सालात सोनं आणि चांदीच्या दरांनी विश्लेषकांना आणि गुंतवणूकदारांना चकित केलं होतं. सोन्याच्या किंमती 2025 मध्ये 65% वाढल्या तर चांदीच्या किंमतींमध्ये 180% वाढ झाली.
सोन्याचे दर का वाढले होते? कारण जगभरात अनेक संघर्ष सुरू होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ, ट्रेड वॉर, इतर धोरणं या सगळ्याचा परिणाम झाला, जागतिक गुंतवणूकदारांचा डॉलरवरचा विश्वास घटला, बँक ऑफ अमेरिका आणि जगभरातल्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा परिणाम झाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं - वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं.
भारतातल्या सोन्याच्या दरांवर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य, सण-लग्नसराईत वाढलेली मागणी याचाही परिणाम झाला.
पण मग चांदी इतकी का उसळली?
कारण चांदीला जगभरातून असणाऱ्या मागणीपैकी 50% ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजकडून येते. जगभरातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी चांदी महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक्स, EVs म्हणजे इलेक्ट्रिक व्हेईकल्स - हायब्रिड गाड्या, औषध उद्योग, सोलर पॅनल्स, AI चं हार्डवेअर, 5G इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांमध्ये चांदीचा वापर होतो आणि यात चांदीला कोणताही पर्याय नाही. जगामध्ये आता उत्पादन होत असलेल्या एकूण चांदीपैकी 70% चांदीचं उत्पादन दुसऱ्या एखाद्या धातूचं उत्खनन करताना होतं. गेली पाच वर्षं या धातूसाठी मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी.
शिवाय, चांदीतली गुंतवणूक वाढलीय, सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने चांदीचा समावेश क्रिटिकल मिनरल्स लिस्टच्या मसुद्यात केल्यानंतर अमेरिकेला पाठवण्यात येणारं चांदीचं प्रमाण वाढलं, त्याचाही परिणाम दरांवर झाला.
सोनं-चांदीच्या किंमती वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टी अजूनही कायम आहेत. मग आता... 2026 मध्ये सोन्या-चांदीचे दर काय असतील? या व्हीडिओतून सविस्तरपणे जाणून घ्या.
- रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : निलेश भोसले






