'बीबीसी आय'च्या रिपोर्टनंतर भारत सरकारनं 'या' औषधांच्या निर्मितीवर तातडीनं बंदी घातली

बीबीसीनं छुप्या कॅमेऱ्याचा वापर करुन अ‍ॅव्हियोचे संचालक विनोद शर्मांचं शुटिंग केलं.
    • Author, बीबीसी आय इनव्हेस्टिगेशन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

बीबीसी आय इन्व्हिस्टिगेशन टीमने भारतातील एका फार्मास्युटिकल कंपनीबाबत एक अत्यंत धक्कादायक रिपोर्ट प्रकाशित केला होता. ही कंपनी अत्यंत घातक अशा आणि व्यसन लागणाऱ्या ओपिऑइड्स (Opioids) म्हणजे एक प्रकारच्या वेदनाशामक औषधांचं विनापरवाना उत्पादन करुन ते बेकायदेशीररित्या पश्चिम आफ्रिकेत निर्यात करत असल्याचं यातून उघड झालं होतं.

यानंतर आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने बीबीसीच्या रिपोर्टचा उल्लेख करून भारतामध्ये टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉलच्या निर्मितीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा एक आदेश जारी केला असून आता ही औषधं भारतात बनवता येणार नाहीत.

या रिपोर्टमध्ये एव्हिओ या कंपनीचं एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. ही कंपनी आफ्रिकन देशामध्ये टेपेंटाडॉल हे औषध निर्यात करत होती. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील सार्वजनिक आरोग्य संकटात आल्याचं बीबीसी आय इन्व्हिस्टिगेशन टीमनं उघड केलं होतं.

त्यानुसार आता भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या औषध निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने सदर कंपनीच्या कारखान्यावर आणि स्टोरेज गोदामावर छापा टाकला असून सर्व साठा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे पुढील उत्पादन प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेली आहे.

भारत सरकार

फोटो स्रोत, GOVERNMENT OF INDIA

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्यात विषयक ना हरकत प्रमाणपत्र आणि टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल व त्यांच्या अशा सर्व उत्पादनांची निर्मिती करण्याची परवानगी मागे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच वरील मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती या विभागाने दिलीय.

आयात करत असलेल्या देशांमध्ये परवानगी नसलेल्या टेपेंटाडॉल आणि इतर सर्व कॉम्बिनेशनच्या निर्मितीवर भारत सरकारने बंदी घातलीय.

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत सदर कंपनीस यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

'बीबीसी आय'ने केलेला रिपोर्ट खालीलप्रमाणे :

एक भारतीय फार्मास्युटिकल कंपनी अत्यंत घातक अशा आणि व्यसन लागणाऱ्या ओपिऑइड्स (Opioids) म्हणजे एक प्रकारच्या वेदनाशामक औषधांचं विनापरवाना उत्पादन करुन ते बेकायदेशीररित्या पश्चिम आफ्रिकेत निर्यात करत आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या औषधामुळं पश्चिम आफ्रिकेतील सार्वजनिक आरोग्य संकटात आल्याचं बीबीसी आय इन्व्हिस्टिगेशन टीमनं उघड केलं आहे.

मुंबईतील अ‍ॅव्हियो फार्मास्युटिकल्स (Aveo Pharmaceuticals) कंपनी ही वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या ब्रँडच्या नावानं तयार करते. त्याचं पॅकेजिंगही अगदी अस्सल औषधांसारखंच असतं.

पण या सर्व गोळ्यांमध्ये एकच हानिकारक मिश्रण असतं, ते म्हणजे टॅपेंटाडॉल, अत्यंत प्रभावी असे ओपिऑइड्स आणि कॅरिसोप्रोडॉल हे स्नायूमध्ये शिथिलता आणण्यासाठी व्यसनाधीनांकडून वापरला जाणारा घटक. युरोपमध्ये अशा औषधांवर बंदी आहे.

औषधांच्या या कॉम्बिनेशनला जगात कुठंच परवानगी देण्यात आलेली नाही. या औषधामुळं श्वसनाची समस्या आणि फेफरे येऊ शकतात. याचा अतिरेक झाल्यास माणूस दगावण्याचीही शक्यता असते.

इतके धोके असूनही हे ओपिऑइड्स पश्चिम आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये 'स्ट्रिट ड्रग्ज' म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण स्वस्त असल्याने याची मोठी मागणी या देशांमध्ये आहे. त्याचबरोबर ते सहज उपलब्धही होतात.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला घाना, नायजेरिया आणि कोटे डी'आयव्हरीच्या रस्त्यांवर अ‍ॅव्हियोचा लोगो असलेल्या या औषधांची पाकिटं मिळाली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'धोकादायक आहे.. पण व्यवसाय आहे'

बीबीसीनं भारतातील अ‍ॅव्हियो कंपनीचा शोध घेतला. त्यांनी आपल्या एका प्रतिनिधीला गुप्तपणे अ‍ॅव्हियो फॅक्टरीत पाठवलं. या प्रतिनिधीनं ते नायजेरियाला ओपिओइडचा पुरवठा करणारे एक आफ्रिकन व्यापारी असल्याचं भासवून कंपनीशी संपर्क साधला होता.

बीबीसीनं छुप्या कॅमेऱ्याचा वापर करुन अ‍ॅव्हियोचे संचालक विनोद शर्मांचं शुटिंग केलं. विनोद शर्मांनी बीबीसीच्या या प्रतिनिधीला पश्चिम आफ्रिकेत अ‍ॅव्हियोच्या माध्यमातून विकली जाणारी तीच धोकादायक उत्पादनं दाखवली.

अत्यंत गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये बीबीसीच्या प्रतिनिधीनं शर्मा यांना या गोळ्या नायजेरियातील टीनएजर्सला विकण्याची योजना असल्याचं सांगितलं. तसंच नायजेरियातील युवकांना हे ड्रग्ज खूप आवडतात, असंही तो प्रतिनिधी म्हणाला.

यावर शर्मांनी आपल्या चेहऱ्यावर विशेष अशी कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. त्यांनी फक्त "ठीक आहे," असं म्हटलं.

व्हीडिओ कॅप्शन, पश्चिम आफ्रिकेतील ओपिऑइड संकटाला खतपाणी घालणाऱ्या भारतीय औषध कंपनीचा पर्दाफाश

"एखाद्या व्यक्तीनं दोन किंवा तीन गोळ्या एकत्र घेतल्यास तिला एकदम 'रिलॅक्स' वाटेल. तो 'उत्तेजित' होईल, असं शर्मा म्हणाले. बैठकीच्या शेवटी त्यांनी म्हटलं की, "हे ड्रग्ज आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे, पण शेवटी हा एक व्यवसाय आहे", असंही ते म्हणाले.

हा आरोग्याला हानी पोहोचणारा व्यवसाय आहे. या ड्रग्जमुळं पश्चिम आफ्रिकेतील लाखो तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे.

उत्तर घानामधील टमाले शहरातील युवक मोठ्याप्रमाणात घातक ओपिऑइड्सचे सेवन करतात.

या शहरातील एक प्रमुख व्यक्ती असलेल्या अलहसन महाम यांनी सुमारे 100 स्थानिक नागरिकांचा एक स्वयंसेवी गट तयार केला आहे. ड्रग्ज विकणाऱ्यांवर छापा मारणं आणि रस्त्यावरुन हे ड्रग्ज नाहीसं करणं हे या गटाचं उद्दिष्ट आहे.

"या ड्रग्जचा वापर करणाऱ्यांची शुद्ध हरपते. आगीवर केरोसीन ओतल्यावर जसा भडका होतो, हे अगदी तसंच आहे," असं महम म्हणतात.

टमालेतील एका व्यसनी व्यक्तीनं तर 'या ड्रग्जने आमचं आयुष्य अक्षरश: वाया गेलं', अशी प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली.

'नायजेरियाच्या युवा पिढीला धोका'

बीबीसी टीमनं स्वतः ही टास्क फोर्स कसं काम करते हे जाणून घेतलं. ड्रग्ज डीलची माहिती मिळाल्यावर लगेचच बाईकवरून टमालेतील एका सर्वात गरीब वस्तीपर्यंत ते पोहोचले. रस्त्यात त्यांना एक तरुण नशेमुळे गुंगी आलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. स्थानिकांच्या मते, त्या युवकानं हेच ड्रग्ज घेतलं होतं.

टास्क फोर्सनं त्या ड्रग्ज डिलरला पकडलं तेव्हा त्याच्याकडं एक प्लास्टिक बॅग सापडली. त्या बॅगमध्ये टॅफ्रोडोलचं लेबल असलेल्या हिरव्या गोळ्या होत्या. त्या पॅकेट्सवर अ‍ॅव्हिओ फार्मास्युटिकल्सचा लोगो आणि शिक्काही होता.

अ‍ॅव्हियोच्या गोळ्यांमुळं फक्त टमालेचीच दुर्दशा झालेली नाही. अगदी तशाच प्रकारचे ड्रग्ज पोलिसांनी घानाच्या इतर भागांमधूनही जप्त केल्याचं बीबीसीला निदर्शनास आलं आहे.

अ‍ॅव्हियो कंपनीच्या गोळ्या नायजेरिया आणि कोटे डी'आयव्हरीच्या रस्त्यांवर विकले जात असल्याचे पुरावेही मिळाले. तिथले किशोरवयीन तरुण अल्कोहोलिक एनर्जी ड्रिंकमध्ये या गोळ्या मिसळून त्याची नशा करतात.

निर्यातीबाबत सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या डेटानुसार, 'अ‍ॅव्हियो फार्मास्युटिकल्स' त्यांची सहकारी कंपनी असलेल्या 'वेस्टफिन इंटरनॅशनल' या कंपनीबरोबर घाना आणि इतर पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये लाखोंच्या संख्येनं या गोळ्या पाठवते.

बेशुद्धावस्थेतील युवकानं टॅफ्रोडॉलचं सेवन केल्याचं टमालेतील टास्क फोर्सला वाटतं. कारण त्यांनी टाकलेल्या छाप्यात टॅफ्रोडॉलच सापडले होते.
फोटो कॅप्शन, बेशुद्धावस्थेतील युवकानं टॅफ्रोडॉलचं सेवन केल्याचं टमालेतील टास्क फोर्सला वाटतं. कारण त्यांनी टाकलेल्या छाप्यात टॅफ्रोडॉलच सापडले होते.

नायजेरियाची लोकसंख्या सुमारे 225 दशलक्ष (22.5 कोटी) इतकी आहे. हा देश या गोळ्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

नायजेरियाच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागानुसार सुमारे चार मिलियन नायजेरियन नागरिक अशा प्रकारच्या ओपिऑइड्सचे सेवन करतात.

"ओपिऑइड्स आमच्या तरुणांना, आमच्या कुटुंबांना उद्धवस्त करत आहे. नायजेरियाच्या प्रत्येक स्तरातील समूहामध्ये या गोळ्यांचं व्यसन केलं जात आहे," असं नायजेरियाच्या ड्रग अँड लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचे (NDLEA) प्रमुख ब्रिगेडियर जनरल मोहम्मद बुबा मारवा यांनी बीबीसीला सांगितलं

2018 मध्ये, बीबीसी आफ्रिका आयच्या एका तपासानंतर, ओपिऑइड्स म्हणून विकल्या जाणाऱ्या रस्त्यावरील या ड्रग्जचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ट्रामाडॉल नावाच्या एका ओपिऑइड पेनकिलरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

तिथल्या सरकारनं प्रिस्क्रिप्शनशिवाय ट्रामाडॉलच्या विक्रीला बंदी घातली. डोस किती घेण्यात यावा, याबाबतही कडक निर्बंध घातले गेले. तसंच अवैध गोळ्यांच्या आयातीवर कडक कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय अधिकाऱ्यांनी ट्रामाडॉलच्या निर्यातीवरील नियम कडक केले.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

'कंपनीनं शोधला नवा पर्याय'

या कडक कारवाईनंतर, अ‍ॅव्हियो फार्मास्युटिकल्सनं नवीन पर्याय शोधला. त्यांनी टॅपेंटाडॉलवर आधारित एक नवीन गोळीची निर्यात सुरू केली. ही अधिक तीव्र ओपिऑइड आणि मसल-रिलॅक्संट कॅरिसोप्रोडॉलच्या मिश्रण असलेली गोळी होती.

ओपिऑइड निर्यातदार या नवीन कॉम्बिनेशनच्या गोळ्या ट्रामाडॉलचा पर्याय म्हणून वापरत असल्याचा इशारा पश्चिम आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अ‍ॅव्हियो फार्मास्युटिकल्सच्या फॅक्टरीत अशा कॉम्बिनेशन ड्रग्जचे भरलेले खोके एकमेकांवर रचून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले दिसले. शर्मांच्या डेस्कवर टॅपेंटाडॉल-कॅरिसोप्रोडॉल या कॉकटेल गोळ्यांचे पॅकेट ठेवले होते.

या गोळ्या कंपनी वेगवेगळ्या नावानं बाजारात विकते. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय टॅफ्रोडॉल, टिमाकिंग आणि सुपर रॉयल 225 यांचा समावेश होता.

गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये, विनोद शर्मा म्हणतात की, अ‍ॅव्हियोचं कॉकटेल ड्रग "खूपच हानिकारक" आहे. पण शेवटी हा व्यवसाय आहे, असंही ते म्हणतात.
फोटो कॅप्शन, गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये, विनोद शर्मा म्हणतात की, अ‍ॅव्हियोचं कॉकटेल ड्रग "खूपच हानिकारक" आहे. पण शेवटी हा व्यवसाय आहे, असंही ते म्हणतात.

विनोद शर्मांनी बीबीसीच्या 'अंडरकव्हर' प्रतिनिधीला त्यांच्या शास्त्रज्ञांची टीम फॅक्टरीत काम करत असल्याचं सांगितलं. हे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या ड्रग्जचे कॉम्बिनेशन करून नवीन उत्पादनं बनवू शकतात, असं ते म्हणाले.

अ‍ॅव्हियोची नवीन उत्पादनं त्यांनी बनवललेल्या ट्रामाडॉलपेक्षाही अधिक धोकादायक आहेत.

भारतातील बेंगळुरु येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. लेखांश शुक्ला यांच्या मते, टॅपेंटाडॉलचे सेवन केल्यास त्या व्यक्तीवर गोळीचा परिणाम होतो आणि त्याला गाढ झोप लागते. या गोळीत ओपिऑइड्सचाच प्रभाव जाणवतो, असंही ते म्हणाले.

"ही झोप इतकी गाढ असते की, काहींना श्वासही घेता येत नाही. त्यामुळं ड्रग्जचा ओव्हरडोस होऊ शकतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.

"त्याचबरोबर तुम्ही कॅरिसोप्रोडॉल नावाचा आणखी एक घटक घेता. त्यामुळं आणखी गाढ झोप लागते. त्याचं सेवन करणाऱ्याला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. हे एक अत्यंत धोकादायक कॉम्बिनेशन वाटतं."

घानामधील टमाले येथे टाकलेल्या छाप्यात अ‍ॅव्हियोचे लेबल असलेली टॅफ्रोडॉलची पाकिटं जप्त करण्यात आली.
फोटो कॅप्शन, घानामधील टमाले येथे टाकलेल्या छाप्यात अ‍ॅव्हियोचे लेबल असलेली टॅफ्रोडॉलची पाकिटं जप्त करण्यात आली.

कॅरिसोप्रोडॉलचे व्यसन लागण्याचा धोका असल्यामुळं युरोपमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेत याच्या मर्यादित वापराला परवानगी आहे. केवळ तीन आठवड्यांपर्यंतच त्याचं सेवन करता येतं. याचं सेवन बंद केल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांमध्ये व्यक्तीला घबराट होणं, झोप न येणं, सतत भास होणं यांचा समावेश होतो.

डॉ. शुक्ला यांनी सांगितलं की, "टॅपेंटाडॉलसोबत हे मिसळल्यावर नियमित ओपिऑइड्सच्या तुलनेत याच्या समस्या आणखी तीव्र होतात."

त्यांनी सांगितलं की, या कॉम्बिनेशनच्या परिणामकारकतेबद्दल त्यांच्याकडे कोणत्याही क्लिनिकल चाचण्या उपलब्ध नाहीत.

ट्रामाडॉलचा मर्यादित डोस वापरणं कायदेशीर आहे. मात्र, टेपेंटाडॉल-कॅरिसोप्रोडॉल कॉकटेल हे अजिबातच तर्कसंगत कॉम्बिनेशन वाटत नाही. आपल्या देशात हे वापरण्यास परवानगीही देण्यात आलेली नाही, असं ते म्हणाले.

भारतामध्ये, फार्मास्युटिकल कंपन्यांना परवानगी नसलेली औषधं तयार करण्याची आणि निर्यात करण्याची कायदेशीर परवानगी नाही. जोपर्यंत ही औषधे आयात करणाऱ्या देशातील मानकं पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत परवानगी दिली जात नाही.

अ‍ॅव्हियो कंपनी टॅफ्रोडॉल आणि त्यासारखी उत्पादनं घानामध्ये पाठवते. घानाच्या राष्ट्रीय औषध नियंत्रण एजन्सीच्या मते, टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉलचं कॉम्बिनेशन परवानगी नसल्याने बेकायदेशीर आहे. त्यामुळं अ‍ॅव्हियो कंपनी घानाला टॅफ्रोडॉल निर्यात करून भारतीय कायद्याचंही उल्लंघन करत आहे.

आम्ही याबाबत विनोद शर्मा आणि अ‍ॅव्हियो फार्मास्युटिकल्सला विचारलं. पण त्यांनी यावर प्रतिसाद दिला नाही.

भारतीय औषध नियंत्रण प्राधिकरणने (CDSCO) आम्हाला सांगितलं की, भारत सरकार जागतिक सार्वजनिक आरोग्याप्रती आपली जबाबदारी जाणून आहे. या जबाबदारीने आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी भारताची औषध नियंत्रक प्रणाली कटिबद्ध आहे.

नायजेरियन अधिकाऱ्यांनी जप्त केलेले बेकायदेशीर ड्रग्ज. हे ड्रग्ज लागोसमधील एका गोदामात ठेवण्यात आले होते.
फोटो कॅप्शन, नायजेरियन अधिकाऱ्यांनी जप्त केलेले बेकायदेशीर ड्रग्ज. हे ड्रग्ज लागोसमधील एका गोदामात ठेवण्यात आले होते.

भारतातून इतर देशांना होणाऱ्या निर्यातीवर बारकाईने लक्ष ठेवले जातं. अलीकडेच कडक केलेले नियम काटेकोरपणे अंमलात आणले जात आहेत. तसेच आयात करणाऱ्या देशांना भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं जातं. त्यांच्याकडे समान मजबूत नियामक प्रणाली आहेत याची खात्री केली जाते.

सीडीएससीओने सांगितलं की, त्यांनी पश्चिम आफ्रिकेतील देशांसह इतर देशांसोबत यावर चर्चा केली आहे. तसंच गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करण्यास कटिबद्धता व्यक्त केली आहे.

गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही फार्मास्युटिकल कंपनीवर त्वरित कारवाई केली जाईल, असंही संस्थेनं सांगितलं.

अ‍ॅव्हियो विनापरवाना ओपिऑइड बनवणारी आणि निर्यात करणारी एकमेव भारतीय कंपनी नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध असलेल्या निर्यातीबाबतच्या डेटानुसार, इतर फार्मा कंपन्यादेखील याच प्रकारची उत्पादनं तयार करतात. वेगवेगळ्या ब्रँडिंगसह ही औषधं पश्चिम आफ्रिकेतील विविध ठिकाणी सहज उपलब्ध आहेत.

भारतात उच्च-दर्जाची जेनेरिक औषधे तयार केली जातात. त्यावर जगभरातील लाखो लोक अवलंबून आहेत आणि जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात निर्माण केलेल्या लसींमुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. या उद्योगाची निर्यात $28 बिलियन (22 बिलियन पाउंड) इतकी आहे.

परंतु, असे उत्पादक भारताच्या वेगानं वाढणाऱ्या औषध उद्योगाची प्रतिष्ठा धोक्यात आणत आहेत.

शर्मा यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना, बीबीसीचे अंडरकव्हर प्रतिनिधी (सुरक्षिततेसाठी त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे) म्हणाले की, "नायजेरियन पत्रकार या ओपिओइड संकटावर 20 वर्षांहून अधिक काळापासून वार्तांकन करत आहेत. परंतु शेवटी, आफ्रिकेच्या ओपिओइड संकटाच्या मुळाशी असलेल्या एका माणसाशी मी समोरा-समोर बोललो.

हा एक असा माणूस आहे जो हे उत्पादन तयार करतो आणि कंटेनर लोड करुन ते आमच्या देशांत पाठवतो. आपण जे करत आहोत, त्यातून होणाऱ्या नुकसानाविषयी त्याला माहीत होतं. पण त्याला त्याचा काही फरक पडत नाही... हा फक्त एक व्यवसाय असल्याचं तो नमूद करतो."

घानाच्या टास्क फोर्सने टमालेतील छाप्यात जप्त केलेली औषधे जाळली. त्यात अ‍ॅव्हियो ब्रँडच्या टॅफ्रोडॉलचा देखील समावेश होता.
फोटो कॅप्शन, घानाच्या टास्क फोर्सने टमालेतील छाप्यात जप्त केलेली औषधे जाळली. त्यात अ‍ॅव्हियो ब्रँडच्या टॅफ्रोडॉलचा देखील समावेश होता.

घाना येथील टमालेमध्ये बीबीसी टीमनं स्थानिक टास्क फोर्ससह पाठपुरावा करुन एक शेवटचा छापा टाकला. तिथं अ‍ॅव्हियोच्या टॅफ्रोडॉल औषधांचा आणखी साठा सापडला. त्या संध्याकाळी ते स्थानिक पार्कमध्ये जमले आणि जप्त केलेले ड्रग्ज जाळून नष्ट केले.

"सर्वांनी पाहावं म्हणून आम्ही ते खुल्या ठिकाणी जाळत आहोत," असं इथले स्थानिक नेते झिके म्हणाले. पॅकेटवर पेट्रोल टाकून पेटवले जात होते. "यातून विक्रेते आणि पुरवठादारांना एक संदेश जाईल की, आम्हाला जर हे ड्रग्ज सापडले तर आम्ही ते पुन्हा जाळू".

एकीकडे, आगीमुळं टॅफ्रोडॉलची काही शेकडा पाकिटं नष्ट केली जात होती; तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला, या साखळीत वरच्या कडीमध्ये असणारे 'विक्रेते आणि पुरवठादार' हजारो मैल दूर असलेल्या भारतात अशा प्रकारचे आणखी लाखो पॅकेट्स तयार करत होते.

इतरांचं दुःख आणि वेदनांतून मिळालेल्या नफ्यावर ते अधिकाधिक श्रीमंत होत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)