'तंबाखूच्या या व्यसनाने माझं बाळ हिरावून घेतलं', एका आईची वेदनादायक कबुली

- Author, अझीझत ओलाओलुवा
- Role, वरिष्ठ प्रतिनिधी, पश्चिम आफ्रिका गॅम्बियाहून रिपोर्टिंग
(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात. 'टाबा'चा अनुभव सांगणाऱ्या सर्व व्यक्तींची नावं बदलण्यात आली आहेत.)
*आयशातू ही गॅम्बियामध्ये राहणारी विधवा माता आहे. तिची ओळख सुरक्षित राहण्यासाठी तिचं नाव बदललेलं आहे.
आयशातू बीबीसीला सांगते की, ती मागील 15 वर्षांपासून अधूनमधून 'टाबा' वापरत होती आणि नंतर हळूहळू तिला त्याचं व्यसनच लागलं.
'टाबा' हे तंबाखू पावडरचं स्थानिक नाव आहे. पश्चिम आफ्रिकेत पुरुष-महिला अनेक वर्षांपासून याचा वापर करतात. बहुतेक लोक ते नाकातून ओढतात, धुम्रपान करतात किंवा चघळतात.
परंतु, आयशातूसारख्या अनेक महिला 'टाबा' लपून खरेदी करतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी त्याची पेस्ट योनीमध्ये लावतात.
आम्हाला ती सामुदायिक आरोग्य केंद्रातील नर्सच्या कार्यालयाजवळ भेटली. ती तिथे बसली होती. तिथे ती 'टाबा'विरोधी मोहिमेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला आली होती. 'टाबा' वापरायला सुरुवात केल्याचा तिला आज खूप पश्चाताप होत असल्याचं ती सांगते.
महिलांमध्ये छुप्या पद्धतीने व्यापार
'टाबा'ची देशभर नेटवर्कद्वारे गुप्तपणे विक्री केली जाते. अनेकदा ते स्थानिक बाजारपेठांमध्येही मिळते आणि महिला संपूर्ण देशभरात त्याची खरेदी-विक्री करतात.
गेल्या काही वर्षांत 'टाबा'ची मूळ रचना किंवा सूत्र बदललं आहे. आता तंबाखूच्या पावडरमध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळून ती पेस्टच्या स्वरूपात बनवली जात आहे.
2021 मध्ये गर्भवती राहिल्यावर, तिला 'टाबा' वापरणं थांबवायला हवं हे माहिती होतं. आधीच्या गर्भधारणांमध्ये तिनं ते सोडलंही होतं, पण यावेळी मात्र तिला ते सोडणं जमलं नाही.
या शेवटच्या गर्भधारणेत झालेल्या दुर्दैवी नुकसानीसाठी ती स्वतःच्या व्यसनालाच जबाबदार धरते. टाबाच्या वापरामुळेच आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा तिला ठाम विश्वास आहे.
बाळाची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिला सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागली. "बाळ बाहेर काढल्यानंतर त्याची त्वचा जळाल्यासारखी दिसत होती. मला तेव्हाच लक्षात आलं की मी वापरलेला टाबाच माझ्या बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला," असं ती सांगते.
तिचा हा दावा वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. पण आयशातू सांगते की टाबा वापरल्यावर नेहमीच तिच्या योनीमध्ये जळजळ जाणवत असत.
आयशातू सांगते की, तिने काही वर्षांपूर्वी टाबा वापरण्यास सुरूवात केली. कारण त्यामुळे वजन कमी होईल आणि गर्भधारणा राहण्यास मदत होईल, असं तिला वाटत होतं. पण यातील दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत.
"जेव्हा टाबा तुमच्या शरीरात जातं, तेव्हा ते तुमच्यावर नियंत्रण मिळवतं. सामान्य वाटण्यासाठी तुम्हाला ते सतत वापरावं लागतं. टाबामुळे मला आनंद मिळत होता, पण त्यामुळे माझी सेक्सची इच्छा कमी झाली," असं आयशातू सांगते.
"मला त्याचं व्यसन लागलं आणि दिवसातून तीन ते चार वेळा मी त्याचा वापर करू लागले."
"मी माझं बाळ गमावल्यानंतर टाबा वापरणं थांबवलं, त्या वेळी मला माहीत नव्हतं की मला आधीपासून गर्भाशयाचा (ग्रीव्हा) कॅन्सर होता," असं ती सांगते. तिला दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरचे निदान झाले होते, असं ती पुढे स्पष्ट करते.

आम्ही रशिदाला भेटलो (हे तिचं खरं नाव नाही), ती आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसलेली होती. रशिदा बीबीसीला सांगते की, ती सात वर्षांपासून टाबा वापरत आहे. तिच्या पतीला याबद्दल काहीही माहिती नाही. या व्यसनाने तिच्या आयुष्याचा कसा ताबा घेतला, हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
तिने तिच्या नणंदेचा हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूची आठवण सांगितली. ती म्हणाली की, "मला तिच्या जवळ तीन दिवस राहावं लागलं, पण मी माझा टाबा सोबत आणायला विसरले होते. मला इतकी इच्छा व्हायची की, त्यामुळे मला तिथं लक्ष केंद्रित करणंही जमत नव्हतं."
तिने तिच्या पुरवठादाराच्या घराकडे टाबा घेण्यासाठी जात असताना टाबा हे तिच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग कसा बनला हे सांगितलं.
बीबीसीशी बोललेल्या महिलांनी सांगितलं की, टाबा पहिल्यांदा योनीत (इंट्राव्हजायनल) वापरणाऱ्यांसाठी अतिशय वाईट अनुभव असतो.
"पहिल्यांदा त्याचा वापर केल्यावर एका तासाहून जास्त वेळ माझी शुद्ध हरपली होती. त्यावेळी याचा पुन्हा कधीच वापर करायचा नाही, असं ठरवलं. दुसऱ्यांदा वापरल्यावर मला खूप उलट्या झाल्या.
ज्याने मला टाबा वापरण्यास सांगितलं होतं, त्याने ते पुढंही सुरू ठेव असं सांगितलं. हे तुझं शरीर आतून साफ करत आहे," असं त्यानं म्हटल्याचं आयशातू सांगते.
रशिदाही आयशातूच्या मतावर सहमत आहे. ती म्हणाली की, "मला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं, शरीर थरथरायला लागलं. असं वाटलं जणू मला मलेरिया झाला आहे. नंतर मी बेशुद्ध पडले." दुसऱ्या दिवशीही तसंच झालं, "पण तिसऱ्या दिवशी मला सामान्य वाटायला लागलं," असं तिने सांगितलं.
टाबा विकणारी व्यक्ती इतर वस्तू विक्रीसाठी दाखवून त्याची पावडर लपवून ठेवतात. ते फक्त विशेष 'कोडवर्ड' (सांकेतिक शब्द) माहीत असलेल्या ग्राहकांनाच विकतात. तसेच हे साधारणपणे ग्रामीण भागातील वृद्ध महिलांच्या गटांमध्ये देखील मिळतं.

रामत ही 56 वर्षांची आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती नॉर्थ बँक क्षेत्रातील एका लहान गावात गुप्तपणे टाबा विकत आहे.
ती सांगते की, हे मिश्रण साधारणपणे नायलॉनमध्ये गुंडाळलेलं असतं आणि त्याच्या तीव्र वासामुळे कधीकधी त्यावर आणखी एक कागद गुंडाळला जातो. एक पॅक सुमारे 15 दलासी (20 सेंट) किमतीत विकला जातो.
रामतला तिचे पुरवठादार हे मिश्रण तयार करण्यासाठी काय वापरतात याची माहिती नाही. ती सांगते की, तिचा व्यवसाय जोरात चालला आहे. ती विकत असलेल्या प्रत्येक पाच लिटरच्या टाबा पावडरवर ती 200 टक्के नफा कमावते.
ती सांगते की, सुरुवातीला तिला माहीत नव्हतं की हे किती व्यसनाधीन आहे. "जर मला दुसरा एखादा फायदेशीर व्यवसाय मिळाला, तर मी ते विकणं थांबवेन कारण आता मी माझ्या सहकारी महिलांचं नुकसान करू इच्छित नाही."
"मी एकदा कधी तरी संसर्गावर उपचार करण्यासाठी टाबा वापरला होता. त्यावेळी माझा मृत्यूच झालाय असं मला वाटलं होतं. त्या दिवसापासून मी कधीच ते वापरलं नाही. काही ग्राहकांनीही त्यांना असाच अनुभव आल्याचं सांगितलं," असं ती म्हणते.
आंतरराष्ट्रीय नेटवर्क
टाबाचा पुरवठा देशाच्या पलीकडेही पसरलेला आहे, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. विक्रेते हे उत्पादन गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन आणि सेनेगलमधील कॅसामन्समधून आणतात.
गॅम्बियाने 2020 मध्ये टाबा महिलांसाठी आणि मुलींसाठी हानीकारक म्हणून घोषित केलं आहे. पण प्रत्यक्षात याचा फारसा परिणाम झालेला नाही. विक्रेते आणि वापरकर्त्यांना रोखण्यासाठी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
टाबा वापरणे बेकायदेशीर नसलं तरी, तंबाखू वापरण्याची कायदेशीर वयोमर्यादा 18 वर्षे आहे. मदर्स हेल्थ फाउंडेशन आणि जेंडर (लिंग) मंत्रालयासारख्या गटांना मुले देखील त्याचा वापर करत असल्याची काळजी आहे.
गॅम्बियामधील मेडिकल रिसर्च कौन्सिल युनिटमधील एपिडेमियोलॉजिस्ट डॉक्टर बाई चाम यांनी 2023 मध्ये टाबाचा शरीरावर होणाऱ्या परिणामांवर एक शोधनिबंध प्रकाशित केला.
'इतर धूम्रपानविरहित तंबाखूच्या परिणामांवरून टाबाचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात', असं त्यांच्या टीमला आढळून आलं.
डॉ. चाम पुढील संशोधनाचा भाग म्हणून टाबा मिश्रणांच्या नमुन्यांचे रासायनिक विश्लेषणही करत आहेत.
त्याच्या या संशोधनाचा भाग म्हणून, डॉ. चाम यांनी अशा 42 महिला आणि 15 पुरुषांची मुलाखत घेतली, जे सध्या टाबाचा वापर करतात किंवा पूर्वी वापर करत होते.
ते म्हणतात की, ज्यांच्याशी ते बोलले त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक महिलांना निकोटीन विषबाधेची लक्षणं दिसून आली- जसं की उलटी, जुलाब, अनियंत्रित लघवी, जळजळ आणि खाज सुटणे.
त्यांनी मुलाखत घेतलेल्या काही महिलांनी आपली तंबाखूची पावडर कॉस्टिक सोड्यासोबत मिसळली होती.
त्यांच्या टीमने चाचणी केलेल्या नमुन्यांमध्ये निकोटीनची आणि कॅन्सर निर्माण करणाऱ्या तंबाखू-विशिष्ट एन-नायट्रोसामाईन्सची (टीएसएनए) जास्त मात्रा आढळून आली.

बीबीसीने टाबाचे आणखी काही नमुने- एसाऊ आणि बांजुल येथून गोळा केले. ते विश्लेषणासाठी लागोस विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठवले. चाचणीत निकोटीनसारखी रासायनिक संयुगे असलेले पायरीडाइन डेरिव्हेटिव्ह्ज आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त शिशाची (लीड) पातळी आढळून आली.
गॅम्बियाच्या सरकारने देशभरातील समाज आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये टाबा वापराविरोधात जनजागृती करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांचा वापर सुरू केला आहे. जेंडर मंत्रालयाचे सोनको यांनी यासाठी माहिती आणि जनजागृती कार्यक्रम तयार केल्याचे बीबीसीला सांगितलं आहे.
देशाने मार्चमध्ये आपलं पहिलं औषध पुनर्वसन आणि उपचार केंद्र बांधण्यास सुरुवात केली, पण ते टाबा वापरणाऱ्यांसाठी देखील आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
अधिकारी पुढे काय करायचं हे ठरवत असतानाच, आयशातूसारखे माजी टाबा वापरकर्ते त्यांच्या गावात आणि समाजात टाबा वापराविरोधात जनजागृती करत आहेत.
"मी ज्या गोष्टीतून गेले त्यामधून इतर महिलांनी जावू नये, असं मला वाटतं."
रशिदालाही पश्चात्ताप आहे आणि ती आशा करते की एक दिवस हे थांबेल. "जर मला मदत मिळाली, तर मी नक्कीच टाबा वापरणं बंद करेन. माझ्यासारखं कोणी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी मी कोणालाही टाबा वापरण्याचा सल्ला देणार नाही."
(अतिरिक्त वार्तांकन युसूफ अकिनपेलू)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











