रात्रीच्या वेळी लपूनछपून महिलांचे व्हीडिओ शूट, ऑनलाइन पोस्ट करत लाखोंच्या कमाईचं प्रकरण काय?

परवानगी न घेता रात्री महिलांचे चित्रीकरण
    • Author, शोना इलियटँड, अबी स्मिटन
    • Role, बीबीसी न्यूज इन्व्हेस्टिगेशन्स
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

रात्री बाहेर पडलेल्या महिलांचे व्हीडिओ लपूनछपून चित्रीत करून ते सोशल मीडियावर टाकण्याचे प्रकार वाढत आहेत.

हे व्हीडिओ लाखो लोक पाहतात, त्यातून पैसे कमावले जातात, पण ज्यांना नकळत कॅमेऱ्यात कैद केलं जातं त्या महिलांचं खासगी आयुष्य धोक्यात येतं. ही प्रवृत्ती कशी आहे आणि ती थांबवणं इतकं अवघड आहे का? याचा तपास बीबीसीने केला आहे.

काही पुरुष रात्री बाहेर फिरणाऱ्या महिलांचे लपूनछपून व्हीडिओ चित्रीत करतात आणि ते ऑनलाइन टाकून त्यातून पैसे कमावतात, असं बीबीसीच्या तपासात आढळून आलं आहे.

हे व्हीडिओ 'वॉकिंग टूर' किंवा 'नाईटलाइफ कंटेंट' अशा नावाखाली यूट्यूब, टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टाकले जातात. या व्हीडिओंमध्ये प्रामुख्याने स्कर्ट किंवा ड्रेस घातलेल्या महिलांवरच लक्ष केंद्रित केलेलं असतं.

अनेक वेळा महिलांच्या मागून किंवा खालच्या अँगलमधून चित्रीकरण केलं जातं. त्यामुळे शरीराचे खासगी भाग दिसतात.

आम्ही चित्रीकरण झालेल्या जवळपास 50 महिलांचा शोध घेतला. त्यापैकी अनेक महिलांना आपला व्हीडिओ काढला गेला आहे, याची माहितीच नव्हती. हे कळल्यानंतर त्यांनी भीती आणि अपमानाची भावना व्यक्त केली.

एका 21 वर्षांच्या एका तरुणीचा स्कर्टखालून खालच्या अँगलमधून व्हीडिओ काढण्यात आला होता. आपली परवानगी न घेता तो व्हीडिओ ऑनलाइन टाकलेला पाहिल्यानंतर ती इतकी अस्वस्थ झाली की, घराबाहेर पडताना तिला सतत भीती आणि संशय वाटू लागला.

'लपूनछपून नाईटलाइफचे चित्रीकरण'

बीबीसीने अशा प्रकारचा कंटेट असलेले 65 हून अधिक ऑनलाइन चॅनेल्स ओळखले आहेत. गेल्या 3 वर्षांत या चॅनेल्सवरील व्हीडिओ 300 कोटींहून जास्त वेळा पाहिले गेले आहेत.

हे व्हीडिओ लंडन, ओस्लो, मियामी आणि बँकॉकसह जगभरातील मोठ्या शहरांतील नाईटलाइफ दाखवतात. पण मँचेस्टर हे त्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.

आमच्या पथकाने शहरात गुप्तपणे तपास केला. रात्री बाहेर फिरणाऱ्या महिलांचे लपूनछपून चित्रीकरण करणाऱ्या पुरुषांना आम्ही कॅमेऱ्यात टिपले. या तपासातून सर्वाधिक व्हीडिओ बनवणारे काही लोक समोर आले, जे 12 वेगवेगळ्या ऑनलाइन अकाऊंटशी जोडलेले होते.

यात एक स्थानिक टॅक्सी चालक आणि स्वीडनमधून यूकेमध्ये फक्त चित्रीकरणासाठी आलेले दोन पुरुषही होते. नॉर्वे आणि मोनॅकोतून काम करतो असा दावा करणारे आणखी दोन पुरुष चित्रीकरण करताना दिसले, मात्र त्यांची ओळख निश्चित करता आली नाही.

पुरुषांकडून महिलांचे सार्वजनिक ठिकाणी, त्यांच्या परवानगीशिवाय आणि अनेकदा पैशांसाठी चित्रीकरण केले जाते, याचे आणखी एक उदाहरण तपासातून समोर आले आहे.

मागील महिन्यात बीबीसीच्या एका वेगळ्या तपासात असं उघड झालं की, महिलांशी संवाद कसा साधावा याचा सल्ला देतो असा दावा करणारे काही पुरुष इन्फ्लुएन्सर्स 'स्मार्ट ग्लासेस' वापरून महिलांशी झालेले संभाषण गुपचूप रेकॉर्ड करतात आणि ते ऑनलाइन टाकतात.

महिलांवर आणि मुलींवर हिंसा व छळ करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सरकार खपवून घेणार नाही, असं यावर प्रतिक्रिया देताना गृहसचिव शबाना महमूद यांनी सांगितलं.

'सोशल मीडियावर शेकडो व्हीडिओ'

सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करणे गुन्हा मानला जात नाही. मात्र, प्रतिमांद्वारे (इमेज) होणाऱ्या छळाच्या प्रकरणांत काम करणाऱ्या एका वकिलांच्या मते, अशा प्रकारचे व्हीडिओ कायद्याच्या दृष्टीने 'ग्रे एरिया'मध्ये येतात आणि छळ किंवा गुप्तपणे पाहण्यासंबंधीच्या (व्ह्यूरिझम) कायद्यांचे उल्लंघन होऊ शकते.

आम्ही यूट्यूबसोबत शेअर केलेले काही व्हीडिओ अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र आमच्या तपासाची माहिती दिल्यानंतर यूट्यूबने 2 अकाऊंट बंद केले.

टिकटॉकने 4 चॅनेल्स हटवली आहेत. मात्र फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असे व्हीडिओ अजूनही उपलब्ध आहेत.

ग्रेस (डावीकडे) आणि सोफीचा रात्री बाहेर असताना नकळत व्हीडिओ काढण्यात आला होता.

फोटो स्रोत, Brijesh Patel

फोटो कॅप्शन, ग्रेस (डावीकडे) आणि सोफीचा रात्री बाहेर असताना नकळत व्हीडिओ काढण्यात आला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑक्टोबरच्या अखेरीस, ग्रेस (नाव बदललेलं आहे) मँचेस्टरमधील एका क्लबबाहेर आपल्या मैत्रिणीचा 21वा वाढदिवस साजरा करत होती आणि मोबाइलवर फोटो काढत होती. तिच्यासोबत तिची धाकटी बहीण सोफी (नाव बदललेले आहे) होती. ती नुकतीच 18 वर्षांची झाली होती आणि शहरात पहिल्यांदाच क्लबमध्ये गेली होती.

"ती अगदी नेहमीसारखीच एक सामान्य रात्र होती," असं ग्रेस सांगते. "आमचा व्हीडिओ काढला जात आहे, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती."

आम्ही संपर्क साधल्यानंतरच तिला कळले की, त्या क्षणाचा व्हीडिओ यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. तिचे स्कर्ट दाखवणारे दृश्य असलेला हा व्हीडिओ ऑनलाइन अनोळखी लोकांनी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला होता.

"मी माझे कपडे काळजीपूर्वक निवडले होते," ग्रेस म्हणते. "सामान्य दृष्टीने सर्व काही झाकलेलं होतं, पण व्हीडिओ खालून काढला गेला होता. ते पाहून मला भीती वाटली, तो खूप जवळ होता का?"

सोफीही व्हीडिओंमध्ये होती, पण तिच्याकडे लक्ष नव्हते. ती म्हणते की, जे काही घडलंय ते पाहून मलाही बहिणीसारखीच सतत भीती वाटत आहे.

"मी बाहेर जात नाही, मला भीती वाटते. हे योग्य नाही. हे घडायला नको होतं," ती सांगते.

'स्कर्ट आणि हाय हिल्स घातलेल्या महिला लक्ष्य'

या तपासादरम्यान आम्ही शेकडो व्हीडिओंमध्ये पाहिलेल्या हजारो महिलांमध्ये ग्रेस आणि सोफी यांचा समावेश आहे.

त्यांना अजूनही एक गोष्ट समजली नाही की, हा व्हीडिओ कोण काढत होता आणि त्यांनी असं का केलं?

आम्ही अनेक खात्यांवरचे हे व्हीडिओ पाहिले. ते काही चॅनेल्सवर 20 कोटींहून जास्त वेळा पाहिले गेले आहेत.

जवळजवळ प्रत्येक व्हीडिओचा थंबनेल ड्रेस किंवा स्कर्ट घातलेल्या आणि हाय हील्सच्या तरुणींवर लक्ष केंद्रित करतो. त्याचे शीर्षकही स्पष्ट करतात की, व्हीडिओंमध्ये महिलांचा समावेश असेल.

पुरुषांच्या यूट्यूब चॅनेलवरील थंबनेल जवळजवळ नेहमीच महिलांवर केंद्रित असतात.
फोटो कॅप्शन, पुरुषांच्या यूट्यूब चॅनेलवरील थंबनेल जवळजवळ नेहमीच महिलांवर केंद्रित असतात.

मँचेस्टरमधील अनेक व्हीडिओंमध्ये महिलांना क्लब्समधून फिरताना किंवा कर्बवर बसताना दाखवलं जातं. त्या कपडे व्यवस्थित करत असताना कॅमेऱ्याचं लक्ष त्यांच्यावरच असतं. जवळजवळ प्रत्येक व्हीडिओखाली महिलांविरोधात अपमानजनक टिप्पण्या असतात.

"पाहा, या महिलांचा ड्रेस कसा आहे. त्यांच्यावर हल्ला का होतो, याचं आश्चर्य वाटत नाही," असे एका व्यक्तीने हसत हसत लिहिले.

व्हीडिओंखाली अशा कमेंटही दिसल्या: 'त्या रस्त्यावरच राहाव्यात', 'सेल्युलाइट्स नाईटआउट' आणि 'छोटी डुकरं सगळीकडेच'.

व्हीडिओंमधील अनेक महिलांना ओळखणं तुलनेनं सोपं होतं, पण चॅनेल चालवणारे पुरुष शोधणं कठीण होतं. पुरुष ऑनलाइन जगात आपली खरी नावं वापरत नाहीत, पण काहींची ओळख सार्वजनिक माहिती वापरून पटवता आली.

'स्वीडनहून येऊन मँचेस्टरमध्ये गुपचूप शुटिंग'

एका क्षणी दोघं भाऊ फोन पाहत असल्यासारखी दिसत होती, पण खरंतर त्यांच्याकडे कॅमेरे होते आणि ते महिलांचं जवळून चित्रीकरण करत होते. पण आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवली आहे याची त्यांना माहितीच नव्हती.

आम्ही पाहिले की, ते दोघे वेगवेगळ्या क्लब्सच्या बाहेर व्हीडिओ काढण्यासाठी वेगळे झाले, पण रात्री परत एकत्र येत होते. त्या आठवड्याच्या दुसऱ्या रात्री, ते काळे मुखवटे घालून पार्टी करणाऱ्यांमध्ये सामील झाले.

पुढील काही दिवसांत मँचेस्टरच्या रस्त्यांवरचे नवीन व्हीडिओ अनेक सोशल मीडियाच्या खात्यांवर दिसू लागले, जे फ्लोर्जन रेकाशी संबंधित आहेत. या दोन्ही भावांना शुटिंग करताना आम्ही पाहिलं होतं. त्याच अँगलचे व्हीडिओ सोशल मीडियावर होते.

रोलँड रेकाच्या चॅनेलशी संबंधित एका व्हीडिओमध्ये एक महिला खाली गेलेला स्कर्ट वर खेचत आहे. दुसऱ्या व्हीडिओंमध्ये, महिला चालत आहेत, पण कॅमेरा खालच्या कोनातून रेकॉर्ड करत असल्याने त्यांच्या शरीराचा मागचा भाग दिसत आहे.

फ्लोर्जन रेकाच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या एका व्हीडिओत एक महिला आपले टॉप व्यवस्थित करत असताना कॅमेरा तिच्या क्लीव्हेजवर (स्तनभागावर) रेंगाळतो.

एकाही महिलेला त्यांचं शुटिंग केलं जात असल्याचं माहिती नव्हतं.

हॅलोविननंतरच्या काही महिन्यांत आम्ही फ्लोर्जन रेकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. मग आम्ही स्वीडनला जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळा त्याने प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या मेलबॉक्समधील पत्रालाही उत्तर दिले नाही.

फ्लोर्जन रेका (उजवीकडे) आणि त्याचा भाऊ रोलँड (डावीकडे) हे दोघेही महिलांचे गुप्तपणे व्हीडिओ काढणारी चॅनेल्स चालवतात.
फोटो कॅप्शन, फ्लोर्जन रेका (उजवीकडे) आणि त्याचा भाऊ रोलँड (डावीकडे) हे दोघेही महिलांचे गुप्तपणे व्हीडिओ काढणारी चॅनेल्स चालवतात.

फ्लोर्जन रेका नावाच्या स्वीडनमधील 35 वर्षीय व्यक्तीने ग्रेस आणि सोफीचा व्हीडिओ आपल्या चॅनेलवर टाकला होता.

तो अशाच प्रकारचं एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल चालवतो. त्याचे जवळपास 20 कोटी व्ह्यूज आणि 3 लाख 99 हजार सबस्क्रायबर्स आहेत. त्याच्याकडे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स आहेत.

स्वीडनमध्ये त्याने हे चॅनेल व्यवसाय म्हणून नोंदवले आहे आणि तो 'इन्फ्लुएन्सर ऍक्टिव्हिटी, मार्केटिंग आणि जाहिरात' करत असल्याचे सांगतो.

आम्हाला पाहायचं होतं की, तो कसा काम करतो, म्हणून आम्ही हॅलोविनच्या व्यग्र आठवड्याच्या शेवटी मँचेस्टर शहरात गुप्तपणे तपास केला.

पहिल्या रात्री, अनेक तास आम्ही त्याची वाट पाहिली. रात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास फ्लोर्जन रेका दुसऱ्या एका जोडीदाराबरोबर वेगाने चालत जाताना दिसला. नंतर आम्हाला समजलं की, तो त्याचा भाऊ रोलँड आहे.

'व्हीडिओ काढणाऱ्यांमध्ये टॅक्सी ड्रायव्हरही'

मँचेस्टरमध्ये हॅलोविनदरम्यान आम्हाला आणखी 3 पुरुष महिलांचे व्हीडिओ काढताना दिसले. ते एकमेकांना आणि रेका भावंडांना ओळखत असल्यासारखे वाटत होते, कारण रात्री वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी थांबून ते एकमेकांशी बोलत होते.

त्यापैकी एक होता डीन हिल, 36 वर्षांचा स्थानिक टॅक्सी ड्रायव्हर. तो लहान कॅमेरा छातीजवळ धरून मुलींच्या ग्रूपजवळून जाताना चित्रीकरण करत होता आणि नंतर मागे वळून त्यांचा मागूनही व्हीडिओ काढत होता.

बीबीसीने त्याचे शेकडो तासांचे व्हीडिओ पाहिले. काही फुटेजमध्ये रेका बंधूंच्या पोस्टसारखेच, डीन हिल महिलांचा पाठलाग करताना दिसतो. त्या स्कर्ट खाली ओढण्याचा किंवा कपडे नीट करण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा तो त्याचं शुटिंग करत होता.

एका व्हीडिओत तो हॅलोविनच्या वेषात असलेल्या एका महिलेमागे जवळपास 2 मिनिटे कॅमेरा ठेवतो आणि एका क्षणी तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगही वाढवताना दिसतो.

हिलने आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे ठामपणे म्हटले. त्याने बीबीसीला सांगितलं की, तो कुणाचेही वैयक्तिक किंवा शरीराच्या खासगी भागाचे चित्रीकरण करत नाही आणि त्याचा कॅमेरा नेहमी सर्वांना दिसत असतो.

"मी स्कर्टखालून, शरीराचे खासगी भाग किंवा कोणतेही नग्न दृश्य चित्रीत करत नाही. मी व्हॉयरिस्टिक चित्रीकरण म्हणजेच अश्लील चित्रीकरण केलेले नाही, आणि माझ्या व्हीडिओंमध्ये लैंगिक स्वरूपाचा कंटेंटही नाही," असं त्याने आपल्या संदेशात म्हटलं आहे.

"हे चित्रीकरण किंवा फुटेज निवडक नाही आणि कोणत्याही ठराविक गटाला लक्ष्य करत नाही. त्या वेळी सार्वजनिक ठिकाणी जे लोक असतात, तेच यात दिसतात," असं त्याने सांगितलं.

"काही लोक चुकीचा कंटेंट करत असतील, पण माझ्या चॅनेलवर तसे काही नाही. याबाबतचे आरोप चुकीचे आहेत," असं तो म्हणाला.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आम्ही सोशल मीडियावरून संपर्क साधलेल्या आणखी एका व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. त्यानेही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही किंवा नियमांचे उल्लंघन केले नाही, असं सांगितलं. आपण फक्त नाईटलाइफ आणि चालताना किंवा फिरतानाचे व्हीडिओ काढतो, तसेच आपल्या काही पोस्ट्स काढून टाकल्याचेही त्याने म्हटलं.

आम्ही ज्यांचा तपास केला, त्या कोणत्याही पुरुषांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

'व्हीडिओ ऑनलाइन टाकून लाखोंची कमाई'

महिलांचे रात्री बाहेर असताना व्हीडिओ काढले जात असल्याच्या तक्रारीनंतर, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी 2024 मध्ये एका व्यक्तीला पाठलाग आणि छळाच्या संशयावरून अटक केली.

पोलिसांनी ही देशातील अशा प्रकारची पहिली अटक असल्याचे सांगितले होते. मात्र या महिन्यात त्यांनी 'सध्याच्या कायद्यात मर्यादा' असल्यामुळे संशयितावर पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. तरीही, हा प्रश्न हाताळण्यासाठी 'कायद्याबाहेरील (नागरी) मार्गांचा' विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांचे रात्री गुपचूप चित्रीकरण करून व्हीडिओ टाकण्याचा हा व्यवसाय कोट्यवधी पाउंडची कमाई करू शकतो, असे सरे विद्यापीठातील डिजिटल इकॉनॉमी सेंटरच्या संचालक प्रा. अ‍ॅनाबेल गॉवर यांनी सांगितलं.

"या संपूर्ण इकोसिस्टिममध्ये एकूण व्ह्यूज अब्जावधीच्या संख्येत आहेत. एखाद्या व्हीडिओला 10 लाख व्ह्यूज मिळाले, तर त्यातून सुमारे 5 हजार पाउंडपर्यंत (सुमारे 6 लाख 20 हजार रुपये) कमाई होऊ शकते," असं त्या म्हणाल्या.

'कायद्याची मर्यादा'

यूकेच्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करणे बहुतेक वेळा बेकायदेशीर नसतं. मात्र आम्ही ज्यांच्याशी बोललो त्या अनेक महिलांना, या व्हीडिओंमधून पैसे कमावले जात आहेत हे कळल्यावर राग आणि निराशा आली.

अशा प्रकारच्या कंटेंटबाबतचा कायदा सध्या 'ग्रे एरिया'मध्ये आहे म्हणजे कायदा स्पष्ट नाही, असे इमेजद्वारे (प्रतिमा) होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांतील तज्ज्ञ मॅकअ‍ॅलिस्टर ऑलिव्हेरियस येथील वकील होन्झा सेर्व्हेन्का यांनी सांगितलं.

"हा प्रकार गुप्तपणे पाहणे आणि छळ यांसारख्या अनेक गुन्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. कायदा स्पष्ट नसल्यामुळेच हा प्रकार वाढत गेला," असे ते म्हणाले.

छळाचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी किमान 2 किंवा अधिक वेळा छळ झालेला असावा लागतो. यात रस्त्यावर छळ करणे आणि त्यानंतर ऑनलाइन छळ म्हणजे व्हीडिओ टाकणे किंवा शेअर करणे यांचाही समावेश होऊ शकतो, असे सेर्व्हेन्का सांगतात.

एखादा व्हीडिओ टाकणे आणि नंतर त्याच महिलेचा फोटो इतर व्हीडिओंसाठी थंबनेल म्हणून वापरणे, हा छळ ठरू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

आमच्या तपासाचे निष्कर्ष कळवल्यानंतर यूट्यूबने फ्लोर्जन रेकाशी संबंधित 2 अकाऊंट बंद केले. यावर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये फ्लोर्जन रेकाने या निर्णयाचा पुन्हा रिव्ह्यू व्हावा, अशी मागणी केली आणि आपण फक्त 'सार्वजनिक ठिकाणांचे वॉकिंग टूर व्हिडिओ' टाकतो, असं त्यानं म्हटलं.

आम्ही यूट्यूबसोबत शेअर केलेले काही व्हीडिओ अजूनही ऑनलाइन आहेत. यूट्यूबने सांगितले की, ते आपल्या समुदाय नियमांची (कम्युनिटी गाइडलाइन्स) 'काटेकोर अंमलबजावणी' करतात. तसेच 2025च्या अखेरीस छळविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 18 लाख व्हीडिओ हटवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

इतर संबंधित अकाऊंट अजूनही सुरू आहेत. एका व्यक्तीने चॅनेलचे नाव बदलले, तर दुसऱ्याने सर्व व्हीडिओ काढून टाकले आहेत. टिकटॉकनेही आम्ही माहिती दिलेले 4 चॅनेल्स हटवले आहेत.

आम्ही मेटाला (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची कंपनी) पाठवलेले चॅनेल्स अजूनही सुरू आहेत. मात्र कंपनीने त्यांच्या नियमांचे उल्लंघन करणारा कंटेंट त्यांनी हटवला असल्याचं सांगितलं.

ग्रेस आणि सोफीचा व्हीडिओ हा हटवण्यात आलेल्या अनेक व्हीडिओंपैकी एक आहे.

दोघी बहिणी म्हणतात की, हा त्यांच्यासाठी एक छोटासा विजय आहे, पण ग्रेसला यामुळे खरंच काही फरक पडेल का, याबाबत शंका आहे.

"तो व्हीडिओ अजूनही त्याच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरमध्ये आहे. मग तो पुन्हा शेअर करू नये, असं काही आहे का?" असा प्रश्न ती करते.

"हे कदाचित पूर्णपणे थांबवणं शक्यच नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)