दिवाळी सण शेती आणि मातीचा उत्सव का आहे? या सणाची सुरुवात कशी झाली?

फोटो स्रोत, Rakesh Salunkhe
घरादाराची स्वच्छता, दिवेलागण, गोड-तिखट फराळाची मेजवानी, सगळीकडे झगमगाट, प्रसन्न वातावरण आणि या सगळ्यासाठी चाललेली अनेक दिवसांची तयारी...
दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह, प्रसन्नता भरून राहते आणि आशादायी वाटत राहतं.
भारतात भरपूर सणांची रेलचेल आहे. पण दिवाळीच मजा काही औरच!
शिवाय, संपूर्ण भारतात दिवाळी सणाचा प्रभाव आहे. तो साजरा करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने वेगळी असेलही, पण उत्साह मात्र तोच!
हा सण नक्की कसा सुरू झाला? त्यामागची पूर्वापारची औचित्यं काय असावीत?
'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो,' असं का म्हणतात? 'दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी' असं का म्हणतात?
शेती-माती अर्थात कृषिसंस्कृतीतून हा सण कसा उदयाला आला, याची माहिती आपण घेणार आहोत...
मान्सूनवर आधारित कृषी संस्कृतीच्या मुशीतले सण
भारताची अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे, असं म्हटलं जातं. पूर्वापारपासून भारतातील लोकांचं राहणीमान हे पावसावर आधारलेलं आहे. याच पावसाच्या वेळापत्रकानुसार शेतीचं वेळापत्रक तयार झालेलं आहे.
भारतीय उपखंडात ठिकठिकाणी पावसाच्या उपस्थितीनुसार ठरलेली शेतीची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारं उत्पन्न यावर उभी राहिलेली संस्कृती असंच तिचं स्वरुप राहिलेलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'मान्सून: जन गण मन' या पुस्तकात यासंदर्भात उहापोल करताना म्हटलंय की, "कन्याकुमारी ते काश्मीर आणि नागालँड ते सिंध, प्रत्येक प्रदेशातल्या संस्कृतीत मान्सून केंद्रस्थानी आहे.
वैदिक असोत की अवैदिक, आस्तिक असोत की नास्तिक, हिंदू, बौद्ध, जैन, शीख, वारकरी, शैव, वैष्णव, द्वैतवादी, अद्वैती, मुसलमान वा ख्रिश्चन, वा पारसी वा ज्यू, वा अन्य कोणतेही दार्शनिक असोत, या देशातल्या लोकजीवनात मान्सून केंद्रस्थानी आहे.
माणूस आणि माणूस, माणूस आणि निसर्ग, माणूस आणि विश्व यासंबंधातल्या आपल्या कल्पना घडवण्यात मान्सूनची भूमिका निर्णायक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
यातूनच आकाराला येत गेलंय ते भारतीय सणसमारंभाचं स्वरुप...
पत्रकार आणि 'लोकरहाटी' या पुस्तकाचे लेखक मुकूंद कुळे यांनी आपल्या पुस्तकातील 'दिवाळी: कृषिसंस्कृतीचा जागर' या लेखात म्हटलंय की, "शहरात प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते. पण ग्रामीण जीवनात आजही दिवाळी म्हणजे कृषिसंस्कृतीचा उत्सव आहे."
दिवाळीचं स्वरूप विशद करताना ते नागर संस्कृती आणि अनागर संस्कृती यांमधील सहसंबंधही सुस्पष्ट करून सांगतात.

फोटो स्रोत, Sunil Tambe
ते सांगतात की, "नागर संस्कृतीत मनामनावर होणारा दिवाळीचा पहिला संस्कार कुठला असेल तर तो म्हणजे, बालपणी हातात देण्यात येणारी फुलबाजी आणि ती गोलगोल फिरवत म्हटलेलं गाणं-
दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी
गायी-म्हशी कुणाच्या, लक्षुमनाच्या
लक्षुमन कुणाचा, आईबापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...
... जणुकाही हे गाणं म्हणजे दिवाळीगीतच!"
पुढे ते सांगतात की, "ते नागर संस्कृतीतील दिवाळीगीत नाही, तर अनागर संस्कृतीतील. लोकरहाटीतलं. कारण शहरात गाई-म्हशी नाहीत आणि त्यांना खाणारा वाघोबाही.
त्यामुळेच या गाण्याच्या मुळाचा शोध घेत गेलं की, आपसूक पावलं लोकरहाटीत पडतात. कारण हे गाणं म्हणजे ग्रामीण कृषिगीत आहे. तेही प्रामुख्याने गुराख्यांचं आणि पर्यायाने शेतकरीराजाचं. कारण गाई-म्हशी म्हणजे शेतकरीराजाचीच धनदौलत.
म्हणूनच या गाण्यात दिवाळीच्या निमित्ताने गुरांचं औक्षण केलं आहे, तर त्यांना खायला येणाऱ्या वाघोबाच्या पाठीत काठी घालायची धमकीही दिली आहे. परंपरेने लोकरहाटीत चालत आलेलं हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं, की नागर संस्कृतीलाही ते स्वीकारावंसं वाटलं." असं ते सांगतात.
दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी 'गोवत्स द्वादशी' असते. यालाच 'वसुबारस' असंही म्हणतात. या दिवशी स्त्रिया गायीची पूजा करतात.
दिवाळी - एक प्रकृती उत्सव
98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर आपल्या 'लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा' या पुस्तकात म्हणतात की, "लोकसंस्कृती एकूणच निसर्गवादी संस्कृती आहे. केवळ मानवी नातेसंबंध निसर्गाच्या परिभाषेत मांडले जात नाहीत, तर भारतीय लोकजीवनच निसर्गचक्राशी बांधलेले असल्याने ते निसर्गपूजक आहे.
कारण हा समाज कृषीनिष्ठ समाज आहे. आजही येथील शेती आणि बाकी सगळेच जीवन पावसावर, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभराचे सणवार, यात्रा-उत्सव शआणि सगळी व्रतवैकल्ये निसर्गोपासनेचीच संपन्न रुपे आहेत."
शहरात या सणाला जो झगमगाट दिसतो, तो ग्रामीण भागात नसतो. त्यांच्यासाठी हा सण केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो एक प्रकृती उत्सव असतो.
नव्याने घरात आलेल्या या धान्याधुन्याची आणि ते ज्यांच्यामुळे आलं, त्या गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो, असं मुकुंद कुळे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात की, "शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो अणि दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहत असतं. त्यामुळेच नागर संस्कृतीत दिवाळीला फराळ आणि फटाक्यांची जोरातक आतषबाजी सुरू असते, तेव्हा अनागर संस्कृतीत मात्र हे धान्य पिकवणारा निसर्ग, गुरं आणि ज्याच्या काळात भूमिपुत्र अतिशय सुखासीन आयुष्य जगत होता, त्या बळिराजाची पूजा बांधली जाते.
त्यांच्या नावाने गोडधोड केलं जातं. गुराखी शेतकरी किंवा आदिवासी कोणीही असो, गावगाड्यात आणि वाड्या-पाड्यांत दिवाळीचे हे पाच दिवस निव्वळ प्रकृती उत्सव साजरा होत असतो."

फोटो स्रोत, Getty Images
मंगला सामंत इतर सणांप्रमाणेच अगदी दिवाळी या सणाचा इतिहासही मातृसंस्कृतीच्या इतिहासाशी जोडतात.
यासंदर्भातील विश्लेषण करताना त्या सांगतात की, "एरवी शेतीचा हंगाम संपून सुगीच्या हंगामाच्या वर्षारंभाचा हा दिवस मानण्याचा रिवाज भारतीय संस्कृतीत विवाहाआधीच्या मातृकाळापासून आहे.
आलेल्या नव्या पिकाचं स्वागत आणि वर्षभरातील देण्यांचा हिशेब हे त्याचं शेती-जीवनातलं मूळ स्वरूप होतं. जीवनातल्या बदलांमुळं नंतर व्यापाराला महत्त्व आलं.
त्यातून देण्या-घेण्याचा हिशेब ठेवण्याचं काम शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्याकडं आल्यावर तो अलीकडं व्यापाऱ्यांचा वर्षारंभ झालेला दिसत आहे."
बळीराजाचा उत्सव...
दिवळीला 'इडा-पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे,' असं म्हटलं जातं. खासकरून बलिप्रतिपदा हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.
एकीकडे, या दिवशी विष्णुनं वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटलं, अशी वैदिक संस्कृतीतील मिथककथा आहे. तर दुसरीकडे, अवैदिक आणि बहुजनांच्या संस्कृतीमध्ये हाच बळीराजा त्यांचा त्राता आहे.
त्यामुळे, या दिवशी ते त्याची आठवण काढतात आणि 'तुझंच राज्य पुन्हा येऊदे,' अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसतात.

फोटो स्रोत, Rakesh Salunkhe
बळीराजाची ही महती संपूर्ण भारतात पसरलेली आहे.
सुनील तांबे आपल्या पुस्तकात लिहितात की, "'इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, या चरणावरून महाराष्ट्रात आर्य-अनार्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा संस्कृती संघर्ष रंगवला जातो.'"
पुढे ते सांगतात की, "बळीराजा हे कधी प्रतीक बनतं, तर कधी रुपक, तर कधी आणखी काही. त्यातही प्रादेशिक विविधता आहे. केरळपासून हिमाचल प्रदेशपर्यंत खरीप हंगामाची सुगी हे बळीराजाच्या गोष्टीतलं भक्कम आशयसूत्र आहे."

फोटो स्रोत, Mukund Kule
मुकुंद कुळे लिहितात की, "कोकणातला आगरी समाज तर दिवाळीत शेणाच्या गोळ्याची बळीराजा म्हणून पूजा करतो. भूमिपूत्रांचा राजा मानला जाणाऱ्या बळीराजाला एकूणच बहुजन समाजात मानाचं स्थान आहे.
दिवाळी हा सण मूळ कृषिउत्सव असल्यामुळेच लोकरहाटीतील अनेक समाजांत दिवाळीला बळीराजाची पूजा केली जाते."
मंगला सामंत सांगतात की, "मुळात हा दिवस बलिप्रतिपदेचा म्हणजे मातृसंस्कृतीतल्या बळिराजाचं स्मरण करणारा आहे. बळीराजा हा संपन्न आणि उदार शेतकरी, तत्कालीन ग्रामस्थांचा दिलदार राजा होता.
तो मातृकुळांचं नेतृत्व करणारा होता. आपल्या विरोधकांशी संघर्ष करताना त्याला मृत्यू आला; पण भारतीय समाज त्याला विसरला नाही."
आदिवासी जमातींतील दिवाळी आणि शेती-मातीशी संबंध
आदिवासी समाज देखील दिवाळी हा सण निसर्गपूजनाने साजरा करतो. ते दिवाळीला 'दियरी' अथवा 'दियारी' असं म्हणतात. त्याचा अर्थ दिवा असाच होतो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाड्यातील हिरव्यादेव, वाघदेव, कनसरीमाता अशा निसर्गातील देवतांची पूजा करतो.
या देवतांना रानात सहजच मिळणाऱ्या ऊस, काकडी अशा पदार्थांपासून बनवलेला प्रसाद दाखवला जातो.
दिवाळी सण आदिवासी अर्थात इथल्या मूळ जनजातींच्या शेती-मातीतून कसा वाढत गेला, याविषयी सांगताना 'एम्स, भोपाळ'चे प्राध्यापक सूरज धुर्वे लिहितात, "भारताच्या कृषी व्यवस्थेत, शेती दोन प्रमुख गटांमध्ये विभागली जाते. पहिलं म्हणजे उन्हारी अर्थात रब्बी) पिके आणि दुसरं म्हणजे सियारी अर्थात खरीप पिके."

फोटो स्रोत, Shatali Shedmake
"वंजी (धान) हे सियारीचं मुख्य पीक आहे, म्हणून दिवाळी हा सण संपूर्ण सियारी पिकाचे (धान, उडीद, रताळे, शेंगदाणे, ऊस इत्यादी) स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच, दिवाळीला 'सियारी पंडुम' असंही म्हणतात."
"हळूहळू, इतर बाहेरून आलेल्या संस्कृतींमधील लोकांनी या सणाचं स्वरूप पूर्णपणे बदललं आणि आज संपूर्ण देश हा सण दीपावली किंवा दिवाळी या नावानं साजरा करतो," असं ते सांगतात.
मुकुंद कुळे लिहितात की, "आदिवासी समाजात बलिप्रतिपदेचा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी आदिवासी बांधव ढोरं उठवण्याचा सण साजरा करतात. त्यासाठी या दिवशी सर्व आदिवासी आपापली गुरं-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात आणि त्यांना गावाच्या बाहेर नेतात.
गावाबाहेर साधारण आयताकृती असा आखाडा तयार करून, त्यात गवत पसरवून नंतर तो आखाडा पेटवून देतात. गवत पेटून धूर झाला, की प्रत्येक आदिवासी आपापली ढोरं त्या पेटत्या आखाड्यातून पळवतो.
कारण या धुरातून बकऱ्या किंवा गुरं नेली, तर त्यांना कसलाही आजार होत नाही, तसंच त्यांना कुणाची नजर लागत नाही, अशी या समाजांची परंपरेने चालत आलेली समजूत आहे."

फोटो स्रोत, Babli Kumre
बंजारा या भटक्या विमुक्त समाजामध्येही दिवाळी हा सण पशू आणि शेती-मातीशी संबंधितच दिसून येतो.
प्रा. वीरा राठोड याबाबत माहिती देताना सांगतात की, "बंजारांचा आदिम काळापासून मुख्य सण दिवाळी हाच आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, आदिम काळापासून गायी-गुरं चारणारा हा समाज बळीराजाची पूजा करतो. त्यावेळी गायी-गुराच्या गोठ्याची आणि शेणामातीची ते त्यादिवशी पूजा करतात.
त्यावेळी बंजारा समाजातील अविवाहित मुली हातात दिवे घेऊन गाणीही म्हणतात. या गाण्यांमधून त्या गायीगुराच्या, गोधनाच्या तसेच आपल्या सर्व लोकांची भरभराट होऊदे, अशी प्रार्थना करतात. शेणाने तयार केलेली पाच ठिपके आणि त्यावर रानातून आणलेली फुलं वाहिली जातात."
मुकुंद कुळे सांगतात की, "लोकरहाटीतली दिवाळी कृषिसंस्कृती जागवणारी असते. शेत शिवाराची भरभराट होवो, घरात गुरा-ढोरांची समृद्धी येवो म्हणणारी आणि बळीराजाच्या राज्याचं दान मागणारी.
लोकरहाटीने आपली कृषिपरंपरा दिवाळीच्या सणात अजून टिकवून ठेवली आहे. नागर संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे आता गावगाड्यातही शहरातल्याप्रमाणेच दिवाळी साजरी होऊ लागली आहे.
पण अगदी आत खेड्यात किंवा आदिवासी पाड्यावर गेलात, तर तिथे तुम्हाला दिवाळीला कृषिसंस्कृतीचा जागरच मांडलेला दिसेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











