राज्यात लंपीची साथ, सोलापुरात 33 जनावरं दगावली; हा रोग नेमका काय आहे?

गाय

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात सध्या लंपी आजाराची साथ पसरली आहे. सोलापुरात गेल्या महिन्याभरात 33 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलीय.

लंपी आजार संसर्गजन्य असल्याने त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, त्याबरोबरच जनावरांची तसेच गोठ्याची स्वच्छताही करावी, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचेप्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नागरिकांना केले आहे.

तसंच, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून 15 लाखाची लंपी आजार प्रतिबंध लस खरेदी करण्यात आल्याची माहितीही देण्यात आलीय.

राज्यात कुठल्या जिल्ह्यात लंपीची साथ?

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून 1544 गाय वर्ग पशुधन लंपी आजारामुळे बाधित झालेले आहे, त्यापैकी 1108 जनावरे बरी झाली असून आत्तापर्यंत 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झालेला आहे. तर 403 जनावरावर उपचार सुरू आहेत.

लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे.

लस खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून 15 लाखाचा निधी मंजूर केलेल्या होता, त्यातून लस खरेदी केलेली असून लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याची माहिती जंगम यांनी दिली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माळशिरस तालुक्यात लंपी आजार बाधित जनावरांचे प्रमाण जास्त होते. परंतु मागील काही दिवसापासून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झालेले असून सध्या माढा तालुक्यात लंपी आजार बाधित जनावरांची संख्या वाढत आहे.

जळगाव

जळगाव जिल्ह्यातही गुरांमध्ये 'लंपी' आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांमध्ये लंपी आजाराबाबत जनजागृती मोहिम राबवली जात आहे.

आपल्या पशुधनाच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याचं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे.

गुरांमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवणं, एकत्र गुरं चारायला घेऊन गेल्यावर ती एकमेकांत मिसळणार नाही याची काळजी घेणं, लसीकरण करणं अशा अनेक सूचनांचं नागरिकांना पालन करण्यास सांगितलं आहे.

तसेच प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, लंपी आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जळगावमधील गुरांचे सार्वजनिक बाजार काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातही लंपीची साथ पसरत आहे. त्या पाश्वर्भूमीवर जिल्हा प्रशासनानं 2,08,700 गॉट पॉक्स (Goat Pox) लसी उपलब्ध केल्या आहेत. आतापर्यंत 1,92,980 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लंपी चर्मरोग टाळण्यासाठी पशू लसीकरण आवश्यक असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

त्यामुळे चार महिन्यांवरील सर्व गोवर्गीय जनावरांचं लसीकरण करण्यात यावं, गोठ्यात आणि जनावरांवर औषधाची फवारणी करावी, बाहेरील लोकांचा गोठ्यात प्रवेश टाळावा असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

तसेच आजारी जनावरं आढळल्यास तात्काळ "1962" टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

अकोला

अकोला जिल्ह्यातही लंपीची साथ पसरल्याची बाब समोर आली आहे.

अकोला तालुक्यातील अकोला, अकोट तालुक्यातील नांदखेड, बाळापूर तालुक्यातील भिकूनखेड व मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर येथील जनावरांत लंपी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं आहे.

जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच संसर्ग केंद्रापासून 10 किमीपर्यंतचा परिसर हा बाधित क्षेत्र व नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

त्यानुसार, गुरे, म्हशी प्रजातीच्या प्राण्यांची, अन्यत्र किंवा नियंत्रित क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच, गोजातीय प्रजातीचे मृत प्राणी, कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वैरण, इतर साहित्य, कातडी, प्राण्यांपासूनचे अन्य उत्पादन नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नियंत्रित क्षेत्रात गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यांना मनाई आहे.

परिसरात किटक निर्मूलनासाठी स्वच्छता व फवारणीचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

बाधित जनावर मृत झाल्यास पशुवैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार त्याची विल्हेवाट लावावी, निरोगी जनावरांना बाधा होऊ नये म्हणून ती वेगळी ठेवावीत, पशुंना आवश्यकतेनुसार प्रतिजैविके द्यावीत.

तसेच बाधित क्षेत्राच्या 5 किमी अंतरातील गो व महिषवर्गीय पशुंना गॉट पॉक्स लस द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

लंपी विषाणू काय आहे आणि तो कसा पसरतो?

युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या मते लंपी हा एक त्वचारोग आहे आणि तो प्राण्यांमध्ये आढळतो. तो रक्तपिपासू कीटकांद्वारे पसरतो.

ज्या प्राण्यांना हा रोग आधी झालेला नाही त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर ताप येतो आणि त्वचेवर फोड येतात. यावर पीडित प्राण्यांचं लसीकरण हाच एक उपाय आहे.

पहिल्या कारणाबद्दल बोलताना गुजरात सरकारच्या पशुपालन विभागाचे उपसंचालक डॉ. अमित कयानी म्हणतात, "रक्तपिपासू माशा आणि डासांमुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरतो. जर एखाद्या रस्त्यावरच्या प्राण्याला हा रोग झाला तर तो एका जागी स्थिर थांबत नाही."

"त्यामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. या विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे सध्या हा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे", असंही पुढे ते म्हणतात.

 प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लंपी हा एक त्वचारोग आहे आणि तो प्राण्यांमध्ये आढळतो. तो रक्तपिपासू कीटकांद्वारे पसरतो.

अज्ञान हे विषाणू पसरण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे.

याबद्दल बोलताना पांजरापोळ या संस्थेचे प्रवीण पटोलिया म्हणाले, "अनेक शेतकऱ्यांना या रोगाची माहिती नाही. लोकांना राजकीय रॅलीसाठी ट्रक भरून भरून घेऊन जातात. मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली नाही. तसं केलं असतं तर हजारो प्राण्यांचा जीव वाचला असता."

जिथे प्राणी राहतात तिथे माशा आणि डासांना हाकलणं अतिशय गरजेचं असतं.

लंपी व्हायरसची लक्षणं

प्राण्यांच्या अंगावर पुरळ उठतात. तसंच त्यांना ताप येतो. त्यांना दूध कमी येतं. काही गुरांचा गर्भपात झाल्याची उदाहरणं आहेत. तसंच ते नपुंसक होण्याचीही शक्यता असते.

ज्या प्राण्यांना हा रोग झाला आहे त्यांच्या डोळ्यातून, नाकातून आणि थुंकीतून स्राव गळतो.

लंपी झालेल्या गायीचं दूध माणूस पिऊ शकतो का?

2022 मध्ये जेव्हा गुजरातच्या अहमदनगरमध्ये लम्पी व्हायरसची साथ पसरली होती, तेव्हा सोशल मीडियावर काही पोस्टमध्ये असे दावे करण्यात आले होते की, लंपीने बाधित गाईचं दूध पिल्यास माणसांना सुद्धा हा त्वचारोग होऊ शकतो. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

त्यावेळी बीबीसीच्या पत्रकार मेधावी अरोरा यांनी याचा सविस्तर आढावा घेतला होता.

याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही इथे वाचू शकता.

मात्र, त्यावेळीच्या तपासात आणि तज्ज्ञांशी बोलून असं आढळून आलं की, लंपी हा झुनोटिक आजार नाहीये. म्हणजे प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग माणसांमध्ये नैसर्गिकरित्या संक्रमित होत नाही.

 प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग माणसांमध्ये नैसर्गिकरित्या संक्रमित होत नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या 2017 च्या अहवालात म्हटलंय की, लंपीचा माणसांवर परिणाम होत नाही.

भारत सरकारच्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने देखील लंपीचा माणसांवर परिणाम होत नाही, असं म्हटलं होतं.

या संस्थेचे सहसंचालक डॉ. के. पी. सिंग त्यावेळी बीबीसीशी बोलताना म्हणाले होते की, "आजवर एखाद्या प्राण्यापासून माणसाला संसर्ग झालाय असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पण गाईचं दूध पिणाऱ्या वासराला तिच्यापासून संसर्ग होऊ शकतो."

सरकारकडून मार्गदर्शक सूचना

2022 मध्ये जेव्हा गुजरातमध्ये लंपी या आजाराची साथ पसरली होती, त्यावेळी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

यात असं म्हटलं होतं की, ज्या ठिकाणी गुरांना या रोगाची लागण झाली आहे त्याच्या पाच किलोमीटर हद्दीतच लसीकरण करावं.

ज्या ठिकाणी विषाणूची लागण झाली तो परिसर स्वच्छ करावा. तसंच निरोगी जनावरांना Ectoparasiticide हे औषध द्यावं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)