कफ सिरपमधील 'डायथिलीन ग्लायकॉल'चा धोका काय? लहान मुलांना औषध देताना 'या' गोष्टी तपासाच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सर्दी-खोकल्यासाठी दिलेल्या औषधामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू झालाय. घरामध्ये वा कुटुंबात लहान मुलं असणाऱ्या कुणालाही हादरवून टाकणारी ही बातमी आहे.
सर्दी-खोकला झाला तर औषध घ्यायचं किंवा घरातल्या लहानांना औषध द्यायचं, ही आपल्यासाठी अगदी सामान्य गोष्ट असते. मग ती अशी जीवघेणी कशी ठरली?
कोल्ड्रिफ औषधामुळे चर्चेत आलेले डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल हे घटक काय असतात? ते घातक कधी ठरू शकतात?
आणि मुळात लहान मुलांना औषध देताना काय काळजी घ्यायची?

सर्दीसाठीच्या औषधामुळे मृत्यू होणं, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी 2023 साली भारत सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रीन (chlorpheniramine maleate and phenylephrin) हे कॉम्बिनेशन असणारी औषधं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांना द्यायला बंदी घातली होती.
आता चर्चेत आलेल्या कोल्ड्रिफ या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकॉल आढळल्याचं मृत्यूंनंतर दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये म्हटलंय. हा काय घटक आहे?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार Diethylene Glycol (DEG) आणि Ethylene Glycol (EG) हे इंडस्ट्रियल सॉल्व्हंट्स आहेत. तर Antifreeze Agent म्हणून वापरले जातात.
म्हणजे थंड वातावरणामध्ये द्रव पदार्थ गोठू नयेत, म्हणून या गोष्टी द्रवात मिसळल्या जातात ज्यामुळे त्या द्रवाचा गोठण बिंदू (Freezing Point) आणखी कमी होतो.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2023 या काळात या डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलमुळे जगभरात किमान 300 मुलांचा मृत्यू झाल्याचं WHO ने म्हटलंय..
Paints म्हणजे रंग, ब्रेक फ्लुईड्स, प्लास्टिक यामध्ये DEG आणि EG वापरलं जातं. पण मग हे घटक औषधात कसे आले?

डॉ. हर्षिता शर्मा भोपाळमध्ये गेल्या दशकभरापासून कार्यरत आहेत.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल हे मूळतः कूलंट म्हणून वापरले जातात. यांची चव सॉर्बिटॉलसारखी गोड आणि थंडसर असते.
पण सॉर्बिटॉल महाग असतं, म्हणून औषध कंपन्या त्याच्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात.
हे दोन्ही घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाइल अल्कोहोलच्या श्रेणीत येतात आणि दोन्ही रसायनं शरीरासाठी अतिशय घातक असतात."

हे दोन टॉक्सिक घटक शरीरात गेले तर त्याचा किडनी, यकृत आणि मज्जासंस्थेवर घातक परिणाम होतो.
मुलांच्या शरीरात अगदी कमी प्रमाणात हे घटक गेले तरीही हे धोकादायक असतं कारण मुळात त्यांचं शरीर लहान असतं, वजन कमी असतं.
पण मग औषधात भेसळ आहे किंवा औषध खराब झालंय, हे आपल्याला समजू शकतं का? बाटलीवर लिहिलेले सगळेच घटक काही आपल्याला समजणारे नसतात.

पण काही गोष्टी लहान मुलांना औषध देण्याआधी किंवा स्वतःदेखील औषध घेण्याआधी करता येतील.
बाटलीतलं सिरप कसं दिसतंय? ते पाहा. त्याचा रंग गढूळ आहे का, बदलल्यासारखा वाटतोय का, हे तपासा.
- त्यात काही गुठळ्या वा कण दिसतायत का?
- औषध घट्ट झाल्यासारखं वाटतंय का?
- बाटलीच्या तळाशी औषधातली पूड जमा झाली आहे का?
- औषधाच्या बाटलीवर बॅच नंबर आहे का?
औषधावर ड्रग लायसन्स नंबर लिहिलेला असणंही आवश्यक आहे. तो नसेल तर हे औषध घेऊ नका.
औषधाचा त्रास झाल्याची लक्षणं कोणती?
- मळमळणं
- पोटात दुखणं
- लघवी कमी होणं
- किडनी निकामी होणं
- आकडी येणं
अशीही लक्षणं औषधाचा दुष्परिणाम झाल्यास दिसू शकतात. असं झाल्यास तातडीने पावलं उचला.

2 वर्षांखालच्या मुलांना औषध देण्यासाठीच्या गाईडलाईन्स केंद्र सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत.
पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधांची सामान्यतः शिफारस केलेली नाही, कारण, लहान मुलांमधील कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज लागत नाही.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, "बऱ्याचदा लहान मुलं म्हणजे मोठ्या माणसांची छोटी आवृत्ती असल्याची समजूत असते. पण ही गोष्ट खरी नाही. कारण या विचारातून बऱ्याचदा मोठ्या माणसांची औषधं बऱ्याचदा एक चमचा असेल तर त्याचा पाव अर्धा चमचा, गोळी असेल तर चतकोर गोळी असं दिलं जातं. "
लहान मुलांमध्ये कित्येक औषधं 1 वर्षांखाली देऊ नयेत, असं बंधन असतं. कारण त्या औषधांचे परिणाम या छोट्या मुलांना धोकादायक ठरू शकतात.
विशेषतः यामध्ये खोकल्याची, तापाची औषधं येतात. लहान मुलांना नुसती सर्दी झाली, नाकातून पाणी गळतंय म्हटल्यानंतर औषध द्यायची गरज असतेच असं नाही.
परंतु, ज्यावेळी खूप ताप आहे, सर्दी आहे, खोकला वाढलेला आहे, असं वाटायला लागेल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून औषधं घ्यावीत."

फोटो स्रोत, Getty Images
एरवीही लहान मुलांना औषधं देताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
- डॉक्टरांनी लिहून दिलेलीच औषधं मुलांना द्या. स्वतःहून औषधं विकत घेऊन देऊ नका.
- पूर्वी दिलं होतं, म्हणून तेच औषध स्वतःहून मुलांना देऊ नका.
- लहान मुलांना त्यांच्या वजनानुसार औषधाचा डोस दिला जातो. ते प्रमाण नीट मोजा.
- बाटलीवरची एक्स्पायरी डेट तपासा.
- सोबतच औषध उघडल्यानंतर ते किती दिवस वापरता येऊ शकतं, हे त्या बाटलीवर लिहीलेलं असतं. ते पाळणं गरजेचं आहे.
- काही औषधं उघडल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. ही सूचना बॉक्सवर असते.
- डॉक्टरांनी सांगितलेलं उपलब्ध नसेल, तर परस्पर पर्यायी औषध घेऊ नका.
- न वापरलेली, तारीख उलटलेल्या औषधांची योग्य रीतीने विल्हेवाट ला

डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "कित्येकदा मुलांना ताप आला म्हणून आयब्युप्रोफेन किंवा निम्युसलाईडसारखी औषधं दिली जातात, ज्यांचा त्यांच्या मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.
मूत्रपिंड फेल्युअर होऊ शकतं. कित्येकदा उलट्यांची औषधं किंवा खोकल्याची औषधं चुकीच्या पद्धतीने दिली जाऊ शकतात.
खोकल्याची औषधं मुख्यतः 3 प्रकारची असतात. एक म्हणजे ॲलर्जीचा खोकला. दुसरा म्हणजे छातीत कफ झालेला असतो, दम लागत असतो, अशावेळी द्यायची औषधं. याला ब्राँकोडायलेटर म्हणतात. तिसरा म्हणजे कफ सप्रेसंट. म्हणजे नुसता कोरडा खोकला सप्रेशनसाठीचं औषध."
सप्रेशनची औषधं जास्त प्रमाणात दिली गेली तर मूल जास्तवेळ झोपू शकतं किंवा त्याच्या मेंदूला काही दुष्परिणाम होऊ शकतात, असंही ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"ब्राँकोडायलेटर औषधं आहेत ती, ज्यावेळेला फुफ्फुसांमध्ये किंवा श्वासनलिका जर आकुंचन पावलेल्या नसतील तरीही दिली गेली, तर मुलांना त्याचा खूप त्रास होतो. ही मुलं प्रचंड रडतात आणि अतिशय गंभीर पद्धतीने रडतात, अजिबात थांबत नाहीत.
अशावेळी त्यांना तपासून ही औषधं बंद करावी लागतात. ॲलर्जीची औषधंही अशी जास्ती दिली गेली तरी त्याचा दुष्परिणाम म्हणजे मुलं जास्तवेळ झोपतात, त्यांचा एकूण त्यांच्या दिवसभराच्या वागणुकीवर - खाण्यापिण्यावर परिणाम होऊ शकतो."
सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट, मूल औषध घेणार नाही या भीतीने ते सरबत आहे किंवा पातळ चॉकलेट आहे असं सांगून देऊ नका.
कारण तुमचं लक्ष नसताना, ती बाटली लहान मुलांच्या हाती लागली, तर सरबत समजून मुलं ते पिण्याचा धोका असतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











