देवाचं अस्तित्व विज्ञानाद्वारे सिद्ध करता येतं का?

देव आणि विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोनिका ग्रॅडी
    • Role, द ओपन युनिव्हर्सिटी

(ही बातमी 21 मार्च 2021 रोजी बीबीसी मराठीवरच प्रसिद्ध झाली होती.)

हा प्रश्न मी एका परिसंवादात ऐकला तेव्हा माझा ईश्वरावर विश्वास होता (आता मी निरिश्वरवादी आहे). हा प्रश्न पहिल्यांचा आइनस्टाईनने विचारला होता.

या सुरेख आणि सखोल प्रश्नाने मी चकित झालो होतो: "हे संपूर्ण विश्व व भौतिकशास्त्राचे सर्व नियम एखाद्या ईश्वराने निर्माण केले असतील, तर ईश्वर स्वतः निर्माण केलेले नियम अनुसरतो का? की, ईश्वर स्वतःच्या नियमांचं उल्लंघन करू शकतो- म्हणजे तो प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करू शकतो का/ म्हणजे एकाच वेळी तो दोन निरनिराळ्या ठिकाणी असू शकतो का?"

ईश्वर अस्तित्वात आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर उपयोगी पडेल का? की, वैज्ञानिक अनुभवजन्य ज्ञान आणि धार्मिक श्रद्धा परस्परांना कुठे छेदतात हे अधोरेखित करणाऱ्या या प्रश्नाला वास्तवात काही उत्तरच नाहीये? - डेव्हिड फ्रॉस्ट, 67 वर्षं, लॉस अँजेलिस.

हा प्रश्न माझ्यापर्यंत आला तेव्हा टाळेबंदी सुरू होती. हा मजकूर वाचल्यावर मला लगेच कुतूहल वाटलं. एकंदर प्रश्नाची वेळ आश्चर्य वाटण्यासारखी नव्हती- जागतिक साथीसारख्या शोकात्मक घटनांवेळी देवाच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे: दयाघन देव अस्तित्वात असेल, तर इतकी मोठी संकटं का कोसळतात?

देवालाही भौतिकशास्त्राच्या नियमांची 'बंधनं' असतील (रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांनाही हे नियम लागू होतात, त्यामुळे वैद्यकीय विज्ञानाची मर्यादाही या नियमांनी निश्चित होत असते), या संकल्पनेचं उत्खनन रोचक ठरेल, असं मला वाटलं.

देवाला भौतिकशास्त्राचे नियम मोडणं शक्य नसेल, तर त्याचं किंवा तिचं सर्वशक्तिमान असणंही प्रश्नांकित होतं. पण अशी काही शक्ती असेल, तर विश्वातील भौतिकशास्त्राचे नियम मोडले गेल्याचा पुरावा आपल्याला का सापडत नाही?

हा प्रश्न हाताळण्यासाठी त्याचे काही भाग करू. एक, देव प्रकाशाहून वेगाने प्रवास करू शकतो का? हा प्रश्न दर्शनी अर्थानेच घेऊ. प्रकाशाचा वेग प्रति सेकंद 3x 105 किलोमीटर इतका म्हणजे प्रति सेकंद 2,99,500 किलोमीटर इतका आहे.

इतर कोणतीही गोष्ट प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करत नाही, असं आपण शाळेत शिकतो. अगदी स्टार ट्रेकमधल्या यूएसएस एन्टरप्राइजचे डिलिथियम क्रिस्टल सर्वाधिक क्षमतेने वापरात असले तरीही ते प्रकाशाचा वेग ओलांडू शकत नाही.

देव आणि विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण हे खरं आहे का. काही वर्षांपूर्वी भौतिकशास्त्रज्ञांच्या एका गटाने टाकिऑन (tachyon) नावाचे कण प्रकाशाहून वेगाने प्रवास करत असल्याचं प्रतिपादन केलं होतं. सुदैवाने, असे कण वास्तवात अस्तित्वात असण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे कण अस्तित्वात असलेच तरी त्यांचे वस्तुमान कल्पित असेल आणि त्यात कालावकाशाची वीण धूसर होऊन जाईल- त्यामुळे कार्यकारणभावाचा नियमच उल्लंघला जाईल (आणि बहुधा देवालाही याची डोकेदुखीच होईल).

प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करू शकणारी कोणतीही वस्तू अजून सापडलेली दिसत नाही. याचा तसा थेट देवाशी काही संबंध नाही. प्रकाश खरोखरच अतिशय वेगाने प्रवास करतो, ही माहितीच यातून पुन्हा अधोरेखित होते.

आरंभापासून प्रकाशाने किती प्रवास केला आहे, याचा विचार करायला लागल्यावर हा विषय जरा रोचक होतो. महाविस्फोटाची (बिग बँग) पारंपरिक मांडणी गृहित धरली आणि प्रकाशवेग प्रति सेकंद तीन लाख किलोमीटर इतका गृहित धरला, तर आत्तापर्यंत- म्हणजे विश्व अस्तित्वात आलं तेव्हापासून गेल्या १३.८ अब्ज वर्षांमध्ये प्रकाश सुमारे 1.3 X 10^23 (1.3 X 2310) किलोमीटर इतका प्रवास प्रकाशाने केला आहे. विश्वाच्या अस्तित्वाचं आपण जितपत निरीक्षण करू शकलो आहोत, त्यावरच हा अंदाज आधारित आहे.

हे विश्व सुमारे प्रति एमपीसी प्रति सेकंद 70 किलोमीटर या वेगाने प्रसरण पावतं आहे (1 एमपीसी = मेगा पर सेकंद किंवा सुमारे तीन कोटी किलोमीटर). म्हणजे सध्याच्या अंदाजानुसार या विश्वाचे कडेपर्यंतचं अंतर 46 अब्ज प्रकाशवर्षं इतकं आहे. काळ सरतो तशी अंतराळाची घनता वाढते व प्रकाशाला आपल्यापर्यंत पोचण्यासाठी अधिक प्रवास करावा लागतो.

देव आणि विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याला दिसतं त्यापलीकडेही विश्व आहे, पण आपण पाहिलेली सर्वांत दूरची गोष्ट म्हणजे जीएन-झेड11 ही आकाशगंगा. हबल स्पेस टेलिस्कोपमधून या आकाशगंगेचं निरीक्षण करण्यात आलं. ही आकाशगंगा सुमारे 1.2X10^23 किलोमीटर किंवा 13.4 अब्ज प्रकाशवर्षं दूर आहे.

याचा अर्थ, प्रकाशाला आपल्यापर्यंत पोचण्यासाठी 13.4 अब्ज वर्षं लागली आहेत. पण प्रकाशाने हा प्रवास सुरू केला, तेव्हा आपल्या 'मिल्की वे' आकाशगंगेपासून जीएन-झेड11 ही आकाशगंगा सुमारे तीन अब्ज प्रकाशवर्षं एवढीच दूर होती.

महाविस्फोटापासून विश्वाचं जितकं प्रसरण झालं असेल त्याच्या संपूर्ण कक्षेबाहेरचं आपण पाहू शकत नाही, कारण प्रकाश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्या सेकंदांशापासून पुरेसा वेळ गेलेला नसतो. त्यामुळे इतर अंतराळी प्रदेशात भौतिकशास्त्राचे नियम मोडले जातील का, याबद्दल आपल्याला खात्रीलायकरित्या काही सांगता येणार नाही, त्यामुळे कदाचित ते केवळ स्थानिक, अपघाती स्वरूपाचे नियम असतील, असंही प्रतिपादन काहींनी केलं आहे. यातून आपल्याला विश्वाहूनही मोठा विचार करावा लागतो.

बहुविश्व

अनेक अंतरिक्षशास्त्रांचं असं मत आहे की, हे विश्व एका अधिक विस्तारित अंतरिक्षाचा- बहुविश्वाचा- केवळ एक भाग असावं, त्यात अनेक विभिन्न विश्वांचं सहअस्तित्व असावं, पण त्यांच्यात काही अन्योन्यक्रीडा घडत नाही. बहुविश्वाच्या संकल्पनेला फुगवटा (inflation) सिद्धान्ताचा आधार आहे- हे विश्व 10^-32 सेकंद इतक्या वयाचं होतं त्याआधी त्याचा प्रचंड विस्तार झाला. फुगवट्याचा सिद्धान्त महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला विश्वाचा आज दिसणारा आकार व त्याची रचना यांचं स्पष्टीकरण या सिद्धान्ताद्वारे करता येतं.

पण फुगवटा एकदा घडला असेल, तर परत परत अनेकदा तो का घडला नाही? अचानक अस्तित्वात येणाऱ्या व नंतर लुप्त होणाऱ्या कणांच्या जोडीला क्वान्टम विचलनामुळे गती मिळण्याची शक्यता असते, हे आपल्याला प्रयोगांद्वारे कळलेलं आहे. अशा विचलनाने कण निर्माण होत असतील, तर संपूर्ण अणू अथवा विश्व का निर्माण होणआर नाही?

अनागोंदीतून फुगवटा होत होता, तेव्हादेखील सर्व काही एकसारख्या गतीने सुरू नव्हते- तेव्हा प्रसरणामधील क्वान्टम विचलनामुळे बुडबुडे उत्पन्न झाले आणि त्यातून स्वतंत्र विश्वं तयार झाली, असंही सुचवलं गेलेलं आहे.

पण या बहुविश्वामध्ये देवाचं स्थान कसं ठरतं? आपलं विश्व जीवनाच्या अस्तित्वासाठी अनुकूल आहे, ही वस्तुस्थिती अंतरिक्षशास्त्रज्ञांच्या डोक्याला ताप झालेली आहे. महाविस्फोटामध्ये निर्माण झालेले मूलभूत कण हायड्रोजन व ड्यूटेरियम यांच्या निर्मितीसाठी पूरक गुणवैशिष्ट्यं राखून होते, आणि पहिले तारे हायड्रोजन व ड्यूटेरियम यांपासून तयार झाले.

या ताऱ्यांमधील आण्विक प्रक्रियांचं नियमन करणारे भौतिक नियम पुढे कार्बन, नायट्रोजन व ऑक्सिजन यांची निर्मिती करत गेले- ज्यातून जीवन अस्तित्वात आलं. तारे, ग्रह व अखेरीस जीवन यांच्या विकासाला पूरक मूल्यं विश्वातील सर्व भौतिक नियमांमध्ये व निकषांमध्ये कशी काय मुळातच अस्तित्वात होती?

हा केवळ एक सुदैवी योगायोग आहे, असं प्रतिपादन काही जण करतात. तर, जैवस्नेही भौतिक नियमांनी आपण आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही, कारण शेवटी आपण त्यांच्यापासूनच निपजलो आहोत, त्यामुळे हे स्वाभाविकच आहे, असं इतर काही जण म्हणतात. परंतु, या सगळ्यातून देवाच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थितीचे संकेत मिळतात, असं काही ईश्वरवादी मंडळी मानतात.

देव आणि विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

परंतु, देवाच्या अस्तित्वाचं वैध वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. उलट, बहुविश्वाचा सिद्धान्त हे गूढ उकलणारा ठरतो, कारण विभिन्न विश्वांचे विभिन्न भौतिक नियम असण्याची शक्यता त्यात अनुस्यूत आहे. त्यामुळे जीवनाला पाठबळ पुरवणाऱ्या काही मोजक्या विश्वांमध्ये आपल्याला आपणच दिसण्याची शक्यता आश्चर्यकारक नाही. एखाद्या ईश्वरानेच बहुविश्व निर्माण केलं असण्याची संकल्पना अर्थातच फेटाळून लावता येत नाही.

हा सगळाच शेवटी गृहितकांचा खेळ आहे आणि बहुविश्वाच्या सिद्धान्तांवरची सर्वांत मोठी टीकाही अशीच आहे की, आपलं विश्व व इतर विश्वं यांच्यात कोणतीच अन्योन्यक्रीडा पार पडलेली दिसत नाही, त्यामुळे बहुविश्वाच्या संकल्पनेची थेट चाचणी घेता येत नाही.

क्वान्टम विचित्रपणा

देव एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो का, या प्रश्नाचा आता विचार करू. अंतराळ विज्ञानामध्ये आपण वापरतो त्यातील बहुतांश विज्ञान व तंत्रज्ञान प्रतिअंतःप्रज्ञ सिद्धान्तावर आधारलेलं आहे. क्वान्टम मेकॅनिक्स म्हणून ओळखल्या जाणारा हा अणूरेणूंच्या लहान विश्वाचा सिद्धान्त आहे.

या सिद्धान्तामुळे क्वान्टम एन्टॅन्गलमेन्ट- म्हणजे विचित्ररित्या जोडलेल्या कणांचं अस्तित्व शक्य होतं. दोन कण एकमेकांमध्ये गुंतलेले असतील, तर त्यातील एका कणाचा वापर करताना दुसऱ्या कणाचाही वापर आपण करत असतो. ते एकमेकांपासून दूर असले, त्यांच्यात अन्योन्यक्रीडा घडत नसली, तरीही हे शक्य होतं. मी इथे दिलेल्या उदाहरणाहून चांगल्या रितीने या गुंतागुंतीचं वर्णन करता येईल, पण मला इतकंच सुलभ पद्धतीने हे मांडणं शक्य झालं.

अ आणि ब अशा दोन उप-कणांमध्ये क्षय होणाऱ्या एका कणाची कल्पना करा. उप-कणांची गुणवैशिष्ट्यं मूळ कणाच्या गुणवैशिष्ट्यांशी सुसंगत असायला हवीत- हे संवर्धनाचं तत्त्व आहे. उदाहरणार्थ, सर्व कणांमध्ये 'फिरकी'चं क्वान्टम गुणवैशिष्ट्य असतंच- म्हणजे कम्पासच्या टोकासारखी फिरकी ते घेतात.

मूळ कणाचं 'फिरकी'-मूल्य शून्य असेल, तर दोन उप-कणांपैकी एकाची फिरकी धन असेल, तर दुसऱ्याची ऋण असेल. म्हणजेचच अ आणि ब यांच्या धन अथवा ऋण फिरकी असण्याची शक्यता ५० टक्के आहे (क्वान्टम मेकॅनिक्सनुसार, आपण प्रत्यक्षात मोजमाप घेत नाही तोवर या कणांमध्ये मूलतः विविध अवस्थांची सरमिसळ झालेली असते).

अल्बर्ट आइनस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

अ आणि ब यांची गुणवैशिष्ट्यं एकमेकांहून स्वतंत्र नसतात- ते गुंतलेले असतात. अगदी वेगवेगळ्या ग्रहांवरील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये असले, तरीही हे लागू होतं. यातील अ या कणाच्या फिरकीचं मोजमाप केलं, आणि ते धन आलं, तर त्याच वेळी बी कणाची फिरकी मोजणाऱ्या एखाद्या मित्राची कल्पना करा. संवर्धनाचं तत्त्व लागू होण्यासाठी या मित्राला ब कणाची फिरकी ऋणच दिसायला हवी.

पण इथेच गोष्टी आणखी धूसर व्हायला लागतात. उप-कण 'अ'प्रमाणे 'ब' कण धन असण्याचीही ५० टक्के शक्यता असतेच, त्यामुळे 'अ' कणाची फिरकी अवस्था धन अशी मोजल्यावर 'ब' कणाची फिरकी अवस्था ऋण 'होते.' निराळ्या शब्दांत सांगायचं तर, दोन उप-कणांमधील फिरकी अवस्थेबद्दलची माहिती तत्काळ हस्तांतरित केली जाते.

क्वान्टम माहितीचं असं हस्तांतरण सकृत्दर्शनी प्रकाशाहून वेगाने होतं. खुद्द आइनस्टाइननेही क्वान्टम गुंतागुंतीचं वर्णन 'दूरस्थ भितीदायक क्रिया' असं केलं होतं. हा काहीसा विचित्र परिणाम शोधण्यासाठी आपल्या सर्वांनाच क्षमा करता येईल, असं मला वाटतं.

म्हणजे प्रकाशाहून वेगवान असं काहीतरी आहे तर, त्याला 'क्वान्टम इन्फर्मेशन' / 'क्वान्टम परिणामासंदर्भातील माहिती' असं म्हणता येईल. यातून देवाचं अस्तित्व सिद्धही होत नाही अथवा खोडलंही जात नाही, पण यातून आपण देवाविषयी भौतिक संदर्भात विचार करू शकतो- कदाचित गुंतलेल्या कणांच्या वर्षावाच्या रूपात, क्वान्टम माहिती पुढे-मागे हस्तांतरित करणारा घटक, त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी असणारा घटक, किंवा कदाचित एकाच वेळी अनेक विश्वांमध्ये असणारा घटक, असा हा विचार विस्तारता येईल.

पृथ्वीच्या आकाराचे बॉल उडवत असतानाच आकाशगंगांच्या आकाराच्या ताटल्या फिरवत असलेली व्यक्ती म्हणजे ईश्वर किंवा देव, अशी एक प्रतिमा माझ्या समोर येते. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात माहिती फेकणं, सगळं गतिमान ठेवणं, असं काम तो करत असल्याचं दिसतं. सुदैवाने देवाला अनेक कामं एका वेळी करता येतात- त्यामुळे कालावकाशाची वीण कार्यरत राहते. फक्त थोडी श्रद्धा हवी.

या लेखामध्ये नमूद केलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडीफार तरी उलगडली का? कदाचित नसावीत. तुमचा देवावर विश्वास असेल (माझा आहे), तर देव भौतिकशास्त्राच्या नियमांना बांधील असण्याची संकल्पना निरर्थक ठरते, कारण देव काहीही करू शकतो, अगदी प्रकाशाहून वेगाने प्रवास करू शकतो. तुमचा देवावर विश्वास नसेल, तरीही हा प्रश्न तितकाच निरर्थक ठरतो, कारण देव अस्तित्वातच नसेल, तर प्रकाशाहून वेगाने प्रवास करणारं काहीच नाहीये. कदाचित हा प्रश्न अज्ञेयवाद्यांना विचारता येईल, त्यांना देव आहे की नाही हे माहीत नसतं.

देव आणि विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

विज्ञान व धर्म यांच्यातील भिन्नतेचा मुद्दा इथे येतो. विज्ञानाला पुरावा हवा असतो, धर्माला श्रद्धा लागते. वैज्ञानिक देवाचं अस्तित्व सिद्ध करण्याचे किंवा नाकारण्याचे प्रयत्न करत नाहीत, कारण देव ओळखणारा प्रयोग कधीच असणार नाही हे त्यांना माहीत आहे. तुमचा देवावर विश्वास असेल, तर वैज्ञानिकांनी विश्वाबद्दल काहीही शोध लावले, तरी कोणतंही अंतरिक्ष देवाच्या असण्याशी सुसंगत वाटू शकतं.

देव, भौतिकशास्त्र किंवा इतर कशाहीबद्दलची आपली मतं परिप्रेक्ष्यावर अवलंबून असतात. पण या लेखाचा शेवट आपण एका खरोखरच्या आधिकारिक म्हणता येईल अशा व्यक्तीच्या अवतरणाने करू. नाही, बायबल नव्हे. अंतरिक्षशास्त्रावरचं काही पाठ्यपुस्तकही नव्हे. टेरी प्रॅशेट यांच्या 'रीपर मॅन' या कादंबरीतलं हे अवतरण आहे:

"आपण कशाहीपेक्षा वेगाने प्रवास करतो, असं प्रकाशाला वाटतं. पण ते चूक आहे. प्रकाश कितीही वेगाने प्रवास करत असला, तरी आपल्या आधी अंधार पुढे पोचलेला आहे, तो आपली वाट पाहतोय, हेच शेवटी प्रकाशाला पाहायला मिळतं."

(मोनिका ग्रॅडी या द ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ग्रह व अंतराळविज्ञानाच्या प्राध्यापक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.