रायगडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, सूडाच्या राजकारणाचा आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मंगेश काळोखे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली आहे.

मानसी यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी जवळपास पाच जणांनी भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे.

या प्रकरणी खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (27 डिसेंबर) काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, "रायगड जिल्ह्यात यापूर्वी कधीही राजकीय वैमनस्य एवढ्या टोकाला गेलेलं नव्हतं. मात्र, मंगेश यांच्या बाबतीत सूडाचं राजकारण घडलं."

या घटनेनंतर रायगडमधील राजकारण ढवळून निघाल्याचं चित्र आहे. तर शुक्रवारी रात्री स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

नेमकं प्रकरण काय आहे?

21 डिसेंबर रोजी खोपोली नगरपरिषदेचे निकाल जाहीर झाले. यात मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या.

त्यांच्या विरोधात संबंधित घटनेतील आरोपीच्या पत्नी या देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणुकीला उभ्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विजयाच्या पाच दिवसांनंतर मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची सकाळी सात वाजताच्या सुमारास भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एकूण सहा आरोपींवर नावानीशी आणि चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो कॅप्शन, जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एकूण सहा आरोपींवर नावानीशी आणि चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी 26 डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आज (26 डिसेंबर) जवळपास सात वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. एकूण पाच लोकांनी त्यांना डोक्यावर वार करून ठार मारलेलं आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. आमचा तपास सुरू आहे. आरोपीच्या संदर्भात लीड मिळालेली आहे. पुराव्यांच्या माध्यमातून चार्जशीट दाखल करू. याअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे."

"एकूण सहा आरोपींवर नावानीशी आणि चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची आठ पथकं तयार करण्यात आलेली आहेत. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झालेली होती. यात लवकरात लवकर आरोपींची अटक करून आम्ही पुढील प्रक्रिया करू. आरोपी मिळत नाही तोपर्यंत मोटीव्ह कळणार नाही. मयत व्यक्तीची बायको शिवसेना शिंदे गटची नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे. जी आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवकासाठी उमेदवार होती," असंही त्यांनी सांगितलं.

'निवडणुकीत हरवू शकले नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या ते जिव्हारी लागलं असावं'

ही हत्या राजकीय सूडापोटी घडली असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या आमदारांनी केला आहे.

आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "ते निवडणुकीत हरवू शकले नाहीत. म्हणून राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलं असावं, असं आम्हाला वाटतंय. हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय. कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते. कारण हाच माणूस महेंद्र थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीतून सहा-साडेसहा हजारचा लीड मिळवून देण्यात अग्रगण्य होता. या विजयातही त्याचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही खेळी करून त्यांनी डाव साधला असावा."

तर मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, "रायगडचं राजकारण तुम्ही पाहताय. हे रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेत आल्यापासून आणि सत्तेचा माज येण्यातून झालेलं आहे. बीडनंतर रायगडचा आका सुनील तटकरे झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्याला जीवे मारण्यात येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य दडपशाहीने दादागिरीने दहशतीने सुरू झालेलं आहे."

ही हत्या राजकीय सुडापोटी घडली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी केला आहे.
फोटो कॅप्शन, ही हत्या राजकीय सुडापोटी घडली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी केला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महेंद्र थोरवे म्हणाले, "माझ्या विश्वासू सहकारी, निष्ठावान कार्यकर्त्याची हत्या केलेली आहे. फाशीची शिक्षा होईपर्यंत माफ करणार नाही. सुनील तटकरे स्टेटमेंट करतायत की, यात त्यांचा हात नाही. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे का? याचा अर्थ हे सगळं प्री-प्लॅनींग आहे. वाट्टेल ते स्टेटमेंट करायचं. मोकळं व्हायचं. आयजीपासून सगळ्यांवर राजकीय दबाव टाकायचा, असं सगळं सुरू आहे. मंगेशची हत्या करायची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची नाहीच आहे. हे सगळे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांना ताकद देऊन सुरू आहे. भगत हा रवी देवकरचा मित्र आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत सातत्याने ताकद देण्याचं काम करत होते. हत्यारं आणली गेली. सातत्याने मंगेशचा पाठलाग करत होते. हे निदर्शनास येत होतं. पण मंगेशला कल्पना आली नाही की हे हत्या करतील. मात्र, ह्या आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला बसून राहू."

"मंगेश रात्र-दिवस लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता होता. गोरगरींबाची सेवा करणारा कार्यकर्ता होता. अशा कार्यकर्त्याची हत्या होत असेल तर आम्ही राजकारण करायलाच नको. सुधाकर घारे हा एफआयआरमधला आरोपी आहे. भरत भगत, रवी देवकर हे एफआयआरमधले आरोपी आहेत. सुनील तटकरे स्टेटमेंट देतात की सुधाकर घारेचा संबंध नाही. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की ही घटना घडायच्या दोनदिवस आधी रवी देवकर हा अलिबागच्या वकिलांकडून सुतारवाडीला जाऊन सुनील तटकरेंसोबत बसला होता. यानंतर प्रीप्लॅन करूनच हत्या करण्यात आलेली आहे. याचीही पोलिसांनी चौकशी करावी," असंही ते म्हणाले.

सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं की, "या बाबतीत जे बोललं जातंय ते तथ्यहीन आहे, असं माझं मत आहे. ज्यावेळेला एखाद्या घटनेत तपास चालू असतो तेव्हा त्यावर मतप्रदर्शन करणं उचित नसतं. सुधाकार घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. मला विश्वास आहे की, त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसेल. पण तपास चालू असल्याने तपास इन्फ्लूअन्स होईल असं स्टेटमेंट मी करणार नाही."

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं की, "या बाबतीत जे बोललं जातंय ते तथ्यहीन आहे, असं माझं मत आहे."

फोटो स्रोत, Facebook/Sudhakar Ghare

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं की, "या बाबतीत जे बोललं जातंय ते तथ्यहीन आहे, असं माझं मत आहे."

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "त्यांना काय बोलायचं आहे ते बोलूद्या. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही. मी याबाबतीत संवेदनशील आहे. याचा तपास शीघ्र गतीने व्हावा. शक्य झाल्यास मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमावी. कधीपासून त्या दोघांच्यात अंतर होतं किंवा काय होतं याचा पूर्णपणे तपास केला जावा. मग बोलू आपण काय बोलायचं ते. राजकीय वातावरण तयार करू नये."

'मोक्का लावून कठोर कारवाई करणार'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (27 डिसेंबर) काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, "लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर हल्ला करून निघृण हत्या करण्यात आली. क्रूरपणे हत्या झालेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मुलीला शाळेत सोडताना पाळत ठेऊन पूर्णपणे नियोजन करून हल्ला केलेला आहे. हा नियोजित कटाचा भाग आहे. पूर्ण नियोजन करून मंगेशला मारलेलं आहे. त्याच्या परिवाराच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तिथल्या जनतेच्या भावनाही अतिशय तीव्र आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोक्का अंतर्गत कारवाई करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची त्यांची भावना आहे. अशाप्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे."

"एखाद्याचा विजय झाल्यानंतर, ज्याला जनतेने निवडून दिलं आणि जे सुडाचं राजकारण करतायत त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे. कठोर शिक्षा झाली पाहिजे. यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर नेऊन अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे. सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील,"

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (27 डिसेंबर) काळोखे कुटुंबियांची भेट घेतली.
फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (27 डिसेंबर) काळोखे कुटुंबियांची भेट घेतली.

'घटनेशी संबंध नाही, मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायला तयार'

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनीही फेसबुकवर एक व्हीडिओ प्रसारित करून उत्तर दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की, "खोपोलीमध्ये जी हत्या झाली, ती हत्या भयानक आहे. मी कालपासून एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी आहे. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर एक-दोन तासांसाठी माझा मोबाईल बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून अहमदाबादला उतरलो, तेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की, या घटनेचा आपण जेवढा निषेध करू, तेवढं कमी आहे.

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनीही फेसबुकवर एक व्हीडिओ प्रसारित करून उत्तर दिलेलं आहे.

फोटो स्रोत, Facebook/Sudhakar Ghare

फोटो कॅप्शन, शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनीही फेसबुकवर एक व्हीडिओ प्रसारित करून उत्तर दिलेलं आहे.

"या प्रकरणी अनेकांची नावे आलेली आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, आमदार महेंद्र थोरवे यांनी माझं सुद्धा नाव त्यात घेतलेलं आहे. त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते अशा गोष्टी करत आहेत. मी एका धार्मिक ठिकाणी आलेलो आहे. इथे मी शपथ घेऊन सांगतो की, माझा या घटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

"जे मयत झालेले आहेत, ते माझे जवळचे नातेवाईक आहेत. मी असं कोणतंही काम केलेलं नाही. आमदार महेंद्र थोरवे, त्यांचे बंधू मनोहर थोरवे, संकेत भासे यांनी माझे आणि भरत भगत यांचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला असेल, परंतु माझा खोपोली पोलीस, रायगड पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणी जे आरोपी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे," असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)