धुरंधर : चौधरी अस्लम यांची खरी कहाणी, जे गुन्हेगारांचा एन्काऊंटर करायचे; मग लोक त्यांना 'व्हिलन' का म्हणत?

फोटो स्रोत, Facebook/ChaudhryAslam
'धुरंधर' सिनेमाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अक्षय खन्नाचा अभिनय, त्याच्यावर चित्रित झालेलं अरबी गाणं, सिनेमाची कथा आणि त्यातील तगडी स्टारकास्ट यामुळे जिकडे-तिकडे फक्त 'धुरंधर' ट्रेडिंगमध्ये आहे.
या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा जितका भारतात चर्चेत आहे. तितकंच पाकिस्तानमध्येही यावर बोललं जात आहे. कारण सिनेमा पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
रहमान डकैत, चौधरी अस्लम ही पाकिस्तानमधील गुन्हेगारी आणि पोलिसी यंत्रणेतील मोठी नावं आहेत.
अक्षय खन्नाच्या भूमिकेमुळे आणि त्याच्या अरबी गाण्यावरील नृत्यामुळे रहमान डकैत आता सर्वांना माहीत झाला. पण याच रहमान डकैतचा एन्काऊंटर करणारे चौधरी अस्लम हेही चर्चेत आहेत. त्यांच्या भूमिकेत आहे संजय दत्त.
आता या भूमिकेमुळे संजय दत्तचीही तितकीच चर्चा होताना दिसत आहे. चौधरी अस्लम हे कराची पोलीस दलातील अधिकारी होते. एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी त्यांची ख्याती होती.
पाकिस्तान त्यातल्या त्यात कराचीमध्ये तर काही जण त्यांना नायक आणि काही जण व्हिलन ठरवतात. चौधरी अस्लम हे त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेकवेळा वादात राहिले आहेत.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानमधूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत.
त्यातल्या त्यात चौधरी अस्लम यांची भूमिका निभावणाऱ्या संजय दत्तबद्दल काहींनी आपलं मत नोंदवलं आहे.
चौधरी अस्लम हे संजय दत्त यांच्यापेक्षा हँडसम होते, असं काहींनी म्हटलं आहे. आज आपण याच चौधरी अस्लम यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.
कोण होते चौधरी अस्लम?
कराचीतील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी ओळखले जाणारे चौधरी अस्लम यांची कारकीर्द वाद आणि विरोधाभासांनी वेढलेली आहे.
त्यांना जवळून आणि दुरून ओळखणाऱ्यांची मतं ही नेहमीच वेगवेगळी दिसून आली आहेत.
"चौधरी अस्लम हे सुरुवातीला सिंध रिझर्व्ह पोलिसांच्या प्रसिद्ध 'इगल स्क्वॉड'मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून सामील झाले. पण लवकरच ते कराची पोलिसांच्या नियमित दलाचा भाग बनले," असं माजी एसपी लियारी फय्याज खान सांगतात.
चौधरी अस्लम यांनी आपल्या कामगिरी आणि संबंधांच्या जोरावर पोलीस अधिक्षकपदापर्यंत मजल मारली. ल्यारी टास्क फोर्सचे प्रमुख झाल्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

फोटो स्रोत, SMVP
कराचीमध्ये 1992 आणि 1996 मध्ये गुन्हेगारांविरोधात झालेल्या कारवायांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्यावर अनेकदा एन्काउंटरबाबत आरोप झाले, पण चौकशीनंतर ते आरोप निराधार ठरले आणि त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं.
ल्यारीचा कुख्यात गँगस्टर अब्दुल रहमान बलोच, म्हणजेच रहमान डकैत जो पीपल्स अमन कमिटीचा संस्थापक प्रमुख मानला जात होता. त्याला 9 ऑगस्ट 2009 रोजी चौधरी अस्लम यांनी ठार केलं होतं.
धुरंधर या चित्रपटात रहमान डकैतचं पात्र आहे, आणि ते अक्षय खन्नाने साकारलं आहे.
पोलीस दलात कार्यरत असताना चौधरी अस्लम यांच्यावर अनेकवेळा प्राणघातक हल्ले झाले.
9 जानेवारी 2014 रोजी कराचीमध्ये दहशतवादी बॉम्बहल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचा जवळचा सहकारी कामरान आणि अंगरक्षकही ठार झाले होते.
चौधरी अस्लम यांचं खरं नाव काय होतं?
कराची पोलिसांतील सर्वात प्रसिद्ध अधिकारी असलेले 'चौधरी' अस्लम यांचं हे खरं नाव नव्हतं. मुहम्मद अस्लम खान हे त्यांचं खरं नाव. ते नंतर चौधरी नावाने प्रसिद्ध झाले.
अस्लम प्रत्यक्षात ना आडनावाने, ना जातीने 'चौधरी' होते. 'चौधरी' हा त्यांचा अधिकृत नावाचा भागही नव्हता.
मग कधी, का, कुणी आणि कशामुळे त्यांच्या नावापुढे 'चौधरी' हा शब्द जोडला? हे कुणालाच नीट माहीत नाही.
परंतु, कालांतराने हेच नाव इतकं रूढ झालं की, आज त्यांच्या मूळ नावाची माहिती फार कमी लोकांना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकारांच्या मते, नाझिमाबादचे माजी डीएसपी आरिफ जाह सिद्दीकी हे चौधरी अस्लम यांचे मार्गदर्शक होते.
त्यांचा मुलगा आफताब जाह सिद्दीकी सध्या लंडनमध्ये राहतात. ते विश्लेषक असून कराची आणि कराची पोलिसांच्या कामकाजावर त्यांचा सखोल अभ्यास आहे.
आफताब सिद्दीकी यांच्या मते, चौधरी अस्लम यांचा जन्म 1964 मध्ये मानसेरा जिल्ह्यातील 'दुदयाल' तहसीलमध्ये झाला होता. ते 31 ऑक्टोबर 1984 रोजी पोलीस दलात दाखल झाले.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले चौधरी अस्लम सुरुवातीला 'अगदी शांत आणि लाजाळू' होते, या दाव्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं.
चौधरी अस्लम यांची वादग्रस्त कारकीर्द
चौधरी अस्लम यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जाणारे माजी एसपी फय्याज खान यांनी सीआयडीसह कराची पोलिसांच्या विविध विभागांत चौधरी अस्लम यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं. चांगल्या-वाईट काळात ते कायम त्यांच्या सोबत होते.
कराचीच्या नियमित पोलीस दलाचा भाग बनल्यानंतर त्यांची पदोन्नती झाली.
आफताब सिद्दीकी म्हणतात की, "सुमारे चार वर्षे चाललेल्या 'कराची ऑपरेशन' दरम्यान, शेकडो पोलीस चकमकींमध्ये 100 पेक्षा जास्त वॉन्टेड संशयितांना मारणारे किंवा अटक करणारे आणि त्यांना तुरुंगात किंवा थेट स्मशानभूमीत नेणारे गुलबहार पोलीस स्टेशनचे एसएचओ चौधरी अस्लम यांना लवकरच 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' मानलं गेलं."

फोटो स्रोत, Aditya Dhar/Instagram & Chaudhry Aslam/Facebook
आफताब सिद्दीकी यांच्या मते, पदोन्नती मिळवत चौधरी अस्लम आधी पोलीस निरीक्षक झाले. त्यानंतर त्यांची गुलबहार पोलीस ठाण्याचे एसएचओ म्हणून नियुक्ती झाली आणि 25 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांची नाझिमाबादचे डीएसपी म्हणून नियुक्ती झाली.
यानंतर 2000 च्या दशकात वेगवेगळ्या काळात त्यांची स्पेशल ब्रँच लारकाना, एसआरपी सुक्कर आणि कराचीतील अँटी कार लिफ्टिंग सेलमध्ये नियुक्ती झाली.
2010 च्या दशकापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत चौधरी अस्लम यांनी एसपी म्हणून, तसेच सीआयडी आणि अतिरेकी विरोधी गुन्ह्याचे प्रभारी म्हणून काम केलं.
सुमारे 30 वर्षांच्या आपल्या पोलीस सेवेत त्यांचा कारकिर्दीचा प्रवास वादग्रस्त राहिला आणि तो मोठ्या चढ-उतारांनी भरलेला होता.
तालिबान, दहशतवादी आणि चौधरी अस्लम
काही काळानंतर चौधरी अस्लम यांची सीआयडीमध्ये नियुक्ती झाली. हा विभाग धार्मिक आणि पंथीय दहशतवाद तसेच तालिबानसारख्या कट्टरतावाद्यांविरोधात लढत होता.
रहमान डकैतच्या मृत्यूनंतर झालेल्या एका कारवाईत चौधरी अस्लम रहमान डकैतचा उत्तराधिकारी आणि पीपल्स अमन कमिटीचा प्रमुख उझैर बलोचला पकडण्यात अपयशी ठरले.
काही काळानंतर चौधरी अस्लम यांची सीआयडीमध्ये नियुक्ती झाली. तो विभाग धार्मिक दहशतवाद, पंथीय हिंसा आणि तालिबानसारख्या कट्टरवाद्यांविरोधात काम करत होता.

फोटो स्रोत, Facebook/ChadhryAslamFans
लवकरच चौधरी अस्लम थेट तालिबान, लष्कर-ए-झांगवी आणि धर्म वा पंथाच्या नावाखाली दहशतवाद करणाऱ्या कट्टरवाद्यांच्या समोर पोहोचले.
त्यानंतर नियमितपणे त्यांच्या नेतृत्वाखालील सीआयडीच्या सशस्त्र चकमकींबाबत बातम्या येऊ लागल्या. त्या बातम्या या संघटना आणि त्यांच्या कट्टर सदस्यांविरोधात होत्या.
संपूर्ण पाकिस्तानमधील राजकीय आणि जनतेच्या वर्तुळांमध्ये तसेच माध्यमांमध्येही कट्टरवाद्यांविरोधातील राज्य संस्थांच्या कारवाया कौतुकास्पद समजल्या जाऊ लागल्या, आणि वादग्रस्त सशस्त्र चकमकींवर टीका कमी होऊ लागली. आता चौधरी अस्लम लोकांना हिरो जास्त आणि व्हिलन कमी वाटू लागले.
चौधरी अस्लम यांच्यावर हल्ले
कराचीच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाइन्स भागात सीआयडीच्या कार्यालयावर स्फोटकांनी भरलेली एक कार आदळून हल्ला झाला. यात सुमारे 20 जण ठार झाले.
हल्ल्याची जबाबदारी तालिबान आणि लष्कर-ए-झांगवी यांनी स्वीकारली होती. सीआयडी विशेषत: चौधरी अस्लम या संघटनेविरोधात खूप सक्रिय होते. मात्र या हल्ल्यात सुदैवाने ते सुरक्षित राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
पण अजूनही हल्ल्याचा धोका कायम होता. अशावेळी, तालिबान आणि लष्कर-ए-झांगवीने चौधरी अस्लम यांच्यावर आणखी एक हल्ला केला.
19 सप्टेंबर 2011 रोजी कराचीच्या तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डिफेन्स भागात त्यांच्या घरावर हल्ला झाला.
या वेळीही फेज 8 मध्ये असलेल्या त्यांच्या घराच्या भिंतीवर स्फोटकांनी भरलेली एक कार आदळली. या आत्मघाती हल्ल्यात 8 जण ठार झाले.
यात चौधरी अस्लम यांच्या घरावर नेमणुकीला असलेल्या 6 पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर एक महिला आणि तिचा मुलगाही होता.
या हल्ल्यातून चौधरी अस्लम चमत्कारिकरित्या बचावले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
अखेर दहशतवादी हल्ल्यातच मृत्यू
पण 9 जानेवारी 2014 रोजी चौधरी अस्लम दहशतवाद्यांच्या आणखी एका हल्ल्याचे बळी ठरले. या बॉम्ब हल्ल्यात त्यांचा जवळचा सहकारी कामरान आणि अंगरक्षकही ठार झाला.
या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी नॉर्दर्न बायपासवरील मंगहोपीर भागात झालेल्या कथित 'पोलीस एन्काउंटर'मध्ये तीन तालिबान कट्टरवाद्यांना मारल्याचा दावा केला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











