सोशल मीडियावरील व्हायरल उपाय आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खरंच प्रभावी आहेत का? तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
'गट हेल्थ' अर्थात आतड्यांचं आरोग्य यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. लोक याबद्दल जागरुकतेनं चर्चा करताना दिसतात.
काही लोक आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी लवकर चिया सीड्सचं पाणी पितात.
काही लोक त्यांच्या स्मूदीमध्ये 'सी मॉस जेल' अर्थात समुद्री शेवाळ घालतात, तर बरेच लोक त्यांच्या आतड्यांना बरं वाटण्यासाठी 'बोन ब्रॉथ' अर्थात हाडांचा रस्सा वा पाया सूप पितात.
अशा पदार्थांचं सेवन केल्यानं मूड सुधारतो तसेच त्यामुळे उर्जेची पातळी वाढते, असं मानलं जातं.
सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या खाद्यपदार्थांच्या मागचं सत्य हे अधिक गुंतागुंतीचं असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
आतड्यांच्या आरोग्यावरील संशोधन अजूनही वाढतचं आहे. कारण, जवळजवळ दररोज नवनवीन वैज्ञानिक पुरावे समोर येताना दिसत आहेत.
'गट मायक्रोबायोम' अर्थात आतड्यांवरील सूक्ष्मजीव एकूणातच आतड्यांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
मात्र, आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे उपाय खरेच तितके प्रभावी आहेत का? याबद्दलचे पुरावे मर्यादित आहेत.
त्यामुळे, मुळातच आरोग्य चांगलं असलेल्या लोकांसाठी याचा अधिक विचार करत वेगवेगळे उपाय करणं, ही गोष्ट कदाचित अनावश्यक स्वरूपाची असू शकते.
'गट मायक्रोबायोम' म्हणजे काय?
बीबीसी सायन्स ब्रॉडकास्टर कॅरोलिन स्टील हे आपलं आतडं आणि त्यांचं स्वरूप नक्की कसं आहे, हे स्पष्ट करतात.
त्या सांगतात की, "आपली पचनसंस्था तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत ते पसरलेली असते. आतड्याच्या आत 'गट मायक्रोबायोम' अर्थात आतड्यातले सूक्ष्मजीव राहत असतात.
या गट मायक्रोबायोममध्ये अब्जावधी बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी यांचा समावेश असतो. आपलं शरीर कशाप्रकारे कार्य करत आहे, यामध्ये या सूक्ष्मजीवांची भूमिका महत्त्वाची असते. ते अगदी एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम करतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्टील म्हणतात की, "प्रत्येक व्यक्तीच्या आतड्यातील सूक्ष्मजीव हे बोटांच्या ठशांहूनही अधिक वेगळे आणि अधिक अनोखे असतात."
निरोगी आतड्यामधील सूक्ष्मजीव हे शरीराला अन्नामधून ऊर्जा बाहेर काढण्यास मदत करतात. ते रक्तातील साखरेचं योग्य नियमन करण्यासदेखील मदत करतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.
अनेक संशोधनांमध्येही आतड्यांचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांच्यातील दुवा दिसून येतो. कारण, आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं असेल तर आपल्या आयुष्यातील चिंतेची पातळीही कमी असते आणि आपला मूड अधिक चांगला असतो, असं संशोधनात आढळून आलं आहे.
व्हायरल फूड्स खरंच प्रभावी आहेत का?
मायक्रोबायोलॉजिस्ट ॲलन वॉकर तसेच गट हेल्थ सायन्टीस्ट डॉ. मेगन रॉसी यांनी आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पदार्थांबाबत आपलं मत मांडलं आहे.
त्या दोघांचंही असं म्हणणं आहे की, अशा प्रकारे सोशल मीडियावर गाजवल्या जाणाऱ्या अनेक लोकप्रिय पदार्थांमध्ये थोडेसं तथ्य नक्कीच असतं.
मात्र, बहुतांश वेळेला अशा पदार्थांना एखादा चमत्कारिक पदार्थ असल्यासारखं वागवलं जातं. त्यांच्या मते, असे दावे सहसा अतिशयोक्तीपूर्ण असतात.
चिया सीड्स वॉटर
चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.
डॉ. मेगन रॉसी म्हणतात की, फायबर आतड्यांतील फायदेशीर बॅक्टेरियांना पोषण देण्यास मदत करतं. फायबर आतड्यांच्या नियमित हालचालींना देखील मदत करतं.

फोटो स्रोत, Getty Images
ॲलन वॉकर स्पष्ट करतात की, फायबरचा कोणताही एकच स्रोत पूर्णपणे पुरेसा नसतो. आतड्यांतील वेगवेगळ्या सूक्ष्मजंतूंना वेगवेगळ्या प्रकारच्या फायबरची आवश्यकता असते.
एकाच घटकापेक्षा विविध प्रकारचे फायबर स्रोत असणं अधिक महत्त्वाचे आहे. वॉकर म्हणतात की, चिया सीड्सचं पाणी पिण्यात काहीही नुकसान नाही.
मात्र, केवळ चिया सीड्सचं पाणी पिणं, यामध्ये मर्यादित फायदा आहे.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल हा त्याच्या अँटी-इन्फ्लामेटरी अर्थात दाहविरोधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठीही मदत करू शकतं, हे फायदे ॲलन वॉकर स्पष्ट करतात.
ऑलिव्ह ऑइल आतड्यांचं मायक्रोबायोम सुधारतं, याचे फारसे पुरावे नाहीत. ऑलिव्ह ऑइल प्यायल्याने विशेष फायदे मिळत नाहीत.
वॉकर म्हणतात की, "ऑलिव्ह ऑइल थेट पिणं आणि ते अन्नात घालणं, यामध्ये तसा फारसा फरक नाही."
समुद्री शेवाळ (सी मॉस जेल)
सी मॉस जेल हे एक प्रकारचं समुद्री शेवाळ आहे. ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारं उत्पादन म्हणून लोकप्रिय झालेलं आहे. ते फायबर, काही जीवनसत्त्वं आणि खनिजं प्रदान करतं.
डॉ. मेगन रॉसी म्हणतात की, समुद्री शैवालाचं आतड्यांच्या आरोग्यासाठीच्या फायद्यांना समर्थन देणारे वैज्ञानिक पुरावे फार कमी आहेत.
त्या म्हणतात की, हे समुद्री शैवाल आतड्यांतील मायक्रोबायोम किंवा पचन पूर्णपणे सुधारत नाही.
रॉसी या सी मॉस जेल अधिक प्रमाणात घेऊ नये, असा इशारा देतात. त्या आतड्यांसंबंधी दाहक आजार असलेल्या लोकांना विशेषतः सावध करतात.
ॲलन वॉकर सी मॉस जेलचे संभाव्य धोके दर्शवितात. समुद्री शैवालमध्ये जड धातू आणि आयोडीन असू शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
पाया सूप
हाडांचा रस्सा अर्थात पाया सूप हे पोषक तत्वांनी समृद्ध असतं. ते सेवन करतानाही बरंच आरामदायी वाटतं. ॲलन वॉकर स्पष्ट करतात की, हाडांच्या रस्स्यांमधील बहुतेक पोषक घटक हे लहान आतड्यात शोषले जातात.
आतड्यातील बहुतेक सूक्ष्मजंतू हे मोठ्या आतड्यात राहतात. रस्सा आतड्यातील सूक्ष्मजंतूंपर्यंत फारच कमी पोहोचतो.

फोटो स्रोत, Getty Images
वॉकर म्हणतात की, हाडांचा रस्सा आतड्यातील सूक्ष्मजंतूंना फायदेशीर ठरतो, याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
डॉ. मेगन रॉसीदेखील या मताशी सहमत आहेत. त्या असा इशारा देतात की, हाडांचा रस्सा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. जर चरबी काढून टाकली नाही तर हा धोका जास्त असतो.
कोम्बुचा
कोम्बुचा हा एक प्रकारचा आंबवलेला चहा असतो.
डॉ. मेगन रॉसी म्हणतात की, त्या पारंपारिक कोम्बुचाच्या मोठ्या चाहत्या आहेत. कारण, पारंपारिक कोम्बुचामध्ये आंबवताना तयार होणारे नॅचरल ॲसिड्स असतात.
तसेच, त्यात अँटीऑक्सिडंट वनस्पती संयुगे देखील असतात. ही संयुगे आरोग्याच्या फायद्यांशी जोडलेली असतात. रॉसी म्हणतात की, कोम्बुचाची सर्व उत्पादनं सारखी नसतात.
कोम्बुचासोबत व्हिनेगर जोडण्याची आवश्यकता नाही. कारण, सूक्ष्मजंतू नैसर्गिकरित्या ऍसिड तयार करतात. त्या कृत्रिम गोड पदार्थांसह शुगर-फ्री कोम्बुचा टाळण्याचा सल्ला देतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्टील म्हणतात की, काही लक्षणं आतड्यांसंबंधी समस्या दर्शवू शकतात. सततची बद्धकोष्ठता, अतिसार, अधिक गॅस होणं, सतत पोटदुखी होणं, या सगळ्या समस्या याकडेच इशारा करतात.
अशा परिस्थितीत, वैद्यकीय सल्ला घ्यावा. निव्वळ आहारातील बदलांवर अवलंबून राहू नये.
त्या म्हणतात की, "बहुतांश लोकांना आहारात कठोर बदल करण्याची आवश्यकता नसते. आपले आतडे जर आधीपासूनच हेल्दी असेल, तर विनाकारण त्यासाठी ट्रेंडमध्ये असलेले पदार्थ खाण्याची गरज नसते. कारण, आतड्यांवरील अशी ट्रेंडी उत्पादनं सहसा फारसा फरक पाडणारी नसतात."
त्यामुळे, त्या लोकांना अशा ट्रेंड्सच्या मागे न धावण्याचा सल्ला देतात. आतडे निरोगी ठेवण्याचे काही सोपे मार्ग आहेत, असं त्या सांगतात.
त्या सांगतात की, "वनस्पती-आधारित अन्न जास्त खाल्ल्यानं आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच, फायबरचं सेवन वाढवणंदेखील फायदेशीर आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न कमी करणं देखील महत्त्वाचं ठरू शकतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











