हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी करारात नेमका कोणाचा विजय झाला?

हिज़्बुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाह आता खूप कमकुवत झाली आहे आणि संघटनेची पुन्हा उभारणी करायला खूप वेळ लागेल असं म्हटलं जात आहे.

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या इराणचं समर्थन करणाऱ्या अतिरेकी संघटनेत आणि इस्रायलमध्ये 27 नोव्हेंबरला झालेल्या शस्त्रसंधी कराराची सध्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या 13 महिन्यांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं.

ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलने गाझावर हल्ला केला तेव्हा हिजबुल्लाहनेही इस्रायलवर लेबनॉनमधून रॉकेटहल्ला सुरू केला होता. हिजबुल्लाह मोकळेपणाने हमासचं समर्थन करत होता.

“हमास आणि हिजबुल्लाह यांच्यातला संपर्क तोडणं हा इस्रायलचा विजयच म्हणावा लागेल. यासाठी इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटवून घ्यावी,” असं रावित हेच्ट लिहितात. ते हारेत्झ या इस्रायलमधल्या इंग्रजी वृतपत्राचे स्तंभलेखक आहेत.

“लेबनॉनसोबत झालेल्या करारानंतर हमास एकटं पडलं आहे. हिजबुल्लाहला या संपूर्ण युद्धातून बाजूला टाकलंय,” असं कराराची घोषणा करताना नेतन्याहू म्हणाले आहेत.

इस्रायलमधील माध्यमंं काय सांगतात?

हिजबुल्लाह आता कमकुवत झाली आहे असं इस्रायलमधली माध्यमं म्हणत आहेत. शिवाय, संघटनेची पुन्हा उभारणी करायलाही खूप वेळ लागेल. इस्रायलने संधी दिली तरच हिजबुल्लाहला आपली ताकद परत मिळवता येईल.

“धोरणात्मकदृष्ट्या हिजबुल्लाहला हार पत्करावी लागली असं म्हणता येत नाही. पण उत्तर सीमेवर सुरू असणाऱ्या युद्धात इस्रायलचा विजय नक्कीच झाला आहे,” असं इस्रायलच्या वल्ला या वेबसाइटचे राजकीय पत्रकार बराक रेवीड लिहितात.

हिजबुल्लाह नामशेष झाली नसली तरी कमजोर झाली आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

लेबनॉनच्या सीमेलगत इस्रायलमधे राहणाऱ्या लोकांना हिजबुल्लाह हळूहळू पुन्हा संघटनेची बांधणी करेल असं वाटतं. दक्षिण लेबनॉनमधल्या गावात आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न संघटना करेल अशी भीती त्यांच्या मनात आहे.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

सीमेच्या जवळचं किरयात शमोना या शहराच्या महापौरांनी 'इस्रायल हायोम' या दैनिकात एक लेख लिहिला आहे. “या शस्त्रसंधीनंतरही युद्ध थांबेल यावर मला शंका आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सेनेचं एक बफर झोन बनवायला हवं,” असं ते लिहितात.

हिजबुल्लाहसोबत झालेल्या शस्त्रसंधीनंतर गाझात सुरू असलेलं युद्ध आणि इस्रायली ओलिसांबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.

हिजबुल्लाहसोबत झालं ते गाझामध्ये का झालं नाही?

“लेबनॉनमध्ये केलं तेच गाझामध्ये का करत नाही या प्रश्नाचं उत्तर इस्रायली लोकांना देण्यात नेतन्याहू कमी पडत आहेत,” येडियोट ॲक्रोनॉट या दैनिकातच्या स्तंभलेखक सिमा कडमोन लिहितात.

“मुळातच त्यांना तसं करायचं नाही. नेतन्याहू गाझाऐवजी लेबनॉनला, हमासऐवजी हिजबुल्लाहला आणि ओलिसांना सोडवण्याऐवजी स्वतःच्या सत्तेला प्राधान्य देतात.”

हिज़्बुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जमीनदोस्त झालेली घरं पाहताना दक्षिण लेबनॉनमधून विस्थापित झालेले लोक.

हमास एकटं पडलं असल्याचा फायदा नेतन्याहू यांनी घेतला पाहिजे आणि अशाच प्रकारचा करार गाझातही करायला हवा. त्यामुळे काही ओलिसांना सोडवता येईल, असं हारेत्झ दैनिकाच्या एका संपादकीय लेखात लिहिलं होतं.

दुसरीकडे हिजबुल्लाहचं समर्थन करणारी माध्यमं हा करार म्हणजे त्यांचा विजय असल्याचं म्हणत आहेत.

अल मनार या वेबसाईटवरच्या एका बातमीत लिहिलंय, “हा लेबनॉनचा विजय आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलाचं भरपूर नुकसान झालं आहे. दक्षिण लेबनॉनमधलं खिआम या महत्त्वाच्या शहरावर ताबा मिळवणंही इस्रायलला जमलं नाही.”

''इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी भाषणात युद्धविरामाची घोषणा केली. यावरूनच इस्रायली सैन्य किती असहाय्य झालं आहे हे समजतं. युद्धात जिंकता येणार नाही हे इस्रायली सैन्यानं ओळखलं होतं,” असंही पुढे लिहिण्यात आलं आहे.

इराणचा कमकुवतपणा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अल अखबार या दुसऱ्या एका दैनिकानंही काहीसं असंच लिहिलं आहे.

या दैनिकाच्या पहिल्या पानावरची हेडलाईन आहे - अविचल विजय.

“जे काही करता येत होतं ते सगळं शत्रूंनी केलं. याही युद्धाचा अंत 2006 प्रमाणेच झालाय. तेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या 1701 या प्रस्तावावरून शस्त्रसंधी झाली होती. त्यातही हेच सारे नियम होते,” दैनिकात म्हटलं आहे.

“शत्रूला त्रास होऊ लागला तेव्हा शस्त्रसंधी लागू झाली. इस्रायलला प्रतिकाराचा अनुभव आलाय. हिजबुल्लाहने चांगला धडा शिकवला. जे साध्य करायचं होतं ते इस्रायलला करता आलं नाही. आपला विजय झाला. इस्रायलचा कमकुवतपणा आणि क्रूरता दोन्ही जगासमोर आलं,” हिजबुल्लाहची वेबसाईट अल-अहद यावरचा हा मजकूर.

इराणमधलं इंग्रजी वृत्तपत्र तेहरान टाइम्सने हिजबुल्लाहच्या प्रमुख रहे सय्यद हसन नसरल्लाह यांचा मुलगा सय्यद मोहम्मद मेहदी यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. शस्त्रसंधी म्हणजे हिजबुल्लाहचा विजय असल्याचं मेहदी यांचंही म्हणणं आहे. “हा आमच्या शौर्याचा आणि त्यागाचा विजय आहे. त्यांनी आमची घरं मोडली आणि लोक मारले पण शेवटी विजय आमचाच झाला,” असंही मेहदी म्हणालेत.

अनेक लोक इराणची बाजू कमकुवत पडल्यामुळे ही शस्त्रसंधी झाली असं मानतात. पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून भारतात वास्तव्यास असलेले अब्दुल बासित इराण बचावाची भूमिका घेतोय असं म्हणतात. इराण आता संघर्ष करण्याच्या मूडमध्ये नाही हेच या करारावरून दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे.

हिज़्बुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या 13 महिन्यांपासून लेबनॉनमध्ये इस्रायल विरुद्ध हिजबुल्लाह असं युद्ध सुरू होतं.

युट्यूबवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओत त्यांनी या प्रकरणाचं विश्लेषण केलं आहे. “अमेरिकेत ट्रम्प निवडून आल्यानंतर इराण बचावात्मक भूमिका घेत आहे. शस्त्रसंधीकडे जायला इराणनेच हिजबुल्लाहला सांगितलं असेल. नाहीतर इस्रायलने गाझामधले हल्ले बंद केल्याशिवाय युद्ध थांबवणार नसल्याचं आधी हिजबुल्लाहने म्हटलं होतं,” बासित म्हणाले.

हिज़्बुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हमासच्या ताब्यात असेलेल इस्रायली ओलिस अजूनही मुक्त झालेले नाहीत.

पण आता गोष्टी वेगाने बदलत आहेत असं त्यांना वाटतं. “ट्रम्प सत्तेवर येण्याआधी हिजबुल्लाहला बाजूला करावं अशी इराणची इच्छा होती. त्याला आत्ताच ट्रम्प यांच्याशी संघर्ष करायचा नाही. त्यामुळे युद्धविरामावर स्वाक्षरी करत युरोपशी असलेले संबंध व्यवस्थित करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

अमेरिकेतील सत्ता बदल आणि अणू चाचणी इराणला थांबवायची आहे. निदान ट्रम्पला न उसकवता ती पुढे ढकलता येतेय का यावर इराणचा भर आहे,” असं बासित म्हणाले.

“रशियाही युक्रेनसोबतच्या युद्धात गुंतलेला आहे. पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या व्यापार बंधनांमुळे रशियाचीही आर्थिक स्थिती दुर्बल झाली आहे. त्यातच चीनने इराणमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

त्यामुळे इराणला सध्या रशियाकडून मदत मिळणार नाही आणि त्याने युद्धात अडकून रहावं अशी चीनचीही इच्छा नाही.

चीन कधीही अशाप्रकारे कोणत्याही सैन्याला मदत करत नाही. अशातच ट्रम्पबातीत सावध राहण्याशिवाय इराणला पर्याय नाही,” असं अब्दुल बासित यांचं एकूण विश्लेषण आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)