खेळण्यातल्या बंदुकीने विमान 'हायजॅक' करणारे अपहरणकर्ते आमदार कसे बनले?

प्रतीकात्मक प्रतिमा

फोटो स्रोत, Bureau of Aircraft Accidents Archives

फोटो कॅप्शन, इंडियन एअरलाइन्स बोईंग 737-200
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

20 डिसेंबर 1978 च्या संध्याकाळी दोन तरुण इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 410 मधील 15 व्या रांगेतील आपल्या सीटवरून उठले आणि कॉकपिटच्या दिशेनं निघाले.

कोणत्याही प्रवाशानं त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही किंवा क्रू मेंबर्सपैकी कोणालाही यात काही वावगं वाटलं नाही.

त्यांना असं वाटलं तरी का असतं, कारण एका तरुणानं अत्यंत 'विनम्रपणे' कॉकपिटमध्ये जाण्याची विनंती केली होती.

126 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन कलकत्त्याहून (आताचं कोलकाता) लखनौमार्गे निघालेलं हे विमान 15 मिनिटांत दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरणार होतं, परंतु तेव्हाच परिस्थिती बदलली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या "विनम्र" तरुणाच्या विनंतीनंतर, क्रू मेंबर जीव्ही डे कॅप्टनला संदेश देण्यासाठी कॉकपिटमध्ये प्रवेश करणार तेव्हढ्यात एका तरुणानं इंदिरा ठाकरे नावाच्या एअर होस्टेसचा कोपर धरला आणि त्याचा दुसरा साथीदार कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला.

रिपोर्टनुसार, "कॉकपिटच्या मॅग्नेटिक दरवाजाचं ऑटोमॅटिक लॉक बंद होतं, त्यावर दोन तरुणांनी पूर्ण जोर लावला आणि दरवाजा उघडला मग ते आत शिरले."

तोपर्यंत प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना लक्षात आलं होतं की काहीतरी गडबड आहे.

काही मिनिटांतच विमानाच्या कॅप्टनचा आवाज आला, "आपलं अपहरण झालं आहे आणि विमान पाटण्याला जात आहे."

या घोषणेनंतर काही क्षणातच आणखी एक घोषणा आली, "आपण वाराणसीला चाललो आहोत."

'इंडिया टुडे'ने कॅप्टनच्या हवाल्यानं सांगितलं की, या घोषणांपूर्वी कॉकपिटमध्ये अपहरणकर्ते आणि वैमानिक यांच्यात बरीच बाचाबाची झाली होती.

कॅप्टनच्या मते, "त्या मूर्खांना (अपहरणकर्त्यांना) हे समजावून सांगणं कठीण होतं की उड्डाणाची एक मर्यादा असते ज्याला रेंज म्हणतात. आधी त्यांनी नेपाळला जाण्याची मागणी केली. जेव्हा मी त्यांना, विशेषत: त्या दोघांपैकी एकाला, जो वारंवार माझ्या कनपटीकडे पिस्तूल रोखत होता, सांगितलं की आपल्याकडं पुरेसं इंधन नाही, तेव्हा त्यांनी बांगलादेशला जाण्याची मागणी केली. मला वाटतं की ते शाळेत शिकलेले भूगोलाचे धडे विसरले होते."

मासिकानं म्हटल्यानुसार, नंतर सशस्त्र अपहरणकर्ते कॉकपिटमधून बाहेर पडले आणि त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अटक आणि मार्च 1977 च्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर सत्ताधारी जनता पक्षाच्या 'सूडाच्या भावनेचा' निषेध केला.

घटनेच्या फक्त एक दिवस आधी इंदिरा गांधींना अटक करण्यात आली होती.

इंदिरा गांधींची अटक

विल्यम बॉर्डर्स यांनी अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'साठी लिहिलं होतं की, लोकसभेनं सात दिवसांच्या वादविवादानंतर इंदिरा गांधींना सभागृहातून बहुमतानं निष्कासित केलं आणि त्यांना तुरुंगात पाठवलं.

माजी पंतप्रधानांनी ही कृती "सूडाच्या भावनेने आणि राजकीय हेतूने प्रेरित" असल्याचे वर्णन केले.

1975 मध्ये पंतप्रधान असताना, पुत्र संजय गांधी यांच्या नियंत्रणाखालील मारुती लिमिटेड या कंपनीची चौकशी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून माघार घ्यावी म्हणून त्यांचा छळ केल्याचा आरोप इंदिरा गांधींवर होता.

माजी पंतप्रधानांनी या कारवाईचं वर्णन 'सूड आणि राजकीय हेतूनं प्रेरित' असं केलं होतं.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1978 मध्ये इंदिरा गांधींना काही दिवसांसाठी अटक करण्यात आली होती.

"संसदेतील चर्चेदरम्यान इंदिरा गांधी सरकारच्या तुरुंगवास, सेन्सॉरशिप आणि हुकूमशाही राजवटीच्या धोरणांचा वारंवार उल्लेख करण्यात आला, परंतु त्यांनी माफी मागण्याचं आवाहन फेटाळून लावलं आणि आपल्या भाषणात म्हटलं की, त्यांना कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही."

'मी टॉयलेटला जातोय, गोळी मारली तरी चालेल'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विल्यम बॉर्डर्स लिहितात की, इंदिरा गांधींनी अधिवेशन संपल्यानंतर घरी किंवा 'रात्रीच्या शांततेत' अटक होण्यापेक्षा संसदेतूनच अटक होण्यावर होण्यावर भर दिला.

"तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर, पोलीस अधिकारी अटकेसाठी वॉरंट घेऊन त्यांच्याकडे आले. इंदिरा गांधी हसत हसत एका जाड लाकडी टेबलावर चढल्या आणि हनुवटीखाली हात जोडून नंतर त्या खाली. निघण्यापूर्वी त्यांनी एका जुन्या इंग्रजी गाण्यातील ओळी लिहिल्या, ज्या नंतर त्यांच्या एका समर्थकानं जमावासमोर वाचून दाखवल्या.

"मला निरोप देताना, माझ्या शुभेच्छांसाठी प्रार्थना करा

डोळ्यांतील अश्रूंनी नव्हे तर स्मित हास्यानं

मला एक असं स्मित द्या जे माझ्या अनुपस्थितीतील काळात माझ्यासोबत राहील."

"तुम्हाला हवं तर मला गोळी घाला, मी टॉयलेटला जात आहे."

इंदिरा गांधी यांच्या अटकेची बातमी पसरताच अनेक भागात निदर्शनं झाली. जोपर्यंत त्या तुरुंगात आहेत, तोपर्यंत निदर्शनं आणि आंदोलनं सुरूच राहतील, अशी धमकी काँग्रेसनं दिली.

मात्र, स्वतःला युवक काँग्रेसचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी इंदिरा गांधींच्या सुटकेसाठी संपूर्ण विमानाचंच अपहरण केलं. त्यानंतर या अपहरणकर्त्यांची ओळख 27 वर्षीय भोलानाथ पांडे आणि 28 वर्षीय देवेंद्र पांडे अशी झाली.

अपहरणकर्त्यांनी विमानात जाहीर केलं की ते 'गांधीवादी' आहेत आणि 'अहिंसेवर' विश्वास ठेवणारे आहेत. प्रवाशांना इजा करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंडिया टुडेनं लिहिलंय आहे की, असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा या दोन अपहरणकर्त्यांवर सहज नियंत्रित मिळवता आलं असतं, परंतु प्रवासी किंवा क्रू कडून असा कोणताही प्रयत्न केला गेला नाही.

एक वेळ अशी होती की अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना टॉयलेटचा वापर करण्यापासून रोखलं होतं. विमानात माजी कायदामंत्री ए. के. सेन देखील होते, जे टॉयलेटसाठी जास्त वेळ थांबू शकले नाहीत आणि मग ओरडले की, "तुम्हाला हवं असेल तर मला गोळी घाला, मी टॉयलेट जात आहे."

दरम्यान, विमान वाराणसीत उतरून धावपट्टीच्या एका कोपऱ्यात उभं राहिलं होतं.

अपहरणकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राम नरेश यादव यांच्याशी बोलण्याची मागणी केली. सुरुवातीला यादव यांनी बोलण्यास नकार दिला, परंतु नंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सूचनेनुसार ते वाराणसीला रवाना झाले.

अपहरणकर्त्यांनी विमानातून वायरलेसद्वारे स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्यांच्या चार मागण्या आहेत, त्यातील सर्वांत महत्त्वाची मागणी म्हणजे इंदिरा गांधींची बिनशर्त सुटका करणं ही आहे.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राम नरेश यादव आणि अपहरणकर्त्यांमधील चर्चा यादव यांनी स्वतः विमानात येऊन त्यांच्याशी बोलावं या मागणीनं सुरू झाली. याला प्रत्युत्तर देताना यादव यांनी विमानातील परदेशी नागरिक आणि महिला प्रवाशांची सुटका करण्याची अट घातली.

दरम्यान, एसके मोदी नावाच्या एका प्रवाशानं विमानाचा मागील दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली, आणि आत कोणालाही याचा काही सुगावा लागला नाही.

तत्कालीन पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री पुरुषोत्तम कौशिक यांनी 21 डिसेंबर रोजी लोकसभेच्या अधिवेशनात या घडामोडींची माहिती दिली.

ते म्हणाले, "एसके मोदी एका एअर होस्टेसच्या मदतीनं विमानातून पळून जाण्यात यशस्वी झाले. पळून गेल्यानंतर मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितलं की विमानात दोन अपहरणकर्ते आहेत, एकानं पांढरा पायजमा-कुर्ता आणि दुसरा पांढरा धोती-कुर्ता घातला आहे. अपहरणकर्त्यांकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापलेली पत्रकं देखील आहेत, ज्यात 'राष्ट्रीय नेत्या'च्या सुटकेची मागणी केली गेली आहे आणि त्यांच्या या कृतीची व्यापक प्रसिद्धी करण्याचं आवाहन केलं आहे."

"मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संभाषणात अपहरणकर्त्यांनी इंदिरा गांधींची त्वरित सुटका करावी, त्यांच्यावरील सर्व फौजदारी खटले मागे घ्यावेत, जनता पक्षाच्या सरकारनं राजीनामा द्यावा आणि शेवटी विमान लखनौला परत जावं आणि त्यांना पत्रकारांना भेटण्याची परवानगी द्यावी."

"सर्व प्रवाशांना सोडल्यास सरकारी विमानानं अपहरणकर्त्यांना लखनौला घेऊन जाण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला ही ऑफर नाकारली आणि विमानात इंधन भरण्याची मागणी केली. केंद्रीय समितीनं वाराणसीत वाटाघाटी करणाऱ्यांना विमानात इंधन भरू नये आणि वाटाघाटी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले."

वर्तमानपत्रातील अपहरणाची बातमी

फोटो स्रोत, Screengrab/Indian Express

फोटो कॅप्शन, लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर इंदिरा गांधींना तुरुंगात पाठविण्यात आले. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने ठळकपणे प्रसिद्ध केली होती.

इंडिया टुडेनुसार, रात्रभर वाटाघाटी सुरू राहिल्या आणि तत्कालीन पंतप्रधान देसाई यांच्या खास सूचनांनुसार तत्कालीन मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनी अपहरणकर्त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करण्यास नकार देणं चालूच ठेवलं.

"सकाळी सहा वाजता, प्रवाशांनी तक्रार केली की विमानाच्या आत गुदमरतंय, जे आता असह्य झालं आहे, त्या वेळी अपहरणकर्त्यांनी मागील दरवाजे उघडण्याची परवानगी दिली."

"याच दरम्यान, कॅप्टननं आपत्कालीन स्लाइडचा रिलीझ लिव्हर खेचला. दरवाजातून स्लाइड खाली पडताच काही प्रवासी पळाले आणि धावपट्टीवर उतरले आणि थोड्याच वेळात विमानातील निम्मे प्रवासी त्यांच्या मागे उतरले आणि अशा प्रकारे सुमारे 60 प्रवासी खाली उतरले होते."

"त्याच वेळी एका अपहरणकर्त्यांपैकी एकाचे वडील वाराणसी विमानतळावर पोहोचले आणि वायरलेसद्वारे आपल्या मुलाशी बोलले. वडिलांचा आवाज ऐकून दोन्ही तरुण इंदिरा गांधींच्या बाजूनं घोषणा देत विमानातून बाहेर आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं."

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, अपहरणाचं नाटक 13 तास चाललं. अपहरणकर्त्यांनी "दोन खेळण्यातील पिस्तूल आणि हातगोळ्यांसारखे दिसणारा एक क्रिकेटचा चेंडू जो काळ्या कापडात गुंडाळलेला होता तो अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला".

"ते शांतपणे खाली उतरले आणि 'इंदिरा गांधी जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं."

या कारवाईसाठी काँग्रेस नेत्यांकडून पैसे मिळाल्याचा दावा या दोघांनी केला होता. त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दोन पदाधिकाऱ्यांची नावं सांगितली ज्यांनी त्यांना अनुक्रमे 400 आणि 200 रुपये दिले होते. याच रकमेतून लखनौ ते दिल्ली विमानाची तिकिटं खरेदी करण्यासाठी त्यांनी 350 रुपये खर्च केले होते.

या घटनेनंतर काही दिवसांतच इंदिरा गांधींची तुरुंगातून सुटका झाली, तरी विमान अपहरण प्रकरणात या दोन्ही तरुणांना लखनौ तुरुंगात नऊ महिने आणि 28 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.

काही महिन्यांनंतर इंदिरा गांधी पुन्हा केंद्रात सत्तेवर आल्या आणि भोलानाथ आणि देवेंद्र पांडे या अपहरणकर्त्यांवरील खटले मागे घेण्यात आले.

मौलश्री सेठ यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलं होतं की, काँग्रेसनं बलिया जिल्ह्यातील दोआबा विधानसभा मतदारसंघातून भोलानाथ यांना तिकीट दिलं. 1980 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी भोलानाथ पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1989 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच जागेवरून विजय मिळविला, परंतु त्यानंतर ते कोणतीही निवडणूक जिंकू शकले नाहीत, परंतु, काँग्रेसनं त्यांना पक्षात अनेक पदं दिली.

देवेंद्र पांडे हे काँग्रेसच्या तिकिटावर जयसिंहपूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे उत्तर प्रदेश राज्य सरचिटणीस ही होते.

काँग्रेस नेते काय म्हणाले?

'इंडियन एअरपोर्ट्स (शॉकिंग ग्राउंड रिअ‍ॅलिटीज)' या पुस्तकात कृष्णा आर. वाधवानी यांनी देवेंद्रनाथ पांडे यांच्या विधानाचा हवाला दिला आहे, "हा वेडेपणा होता, गांधी कुटुंबाप्रती वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत समर्पण होतं"

ते पुढे सांगतात, "त्या काळात अपहरण हा गुन्हा मानला जात नव्हता."

ए. सूर्यप्रकाश यांनी आपल्या एका संशोधन लेखात लोकसभेतील चर्चेचा हवाला देत लिहिलं आहे की, 23 डिसेंबर रोजी लोकसभेत या घटनेवर जोरदार चर्चा झाली.

"इतर पक्षांच्या खासदारांनी अपहरणाचा निषेध केला, आर. वेंकटरामन (जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले) आणि वसंत साठे यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि अपहरणाचं वर्णन विनोद म्हणून केलं."

वर्तमानपत्रातील अपहरणा प्रकरणावरची बातमी

फोटो स्रोत, ScreenGrab/ Indian Express

फोटो कॅप्शन, 13 तासांच्या अपहरण नाट्यानंतर अपहरणकर्त्यांनी शेवटी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं.

वेंकटरामन यांच्या मते, "जेव्हा ही बातमी आली तेव्हा देशात संताप व्यक्त करण्यात आला, परंतु नंतर असं समजलं की ते फक्त एक टॉय पिस्तूल आणि क्रिकेटचा चेंडू होता, म्हणून तो वर्षातला विनोद बनला."

सूर्यप्रकाश यांच्या मते, वसंत साठे म्हणाले की, ते अपहरणकर्त्यांच्या कृत्याचा बचाव करत नाहीत, परंतु त्याला अपहरण म्हणावं की 'स्काय जॉकिंग' म्हणावं हे त्यांना समजत नाही. त्यांच्या मते, क्रिकेटचा चेंडू आणि खेळण्यातील पिस्तूल वापरल्यानं तरुणांची ही खोडकर चेष्टा होती.

ते लिहितात की, तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काँग्रेस सदस्यांना अपहरण क्षुल्लक म्हटल्याबद्दल फटकारलं होतं.

ते म्हणाले की, जर वैमानिक घाबरले असते तर मोठा अपघात झाला असता. ते खेळण्यातलं पिस्तूल असो की क्रिकेटचा चेंडू, वैमानिक धोका पत्करू शकत नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)