मोस्ट वाँटेड मेहुल चोकसीचा बेल्जियममध्ये आश्रय, भारतासाठी कठीण का ठरू शकते प्रत्यर्पण?

फोटो स्रोत, Getty Images
पंजाब नॅशनल बँकेचा 2018 मधील घोटाळा उघडकीस आल्यापासून भारत सरकार मेहुल चोकसी आणि त्यांचा पुतण्या नीरव मोदी यांच्या शोधात आहे.
एकीकडे नीरव मोदी लंडनला पोलीस अटकेत असून त्यांना भारतात आणण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून प्रयत्न चालले आहे.
त्यात आता मेहुल चोकसीनी बेल्जियममध्ये आश्रय घेतल्यानं त्यांच्या प्रत्यार्पणाचा मार्गही भारतासाठी खडतर झाल्याचं म्हटलं जात आहे.
खोट्या कागदपत्रांचा आधार
काही दिवसांपूर्वी मेहुल चोकसी बेल्जियममध्ये असल्याचा दावा कॅरिबियन भागाचं वार्तांकन करणाऱ्या असोसिएटेड टाइम्स या वेबसाईटने केला होता.
"मेहुल चोकसी त्यांची पत्नी प्रीती यांच्यासोबत बेल्जियमच्या अंँटवर्प प्रांतात रहात आहेत. त्यांनी देशाचं एफ रेसिडेन्सी कार्डही मिळवले आहे," असं असोसिएटेड टाइम्सच्या वार्तांकनात लिहिलं होतं.
मेहुल यांच्या पत्नी प्रीती बेल्जियमच्या नागरीक असून त्यांच्या मदतीनेच मेहुल यांनी 15 नोव्हेंबर 2023 ला बेल्जियमचा व्हिसा मिळवला असंही असोसिएटेड टाइम्सने म्हटलंय.
भारतात प्रत्यर्पण केलं जाईल या भीतीने मेहुल यांनी खोटी कागदपत्र दाखवून एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवल्याचंही असोसिएटेड टाइम्सने सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे.
भारत आणि अँटिग्वा देशाच्या नागरिकत्वाची माहितीही मेहुल चोकसी यांनी लपवली.


अँटिग्वा ते बेल्जियम व्हाया डोमिनिक
पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघडकीस यायच्या दोन महिने आधीच चोकसी यांनी कॅरिबिया भागातल्या अँटिग्वा आणि बार्बुडा या देशाचं नागरिकत्व घेतलं होतं. गुंतवणूक कार्यक्रमातंर्गत या देशात नागरिकत्व घेतलं जाऊ शकतं.
2018 मध्ये घोटाळा उघडकीस येण्याच्या काहीच दिवस आधी चोकसी भारतातून फरार होऊन अँटिग्वा आणि बार्बुडाच्या बेटांवर गेले होते.
बेल्जियमप्रमाणेच अँटिग्वासोबतही भारताचा प्रत्यार्पण करार झालेला आहे. त्यामुळे त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पण आरोग्याचं कारण पुढे करत ते प्रत्यार्पण लांबवत होते.
त्यानंतर 2021 ला त्यांनी अचानक अँटिग्वा सोडल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. ते डोमिनिका या देशात सापडले.

फोटो स्रोत, Getty Images
देशात बेकायदेशीरपणे घुसल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. तिथल्या खटल्यातही त्यांनी वैद्यकीय कारण पुढे केलं. त्यावरून डोमिनिकाच्या न्यायालयाने त्यांना अँटिग्वा आणि बार्बुडाला परत जाण्याची परवानगी दिली.
त्यांच्या अपहरणाचे प्रयत्न झाले, असे आरोपही त्यांनी केले होते. त्यात भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ते मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं चोकसी सांगत होते.
नंतर दोन आठवड्यांपूर्वी पुन्हा चोकसी वैद्यकीय उपचारांसाठी गेले आहेत असं अँटिग्वा आणि बार्बुडा देशाचे परराष्ट्र मंत्री ई. पी. चेट ग्रीन यांनी स्पष्ट केलं. देश सोडून गेले असले तरीही त्यांच्याकडे अँटिग्वा देशाचं नागरिकत्व आहे असंही ते म्हणाले. त्यानंतर ते बेल्जियममध्ये असल्याचं समोर आलं.
बेल्जियम सरकारने काय म्हटलं?
बेल्जियमच्या फेडरल पब्लिक सर्व्हिस (एफपीएस) परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते आणि सोशल मीडिया आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डेव्हिड जोर्डेन्स यांना त्यांच्या देशात मेहुल चोकसीच्या संभाव्य उपस्थितीबाबत विचारण्यात आले, अशी माहिती एनएआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
जोर्डेन्स यांनी उत्तर दिलं, "एफपीएस परराष्ट्र विभागाला या प्रकरणाची माहिती आहे असं मी खात्रीनं सांगू शकतो. या प्रकरणाला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण आम्ही कोणत्याही वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करत नाही. शिवाय, हे प्रकरण फेडरल पब्लिक सर्व्हिस न्याय विभागाच्या कार्यक्षेत्रात येतं."
या प्रकरणातील घटनाक्रमावर एफपीएस परराष्ट्र विभाग सक्रिय पद्धतीने लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एएनआयच्या हवाल्यानुसार, जॉर्डन यांच्या बोलण्यावरून चोकसी बेल्जियममध्ये नेमके कुठे आहेत हे स्पष्ट होत नाही. मात्र, बेल्जियमचे अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेऊन असल्याने प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती भारताला दिली जाईल.
परत आणणं अवघड का?
मेहुल चोकसी यांनी ल्युकीमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर झाला असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी बेल्जियममधल्याच एका डॉक्टरचं सर्टिफिकेटही सादर केलं. त्यात चोकसी प्रवास करण्यास 100 टक्के असमर्थ असल्याचं म्हटलंय.
कॅन्सरच्या उपचारासाठी बेल्जियमवरून स्वित्झर्लंडला एका प्रसिद्ध रुग्णालयात जाण्याचा चोकसी यांचा बेत होता असं टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं होतं. त्या आधारावरच मानवाधिकाराची कारणं देऊन प्रत्यर्पणापासून स्वतःला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पण मेहुल चोकसी सतत देश बदलत राहिले तर त्यांचा ठावठिकाणा लागणं अवघड होईल आणि अधिकारीक कारवाई आणखी अवघड होईल.

फोटो स्रोत, Getty Images
बेल्जियमचं नागरिकत्व मिळाल्याने मेहुल चोकसी यांना युरोपातील देशांत बिनधास्तपणे कुठेही येण्या-जाण्याचं स्वातंत्र्य मिळेल. एखाद्या देशात ते असल्याची माहिती मिळताच प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली तरी, ते लगेचच देश बदलतील.
एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चोकसी यांना भारतातही चांगल्या आरोग्य व्यवस्था आणि उपचार मिळू शकतात असं इकोनॉमिक टाइम्सने म्हटलंय.
दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी बेल्जियमला मेहुल चोकसींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन केलं आहे, असं असोसिएटेड टाईम्स ने म्हटलं आहे. मात्र, यासंबंधी नवी दिल्लीतल्या अधिकाऱ्यांकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मोठ्या घोटाळ्यातील आरोपी
पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा 2018 च्या सुरुवातीच्या दिवसात उघडकीस आला होता. त्यात नीरव मोदी यांच्या पत्नी एमी, त्यांचे भाऊ विशाल आणि काका मेहुल चोकसी असे प्रमुख आरोपी आहेत.
या सगळ्यांनी मिळून बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कट रचला, खोटी शपथपत्र सादर केली आणि बँकेचं नुकसान केलं असे आरोप आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
हा भारतातला सर्वात मोठा बँक घोटाळा होता. सीबीआय आणि ईडी या प्रकरणी सध्या चोकसी यांचा शोध घेत आहेत.
लंडनच्या जेलमधे कैदेत असलेल्या नीरव मोदींचा जामिनासाठीचा अर्ज अनेकदा रद्द झाला आहे. भारतात प्रत्यर्पण करण्याविरोधात ते कायदेशीर लढाई लढत आहेत.
काय आहे पंजाब नेशनल बँक घोटाळा?
या सगळ्या आरोपींनी मिळून बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कट रचला आणि बँकेचं नुकसान केलं असे आरोप आहेत.
2018 च्या जानेवारी महिन्यात पंजाब नॅशनल बँकेने पहिल्यांदा या सगळ्यांविरोधात तक्रार केली होती. त्यात त्यांनी 280 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
फेब्रुवारी 14 ला चौकशी पूर्ण झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने या घोटाळ्याची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिली.

फोटो स्रोत, Getty Images
घोटाळा उघडकीस यायच्या दोन महिने आधी 2017 लाच चोकसी यांनी कॅरिबिया भागातल्या अँटिग्वा आणि बार्बुडा या देशाचं नागरिकत्व घेतलं होतं. गुंतवणूक कार्यक्रमातंर्गत या देशात नागरिकत्व घेतलं जाऊ शकतं.
अँटिग्वा सोडल्यानंतर 2021 मध्ये चोकसी यांना डोमिनिकामध्ये पकडण्यात आलं होतं अशा बातम्या आल्या होत्या. पण वैद्यकीय कारणावरून डोमिनिकाच्या न्यायालयाने त्यांना अँटिग्वा आणि बार्बुडाला परत जाण्याची परवानगी दिली.
नीरव मोदीही देश सोडून फरार झाले. 2021 मध्ये त्यांना लंडनमधे अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तिथल्या जेलमध्ये आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं सरकार सांगत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











