नखांचा रंग पांढरा, पिवळा किंवा निळा पडत असेल तर...

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखं

नखांची निगा राखणे हे ब्युटी वा नेल सलॉनला जाण्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचे आहे. शरीराचा हा अवयव तुमच्या आरोग्याविषयीचे संकेत देतो आणि अनेक आरोग्य समस्यांची लक्षणं वेळेआधीच दर्शवतो.

म्हणूनच नखांचा रंग आणि त्यात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नखांवर डाग पडणे किंवा इतर काही होणे हे कदाचित एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.

जेव्हा असे होते तेव्हा त्वचारोगतज्ज्ञाला दाखविण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून रक्ताची तपासणी करून आणि इतर प्रकारे डॉक्टर त्यांच्या रुग्णांची परिस्थिती समजून घेऊ शकतात. स्थिती गंभीर आहे असे जाणवले तर विशेषज्ञ बायोप्सी करण्यास सांगू शकतात.

असेही काही रोग असतात जे आपल्या शरीराच्या एका वा एकाहून अधिक अवयवांवर परिणाम करतात, मग तो आजार हाताला होऊ दे वा पायाला.

आरोग्याच्या बहुतेक समस्या मूत्रपिंड, त्वचा, यकृत, इंडस्रीन (अंतस्त्रावी ग्रंथी), पोषण आणि रोगप्रतिकारक यंत्रणेशी संबंधित असते.

नखांमध्ये बदल झाला तर ही आरोग्याची गंभीर समस्या असतेच असे नाही. काही वेळा हा बदल सामान्यही असू शकतो.

त्वचारोगतज्ज्ञ वलेरिया जॅनेला फ्रेंझन म्हणतात, "पायांच्या नखांची निगा कमी राखली जाते, आणि अनेकदा त्यात जास्त समस्या असतात. उदाहरणार्थ- ही नखं पिवळी पडू लागतात आणि जाड होऊ लागतात.

आम्ही आता असे काही बदल सांगणार आहोत, जे आगामी समस्यांचा संकेत देतात आणि ज्यांच्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

पांढरी नखं

नखांमध्ये काही असामान्य बदल होत आहे, असे वाटले तर सर्वात आधी त्यांच्या रंगावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

नखांचा रंग पांढरा आहे, असे वाटले तर हे मायकॉसिस, सोरायसिस, न्यूमोनिया किंवा हृदयाविकाराचेही लक्षण असू शकते.

पोषक घटकांची कमतरता, आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी असणे यामुळेही ही स्थिती उद्भवू शकते.

त्वचारोगतज्ज्ञ ज्युलियाना पिक्वेट म्हणतात, "नखांचा रंग निस्तेज होऊ लागला तर हे अॅनिमियाचे (रक्तक्षय) लक्षण असू शकते. रक्तात लोह कमी प्रमाणात असेल तर नखांचा आकार चमच्यासारखा होतो आणि ती ठिसूळ होऊ शकतात."

ल्यूकोनिकिया नावाचाही एक प्रकार आहे. यात नखांवर पांढऱ्या रंगाचे चट्टे पडू लागतात. पण त्यामुळे कसल्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि शरीरात बदल झाल्याचेही हे लक्षण नसते.

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखं

अशा प्रकारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर बहुधा रुग्णांच्या समस्येचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतात.

जर तुमच्या नखांचा रंग पांढरा होऊ लागला आहे तर त्वचारोगतज्ज्ञांकडे जावे आणि त्यांनी वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितली तर ती अवश्य करावी, जेणेकरून पुढे एखाद्या विशेषज्ञाची गरज लागली तर त्यांना संपर्क केला जाऊ शकतो.

पिवळी नखे

नखे पिवळी होणे अनुवांशिकसुद्धा असू शकते किंवा वाढत्या वयानुसार नखे पिवळी होऊ शकतात. अशा वेळी नखे जाड दिसू लागतात आणि त्यांचा पिवळेपणाही जाणवण्याइतका असतो.

फंगल इन्फेक्शनमुळेही असे होऊ शकते. त्याचप्रमाणे काही गंभीर प्रकरणांमध्ये हे सोरायसिस, एचआयव्ही आणि मूत्रपिंडांच्या आजाराची लक्षण असू शकते.

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ध्रूमपान हे आरोग्यासाठी हानीकारक आहे.

ज्या व्यक्ती जास्त धूम्रपान करतात त्यांच्या नखांचा सिगरेटशी थेट संपर्क आल्याने ती पिवळी दिसू लागतात.

अशा प्रकरणांमध्ये अंगठा आणि तर्जनीच्या नखांचा रंग अधिक पिवळा दिसतो.

नखांवर पांढरे डाग

त्वचारोगतज्ज्ञ याला पिटिंग असेही म्हणतात. नखांवर हे छोट्या छोट्या ठिपक्यांसारखे दिसतात. हे ठिपके बहुधा एकाच नखावर दिसतात.

या ठिपक्यांचा संबंध एटॉपिक डर्माटायटिस (एक प्रकारचा एक्झिमा), सोरायसिस किंवा एखादा त्वचाविकार किंवा केसांच्या समस्येशी असू शकतो.

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखं

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाओलोमधील त्वचाविकारतज्ज्ञ ज्युलियाना टोमा म्हणतात, "जर नखांवर ठळक पांढरे डाग स्पष्टपणे दिसत असतील तर त्याचा संबंध अॅलेपेशिया एरियाटा (अचानक केसगळती) या विकाराशी असू शकतो. अशा वेळी तुम्हाला केसांच्या समस्येवर उपचार करून घेतले पाहिजेत.

क्वचित काही वेळा हे सिफलिस नावाच्या एका लैंगिक संसर्गाचेही लक्षण असू शकते.

निळ्या रंगाची नखे

हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. एखाद्या विशिष्ट औषधामुळे नखांचा रंग निळा होऊ शकतो.

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखं

मुरुम किंवा मलेरियाच्या औषधांचा वापर करणाऱ्या लोकांच्या नखांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.

असे झाल्यास, एखादे विशिष्ट औषध थांबवावे का किंवा उपचार बदलण्याची आवश्यकता आहे का, याचा विचार डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे.

नखांना वारंवार फंगल इन्फेक्शन होणे

मायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे होतो आणि उपचार थांबवले तर तो पुन्हा होतो. यावर नीट लक्ष ठेवले नाही तर तो वारंवार होतो.

पायांच्या नखांवर बहुधा हा प्रकार होतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, उपचार सुरू केल्यानंतर तो किमान सहा महिने तरी नियमित घेतला पाहिजे.

हातावर फंगल इन्फेक्शन झाले तर तीन-चार महिने उपचार घेतले पाहिजेत. रुग्णाने वेळेवर औषधे घेतली पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढची पावले उचलली पाहिजेत.

नखं, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखं

त्याचप्रमाणे घट्ट बुट, स्विमिंग पूल किंवा सोना बाथ अशा संसर्ग करू शकणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

नखांवर रेषा दिसणे

त्यांना 'ब्योज लाइन्स' असेही म्हणतात. नखांवर आडव्या रेषांसारख्या या रेषा दिसतात.

खूप ताप आल्यानंतर घेतलेली औषधे किंवा केमोथेरपीनंतर अशा प्रकारच्या रेषा दिसतात.

या रेषा गडद रंगाच्या असतात किंवा एकाच बोटावर दिसून येतात तेव्हा हे मेलानोमाचे लक्षण असू शकते.

मेलानोमा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे.

नखांमध्ये शुष्कपणा येणे

विशेषज्ञांनुसार नखे एखाद्या रसायनाच्या संपर्कात आली तर नखे तुटण्याची व गळून पडण्यापर्यंत सुखतात. असे असेल तर शरीराच्या त्या भागात डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वगैरे लावून ओलावा टिकवून ठेवला गेला पाहिजे.

आहारात बायोटिन (बी7) आणि दुसऱ्या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे नखे कमकुवत होऊ शकतात. शाकाहारी व्यक्तींनी बी१२ जीवनसत्व आणि दुसरे पोषक घटक असलेला आहार पुरेसा घेतला तर नखे तुटण्यापासून वा गळण्यापासून बचाव होऊ शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)