कोव्हिड मृत्यूंची जगभरातली संख्या अधिकृत आकड्यापेक्षा तिप्पट असण्याची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजीटल हेल्थ एडिटर
कोव्हिडची जागतिक साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रोगाने मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा हा नोंद झालेल्या आकडेवारीच्या तिप्पट असण्याचा अंदाज अभ्यासकांनी नोंदवलाय. कोव्हिडच्या मृत्यूंचा आकडा 1 कोटी 80 लाखांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे.
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड 19ची जागतिक साथ - Pandemic असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याच्या दोन वर्षांनर हा अहवाल प्रसिद्ध झालाय.
यातले काही मृत्यू हे कोव्हिडच्या विषाणूमुळे झाल्याचं तर काहींचा संसर्गाशी संबंध नसल्याचं या संशोधनादरम्यान आढळलं.
आधीपासूनच हृदय किंवा फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्यांची तब्येत कोव्हिड झाल्यानंतर आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचं कारण या मृत्यूंमागे असण्याची शक्यता आहे.
कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही अधिकृत नोंद झालेल्या मृत्यूच्या तिप्पट असल्याचं निरीक्षण संशोधकांनी नुकत्याच एका अहवालात नोंदवलं आहे. हा आकडा 1 कोटी 80 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता या अहवालात मांडण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिडच्या साथीची घोषणा केल्यानंतर दोन वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
हा अहवाल तयार करण्यासाठी अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील कोविड-19 एक्सेस मॉरटॅलिटी टीमने (Excess Morality Team) जवळपास 191 देशांचा अभ्यास केला. कोव्हिडच्या काळात झालेल्या मृत्यूंचा नेमका आकडा मिळवणे हा या अभ्यासाचा हेतू होता.
आता संशोधकांना हा अभ्यास करताना, काही मृत्यू हे कोव्हिडच्या विषाणूमुळे तर काही मृत्यू हे या संसर्गाशी संबंधित असल्याचे आढळले.
हा संसर्ग कोणता? तर कोव्हिड येण्यापूर्वी ही लोकांना हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार होतेच. त्यात पुन्हा कोव्हिड आल्यानंतर याच लक्षणांमुळे स्थिती आणखीनच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली.

फोटो स्रोत, Getty Images
हा अहवाल तयार करण्यासाठी संशोधकांनी अतिरिक्त मृत्यदर हे एकक मानलं. म्हणजे कोव्हिड येण्यापूर्वी आणि कोव्हिड आल्यानंतरच्या वर्षांची तुलना करण्यात आली. या तुलनेत कोव्हिडच्या आधीच्या वर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेले आणि कोव्हिड आल्यानंतरच्या वर्षात मृत्युमुखी पडलेले लोक अशी तुलना केली असता जी आकडेवारी मिळाली ती अतिरिक्त मृत्यूदराची आकडेवारी होती.
आता ही तुलना करण्यासाठी लागणारा डेटा संशोधकांनी त्या त्या देशांच्या सरकारी वेबसाइट असतील, जागतिक मृत्यूचा डेटाबेस असेल किंवा युरोपियन सांख्यिकी कार्यालय असेल, इथून गोळा केला.
ज्यावेळेस संशोधकांनी या मृत्यूदराची तुलना करायला सुरुवात केली, तेव्हा देशानुसार त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशानुसार मृत्यूचे आकडे वरखाली होतं होते. या अहवालात 100,000 लोकांमागे 120 लोकांचे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
म्हणजेच, 2020 च्या सुरुवातीपासून ते 2021 च्या शेवटापर्यंत अशा या दोन वर्षाच्या कालावधीत कोव्हिडमुळे सुमारे 1 कोटी 82 लाख लोकांचे मृत्यू झाले. आणि प्रत्यक्षात मात्र 5.9 दशलक्षच्या आसपास मृत्यूंची नोंद झाली आहे. म्हणजेच अधिकृत आकडेवारीच्या तिप्पट मृत्यू झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवल आहे.
अतिरिक्त मृत्यूचे अंदाज हे आठवडा किंवा मग महिनाभरासाठी न बांधता ते संपूर्ण अभ्यासाच्या कालावधीसाठी बांधण्यात आले आहेत. कारण कोव्हिडमुळे झालेले जे मृत्यू आहेत त्यांचा येणारा डेटा, त्याचे अपडेट होणारे अहवाल, या अहवालात होणारी दिरंगाई आणि विसंगती यामुळे अंदाज मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण होते.
द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, लॅटिन अमेरिका, युरोप आणि सब-सहारा आफ्रिकेतील कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हा मृत्यूदर सर्वाधिक होता. तेच इटली आणि अमेरिकेच्या उच्च-उत्पन्न असलेल्या भागांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण बरंच जास्त होतं.
मृत्यूदर सर्वाधिक जास्त असलेले पाच देश खालीलप्रमाणे,
1. बोलिव्हिया
2. बल्गेरिया
3. इस्वातीनी
4. नॉर्थ मॅसेडोनिया
5. लेसोथो
सर्वात कमी मृत्यूदर असलेले पाच देश होते,
1. आइसलँड
2. ऑस्ट्रेलिया
3. सिंगापूर
4. न्युझीलँड
5. तैवान
ब्रिटनमध्ये 2020 आणि 2021 मध्ये कोव्हिड संबंधित मृत्यूंची अधिकृत नोंद ही 173,000 इतकी होती. ज्यामध्ये प्रति 100,000 लोकांमागे 130 लोकांचा मृत्यू झाला होता.
इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे प्रमुख लेखक डॉ हैडोंग वांग सांगतात, "कोव्हिडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची खरी आकडेवारी समजून घेतल्यास सार्वजनिक आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आखणी करता येऊ शकते.
जास्त लोक मृत्युमुखी पडण्याचं कोव्हिड हेच एक थेट कारण असावं. असा अंदाज तरी स्वीडन आणि नेदरलँड्ससह अनेक देशात झालेल्या अभ्यासावरून दिसून येतो. मात्र हे म्हणण्यासाठी सध्या आमच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत.
मात्र कोव्हिडमुळे नेमके किती मृत्यू झाले आणि कोव्हिडच्या अप्रत्यक्ष परिणामामुळे किती मृत्यू झाले हे पुढील संशोधनामुळे समजायला निश्चितच मदत होईल."
कोव्हिडवर आलेली नवीन उपचार पद्धती आणि लस आणि यामुळे हा अतिरिक्त मृत्युदर कमी होईल असं संशोधकांच मतं आहे. मात्र कोव्हिडची साथ अजूनही संपली नसल्याने या विषाणूचे नवीन, धोकादायक स्ट्रेन तयार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं ही मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








