पत्रकार जमाल खाशोग्जी हत्येप्रकरणी संशयिताला फ्रान्समध्ये अटक

फोटो स्रोत, Reuters
पत्रकार जमाल खाशोग्जी हत्येप्रकरणी फ्रान्समध्ये सौदी अरेबियाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
फ्रान्समधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संशयिताचं नाव खालिद एध अल ओतैबी असं आहे. मंगळवारी चार्ल्स डी गॉल विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.
वाँटेड लिस्टमधील 26 जणांच्या यादीत खालीदचं नाव आहे. खाशोग्जी हत्येसंदर्भात टर्कीने ही यादी तयार केली होती.
आरटीएस रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार, 33 वर्षीय खालीदने सौदी अरेबियाचे शाही सुरक्षारक्षक म्हणून काम केलं आहे. ते स्वत:च्या नावानेच प्रवास करत होते. अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
मोहम्मद बिन सलमान यांच्या सौदी सरकारचे प्रखर टीकाकार म्हणून ओळखले जाणारे खाशोग्जी यांची 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या झाली होती. अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्ट साठी ते लिखाण करत असत.
सौदी अरेबियाच्या एजंट्सचं पथक त्यांना मायदेशी आणण्यासाठी गेलं होतं. या मोहिमेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं सौदी अरेबियाने म्हटलं होतं.
दुसरीकडे सौदीतील उच्चपदस्थांच्या आदेशानुसार एजंट्सनी कारवाई केली असं टर्कीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
खाशोग्जी यांच्या हत्येचं प्रकरण आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या प्रतिमेला याप्रकरणामुळे धक्का पोहोचला. सौदी अरेबियाच्या एका न्यायालयाने 2019 मध्ये खाशोग्जी यांच्या हत्येप्रकरणी आठ लोकांना दोषी ठरवलं होतं. यापैकी पाच लोकांना थेट हत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मात्र नंतर ही शिक्षा 20 वर्षांच्या कारावासात बदलण्यात आली. अपराध लपवण्यासंदर्भात अन्य तिघांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधीने सौदीतील सुनावणी फेटाळून लावली होती.
खाशोग्जी यांची हत्या कशी झाली होती?
59 वर्षीय खाशोग्जी ऑक्टोबर 2018 मध्ये इस्तंबूलस्थित सौदीच्या दूतावासात वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठी गेले होते. या कागदपत्रांच्या आधारे ते टर्कीची प्रेयसी हतीजे जेगिंग्जशी लग्न करू शकणार होते.
क्राऊन प्रिन्स यांचे बंधू प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी खाशोग्जी यांना सौदी दूतावासात जाणं सुरक्षित आहे असं सांगितलं होतं असं मानलं जातं.
प्रिन्स खालिद त्यावेळी अमेरिकेत सौदीचे राजदूत होते. मात्र खाशोग्जी यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क झाल्याचं प्रिन्स खालीद यांनी नाकारलं आहे.

फोटो स्रोत, AFP
सौदी अरेबियाच्या नुसार खाशोग्जी यांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देण्यात आले. ड्रग्जच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. सौदी दूतावासाच्या बाहेर एक स्थानिक माणसाला हे सोपवण्यात आलं. दरम्यान खाशोग्जी यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.
टर्कीच्या गुप्तचर विभागाने हत्याकांडादरम्यानची ऑडियो क्लिप मिळाल्याचा दावा केला होता. टर्कीने ही क्लिप सार्वजनिक केली होती.
सुरुवातीला ते बपत्ता असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांचा कसून शोध घेतला जाऊ लागला.
मात्र नंतर त्यांची हत्या झाल्याचा दाट संशय जिथे हा दूतावास आहे, त्या टर्कीच्या सरकारने व्यक्त केला होता. त्यानंतर झालेल्या तपासाअंती सौदीच्या काही एजंट्सनी त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह अॅसिडमध्ये टाकून संपवल्याचा खुलासा टर्कीच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
सौदीचे सरकारी वकिलांनी सांगितलं की त्यांची हत्या म्हणजे काही 'गुन्हगारांनी केलेलं ऑपरेशन' होतं. याप्रकरणी त्यांनी 11 लोकांविरुद्ध खटला भरला होता.
संयुक्त राष्ट्राच्या एका तज्ज्ञांच्या मते ही "न्यायबाह्य हत्या" होती आणि त्यावर आलेला हा निकाल म्हणजे "न्यायाच्या अगदी विपरीत" असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणासाठी संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेल्या विशेष अधिकारी अॅग्नेस कॅलामार्ड यांनी सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या या हत्येतील भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खाशोग्जी यांची कारकीर्द
- जमाल खाशोग्जी यांचा जन्म मेडिना येथे 1958 मध्ये झाला. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून ते MBA झाले.
- त्यानंतर ते सौदी अरेबियात परतले आणि 1980 च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली. सौदी अरेबियात चालणाऱ्या संघर्षाचं त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रातून वार्तांकन केलं.
- ओसामा बिन लादेन यांच्याबद्दलच्या बातम्या करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी 1980 ते 1990 या काळात त्यांनी अनेकदा ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती.

फोटो स्रोत, EPA
- मध्य आशियातल्या महत्त्वांच्या घडामोडीचं त्यांनी वार्तांकन केलं होतं. कुवैतमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचं रिपोर्टिंग त्यांनी केलं आणि 1990 मध्ये ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे डेप्युटी एडिटर बनले.
- 2003मध्ये ते अल वतन या वर्तमानपत्राचे संपादक झाले. मात्र दोनच महिन्यात सौदीच्या प्रशासनाविरोधात टीका केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं.
- त्यानंतर लंडनला गेले तिथून ते वॉशिंग्टनला गेले आणि सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर विभागाचे प्रमुक प्रिन्स तुर्की बिन फैसल यांचे सल्लागार झाले. 2007 मध्ये ते अल-वतनला परतले.
- 2011 मध्ये अरब देशांत उठाव झाल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
- 2012मध्ये अल-अरब या येऊ घातलेल्या वृत्तवाहिनीचा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ही वाहिनी अल जजिरा या वाहिनीची प्रतिस्पर्धी ठरेल असं म्हटलं जात होतं.
- 2015 मध्ये बहरीनमध्ये ही वृत्तवाहिनी लाँच झाल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रक्षेपण बंद झालं. कारण त्यांनी बहारीनच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
- सौदी अरेबिया या विषयाचे तज्ज्ञ म्हणून खाशोज्गी यांना अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांमध्ये पॅनेलिस्ट म्हणून निमंत्रित केलं जात असे.
- 2017मध्ये सौदी अरेबिया सोडून ते अमेरिकेला गेले. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात त्यांनी सप्टेंबरमध्ये स्तंभलेखनास सुरुवात केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








