अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस-मॅकेन्झी बेझोस यांचा घटस्फोट, पोटगीची रक्कम 2.41 लाख कोटी रुपये

जेफ बेझोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेन्झी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे, असं मॅकेन्झी बेझोस यांनी म्हटलं.

जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेन्झी गुरुवारी 25 वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले.

त्यांच्या पोटगीच्या रकमेवर शिक्कामोर्तब झालं असून ही घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना 35 अब्ज डॉलर्स, म्हणजे जवळजवळ 2.41 लाख कोटी रुपयांची पोटगी मिळेल.

या व्यतिरिक्त मॅकेन्झी यांच्याकडे अमेझॉनमधले 4 टक्के शेअर्स राहतील, पण त्यांनी 'वॉशिग्टन पोस्ट' आणि जेफ यांची स्पेस फर्म ब्लू ओरिजिनमधला हक्क सोडून दिला आहे.

घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मॅकेन्झी यांनी ट्वीट करून याची माहिती सगळ्यांना दिली. "जेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे," असं त्यांनी लिहिलं.

जानेवारी महिन्यात जेफ आणि मॅकेन्झी यांनी आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी दोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं होतं.

"अनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू," अशा आशयाचं ट्वीट दोघांनी केलं होतं.

गेल्या अनेक महिन्यापासून जेफ आणि फॉक्स टीव्हीच्या माजी होस्ट लॉरेन सँचेस यांच्या नात्याची चर्चा आहे. जेफ यांचे सँचेस यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची भरपूर चर्चा अमेरिकेतल्या टॅब्लॉईड मासिकांमधून झाली.

54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ अव्वल स्थानी आहेत. जेफ यांची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

काही महिन्यांपुर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता.

अमेझॉन

फोटो स्रोत, Reuters

जेफ यांच्या पत्नी 48 वर्षीय मॅकेन्झी साहित्यिक आहेत. त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. 2005 मध्ये 'The Testing of Luther Albright' तर 2013 मध्ये 'Traps' ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.

"आम्ही दोघं अतिशय नशीबवान आहोत. आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो, एकमेकांना साथ दिली. इतकी वर्ष संसार केला. आम्ही एकमेकांचे आभारी आहोत. आम्ही एकत्र उत्तम आयुष्य जगलो. आम्ही भविष्याची काही स्वप्नं पाहिली. आईवडील, मित्र, जोडीदार म्हणून अनेक भूमिका निभावल्या. अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र कामही केलं. खूप मजा आली. आमच्या नात्याचं नाव आता वेगळं असेल, पण आम्ही एक कुटुंबच असू. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू," असं दोघांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.

गेल्याच वर्षी या जोडीने एक चॅरिटी कार्यक्रम सुरू केला होता. 'द डे वन' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. बेघर नागरिकांना घरं मिळवून देणं आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं.

जेफ

फोटो स्रोत, Getty Images

जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत - त्यांना झालेली 3 मुलं तर एका मुलीला त्यांनी आहे. जेफ यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान ओळख झाल्याचं मॅकेन्झी यांनी 2013 मध्ये व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जेफ यांनीच मॅकेन्झी यांची मुलाखत घेतली होती.

तीन महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर एका वर्षात जेफ यांनी अॅमेझॉन कंपनी सुरू केली. त्यावेळी अॅमेझॉनवर केवळ पुस्तकांचीच विक्री व्हायची.

हळूहळू अॅमेझॉनचा विस्तार वाढत गेला आणि काही वर्षांतच अॅमेझॉन ई-कॉमर्स क्षेत्रातली अव्वल कंपनी ठरली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)