चीनमध्ये रात्रीच्या उजेडासाठी चाललाय खोट्या चंद्राचा खटाटोप

चंद्र

फोटो स्रोत, Getty Images

रात्री रस्त्यांवर उजेडासाठी दिवे लावावे लागू नयेत म्हणून आकाशात कृत्रिम चंद्र बसवला तर? कविकल्पना म्हणून छान आहे, पण प्रत्यक्षात असं काही घडत आहे, असं सांगितलं तर कोण विश्वास ठेवेलं?

होय, हे खरं आहे. चीनमध्ये एका खासगी संस्थेने 2020पर्यंत अवकाशात प्रकाशमान उपग्रह सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्ट्रीट लाईटला पर्याय ठरेल इतका हा उपग्रह प्रकाशमान असेल, असं चेंदगू इथल्या खासगी एरोस्पेस संस्थेचं म्हणणं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र पिपल्स डेलीनं ही बातमी दिली आहे.

Chengdu Aerospace Science Institute Microelectronics System Research Institute Co, Ltd. असं या कंपनीचं नाव आहे.

काहींनी याची थट्टा केली, काहींनी ही कल्पना फारच आवडली तर काहींना असं काही होऊ शकेल यावर विश्वासच बसत नाही.

या प्रकल्पाबद्दल आपल्याला काय माहिती आहे?

याविषयी फारशी माहिती नाही. जी माहिती आहे, त्यातही विरोधाभास आहे.

पिपल्स डेलीमध्ये गेल्या आठवड्यात याबद्दल बातमी आली होती. एका संशोधन परिषदेमध्ये या संस्थेचे अध्यक्ष वू चेनफेंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "या कल्पनेवर गेली काही वर्षं काम सुरू होतं. आता यासाठीचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण 2020ला नियोजित आहे."

चायना डेली या वृत्तपत्राने 3 मोठे आरसे 2020ला आकाशात प्रक्षेपित केले जातील, असं वू यांनी म्हटल्याची बातमी दिली आहे.

पण या प्रकल्पाला सरकारी पाठबळ आहे का, याबद्दल कसलीही माहिती उपलब्ध नाही.

हा खोटा चंद्र कसं काम करेल?

हा कृत्रिम चंद्र आरशासारखं काम करेल. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर परावर्तीत करण्याच काम हा चंद्र करेल असं चायना डेलीनं म्हटलं आहे.

पृथ्वीपासून 500 किलोमीटर इतक्या उंचीवर हे उपग्रह फिरतील. या चंद्राचा आकार कसा असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. पण वू यांनी हा कृत्रिम चंद्र खऱ्या चंद्रापेक्षा 8 पट जास्त प्रकाश देईल, असं म्हटलं आहे.

वू म्हणतात या प्रकाशाची तीव्रता आणि अचूकता यावर नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे.

हा प्रकल्प कशासाठी?

पैसे वाचवण्यासाठी! होय या संस्थेचं मत आहे की स्ट्रीट लाईटवर जितका खर्च येतो त्यापेक्षा या कृत्रिम चंद्रावर खर्च कमी असेल. अशा पद्धतीने जर 50 चौरस किलोमीटरचा परिसर प्रकाशित करण्यासाठी विजेवर येणाऱ्या खर्चात वर्षाला 1.2 अब्ज युआन इतकी बचत होईल.

स्ट्रील लाईट

फोटो स्रोत, Getty Images

नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे, असा भागही अशा चंद्राने प्रकाशमान करता येईल, असं वू म्हणाले.

या संदर्भात बीबीसीने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लास्गोमधील डॉ. मॅटिओ सिरिऑटी यांच्याशी संपर्क साधला.

"रात्री विजेवर जास्त खर्च येतो, हा विचार केला तर 15 वर्षांसाठी मोफत प्रकाश देणारा हा प्रकल्प नक्कीच फायद्याचा आहे. ही एकप्रकारे गुंतवणूक आहे," असं ते म्हणाले.

पण हे शक्य आहे का?

सिरिऑटी म्हणाले, "शास्त्रीय दृष्टीने पाहाता, हे शक्य आहे."

"पण चेंदगू या शहरावर जर प्रकाश पाडायचा असेल तर हा कृत्रिम चंद्र कायम या शहरावर राहिला पाहिजे. त्यासाठी त्याला जीओस्टेशनरी कक्षात ठेवावं लागेल. योग्य त्या ठिकाणी प्रकाश पाडण्यासाठी अचूकता आवश्यक आहे, असं ते म्हणाले. काही अंशाचा जरी फरक पडला तर चुकीच्या ठिकाणी प्रकाश पडणार," असं ते म्हणाले.

पर्यावरणावर काय परिणाम होतील?

हर्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक कँग वैमिन म्हणतात, "हा उजेड संधीप्रकाशासारखा असेल. त्यामुळे प्राण्यांवर याचा दुष्परिणाम होणार नाही."

पण चीनच्या सोशल मीडियावर यावर उलटसूलट चर्चा सुरू आहे. चीनमध्ये आधीच प्रकाशाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालं आहे, त्यामुळे अशा प्रकल्पाचा निशाचर प्राण्यांवर परिणाम होईल.

प्रकाशाचं प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमधील शहरांत प्रकाशचं प्रदूषण वाढलं आहे.

इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनचे संचालक जॉन बारेंटाईन यांनी फोर्बसशी बोलताना सांगितलं की, "कृत्रिम चंद्रामुळे रात्रीच्या वेळी उजेड अधिकच वाढेल. नको असलेला प्रकाश टाळता न आल्याने या शहरातील लोकांना त्याचा त्रासच होईल."

सिरिऑटी म्हणतात यामुळे निसर्गाचं रात्रीचं चक्र बिघडून जाईल.

हा पहिलाच प्रयोग आहे का?

नाही. रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश मिळवण्यासाठी अवकाशातील आरशांचा उपयोग यापूर्वीही झाला आहे.

1993मध्ये रशियातील संशोधकांनी मिर स्पेस स्टेशनमध्ये परावर्तक पाठवला होता.

Znamya 2 या अवकाश यानातून पृथ्वीवर प्रकाश किरण पाडण्यात आलं होतं. Znamya 2चं मोठं मॉडेल बनवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

त्यावेळी बीबीसीच्या सायन्स एडिटरनी पृथ्वीवर अवकाशातील आरशांनी उजेड आणण्याची शक्यता नजीकच्या काळात नाही, असं मत व्यक्त केलं होतं.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)