शरद पवार- 'मला वाटलं देवेंद्र सुसंस्कृत, सभ्य माणूस आहेत; ते अशाप्रकारचं...'

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. शरद पवार- 'मला वाटलं देवेंद्र सुसंस्कृत, सभ्य माणूस आहेत; ते अशाप्रकारचं...'
"मला वाटलं देवेंद्र सुसंस्कृत माणूस आहेत. सभ्य माणूस आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीसंदर्भात गौप्यस्फोट केला. 'या संदर्भात थेट शरद पवारांशीच चर्चा झाली होती,' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही.
"ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला," असं देवेंद्र यांनी म्हटलं.
त्यांच्या याच विधानांवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
2. कधीही'लिव्ह इन रिलेशन'बाबत ऐकलं नव्हतं, आजच्या पिढीकडून हे ऐकतीये- नवनीत राणा
"मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही'लिव्ह इन रिलेशन'बाबत ऐकलं नव्हतं. पण आजच्या पिढीकडून हे सगळं ऐकतं आहे," असं विधान खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
"आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. पण तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांबरोबर 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली," असं नवनीत राणा यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
नवनीत राणा यांनी म्हटलं, "मी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर हे पाहत असते. याचं माझ्या मनात कुठेना कुठे तरी दु:ख आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट नेमकी कुठून आली? आपण स्वावलंबी झालो आहोत. पण आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं आहे. थोडे पैसे कमवायलो लागलो म्हणून असं वागायचं का? ही आपली संस्कृती नाही. आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. आता आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवाने प्रत्येकाला काही ना काही तरी करायला पाठवलं आहे.
समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. समाजाने आपल्याला राहण्याची पद्धत शिकवली. समाजाने आपल्याला नाव दिलं. आपणही समाजाचं काहीतरी देणं राखतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्के दिलं तरी खूप झालं, हे करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे."
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
3. 'मैदानात या, तुमच्या बाजूने किती जनमत आहे हे दाखवा'
आमची पंचवीस वर्षांची युती होती, त्यात आम्हाला काय मिळाले? 2014 पूर्वीच भाजपने युती तोडली. आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं गेलं. फोडाफोडीचं राजकारण करून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाच वर्षं आपण एकत्र असतो, मग निवडणुकीच्याच वेळी वेगळे का होतो? शिवसेनेनं कायम माणुसकी जपली,असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, महापालिका निवडणुका समोर आहेत. तुम्ही मैदानात या. तुमच्या बाजूने किती जनमत आणि लोकमत आहे, हे कळू द्या.
बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून पाठीत खंजीर खुपसला. आता त्यांना चूक लक्षात आली आहे. पण बोलता येत नाही, अशी परिस्थिती असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी केली.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
4. '...तर राजकीय पक्ष बंद करा, मॅट्रिमोनी काढा'- सुप्रिया सुळेंचा टोला
माझी मुलगी कोणाशी लग्न करणार हे तुम्ही नाही ठरवणार. कोणत्याही पक्षाने मॅट्रिमोनीचा प्रोग्राम काढलेला नाही आणि जर ढवळाढवळ करायची असेल तर राजकीय पक्ष बंद करा, मॅट्रिमोनी काढा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
"मी, अजित पवार आणि जयंत पाटलांनी मॅट्रिमोनी सुरु केलेली नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही रोटी, कपडा, बेरोजगारी यावर काम करतो. त्यामुळे तुम्ही काय खाणार, काय परिधान करणार, किती वाजता घरी येणार याबद्दल आम्हाला देणंघेणं नाही. आम्ही धोरणात्मक बाबींवर बोलतो," असंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
'आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती'संबंधी शासनाने घेतलेला निर्णय त्वरित रद्द व्हावा अशी मागणी सलोखा समिती महाराष्ट्रने केली आहे.
नाशिकमध्ये त्यांचा एक कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, भाई जगताप, मनिषा कायंदेंनी हजेरी लावत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, 'आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती' शासन निर्णयाबाबत मविआने भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
5. महागाईत वाढ; किरकोळ चलनवाढीचा दर उच्चांकीवर
जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
सरकारने सोमवारी (13 फेब्रुवारी) CPI वर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी RBI च्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला असून, जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर 6.52 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
हाच दर डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. किरकोळ महागाईच्या दरातील ही वाढ तीन महिन्यातील सर्वोच्च उच्चांकीवर आहे.
सकाळने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









