एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या नेतेपदावरून काढलं

फोटो स्रोत, Facebook/Eknath Shinde
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरून काढण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत पत्रक काढून माहिती दिली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका एकनाथ शिंदेंवर ठेण्यात आला.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 38 आमदारांसह बंड केलं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार पाडलं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत.

फोटो स्रोत, Shivsena
मेट्रो कारशेड आरे मध्येच होणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार
मेट्रोचं कारशेड आरे मध्येच होणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
सरकार अस्तित्वात आलं की पहिला विषय हा आरेच्या कार शेडचा असतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आता हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मेट्रो 3 चं काम मोठ्या प्रमाणात झालं आहे. मात्र कारशेडचं काम जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत काही होणं शक्य नाही. मागच्या सरकारने जिथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला ती जागा अजूनही वादात आहे. सुप्रीम कोर्टाने ती जागा क्लिअर केली होती. तिथे 25 टक्के काम झालं आहे. 75 टक्के काम तिथे लगेच होऊ शकतं. मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड तिथेच होणं गरजेचं आहे." असं ते म्हणाले.
नवीन सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
"ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षांपूर्वी हेच तर मी अमित शाह यांना सांगितलं होतं. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेता आलं असतं. पण त्यावेळी नकार देऊन आता हे असं का केलं?," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात आले आणि तिथून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
- बऱ्याच दिवसांनंतर आपण फेस टू फेस भेटत आहोत.
- कालच मी नव्या सरकारचं अभिनंदन केलं.
- सर्वांचं भलं व्हावं ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे माझीही आहे.
- ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षांपूर्वी हेच तर मी अमित शाह यांना सांगितलं होतं. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेता आलं असतं. पण त्यावेळी नकार देऊन आता हे असं का केलं?
- लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्यासारखं दाखवलं जात आहे.
- आरेचा निर्णय त्यांनी बदलला याचं मला दुःख झालं आहे.
- मुंबईच्या काळजात कुणीही वार करू नये. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका.
- आरे परिसरात वन्यजीवन आहे. तिथे रहदारी सुरू झाली की ते धोक्यात येणार
- आरेचा निर्णय रेटून नेऊ नका, आरेची जमीन महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा
- लोकशाहीचे चार स्तंभ असतात, असं मानतो. त्या सर्वांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे.
- लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे.
- आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे. पण ज्याने मतदान केलं त्याला तरी आपण कुणाला मतदान केलं ते कळलं पाहिजे.
- मतदारांना लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार असलं पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे.
- लोकशाहीला 75 वर्षे झाली. पण त्यादरम्यान लोकशाहीचे धिंडवडे निघत असतील तर ते घातक आहे.
- माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईकरांच्या काळजात खुपसू नका.
- भाजपने आधीच शब्द पाळला तर शानदार सरकार आलं असता, तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही.
- मी गेल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू माझी ताकद आहेत. तुमच्या अश्रूंशी मी कधी प्रतारणा करणार नाही.
- शिवसेनेच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बनण्याचा अट्टाहास त्यांनी केला. हे जनतेला आवडेल की नाही, हे जनता ठरवेल.
- आधीच ठरवलेला शब्द पाळला असता तर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा बोर्ड स्पष्टपणे लिहून मंत्रालयात ठेवला असता.
- शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसैनिक मुख्यमंत्री होऊच शकत नाही

फोटो स्रोत, Mayuresh Konnur
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत बंड
उद्धव ठाकरेंच्याच मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने खेचून घेतलं. अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरेंनी यानंतर राजीनामा दिला.
एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एकनाथ शिंदे यांची थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागल्याने खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा आहे. शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठीच मोदी-शाह यांनी हे डावपेच केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर बोलण्यासाठी येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत ते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणंही औत्सुक्याचं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








