ICU डायरी: 'ते डोळ्यांद्वारे संवाद साधू लागले आणि सगळ्यांना बरं वाटलं'

आयसीयू डायरी, कोरोना,
फोटो कॅप्शन, आयसीयू डायरी

तुम्ही मुन्नाभाई MBBS सिनेमा बघितला असेल? डिग्री नसतानाही फुल 'इमोशनल होल्डर' मुन्नाभाई जेव्हा हॉस्पिटलला पोहोचतो तेव्हा आनंद बॅनर्जी नावाच्या एका रुग्णासाठी 'सब्जेक्ट' हे संबोधन त्याला अस्वस्थ करतं.

या सब्जेक्टला कसल्याच संवेदना नसतात.

आता रील लाईफमधून रिअल लाईफमध्ये या. गेल्या वर्षाभरापासून कोरोना संकटाच्या काळात कितीतरी डॉक्टरांनी कितीतरी रुग्ण बघितले, त्यांच्यावर उपचार केले आणि सर्वतोपरी प्रयत्न करून अनेकांना वाचवलं, काहींना गमावलंही.

रोज रुग्ण आणि मृत्यू यांच्या मध्ये उभे असलेले डॉक्टर यांनी कसोशीने लढा दिला, देत आहेत. त्यांनी आजाराचं जे तांडव बघितलं ते केवळ 'वॉरिअर' या एका शब्दाने पूर्ण होणारं नाही.

Please wait...

कोव्हिड आयसीयू वॉर्डमध्ये दाखल झालेल्या एखाद्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं किती कठीण असेल? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी घेऊन आलंय - ICU डायरी.

पुढचे काही दिवस तुम्ही ICU वॉर्डात ड्युटी करणाऱ्या डॉ. दीपशीखा घोष यांचा अनुभव इथे वाचाल. यातून तुम्हालाही कळेल की डॉक्टरसाठी रुग्ण म्हणजे केवळ एक 'सब्जेक्ट' नसतो.

अशाच काही उदास, काही स्मितहास्याची किनार लाभलेले तर काही अबोल अनुभवांसोबत घेऊन येत आहोत… #ICUDiary

रोज सकाळी आम्ही एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ.

लाईन

दिवस पाचवा

ज्या लोकांना आधीपासूनच गंभीर आजार आहेत आणि ज्यांना नियमितपणे काही वैद्यकीय गोष्टी पार पाडाव्याच लागतात, म्हणजे केमोथेरपी असेल किंवा डायलेसिस असेल, अशा लोकांची अवस्था दयनीय झाली. दोन्ही बाजूंनी त्यांना मोठी भीती आहे - काहीशी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असल्यानं विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढते आणि लागण झाल्यानंतर शरीरात विषाणूचा प्रसारही वेगानं होतो.

दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला मी अशा एका रुग्णाला पाहिलंही आहे. 78 वर्षांची ही व्यक्ती होती. डायलेसिसवरून परतताना रस्त्यात कुठेतरी त्यांना संसर्ग झाला होता.

मी त्या रुग्णाच्या जवळ गेले आणि त्यांच्याशी थोडं बोलले. ते इतर वयस्कर रुग्णांसारखेच असतील, असं समजून मी त्यांना मास्क कसा घालावा, हे सांगण्याचं ठरवलं. ते प्रचंड दु:खात असतानाही मी तिथून जात असताना माझ्याकडे पाहून हसले.

त्यांनी त्यांचा परिचय करून दिला, मग मी त्यांचं डायलेसिस कधी सुरू होणार आहे, याची चौकशी केली. त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं सांगितलं आणि शक्य तितका ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्याचंही सांगितलं. साधारणपणे असं कुणी म्हणत नाही.

आम्ही त्यांना ब्रिदिंग मशिनवर ठेवलं. डायलेसिसची प्रक्रिया सुरू झाली. आयसीयूमध्ये बऱ्याच काळापासून त्यांना पहिल्यांदा बरं वाटलं होतं.

आयसीयू डायरी, कोरोना,

फोटो स्रोत, Getty Images

डायलेसिस सुरू असताना मधेच त्यांची धडधड कमी होऊ लागली. धोक्याची घंटा वाजू लागली आणि प्रत्येकानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या अत्यंत वेदनादायी CPR च्या 20 मिनिटांनंतर त्यांना ठिकठाक करण्यात यश मिळवलं.

त्यानंतरच्या तीन दिवसात हळू का होईना, पण प्रकृतीत स्थिरता येत होती. चौथ्या दिवशी त्यांनी डोळे उघडले आणि डोळ्यांद्वारे नम्रपणे संवाद साधू लागले. आयसीयूतल्या सर्वांना बरं वाटायला लागलं.

त्यानंतरचे एक-दोन दिवस, त्यांच्या बेडजवळ जो कुणी जात होता, त्यांच्याकडे ते हसत पाहत होते.

आठवड्याभरात त्यांना वॉर्डमध्ये नेलं आणि चार दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही दिला.

या यशासाठीच मी प्रयत्न करतोय आणि यामुळेच मी आहे.

दिवस चौथा

हॉस्पिटलचं वातावरण घाबरवणारं असतं, ते कोणालाच आवडत नाही. काही लोक असेही होते जे कोरोनामुळे पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते.

आयसीयू डायरी, कोरोना,

फोटो स्रोत, BBC/Puneet Barnala

अशा लोकांना वाटणारी भीती अगदी स्पष्ट दिसते. एका सकाळी कोव्हिड ICU वॉर्डमध्ये एक 44 वर्षांची महिला दाखल झाली. अत्यंत त्रासलेली होती. तिला अजिबात उपचार करून घ्यायचे नव्हते.

तिला घरी जायचं होतं. घरच्यांशी बोलणं करून द्या, म्हणजे ते येतील आणि हॉस्पिटलमधून घेऊन जातील असा तगादा तिने लावला होता.

ती म्हणाली, "माझ्या मुलाचा जन्मही नॉर्मल डिलीव्हरीने झाला कारण मला ऑपरेशन करून घ्यायचं नव्हतं. माझं दुःख तुम्हाला समजणार नाही. मला फक्त घरी जाऊ द्या. मग मी तिथे मेले तरी चालेल."

मी त्यांना उपचारांबद्दल सांगत वारंवार समजवायचे, "तुम्हाला काहीही होणार नाही..."

पण माझं म्हणणं ऐकून घ्यायला त्या तयार नव्हत्या. मी त्यांच्या मुलाला फोन लावून त्यांच्या जवळ ठेवला.

त्यांनी मुलाला सांगितलं, "तू आदर्श मुलगा नाहीस. कारण मी नको म्हणत असतानाही तू मला हॉस्पिटलमध्ये सोडून गेलास."

मुलगा माफी मागत म्हणाला, "आई, डॉक्टर सांगतात, तसं कर. तुला काही दिवसांमध्येच बरं वाटेल. मग मी येऊन तुला घेऊन जाईन." त्याने वचन दिलं.

जवळपास अर्ध्या तासाने त्या शांत झाल्या. मग आम्ही उपचार सुरू केले. पण त्यांच्या तब्येत ढासळतच गेली.

100 टक्के सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. त्या मॉनिटरकडे पाहात राहत. त्यावर लिहीलं होतं - 84%

त्या मला बोलवून सांगत, "काही दिवस पूर्ण झाले. आता माझ्या लेकाला बोलवा. तो म्हणाला होता की तो मला घरी घेऊन जाईल. मला घरी मरायंच, हॉस्पिटलमध्ये नाही."

त्यांना काय उत्तर द्यावं मला कळत नसे. त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेशनची गरज असल्याचं मी त्यांच्या मुलाला फोन करून सांगितलं. त्यांच्या मुलाने पटकन होकार तर दिला, पण पुढे म्हणाला - प्लीज आईला फोन देऊ नका. आईच्या विनवण्या नाकारणं त्याला कठीण जात होतं.

त्याने मला सांगितलं, "आईला समजवा की तिची तब्येत नीट झाली की मी तिला घरी घेऊन जाईन." हे बोलताना त्याचा आवाज थरथरत होता.

शक्य ते सर्व उपचार करण्याची विनंती त्याने मला केली. "तुम्ही आईचं ऐकू नका. आईचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचं असेल ते सगळं करा."

त्यांना वाचवण्याचे सगळे प्रयत्न आम्ही केले. त्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. अनेक दिवस उलटून गेलेयत.

त्यांचा मुलगा रोज फोन करतो. पण आम्ही जे सांगतो ते ऐकण्याच्याही परिस्थितीत तो आता नाही.

दिवस तिसरा-

एका वयोवृद्ध व्यक्ती काही आठवड्यांपूर्वी आमच्या रुग्णालयात दाखल झाली होती. त्या व्यक्तीच्या शरीरात तीव्र ताप भरलेला होता. तसंच त्यांची ऑक्सिजनची पातळीही बरीच खालावली होती. त्यांना अतिदक्षता कक्षात (ICU) दाखल करण्यात आलं.

सदर व्यक्ती खूपच अस्वस्थ वाटत होती. त्यांना नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटीलेशनवर (NIV) ठेवण्यात आलं. तिथं ते मास्क वारंवार काढून टाकत होते. टाळाटाळ करत होते. ते खूपच संभ्रमावस्थेत असल्याचं त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळालं.

आयसीयू डायरी, कोरोना,

त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांच्या पत्नीला त्यांचं वागणं समजावून सांगितलं.

त्यांनी मास्क काढू नये, म्हणून आम्हाला त्यांच्यावर फिजिकल रिस्ट्रेंट्स लावावे लागतील, असं आम्ही म्हटलं. त्यांची पत्नी म्हणाली, "हवं ते करा, पण त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवा."

मी म्हटलं, "मी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवीन."

त्यावर त्या म्हणाल्या "वेळेवर चहा मिळाला नाही, तर ते थोडे चिडचिडे होतात. त्यामुळे त्यांना चहा देत राहा आणि त्यांची काळजी घ्या."

यावर मी काहीच बोलू शकले नाही. मी म्हणाले, "आम्ही योग्य ती काळजी घेऊ, चिंता करू नका. नंतर त्या व्यक्तीला चहा आणून देण्यास सांगितलं. आम्ही रिस्ट्रेंट्स लावल्यानंतर ते दोन तास शांत होते. पुढचे दोन दिवस माझी सुटी होती. कामावर परतले तेव्हा त्यांची तब्येत आणखीनच खालावली होती."

मी त्यांच्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाले, "ते उपचारांना सहकार्य करत नाही. त्यांची तब्येतही खालावू लागली आहे."

पत्नी म्हणाली, "त्यांना व्हेंटिलेटर लावण्याआधी चहा दिला होता का?"

या प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी फक्त हो असं म्हणाले.

तिला याचं काय वाटलं काय माहीत, ती शांतच होती. तिने फक्त म्हटलं, "त्यांची काळजी घ्या", मी म्हटलं, "हो, चिंता करू नका."

दिवस दुसरा-

आयसीयूमध्ये ड्युटी करत असल्याने मी फक्त सर्वांत अशक्त रुग्णच बघते. मी कितीतरी नवीन चेहरे बघितले. जगण्याची आशा गमावलेले चेहरे बघितले. ज्याची कधी कल्पनाही केली नाही, असे प्रश्न विचारताना चाचरत असलेले आवाज ऐकले.

खूप मोठा विनाश मी डोळ्यांसमोर घडताना बघतेय. कमी-अधिक प्रमाणात जगभर हीच परिस्थिती आहे आणि हे चेहरे किंवा आवाज म्हणजे केवळ नंबर नाही.

तीसुद्धा तुमच्या-माझ्यासारखी जिवंत माणसं आहेत. डोळ्यात अनेक स्वप्नं असणारी माणसं. कोव्हिडने त्यांचं आयुष्य हिरावून घेतलं, स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जिद्द हिरावून घेतली, आपल्या पश्चातही आपल्याला ओळखलं जाईल, असं काही करण्याची त्यांची आशा हिरावून घेतली.

डॉक्टर

त्यांच्या काही गोष्टी कधीच कुणाला कळणार नाही. कारण काही गोष्टी खूप साध्या, घरगुती होत्या. काही नीट शब्दात मांडता न आल्याने राहून जातील, तर काही कधी बोलल्याच नाहीत म्हणून कळणार नाही.

कोव्हिडमुळे आम्ही डॉक्टर केवळ उपचारांशी संबंधित गोष्टींमध्ये इतके गढून गेलेलो असतो की, रुग्णाशी दोन शब्द बोलण्यासाठी एकतर वेळही नसतो आणि दुसरं म्हणजे मानसिक ताकदही नसते.

आयसीयूमध्ये केवळ दोनच प्रकारची संभाषणं होतात- एक म्हणजे आम्ही रुग्णांना सतत मास्क घालायला, वेळच्या वेळी औषधं घ्यायला सांगतो. हॉस्पिटलमधून लवकरात लवकर डिस्चार्ज मिळून घरी परत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्या कुटुंबीयांविषयी, त्यांच्या कामाविषयी त्यांच्याशी बोलतो.

दुसरं म्हणजे रुग्णांकडून विचारला जाणारा अस्वस्थ करणारा प्रश्न. तो प्रश्न जो रुग्ण आमच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो, "डॉक्टर, मी जगेन ना?" या प्रश्नाला आम्ही योग्य ते उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पण, बरेचदा काहीच योग्य नसतं.

दिवस पहिला-

आम्ही विषाणू आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांसोबतच इतर अनेक बाबींशी सातत्याने लढतोय. एक महिला, ज्या स्वतः डॉक्टर होत्या, आमच्याकडे भरती होत्या. त्यांची ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत खाली गेली होती आणि ब्रिदिंग मशीनवर ठेवूनही ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती.

आयसीयू, कोरोना

ब्रिदिंग मशीनवर असूनही त्यांना नीट श्वास घेता येत नव्हता. एका दमात जास्तीत जास्त शब्द बोलण्याच्या प्रयत्नात वाक्यं नीट उच्चारता येत नव्हती. मी गेल्या एक-दोन आठवड्यांपासून बघत होते. सुरुवातीला माझ्याशी आणि आमच्या नर्सेसशी तुसडेपणाने वागणाऱ्या त्या पुढे माझा हात धरून मला वेदनाशामक औषध देण्यासाठी गयावया करत होत्या.

त्या म्हणायच्या, "तुमी तो आमार मा." म्हणजे, "तू माझ्या आईसारखी आहेस."

त्यांच्या पतीलाही कोव्हिडची लागण झाली होती. पण, त्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती आणि प्रकृतीही तुलनेने बरी होती. ते पत्नीला सतत प्रोन व्हेंटिलेशनसाठी (पालथं झोपून श्वास घेणे, या पोझिशनमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी नैसर्गिकरीत्या वाढण्यास मदत होते.) विनवण्या करत. पण, त्यांचं वजन जास्त असल्याने पालथ झोपणंही त्यांच्यासाठी बरंच वेदनादायी होतं.

आपल्या नवऱ्याला याची जाणीव असल्याचं त्यांनाही कळत होतं. त्या नवऱ्याकडे बघायच्या, हात उंच करून त्यांना मी प्रयत्न करतेय म्हणून सांगायच्या. काहीही करून तिला उपचार घ्यायला सांगा, अशी आम्हाला विनंती करायचे. मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, असं आश्वासन द्यायचे आणि ते काहीही अघटित होणार नाही, अशी आस घेऊन त्यांच्या बेडकडे परत जायचे. काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण, त्यांच्या पत्नीला नाही.

सीरिज प्रोड्युसर - विकास त्रिवेदी, चित्रं - पुनीत बर्नाला

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)