कोरोना संकट : 18 हॉस्पिटल्सने दाखल करून घ्यायला नकार दिला, अखेर मृत्यूनं गाठलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून
दिनेश सुजानी… काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना अश्रू आवरत नाहीत.
तुम्ही विचारता : काय झालं?
हुंदका आवरत ते म्हणतात, "आता सांगून काय अर्थ आहे?"
दिनेश सुजानी यांचे 52 वर्षांचे वडील बंधू भंवरलाल सुजानी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांना लागण झाल्याचा रिपोर्ट त्यांच्या मृत्यूनंतर आला.
दिनेश सांगतात की, देशाची आयटी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातल्या 18 हॉस्पिटल्सने त्यांच्या भावाला दाखल करून घ्यायला नकार दिला होता.
दिनेश आपल्या भावाला स्कूटरवरून घरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. नाईट कर्फ्यू असल्याने त्यांना ऑटो रिक्शा किंवा टॅक्सी काहीच मिळालं नाही.
हे सांगताना दिनेश यांना पुन्हा रडू कोसळलं.
"मी त्यांना (हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना) सांगितलं की, त्यांचे नाडीचे ठोके मंदावले आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि उलट्याही होत आहेत. ते माझ्या भावाला घेऊन आत गेले. एक्स-रे काढला आणि बाहेर आले. त्यांच्या हातात एक कागद होता. त्यावर इंग्रजीत काहीतरी खरडलं होतं. ते मला म्हणाले यांना इथून घेऊन जा."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दिनेश तिथून निघाले. जवळच्याच दुसऱ्या हॉस्पिटलला गेले. इथून त्यांना अॅम्ब्युलन्स मिळाली आणि पुढे एकापाठोपाठ एक अनेक हॉस्पिटल्सचे उंबरठे त्यांनी झिजवले. यात खाजगी आणि सरकारी दोन्ही हॉस्पिटल्स होती.
दिनेश सुजानी यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यांनी आम्हाला दारातूनच परत पाठवलं."
दिनेश यांना या प्रकरणाची पोलीस तक्रार दाखल करायची नाही.
डोळ्यात पाणी दाटून येत असतानाच ते म्हणाले, "नाही...आम्हाला काहीही करायचं नाही."
भंवरलाल सुजानी यांच्या मागे चार मुलं आणि पत्नी आहेत. दोन मुलींची लग्नं झाली आहेत, तर सर्वात धाकटा मुलगा 22 वर्षांचा आहे. या कुटुंबाचा रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय आहे. अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या भागात त्यांचं दुकान आहे.
देशभरात अनेकांना असाच अनुभव
रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटल्सच्या असंवेदनशीलतेला बळी पडणारे भंवरलाल सुजानी पहिले नाहीत.
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून कोरोनाग्रस्त किंवा संशयित कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यास नकार दिल्याच्या बातम्या देशाची राजधानी दिल्लीपासून मुंबई, कोलकाता, हैदराबाद सगळीकडूनच येत आहेत.

फोटो स्रोत, EPA/FAROOQ KHAN
देशात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीलाही हॉस्पिटल्सच्या या नव्या 'वर्क प्रॅक्टिस'चा अनुभव आला होता. 'वर्क प्रॅक्टिस' कुठली तर कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करून घ्यायला नकार देणे.
त्या पहिल्या व्यक्तीला हैदराबाद आणि कलबुर्गीमधल्या हॉस्पिटल्सने भरती करून घ्यायला नकार दिला होता.
हॉस्पिटलचं स्पष्टीकरण
रुग्णांना दाखल करून द्यायला नकार देण्यामागे हॉस्पिटल्सकडून जी कारणं देण्यात येत आहे तीदेखील देशभरात थोड्याफार फरकाने सारखीच आहेत.
भंवरलाल सुजानी यांना भरती करून घ्यायला नकार देणाऱ्या पहिल्या हॉस्पिटलचं म्हणणं आहे की, हॉस्पिटलमधल्या कोरोना वॉर्डमध्ये एकही बेड रिकामा नव्हता. शिवाय, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असता तर काय या कारणासाठीही त्यांना दाखल करता येत नव्हतं.
भगवान महावीर हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ एमरजेंसी मेडिसीन अँड ट्रॉमाचे नोडल ऑफिसर डॉ. निशांत हीरेमट सांगतात, "हॉस्पिटलच्या 350 बेड्सपैकी आम्ही 45 बेड्स कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. त्या सर्व बेड्सवर रुग्ण होते. त्या वॉर्डात सर्व कोव्हिड रुग्ण असल्याने आम्ही संशयित कोव्हिड रुग्णाला तिथे ठेवू शकत नव्हतो. त्या रुग्णाची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली असती तर ती जबाबदारीही आमच्यावरच आली असती. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की, एखादा संशयित कोरोनाग्रस्त आल्यास त्याच्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलची व्यवस्था करायची."

फोटो स्रोत, Getty Images
निशांत यांच्या हॉस्पिटलने भंवरलाल यांना तपाासलंही नाही, हा आरोप ते फेटाळून लावतात.
डॉ. निशांत यांनी सांगितलं, "आम्ही त्यांना ऑक्सिजन दिला होता. रुग्णासाठी ज्या मूलभूत गोष्टी करण्याची गरज होती ते सर्व आम्ही केलं होतं."
ते म्हणाले, "हे खरं आहे की, जिथे कुठे भरती व्हाल तिथे स्वॅब टेस्ट (कोरोना चाचणी) नक्की करा, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. आम्ही आपल्या रुग्णांना जवळच्याच एका मान्यताप्राप्त खाजगी लॅबमध्ये पाठवतो. कारण कोरोना चाचणीसाठीच्या सोयी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत. आम्ही त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता."
हॉस्पिटल्सना नोटीस
मात्र, हॉस्पिटलमध्ये मिळालेले उपचार आणि सल्ला यामुळे भंवरलाल आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीच बदलणार नव्हतं. त्यांच्या हालअपेष्टाही कमी होणार नव्हत्या.
भंवरलाल यांचा धाकटा मुलगा विक्रम याने काही वृत्तपत्रांशी बोलताना सांगितलं की, ते 18 हॉस्पिटल्समध्ये गेले. 32 हॉस्पिटल्सना फोन केले. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रयत्न केले. 120 किलोमीटर अंतर कापलं. शेवटी त्याच्या वडिलांनी यापैकीच एका हॉस्पिटलच्या उंबरठ्यावर प्राण सोडले.
दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत 9 हॉस्पिटल्सना नोटीस बजावत कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट, 2017 आणि कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या हॉस्पिटल्सवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली.
नोटीस बजावण्यात आलेल्या हॉस्पिटल्समध्ये एका सरकारी हॉस्पिटलचाही समावेश आहे. कर्नाटकचे आरोग्य आयुक्त पंकज कुमार पांडेय यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं, "प्रायव्हेट हॉस्पिटल्स कुठल्याही कोरोनाग्रस्त किंवा कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ शकत नाहीत आणि अशा रुग्णांकडे दुर्लक्षही करू शकत नाहीत."
या हॉस्पिटल्सना उत्तर देण्यासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
गेल्या काही दिवसात सरकारने खाजगी हॉस्पिटल्सना कोव्हिड रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मात्र, गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या वेगाने वाढली ते पाहता हॉस्पिटल्समध्ये मोठ्या संख्येने कोव्हिडग्रस्तांसाठी बेड उपलब्ध करणे आणि सबसिडीच्या मुद्द्यावरून सुरू असलेली चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.
दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या तुलनेत लॉकडाऊन काळात कर्नाटकने संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. कोरोना संसर्गाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यात केरळनंतर कर्नाटकचं कौतुक होत होतं.
मात्र, 8 जूनला लॉकडाऊन उघडताच महाराष्ट्र आणि देशातल्या इतर भाागातून लोक कर्नाटकात परतू लागले आणि कर्नाटकात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. कर्नाटकात परतणाऱ्यांपैकी मोठी संख्या महाराष्ट्रातून आलेल्यांची आहे.
8 जून रोजी कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 308 एवढी होती आणि त्या दिवसापर्यंत राज्यात 64 लोकांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला होता.
1 जुलै रोजी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या 1272 एवढी झाली, तर त्या दिवसापर्यंत मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. एकूण 253 लोकांचा मृत्यू झाला होता.
एकट्या बंगळुरू शहराविषयी सांगायचं तर 8 जून रोजी बंगळुरूमध्ये 18 कोरोनाग्रस्त आढळले, तर 1 जुलै रोजी ही संख्या वाढून 732 झाली होती.
फेडरेशन ऑफ हेल्थकेअर असोसिएशन ऑफ कर्नाटकचे आयोजक डॉ. एम. सी. नागेंद्र स्वामी यांनी बीबीसीला सांगितलं, "खाजगी हॉस्पिटल्समध्ये सात ते साडे सात हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यातले अडीच हजार बेड्स खाजगी हॉस्पिटल्समध्ये तर साडे चार हजार बेड्स खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. म्हणजेच कर्नाटक पुढच्या महिन्यासाठी किंवा त्यापुढच्या परिस्थितीसाठी सज्ज आहे."
कर्नाटकच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी 3879 बेड्स आहेत. म्हणजेच कर्नाटकात आजमितीला कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दहा हजारांहून थोडे जास्त बेड्स उपलब्ध आहेत.
डॉ. व्ही. रवी नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेसमध्ये (NIMHANS) न्युरो व्हायरोलॉजिस्ट आहेत.
हॉस्पिटल्सच्या क्षमतांवर प्रश्नचिन्हं
रवी यांच्यामते जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाची सर्वात वाईट परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल तेव्हा हॉस्पिटल्सची सध्या असलेली क्षमता कमीच पडणार आहे.
ते सांगतात, "कुणालाही सर्दी-पडशाची प्राथमिक लक्षणं दिसली तरीसुद्धा त्याने तात्काळ कोव्हिड चाचणी करायला हवी. चाचणी पॉझिटिव्ह असेल तर उपचाराने तो बरा होऊ शकतो. एखाद्याला अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असेल म्हणजेच श्वास घ्यायला अत्यंतिक त्रास होत असेल तर जगातला कुठलाच डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकत नाही. ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आजाराची कुठलीही लक्षणं दिसत नाही त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवलं पाहिजे."

फोटो स्रोत, EPA/RAJAT GUPTA
डॉ. रवी कर्नाटक सरकारच्या विशेषज्ज्ञांच्या पॅनलवरही आहेत.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियात साथरोगतज्ज्ञ असलेले डॉ. गिरीधर बाबू हेसुद्धा राज्य सरकारच्या याच पॅनलवर आहेत.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपचार देण्यासाठी एका मजबूत व्यवस्थेची गरज आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवल्यावर आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की, यापैकी कोणत्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. मध्यमवर्गातल्या ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत ते आपल्या घरताच आयसोलेशनमध्ये राहू शकतात. ज्यांच्या घरी आयसोलेशनसाठी स्वतंत्र खोली नाही त्यांनाच हॉस्पिटलमध्ये आणावं."
डॉ. एम. सी. नागेंद्र स्वामी म्हणतात, "जास्तीत जास्त लोक घरीच आयसोलेशनमध्ये राहिले तर हॉस्पिटलमध्ये जास्त बेड्स उपलब्ध होतील. सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समधल्या कोरोना बेड्ससाठी हॉटलाईन तयार केल्यावर कुणालाही कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे, याची माहिती देणं सुलभ होणार आहे. यामुळे कुठल्याच रुग्णाला हॉस्पिटल्सचे उंबरठे झिजवण्याची गरज पडणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








