नांदेड लोकसभा निकाल : अशोक चव्हाण यांचा परभाव, प्रतापराव पाटील विजयी

फोटो स्रोत, facebook
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा तब्बल 40 हजार मतांनी पराभव झाला आहे.
नांदेडमध्ये यंदा अशोक चव्हाण यांचा पराभव होईल अशी शक्यता आधीच काही विश्लेषकांनी व्यक्त केली होती.
नांदेडच्या निकालाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "गेल्या वेळी मोदी लाटेतही नांदेड आणि हिंगोलीची जागा निवडून आली होती. यावेळी मात्र या दोन्ही जागा युती जिंकणार आहे, असं दिसत होतं. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये तळ ठोकून प्रचार केला होता, शिवाय राज ठाकरे यांची सभाही तिथं झाली होती. असं असतानाही त्यांचा पराभव झाला. याला कारण म्हणजे चव्हाणांना स्वत:लाच निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती.
"दुसरं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या पराभवामागे वंचित बहुजन आघाडीची प्रमुख भूमिका आहे. कारण नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना लाखाहून अधिक मतं मिळाली आहेत. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या मतांमधील फरकही फारच कमी आहे," ते पुढे सांगतात.
राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या मते, "अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये राहुल गांधींची सभा आयोजित केली होती. असं असतानाही मतांचं ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फटका अशोक चव्हाण यांना बसला. पक्षाच्या अध्यक्षाचा पराभव ही पक्षाच्या प्रतिमेसाठी चांगली गोष्ट नाही."
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध नाराजी होती. खरं तर चव्हाण यांना स्वत: निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. कारण त्यांना पराभवाचा पूर्वीच अंदाज आला होता. अशोक चव्हाण यांचा पराभव राज्यातल्या काँग्रेसला विचार करायला लावणारा आहे."
नांदेडची लढत
2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार महाराष्ट्रातून निवडून आले.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून चव्हाणांची जिल्ह्यावर पकड आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड यांचा समावेश होतो. यापैकी भोकर, नांदेड उत्तर आणि नायगाव हे 3 मतदारसंघ काँग्रेस, नांदेड दक्षिण आणि देगलूर हे मतदारसंघ शिवसेना आणि मुखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








