लोकसभा 2019: 'काँग्रेसला पंतप्रधानपद दिलं नाही तरी चालेल' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत:
1) लोकसभा 2019: 'काँग्रेसला पंतप्रधानपद दिलं नाही तरी चालेल'
केंद्रात भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) सरकार स्थापनेपासून रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
या संदर्भात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी 22 विरोधी पक्षांची 'महाबैठक' दिल्लीत बोलावली आहे.
''आम्ही याआधीही हे स्पष्ट केले आहे की, सर्वसहमती असेल तर काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकतो, पण आमचा मुख्य हेतू भाजपला सत्तेपासून रोखणे हा आहे. त्यामुळे सर्वसहमतीने ज्या नेत्याची पंतप्रधानपदासाठी निवड होईल त्यांना आमचा पाठिंबाच राहील,'' असं गुलाम नबी आझाद यांनी बिहारमधल्या एका दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे.
लोकसभा निवडणूक ही कधीच पंतप्रधानपदाच्या दोन उमेदवारांमधील नसते, तर पक्ष आणि विचारधारांमधील असते, लोकांना एक नेता निवडायचा नसतो, तर विचारधारेची निवड करायची असते, असं आझाद यांनी म्हटलं आहे.
2) उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबईत रक्तपेढीत रक्तपुरवठ्याचा तुटवडा
उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबईतल्यात रक्तपेढीत रक्तपुरवठ्याचा तुटवडा भासत असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेनं (SBTC) दिली आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे. सरासरी शहरातल्या रक्तपेढीत 10 हजार ते 15 हजारापर्यंत रक्ताच्या पिशव्या असतात पण हे प्रमाण 5 हजारापर्यंत घसरलं आहे. ही परिस्थिती एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यापासून उद्भवली आहे.
सध्या शहरात 60 पैकी 43 रक्तपेढीत केवळ 4,962 रक्ताच्या पिशव्या उरल्या आहेत.

फोटो स्रोत, ANU ANAND
या परिस्थितीवर मात करण्यासाठी रक्तदानाचे कँप वाढवण्याचा विचार राज्य रक्त संक्रमण परिषद करत आहे. तसंच स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था यांनाही परिषद आवाहन करणार आहे.
3) बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणारः CBI
बोफोर्स प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे आणि नोंदी हाती लागल्याने या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
मिशेल हार्शमन नामक व्यक्तीने केलेल्या महत्त्वाच्या खुलाशानंतर CBIने न्यायालयाकडे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती.
यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाच्या परवानगीची CBIला आवश्यकता नाही. मात्र, बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची माहिती वेळोवेळी न्यायालयाला देत राहणे आवश्यक असल्याचे निर्देश न्यायालयाने CBIला दिले आहेत.
त्यामुळे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली, असंही या बातमीत म्हटलं आहे.
4) राज्यात 1972 पेक्षाही गंभीर दुष्काळ - शरद पवार
सातारा, सोलापूर, बीड, नगर या जिल्ह्यांसह महाराष्ट्रात 1972 पेक्षाही गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मांडलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळ निवारण्यासाठी शक्य होतील ते सगळे निर्णय घ्यावेत असं म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोकसभेचं महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर,बीड, उस्मानाबाद, नगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या.
चारा छावण्या आणि शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या भेटी घेतल्या. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहीलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
5) फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी बंधनकारक
खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिले आहेत. त्यामुळे Zomato, Swiggy, Uber eatsसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्यांची वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक झाले आहे.
तसंच ही तपासणी झाल्यानंतर डिलिव्हरी व्यक्तींना नोंदणीही बंधनकारक करण्यात आली आहे. ABPमाझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांत खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलिव्हरीचा व्यवसाय मोठ्या तेजीत आहे. ग्राहकांकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलमधून ते खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कंपन्यांच्या फूड डिलिव्हरी बॉइजची असते.
हॉटेलमधून खाद्य पदार्थ घेऊन येणाऱ्या या फूड डिलिव्हरी बॉइजना कुठला आजार किंवा संसर्गजन्य रोग आहे का? ते खाद्य पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी योग्य आहेत का? हे तपासण्याची कुठलीच व्यवस्था आतापर्यंत नव्हती.
त्यामुळेच डिजिटल युगात तीव्रतेने प्रचलित होत असलेल्या या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी फूड डिलिव्हरी व्यक्तींची सखोल वैद्यकीय तपासणीचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








