लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टींना तगडं आव्हान देतील का?

उर्मिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी, मुंबईहून

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. याच मतदारसंघातून 2004ला काँग्रेसचे उमेदवार सिनेअभिनेते गोविंदा यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. आता भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला मातोंडकर अशा लढतीत, उर्मिला मातोंडकर तगडं आव्हान देऊ शकतील का, असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे.

उर्मिला यांच्या उमेदवारीवर बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, "संजय निरुपम यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एका भोळ्याभाबड्या मुलीला राजकारणात अडकवल आहे. त्या चांगल्या अभिनेत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो."

"जसं सिनेक्षेत्रात त्यांचं नाव आहे, तसंच आमच्या क्षेत्रात आमचं नाव आहे," असं ते ANI वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले.

उत्तर मुंबईत कॉंग्रेसचा पुन्हा 'सेलिब्रिटी पॅटर्न'

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू होती. अभिनेत्री नगमा, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ते गोविंदाचा भाचा कॉमेडीयन कृष्णापर्यंत अनेक नावं चर्चेत आली होती.

उर्मिला मातोंडकर

फोटो स्रोत, Getty Images

यातून कॉंग्रेस या मतदारसंघात २००४चा 'गोविंदा पॅटर्न' पुन्हा वापरणार अशी चर्चा होती. अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या 'सेलेब्रिटी पॅटर्न'वर शिक्कमोर्तब झालं.

उत्तर मुंबईवर पकड कोणाची?

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2004च्या निवडणुकीत कॉंग्रेसने इथं विजय मिळवला.

सलग पाच वेळा लोकसभेत निवडून आलेले माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या विरोधात कॉंग्रेसनं अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली. या निवडणुकीत राम नाईक यांचा पराभव झाला. पुढे 2009च्या निवडणुकीतही भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला. मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.

गोपाळ शेट्टी

फोटो स्रोत, Gopal Shetty/facebook

2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी जवळपास साडे चार लाख मतं मिळवतं कॉंग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर लगेच विधानसभेला याच मतदारसंघातून भाजपचे 6 पैकी 4 आमदार निवडून आले. मुंबई महापालिकेत भाजपचे एकूण 82 नगरसेवक आहेत. त्यांपैकी 24 नगरसेवक हे एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघातील आहेत.

उर्मिला सक्षम उमेदवार ठरतील?

2004च्या निवडणुकीत राम नाईक यांनी अभिनेता गोविंदाला कमकुवत समजण्याची चूक केली असं जाणकार सांगतात. अभिनय आणि संघर्षमय जीवन या गोविंदा यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या.

लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघांची बांधणी चांगली केली आहे. मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ऐन वेळी उत्तर मुंबई सोडून उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी घेतली. कॉंग्रेसकडे कोणीही तुल्यबळ उमेदवार नव्हता, त्यातून कॉंग्रेसने 2004ची रणनीती अंमलात आणली. सेलेब्रिटी उमेदवाराला कमकुवत समजून चालत नाही, हे यापूर्वी दिसून आलं आहे."

गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर

फोटो स्रोत, facebook/getty images

"सेलेब्रिटी उमेदवार मतदारांना आकर्षित करू शकतात. राम नाईक यांनी गोविंदाला कमकुवत समजून जी चूक केली ती गोपाळ शेट्टी यांना करून चालणार नाही. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी झाली तर उमेदवार कोण आहे गौण ठरेल. पण उमेदवार बघून मतदान झालं तर कॉंग्रेसचं 'सेलिब्रिटी कार्ड' चालणार की गोपाळ शेट्टींची राजकीय कसब कामी येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे," असं ते सांगतात.

तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते सध्या उत्तर मुंबई मतदारसंघातील वातावरण सेना-भाजच्या बाजूनं आहे. "खासदार गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघात चांगली कामं केली, असं लोकांचं म्हणणं आहे. उर्मिला मातोंडकर एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून चांगल्या आहेत. पण या मतदारसंघात त्यांना पार्श्वभूमी काहीही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे."

"काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली. कला क्षेत्रातील लोक पक्षात येत आहे, असं दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ज्या काँग्रेसला आज स्वीकारार्हता कमी आहे, त्या काँग्रेससोबत विचार जुळतात असं सांगून त्या ठाम भूमिका घेत आहेत, याचं नक्कीच कौतुक करायला हवं," असंही ते सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)