मुंबईच्या किनाऱ्यांवर हे विषारी जेली फिश येतात कुठून?
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्लू बॉटल जेली फिश म्हणजेच पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाच्या जलचरानं सध्या मुंबईकरांचे आणि पर्यटकांचे पाय मुंबईच्या किनाऱ्यावर ठेवणं मुश्किल केलं आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येनं आलेल्या या जेली फिशच्या दंशामुळे 100हून अधिक पर्यटक आणि नागरिक जखमी झाले आहेत.
ग्लोबल वॉर्मिंग, वाढलेली मासेमारी आणि मुख्यतः मान्सून वाऱ्यांमुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यांवर सध्या ब्लू बॉटल जेली फिशनी आपलं बस्तान मांडलं आहे.
ब्लू बॉटल जेली फिश दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. आकाराने छोटे आणि पाण्यावर तरंगत असल्याने ते भरतीच्या वेळी वाहून किनाऱ्यावर येतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आगमनाचं आणि पुन्हा जाण्याचं चक्र सुरूच आहे.
किनाऱ्यावरील वाळूत पडलेल्या या जेली फिशना स्पर्श झाल्यास किंवा त्यांना पाय लागल्यास ते दंश करतात आणि तीव्र वेदना होतात. याचा फटका गेल्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत 100हून अधिक पर्यटक आणि मुंबईकरांना अक्सा, जुहू, गिरगाव, दादर इथल्या किनाऱ्यांवर बसला. पण, यंदा त्यांच्या मुंबईत लांबलेल्या मुक्कामामागे जागतिक तापमान वाढ हे कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
'ग्लोबल वॉर्मिंगमुळे ब्लू बॉटलच्या संख्येत वाढ'
मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसणाऱ्या ब्लू बॉटल जेली फिशबद्दल जाणून घेण्यासाठी 'सेंट्रल मरीन रिसर्च फिशरीज इन्स्टीट्यूट' (CMFRI) संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम पाहिलेल्या डॉ. विनय देशमुखांशी बीबीसीनं चर्चा केली.
देशमुख सांगतात, "ब्लू बॉटल जेली फिश हे अरबी समुद्राच्या मिड ओशन रिजन म्हणजेच मध्यवर्ती भागात प्रामुख्याने दिसून येतात. मान्सूनच्या आगमनानंतर वाऱ्यांमुळे समुद्रात घुसळण होते आणि हे जेली फिश थेट वाहून देशाच्या पश्चिम किनाऱ्यांवर येतात. गेल्या 5-6 वर्षांत यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. याच्यामागे जागतिक तापमान वाढ हे कारण असू शकतं."

फोटो स्रोत, Pradip Patade
ते सांगतात, "अरबी समुद्राचं तापमान 0.8 टक्क्यांनी वाढलं आहे. 2010-11मध्ये अरबी समुद्राच्या या तापमानावाढीबद्दलचा अहवाल CMFRI चे वैज्ञानिक डॉ. विवेकानंदन यांनी दिला होता. समुद्राची तापमान वाढ झाल्यामुळे ब्लू बॉटल जेली फिशचे पुनरुत्पादन जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होते. हे मोठ्या संख्येनं वाढलेले जेली फिश सध्या किनाऱ्यांवर येत आहेत."
'जेली फिशच्या अन्न पुरवठ्यात वाढ'
ब्लू बॉटल जेली फिशबद्दल बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) चे संचालक डॉ. दिपक आपटे यांनी बीबीसीशी चर्चा केली. आपटे सांगतात, "तापमान वाढीमुळे त्यांचं पुनरुत्पादन वाढतं ही खरी गोष्ट आहे. मात्र, हे त्यांच्या वाढीमागचं एकमेव कारण नाही. समुद्रातील डेब्रिज, कचरा यामुळे या ब्लू बॉटल जेली फिशना होणारा अन्नाचा पुरवठा वाढला आहे. तसंच त्यांना खाणाऱ्या शिकाऱ्यांची कमी झालेली संख्या हेही त्यांच्या वाढत्या संख्येचं एक कारण आहे."
अशा जलचरांमुळे काही वेगळे संकेत मिळत आहेत काय? या प्रश्नावर बोलताना आपटे सांगतात, "गेल्या काही वर्षांत यांच्यासह इतर प्रकारच्या जेली फिशचं प्रमाणही वाढलं आहे. याचा अर्थ सागरामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. हा अभ्यास झाल्याशिवाय यामागची मूळ कारणं पुढे येणार नाहीत. मोठ्या आणि बऱ्याच काळ चालणाऱ्या अशा संशोधनांचा सरकारी पातळीवरही अभाव दिसतो. यासाठी लवकरच धोरण आखलं गेलं पाहीजे."
'मुंबईचा कचरा आणि वाढती मासेमारी'
या जेली फिशना खाणारी समुद्री कासवं आणि इतर मासे यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती डॉ. विनय देशमुख यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "मुंबईच्या जवळील समुद्रात मासेमारी वाढली आहे. त्यामुळे एकंदरीत माशांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर कोळ्यांकडून फेकलेल्या जाळ्यांमुळे, जहाजांची धडक बसल्याने समुद्री कासवांचा वावरही कमी झाला आहे. हे मासे आणि कासवं या जेली फिशना अन्न म्हणून खातात. तसंच, मुंबईच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात खोलवर कचराच दिसून येतो. कचऱ्यामुळेही माशांची संख्या कमी झाली आहे. परिणामतः या जेली फिशच्या होणाऱ्या वाढीला मदत होत आहे."
जेली फिशचा मुक्काम वाढला
मुंबईच्या सागरी जीवनाचा अभ्यास करणारे आणि 'मरीन लाईफ ऑफ मुंबई'चे समन्वयक प्रदीप पाताडे यांनी याबद्दल बीबीसीशी बातचीत केली. यंदा हे जेली फिश किनाऱ्यांवर आल्यापासून त्यांचं निरीक्षण पाताडे करत आहेत.
पाताडे सांगतात, "यंदाच्या मोसमांत 20 जुलैला गिरगावच्या किनाऱ्यावर मला 4 ब्लू बॉटल जेली फिश दिसले. दरवर्षी हे जेलीफिश किनाऱ्यांवर येतात आणि किमान 3 ते 4 दिवस संपूर्ण मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. परंतु, यावेळी अजूनपर्यंत त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसत आहे. यात वाढच होत असून ते कमी झालेले दिसत नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
पाताडे पुढे सांगतात, "गेल्या शुक्रवारी अक्सा बीचवर 40 जणांना, गिरगावच्या किनाऱ्यावर 30 जणांना तर रविवारी गिरगाव, जुहू, अक्सा मिळून 30 हून अधिकांना या जेली फिशचा दंश झाला आहे. जेली फिशचा दंश होण्याच्या घटनाही दरवर्षी घडतात. अनेक जण जेली फिश वाळूत मृत पडले आहेत असं समजून त्यांना स्पर्श करायला जातात आणि त्यांचा दंश होतो. कारण, या जेली फिशला असलेल्या लांब तंतूमध्ये विषारी काटे असतात. त्याचा वापर ते भक्ष्य पकडण्यासाठी करतात. त्यामुळे किनाऱ्यावर ते दिसल्यास त्यांना स्पर्श करणं टाळलं पाहीजे."
जेली फिश कसे ओळखाल?
जेली फिशच्या रचनेबाबत बोलताना डॉ. देशमुख सांगतात, "ब्लू बॉटल जेली फिशचा सुरुवातीचा भाग हा पारदर्शक फुग्यासारखा असतो. या फुग्याच्या सहाय्याने ते पाण्यावर तरंगतात. त्याच्या खाली निळ्या रंगाचे छोटे आणि मोठे टेंटॅकल्स म्हणजेच तंतू असतात. या तंतूंचा छोटा पुंजकाच असतो. यातला मोठा तंतू 7-8 इंच वाढू शकतो. या दोरीवजा निळसर तंतूमध्ये निमॅटोसीड्स म्हणजेच काटे सदृश छोटे अवयव असतात. यात विषारी पेशी असतात. हे निमॅटोसीड्स जेली फिश आपलं भक्ष्य पकडण्यासाठी वापरतात. त्यातल्या विषामुळे भक्ष्याचा मृत्यू होतो."

फोटो स्रोत, Pradip Patade
मानवासाठी हे फार धोकादायक नसले तरी मानवी त्वचा संवेदनशील असल्यामुळे त्याने खूप वेदना होतात अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
काळजी काय घ्याल?
जेली फिशपासून सावध राहण्याचा इशारा मुंबई महापालिकेसह मरीन लाईफ ऑफ मुंबई या संस्थेनं मुंबईच्या किनाऱ्यांवर ठिकठिकाणी फलक लावून दिला आहे.
पाताडे याबाबत सांगतात, "सध्या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनी आणि मुंबईकरांनी वाळूत दिसणाऱ्या जेली फिशना स्पर्श करू नये. तसंच, एखाद्याला दंश झाल्यास त्यांनी त्यावर समुद्राचं खारं पाणी टाकावं आणि लगेच सरकारी हॉस्पिटल गाठावं. कारण, त्याचे त्वचेत रुतलेले काटे लवकर काढून टाकणं आवश्यक असतं. हा दंश झाल्यानंतर सूज येते आणि वेदनाही होतात. पण यामुळे घाबरुन जाऊ नये. जर, पाण्यात उभं असताना दंश झाला असेल तर लगेच पाण्याबाहेर यावं. अशावेळी पाण्यात अजून जेली फिश चावण्याची शक्यता असते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









