विराट आणि अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, हे आहे बाळाचे नाव

फोटो स्रोत, Twitter
भारतीय क्रिकेट संघाचा धमाकेदार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत.
विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना त्याने ही गोड बातमी दिली आहे.
'मला आणि अनुष्काला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे आणि वामिकाला लहान भाऊ झाला...'असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सोबतच मुलाचं नाव 'अकाय' असल्याचं सुद्धा त्यानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय.
15 फेब्रुवारी रोजी बाळाचा जन्म झाल्याचं विराटने सांगितलं आहे. 'आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आमच्या पाठीशी असू द्या', असं विराटने आपल्या चाहत्यांना म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गेले अनेक दिवस अनुष्का प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.
मात्र विराट आणि अनुष्कानं कधी या चर्चांना दुजोरा दिला नव्हता. आज विराट कोहलीने ट्विटरवरुन ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
2023 मध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकात विराट कोहलीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळाला होता.

याच विश्वचषकावेळीच एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतकांचा विक्रम आपल्या नावे करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता.
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मध्ये विराटने त्याचं पन्नासावं शतक झळकावून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला होता.
15 नोव्हेंबर 2023 ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराटने 106 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार लगावत शतकाला गवसणी घातली होती.
वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधात शतक करण्याआधी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकं केली होती.
बांगलादेशविरुद्ध नाबाद 103 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 101 धावा केल्या होत्या.
वर्ल्डकप स्पर्धांमध्ये विराट कोहलीने एकूण पाच शतकं झळकावली होती.
विराटने पहिलं शतक कधी केलं होतं?
18 ऑगस्ट 2008 रोजी कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच एकदिवसीय सामन्यांपासून झाली होती.
मात्र योगायोग असा की विराटने श्रीलंकेविरुद्धच डिसेंबर 2009 त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी पहिलं शतक केलं होतं. भारताकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पहिलं शतक करायला विराट कोहलीला पंधरा सामने थांबावं लागलं होतं.
श्रीलंकेने ठेवलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना विराटने त्याचं पहिलं शतक केलं होतं आणि आता पन्नास शतकानंतर विराटला 'चेज मास्टर' म्हणून अनेक क्रिकेटरसिकांनी मान्यता दिलेली आहे. त्याच सामन्यात गौतम गंभीरनेही शतक केलं होतं.
अनुष्का शर्मा केवळ अभिनेत्रीच नाही तर यशस्वी निर्माती
विराट आणि अनुष्का यांना पावर कपल म्हटलं जातं. कारण दोघेही जण स्वकर्तृत्वाने आपल्या क्षेत्रात पुढे आहेत. अनुष्का शर्माने शाहरूख खानसोबत चित्रपट करत सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रब ने बना दी जोडी या सुपरहिट चित्रपटानेच तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.

त्यानंतर बॅंड बाजा बारात, जब हॅरी मीट सेजल, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, पीके या चित्रपटात तिने काम केले आहे.
अनुष्का शर्मा ही चित्रपट निर्माती देखील आहे. NH10, परी, कला, बुलबुल यासारख्या चित्रपटांची निर्मिती तिच्या क्लीन स्लेट फिल्मस या कंपनीतर्फे करण्यात आली आहे.
पाताललोक या अॅमेझॉन प्राइमवरील वेबसीरिजची निर्मिती अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्मसतर्फे करण्यात आली होती.












