इस्रायल : नेतन्याहूंना सत्तेतून हटवण्याच्या उद्देशाने दोन कट्टर विरोधी नेते एकत्र कसे आले?

(डावीकडे) मध्यममार्गी विरोधी पक्षनेते याएल लापिड आणि (उजवीकडे) उजव्या विचारसरणीचे माजी पंतप्रधान नफताली बेनेट

फोटो स्रोत, Amir Levy/Getty Images

फोटो कॅप्शन, (डावीकडे) मध्यममार्गी विरोधी पक्षनेते याएल लापिड आणि (उजवीकडे) उजव्या विचारसरणीचे माजी पंतप्रधान नफताली बेनेट
    • Author, बीबीसी मॉनिटरिंग
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

इस्रायलमध्ये यावर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा पराभव करण्यासाठी दोन राजकीय पक्षांनी विलीनीकरण करून एक नवा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

उजव्या विचारसरणीचे माजी पंतप्रधान नफताली बेनेट आणि मध्यममार्गी विरोधी पक्षनेते याएर लापिड यांनी त्यांच्या पक्षांचं विलीनीकरण करून, 'याचाड' हा एक नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याचाडचा अर्थ होतो 'एकत्र'.

इस्रायलमधील वृत्तपत्रांमध्ये 27 एप्रिलला ही बातमी चर्चेत होती.

या निर्णयामुळे याचाड हा सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. तर बेनेट हे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मुख्य प्रतिस्पर्धी झाले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (डावीकडे) आणि माजी पंतप्रधान नफताली बेनेट

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (डावीकडे) आणि माजी पंतप्रधान नफताली बेनेट (संग्रहित फोटो)

इस्रायलमधील अनेक प्रसारमाध्यमांनी हे विलीनीकरण 'नाट्यमय' असल्याचं आणि त्यामागे नेतन्याहू यांना सत्तेतून हटवण्याचा हेतू असल्याचं सांगितलं. जवळपास सर्वच प्रमुख वृत्तपत्रांनी बेनेट आणि लापिड यांचे फोटो पहिल्या पानावर छापले.

याआधी देखील 2021 मध्ये नेतन्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी बेनेट आणि लापिड एकत्र आले होते. मात्र नेतन्याहू यांना सत्तेतून हटवण्याच्या एका समान उद्देशानं तयार झालेली त्यांची ही नाजूक आघाडी लवकरच संपुष्टात आली.

इस्रायलमधील प्रसारमाध्यमांमध्ये काय म्हटलं जातं आहे?

"आम्ही फक्त झायोनिस्ट पक्षांवरच विश्वास ठेवू. अरब पक्ष झायोनिस्ट नाहीत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही," असं बेनेट यांनी म्हटल्याचं वृत्त, 12 न्यूज या लोकप्रिय मध्यममार्गी चॅनलनं दिलं.

अलीकडच्या काही महिन्यांमधील निवडणूक प्रचार मोहिमा आणि प्रसारमाध्यमांवरील चर्चांमध्ये पॅलेस्टिनी पक्षांना आघाडी सरकारांमधून बाहेर ठेवण्याची मागणी, हा एक मुख्य बनला आहे.

हारेत्झ या उदारमतवादी वृत्तपत्रानुसार, इस्रायलमधील पुढील निवडणुकीची प्रक्रिया प्रभावीपणे आधीच सुरू झाली आहे.

"कायदेशीरदृष्ट्या निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे," असं या वृत्तपत्रानं लिहिलं आहे.

वृत्तात म्हटलं आहे की आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचं नफताली बेनेट आणि याएर लापिड यांनी आधी सांगितलं होतं. मात्र नंतर 'प्रत्यक्ष परिस्थितीच्या दबावा'खाली त्यांनी त्यांच्या भूमिकेत बदल केला.

येदिओत अहरोनोत च्या पहिल्या पानावर 'आम्ही दोन आहोत.'
फोटो कॅप्शन, येदिओत अहरोनोत च्या पहिल्या पानावर 'आम्ही दोन आहोत.'
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हारेत्झ या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, बेनेट यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली लवकर विलीनीकरण करण्याची भूमिका घेतली होती. ते म्हणाले की, त्यांना "उजव्या विचारसरणीकडून शक्य असलेलं प्रत्येक मत मिळवायचं आहे." वृत्तात म्हटलं आहे की, बेनेट म्हणाले, "मी जिंकण्यासाठी आलो आहे."

तर लापिड यांना सुरुवातीला वाटत होतं की आता हे करणं घाईचं ठरेल. बेंजामिन नेतन्याहू निवडणूक लढवणार की नाही आणि राजकीय परिस्थितीत काय बदल होतात, यासाठी त्यांना वाट पाहायची होती.

हारेत्झनं असंही म्हटलं आहे की संभाव्य आघाडी आता गॅडी आयसेनकोट यांच्या निर्णयाची वाट पाहते आहे. ते यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

उजवी विचारसरणी आणि नेतन्याहू यांचं समर्थक असलेल्या चॅनल 14 न्यूजनं या विलीनीकरणाला कमी महत्त्व दिलं. ते म्हणाले की लापिड आणि बेनेट यांचा हा राजकीय कारकीर्द वाचवण्याचा प्रयत्न आहे. एका भाष्यकारानं म्हटलं की सर्व्हेनुसार, त्यांच्या पक्षांना निवडणुकीत यश मिळणार नाही.

अर्थात, मुख्य प्रवाहातील अलीकडच्या सर्व्हेच्या उलट असा दावा आहे. या अलीकडच्या सर्व्हेमध्ये बेनेट यांचा पक्ष नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीचा सर्वात मोठा स्पर्धक पक्ष असल्याचं म्हटलं आहे.

बेनेट यांच्या जुन्या वक्तव्यांवरून वाद

या निर्णयानंतर सोशल मीडियावर देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तिथे युजर्स बेनेट यांची जुनी वक्तव्यं शेअर करत आहेत. या वक्तव्यांमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ते लापिड यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देणार नाहीत. हे त्यांच्या तत्वांच्या विरुद्ध आहे.

एक्स या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये बेनेट, लापिड यांना सांगताना दिसतात की कोणीही त्यांच्यासोबत जाऊ इच्छिणार नाही. हा व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या युजरनं लिहिलं आहे, "याप्रकारे त्यांना पुन्हा खोटं बोलताना पाहून वाईट वाटतं. त्यांच्यामध्ये क्षमता होती."

आणखी एका व्हीडिओमध्ये बेनेट यांच्या जुन्या वक्तव्यांचं संकलन शेअर करण्यात आलं आहे. यात ते स्वत:ला उजव्या विचारसरणीचे नेते म्हणवत आहेत आणि ते म्हणाले होते, "मी लापिड यांना पंतप्रधान होऊ देणार नाही."

बेनेट यांनी आधी, न्यू राईट पार्टी या अति राष्ट्रवादी पक्षाचं सह-नेतृत्व केलं होतं. त्याआधी त्यांनी ज्यूईश होम पार्टीचे नेतृत्व केलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन