फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, डॉ. ॲलेक्स जॉर्ज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(या लेखामध्ये आहारावर कठोर बंधनं घालण्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. खाण्याच्या सवयींशी संबंधित समस्या असण्याचा धोका असलेल्या लोकांना हे वाचून त्रास होऊ शकतो. तुम्हाला याबाबत चिंता वाटत असेल, तर मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे.)

कार्निव्होर डाएटमध्ये केवळ मांस आणि प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. यामध्ये भाज्या, फळं आणि धान्यं असे वनस्पतींपासून मिळणारे पदार्थ पूर्णपणे टाळले जातात किंवा लक्षणीयरीत्या कमी खाल्ले जातात.

सोशल मीडियावर या डाएटला मोठी पसंती मिळाली आहे. हा आहार घेतल्याने आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि फिटनेस सुधारतो, असा दावा अनेक लोक करतात.

'क्लिकबेट क्लिनिक' या कार्यक्रमात मी (डॉ. ॲलेक्स जॉर्ज), स्टेसी डूली आणि डॉ. निगहत आरिफ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आरोग्यविषयक दाव्यांची सत्यता पडताळून पाहतो. या कार्यक्रमाच्या एका भागात आम्ही कार्निव्होर डाएटबद्दलच्या (मांसाहार) दाव्यांचीही तपासणी केली आहे.

काही लोकांचा या जीवनशैलीवर खूप विश्वास आहे. परंतु, उपलब्ध पुराव्यांनुसार, हा आहार दीर्घकाळ घेतल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

1. कार्निव्होर डाएट म्हणजे काय? यात नेमकं काय खाल्लं जातं?

कार्निव्होर डाएटमध्ये मांस (विशेषतः लाल मांस), मासे आणि अंडी असे प्राणिजन्य पदार्थ खाल्ले जातात. काही जण या आहारात चीजसारखा दुग्धजन्य पदार्थचाही समावेश करतात.

इतर कडक किंवा प्रतिबंधात्मक आहारपद्धतींप्रमाणेच, यामध्येही अनेक प्रकारचे अन्नपदार्थ खाणं बंद केलं जातं. त्यामुळे शरीराला मिळणारी काही महत्त्वाची पोषकतत्त्वं कमी होतात. विशेषतः कर्बोदकं (कार्ब्स) आणि त्यासोबत मिळणारं फायबर (तंतुमय पदार्थ) शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात
फोटो कॅप्शन, डॉ. ॲलेक्स जॉर्ज

2. कार्निव्होर डाएटमुळे खरंच वजन कमी होतं?

या आहाराबद्दल केला जाणारा सर्वात सामान्य दावा म्हणजे, यामुळे वजन कमी होतं आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. काही लोकांनी हा आहार सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात वजन कमी झाल्याचं आणि पोट फुगण्याच्या समस्येत सुधारणा झाल्याचंही सांगितलं आहे.

परंतु, हे फायदे केवळ मांसाहारामुळेच होतात की आहारात केलेल्या इतर बदलांमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

3. लोक कार्निव्होर डाएट का करतात? इतर कारणं कोणती?

या आहारात उच्च प्रथिनांचं (हाय-प्रोटीन) प्रमाण जास्त असतं. सध्या अनेक लोक प्रथिनांना महत्त्व देतात. प्रामुख्याने फिटनेस आणि शरीराची ताकद (स्ट्रेंथ ट्रेनिंग) वाढवण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांचा जास्त कल आहे.

फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात

मी ऑनलाइन पाहिलेल्या काही व्हीडिओंमध्ये इन्फ्लुएन्सर्स पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होत असल्याचं सांगतात. काही संशोधनातूनही ही बाब समोर आली आहे. कार्निव्होर डाएटमुळे ही समस्या दूर होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. पण, या दाव्याला समर्थन देणारे वैद्यकीय अभ्यासाचे ठोस पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.

तरीही, असे मोठे दावे केले की लोकांचं लक्ष त्याकडे वेधलं जातं आणि हा आहार त्यांना अधिक आकर्षक वाटू लागतो.

4. जंक फूड खाणाऱ्यांसाठी कार्निव्होर डाएट फायदेशीर?

या डाएटचे किंवा आहारपद्धतीचे काही समर्थक म्हणतात की, आपण गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ (अल्ट्रा प्रोसेस्ड) खातो. कार्निव्होर डाएटमध्ये नैसर्गिक पदार्थ (केवळ प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा आहार) खाल्ले जात असल्याने, अशा खाण्याच्या सवयींवर तो चांगला पर्याय ठरू शकतो.

एक देश म्हणून आपण गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खात आहोत, हे मला मान्य आहे. परंतु, त्यावर उपाय म्हणून आधीचा आहार सोडून आणखी एका टोकाच्या आणि अत्यंत निर्बंधात्मक आहाराचा अवलंब करणे योग्य नाही.

फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात

सर्व प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करणं व्यवहार्य नाही. त्याचबरोबर, काय खाऊ नये यावरच लक्ष केंद्रित करणंही फारसं उपयुक्त ठरत नाही. त्याऐवजी आपल्या आहारात कोणते चांगले पदार्थ समाविष्ट करता येतील, याचा विचार करा. ताजं आणि कमी चरबीचं मांस, मासे, डाळी आणि टोफूसारख्या प्रथिनांचे शाकाहारी स्रोत, विविध प्रकारच्या भाज्या आणि कमी प्रक्रिया केलेली कर्बोदकं (प्रक्रिया न केलेले) असलेले पदार्थ आहारात घ्या.

तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचा भरपूर समावेश असेल, तर प्रक्रिया केलेले पदार्थ (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स-यूपीएफ) खाण्याचं प्रमाण आपोआप कमी होऊ शकतं.

5. कार्निव्होर डाएटमुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात का?

क्लिकबेट क्लिनिकमध्ये स्टेसीची भेट एडी ॲबेव आणि त्यांची मुलगी सेलिना यांच्याशी झाली.

एडी सोशल मीडियावर कार्निव्होर डाएटचा प्रचार करतात. या आहारामुळे त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या आरोग्यात कशी सुधारणा झाली, हे ते सांगतात. विशेषतः सेलिना सांगते की, हा आहार सुरू करण्यापूर्वी तिला सतत आजारी असल्यासारखं वाटायचं.

परंतु, एखाद्या व्यक्तीच्या अनुभवावरून सर्व लोकांच्या आरोग्याविषयक सल्ला देता येत नाही. त्यासाठी विविध अभ्यास, अनेक संशोधनांचा एकत्रित आढावा आणि उपलब्ध सर्व वैज्ञानिक पुरावे तपासून पाहावे लागतात.

फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात

लोक ज्या विविध आजारांवर हा आहार गुणकारी असल्याचा दावा करतात, ते आजार कार्निव्होर डाएटमुळे बरे होतात, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे सध्यातरी उपलब्ध नाहीत.

मग या आहारामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा कशी झाली? याचं एक कारण असं असू शकतं की, या आहारात काही विशिष्ट पदार्थ पूर्णपणे बंद (एलिमिनिशेन डाएट) केले जातात. त्यामुळे ग्लुटेन किंवा लॅक्टोजसारखे पदार्थ, ज्यांची काही लोकांना ॲलर्जी असते किंवा जे पचत नाहीत, ते खाणं आहारातून काढून टाकले जातात.

तुम्ही खात असलेल्या काही विशिष्ट पदार्थांमुळे त्रास होत असेल, तर ते पदार्थ काही काळासाठी खाणं बंद करणं उपयोगी ठरू शकतं. पण, त्यानंतर हे पदार्थ हळूहळू पुन्हा आहारात समाविष्ट करणं महत्त्वाचं आहे. यामुळे नेमक्या कोणत्या पदार्थामुळे त्रास होतो, हे समजतं. शिवाय, दीर्घकाळ आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचा समावेश करता येतो.

कार्निव्होर डाएटमधील अडचण अशी आहे की, यात बंद केलेले पदार्थ पुन्हा आहारात समाविष्ट केलेच जात नाहीत.

6. हृदयासाठी कोणते धोके आहेत?

लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त खाल्ल्याने आतड्यांचा कॅन्सर आणि इतर प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, असं अनेक वैज्ञानिक अभ्यासांतून समोर आलं आहे.

जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट (संतृप्त चरबी) असलेले पदार्थ खाल्ल्याने काही लोकांमध्ये एलडीएल म्हणजेच 'वाईट' कोलेस्टेरॉल वाढू शकतं. हृदयविकाराचा हा एक महत्त्वाचा धोका आहे. कारण यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू शकते. परिणामी, रक्तप्रवाह मंदावतो किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

7. कार्निव्होर डाएटमध्ये कोणत्या पोषक घटकांची कमतरता असते?

या आहारातून शरीराला भरपूर प्रथिने आणि चरबी (फॅट्स) मिळते. हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. पण यात कर्बोदकं आणि आहारातील फायबर कमी असतं. हे घटक प्रामुख्याने भाज्या आणि वनस्पतींपासूनच मिळतात.

जर तुमच्या आहारात फायबर आणि वनस्पतींपासून मिळणारे इतर सूक्ष्म पोषक घटक कमी असतील, तर कालांतराने शरीरात काही सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.

याचा रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो, त्वचेचं आरोग्य बिघडू शकतं. काही नव्या संशोधनांनुसार, याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची होऊ शकतो.

8. फक्त कार्निव्होर डाएटचा विचार करताय?

पुराव्यांनुसार, या प्रतिबंधात्मक किंवा मर्यादित आहारामुळे दीर्घकाळात आरोग्याचे धोके उद्भवू शकतात.

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ (यूपीएफ्स) खात आहात किंवा आहारात सकारात्मक बदल करायचे आहेत, तर भूमध्यसागरीय आहार (मेडिटेरेनियन डाएट) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या आहारात विविध प्रकारचे पदार्थ असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळण्याची शक्यता वाढते.

फक्त मांसाहार घेण्याबद्दल सतत विचारले जाणारे 8 प्रश्न, जाणून घ्या पुरावे काय सांगतात

डॉक्टर म्हणून मी प्रत्येक गोष्टीची बारकाईने, चिकित्सक दृष्टीने तपासणी करतो. कोणत्याही दाव्यावर लगेच विश्वास ठेवत नाही. त्याबद्दल स्वतः माहिती मिळवतो, संशोधन करतो आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे विचार करतो. कारण 30 सेकंदांच्या व्हीडिओमध्ये जे दिसतं, प्रत्यक्षात परिस्थिती तशीच असेल असंही नाही.

इंटरनेटवर एखाद्याने गोष्ट चांगली असल्याचं सांगितलं, म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. त्या व्यक्तीच्या दाव्यांची पडताळणी करा, चिकित्सा करा, त्यामागे कोणते वैज्ञानिक पुरावे आहेत आणि तज्ज्ञांचं त्याबाबत काय मत आहे, हे समजून घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)