तरुण शेतकरी मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू, आईलाही आला हृदयविकाराचा झटका

राहुल बेदरे आणि त्याचे वडील भीमराव बेदरे
फोटो कॅप्शन, राहुल बेदरे आणि त्याचे वडील भीमराव बेदरे
    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुलाने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीलाही हृदयविकाराचा धक्का बसला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या दुर्दैवी घटनेची सुरुवात राहुल बेदरे (वय 27) या तरुणाच्या आत्महत्येने झाली. सावरगाव येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.

भीमराव बेदरे यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते, ते उपचार घेत होते.

भीमराव त्यांच्याकडे असलेली चार एकर कोरडवाहू शेती करत असत. राहुल शेतीसह मिळेल ते काम करून वडिलांना हातभार लावत होता.

9 जून 2025 रोजी त्याने दिवसभर मित्रांसोबत ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर पेरणीसाठी खत आणि बी-बियाणे आणतो, असं सांगून तो घरातून बाहेर पडला.

मित्रांसोबत रोजंदारीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर शेतात जाऊन येतो, म्हणून तो गेला होता.

मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुलाच्या मृत्यूचा धक्का

आपल्या मुलाने घेतलेल्या या टोकाच्या पावलाने वडील भीमराव बेदरे (वय 60) यांना मोठा धक्का बसला.

मंगळवारी राहुलच्या अंत्यविधीनंतर घरी परतल्यानंतर भीमराव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बेदरे कुटुंबाचं घर
फोटो कॅप्शन, बेदरे कुटुंबाचं घर

दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं, मात्र मुलाच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला.

गुरुवारी, 12 जून रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलापाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ बेदरे कुटुंबीयांवर आली.

शोभाबाईंना पती-मुलाचे अंत्यदर्शनही घेता आलं नाही

पती भीमराव आणि मुलगा राहुल यांच्या अकाली निधनाचा धक्का पत्नी शोभाबाई बेदरे यांना असह्य झाला. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला असून, नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. एकाच कुटुंबातील दोघांच्या निधनाने सावरगाव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भीमराव यांनी आपल्या शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलींची लग्नं केली होती. आता मात्र, या दुहेरी आघाताने बेदरे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे.

राहुलचे वडील भीमराव बेदरे हे मागील काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. मुलगा राहुल याच्यावर घराची सर्व जबाबदारी आली होती. जेमतेम शेती असल्याने त्यातून फारसं उत्पन्न निघत नव्हतं.

त्यात वडिलांच्या उपचारासाठी खर्च होत असल्याने बँकेचे आणि खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते.

हे सगळं असह्य झाल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं राहुलचे नातेवाईक महेश बेदरे सांगतात.

राहुलची मोठी बहीण संगीता
फोटो कॅप्शन, राहुलची मोठी बहीण संगीता
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राहुलची मोठी बहीण संगीता सांगते की, "आम्ही दोन बहिणी आणि भाऊ राहुल अशी आम्ही तीन भावंडं होतो. आम्हा दोघींचे लग्न झालेले असून तो अविवाहित होता. वडील आजारी होते. आर्थिक परिस्थिती खराब होती. जेमतेम शेती आणि त्यात काही पिकत ही नव्हतं.

"आता पेरणीचा खर्च करायचं म्हणलं तरी पैसे नव्हते. तरी देखील उसनवारी करून तो पेरणीची लगबग करत होता. मात्र, या सगळ्यातून तो अस्वस्थ झाला होता. त्यादिवशी शेतात झोपला असेल म्हणून आम्ही लक्ष दिले नाही. मात्र, उशीर झाला तरी आला नाही म्हणून पाहिल्यास त्याने गळफास लावून घेतला होता. वडिलांना त्याचं जाणं सहन झालं नाही.

"त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. नंतर आईलाही झटका आला, सध्या स्थिर असली तरी ती धक्क्यात आहे.

तर गावचे सरपंच संपत भावे म्हणतात, ''नापिकी आणि कर्जामुळे राहुल तणावात होता. राहुलच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील गेले. शासनाने याची दखल घेत त्याचं कर्ज माफ करून कुटुंबीयांना आधार द्यावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, जेणेकरून शेतकरी असं टोकाचं पाऊल उचलणार नाही.''

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)