मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून विषारी इंजेक्शन दिलं, तरीही जिंवत; क्रिस्टा पाइकने 20 वर्षांपूर्वी मुलाखतीत काय सांगितलं होतं?

20 वर्षांपूर्वी, पत्रकार हेलन रॉबर्ट्स यांनी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या ख्रिस्टा पाइकची मुलाखत घेतली होती.
फोटो कॅप्शन, 20 वर्षांपूर्वी, पत्रकार हेलन रॉबर्ट्स यांनी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या ख्रिस्टा पाइकची मुलाखत घेतली होती.
    • Author, शर्ली बकलँड
    • Role, बीबीसी वेल्स
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

जवळपास दोन दशकांपूर्वी हेलन रॉबर्ट्स यांनी क्रिस्टा पाइकची भेट घेतली होती. त्यावेळी क्रिस्टा पाइक टेनेसीमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत होत्या.

कोलीन स्लेमरची निर्घृणपणे हत्या करणारी ही स्त्री नेमकी कशी व्यक्ती आहे, हे हेलन रॉबर्ट्स यांना समजून घ्यायचं होतं.

रॉबर्ट्स या एका वूमन्स लाईफस्टाईल मॅगझीनच्या रियल लाईफ एडिटर होत्या. त्यामुळेच त्या क्रिस्टा पाइकची मुलाखत घेत होत्या. त्यावेळी क्रिस्टा 30 वर्षांची होती आणि तिनं तिच्या शिक्षेची 11 वर्षे आधीच भोगली होती. त्यावेळी ती मृत्युदंडाची शिक्षा झालेली अमेरिकेतली सर्वांत तरुण महिला होती.

आता क्रिस्टा 50 वर्षांची आहे. तिला बऱ्याच मोठ्या काळाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी फाशी देण्यात येणार होती.

परंतु, पेंटोबार्बिटलचे दोन प्राणघातक डोस देऊनही ती वाचली आहे आणि तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या हेलन रॉबर्ट्स यांनी क्रिस्टा पाइकसोबतच्या त्या भेटीची आठवण सांगताना म्हटलंय की, एक पत्रकार आणि माणूस म्हणून तो अनुभव आजही त्यांच्या स्मरणात आहे.

"माझ्यासमोर बसलेली स्त्री आणि तिनं केलेला गुन्हा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा पाहाव्यात, हे समजणं मला काही वेळा कठीण जात होतं," असं रॉबर्ट्स सांगतात.

"मला असं वाटलं की या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आहेत. मी भेटलेली स्त्री इतका भयंकर हिंसाचार करू शकते, याची मी कल्पनाही करू शकत नव्हते," असं त्या म्हणाल्या.

जेव्हा हेलन रॉबर्ट्स क्रिस्टा पाइकला भेटल्या

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हेलन रॉबर्ट्स डिसेंबर 2006 मध्ये टेनेसीच्या महिलांसाठी असलेल्या हाय सिक्योरिटी जेलमध्ये दाखल झाल्या. हा तुरूंग आता डेब्रा के. जॉन्सन रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून ओळखला जातो. तुरुंगातील, विशेषतः हाय सिक्योरिटी जेलमध्ये जाण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता.

"मी यापूर्वी कधीही तुरुंगात गेले नव्हते, त्यामुळे मी खूप घाबरले होते. मुलाखत कशी होईल हे मला माहीती नव्हतं आणि मी थोडी घाबरले होते," असं रॉबर्ट्स सांगतात.

उत्तर वेल्समधील कॉनवे मध्ये राहणाऱ्या रॉबर्ट्स त्यावेळी 'मोर' मॅगझीनमध्ये काम करत होत्या आणि मुलाखतीसाठी अमेरिकेला गेल्या होत्या. सुरक्षा तपासणी आणि अनेक दरवाजे पार केल्यानंतर, त्या एका काचेच्या खिडकीतून क्रिस्टा पाइकला भेटल्या. त्या दोघींनीही स्पीकर सिस्टीमवरून संवाद साधला.

रॉबर्ट्स आणि पाइक यांच्या वयात फारसा फरक नव्हता. रॉबर्ट्स म्हणाल्या की, त्या कोणत्याही पूर्वग्रहदूषित कल्पना घेऊन मुलाखतीला गेल्या नव्हत्या, पण त्या एका "अत्यंत स्पष्टवक्त्या आणि कणखर" स्त्रीला भेटतील, असं त्यांना वाटत होतं.

मात्र, जिला ती भेटली, ती व्यक्ती तिच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

"तेव्हा मी सुमारे 25 वर्षांची होते. आमचं वय जवळपास सारखंच होतं आणि काही बाबतीत आम्हाला एकमेकींशी एक नातंही जाणवत होतं," असं रॉबर्ट्स सांगतात.

त्या म्हणाल्या की क्रिस्टा पाइक खूप छान कपडे घालून आली होती. तिचे कुरळे केससुद्धा काही प्रमाणात रॉबर्ट्सच्या केसांसारखेच होते. रॉबर्ट्स यांना वाटलं की या लहानसहान साधर्म्यामुळे त्या दोघींमध्ये एक सौहार्दपूर्ण नातं निर्माण झालं.

रॉबर्ट्स यांच्या मते, क्रिस्टा प्रेमळ स्वभावाची जाणवत होती आणि ती समोरच्याला खूश ठेवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आहे, असंही जाणवत होतं. ती वारंवार हसत असे, खिदळत असे आणि संभाषणादरम्यान ती समोरच्या व्यक्तीच्या हावभावांनाही समजून घेत असल्याचं दिसत होतं.

"तिला अस्वस्थ वाटावं, असं मला वाटत नव्हतं. काही मिनिटांनंतर, ती आमच्या थोडं आणखी जवळ येण्यासाठी तिच्या बाजूनं खिडकीच्या कठड्यावर चढली," असं त्या सांगतात.

"आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. हे तिच्याही लक्षात आलं होतं, आणि आम्हाला खूप काही बोलायचं होतं," असं रॉबर्ट्स सांगतात.

क्रिस्टा पाइकच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवरून आधीच एक मोठा कायदेशीर वाद सुरू होता (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, क्रिस्टा पाइकच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवरून आधीच एक मोठा कायदेशीर वाद सुरू होता (फाइल फोटो)

त्या म्हणाल्या की, "ती थेट मुद्द्यावर आली. तिनं बचावात्मक भूमिका घेतली नाही, अवघड प्रश्न टाळले नाहीत किंवा फाजील आडवळणानं बोलली नाही. खरं सांगायचं तर, तिनं माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी स्पष्टपणे आणि मोकळेपणानं दिली."

रॉबर्ट्स यांच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टा पाइक सतत त्यांच्या डोळ्यांत पाहत होती आणि संभाषणादरम्यान पूर्णपणे सहकार्य करत होती.

"ती प्रतिसाद देण्यास उत्सुक होती. काही वेळा ती अगदी सामान्य व्यक्तीसारखी वाटत होती," त्या सांगतात.

"मी तिला कोणत्याही द्वेष किंवा शत्रुत्वाच्या भावनेनं भेटले नाही. कदाचित तिलाही हे जाणवलं असेल की आमचं संभाषण अगदी शांतपणे होणार आहे," असं रॉबर्ट्स म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, "मला फक्त क्रिस्टा पाइकला एक स्त्री म्हणून भेटायचं होतं. मला तिचं आयुष्य, तिनं तो चुकीचा निर्णय का घेतला आणि तुरुंगात ती आपलं जीवन कसं जगत आहे, हे समजून घ्यायचं होतं."

1995 मध्ये, क्रिस्टा पाइक 18 वर्षांची होती, तेव्हा तिनं तिचा तत्कालीन प्रियकर टॅडरिल शिप याच्यासोबत मिळून 19 वर्षीय कोलीन स्लेमरला मारहाण केली, तिचा छळ केला आणि तिची हत्या केली.

ते तिघे समस्याग्रस्त किशोरवयीन मुलामुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या एका जॉब ट्रेनिंग कॅम्पमध्ये भेटले होते.

क्रिस्टा पाइकचा असा आरोप होता की स्लेमरनं तिचा अपमान केला होता आणि तिचा प्रियकर तिच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता.

नंतर कॅम्पमधील इतर दोन रहिवाशांनी न्यायालयात साक्ष दिली की, खून होण्यापूर्वी आणि नंतर क्रिस्टा पाइकनं त्या खुनाबद्दल बढाई मारली होती. त्यांनी असंही सांगितलं की, क्रिस्टानं त्यांना स्लेमरच्या कवटीचा एक तुकडा दाखवला होता.

1995 मध्ये, कोलीन स्लेमर नावाच्या शाळकरी मुलीचा निर्घृणपणे छळ करून खून करण्यात आला.
फोटो कॅप्शन, 1995 मध्ये, कोलीन स्लेमर नावाच्या शाळकरी मुलीचा निर्घृणपणे छळ करून खून करण्यात आला.

1996 मध्ये क्रिस्टा पाइकला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी, तिचा प्रियकर टॅडरिल शिप 17 वर्षांचा होता. त्याला पॅरोलच्या शक्यतेसह जन्मठेपेची शिक्षा झाली. तो अजूनही तुरुंगात आहे.

रॉबर्ट्स म्हणाल्या की, क्रिस्टा पाइकचं असं म्हणणं होतं की, खटल्यादरम्यान तिला या गोष्टीची अजिबातच समज नव्हती की तिच्यासोबत काय घडतंय. मात्र, इतर लोकांचं लक्ष तिच्याकडे आकर्षित होणं तिला आवडायचं. कारण, यापूर्वी तिला कधीही अशा प्रकारचं अटेन्शन मिळालं नव्हतं, असं त्या सांगतात.

खुनाच्या तपशिलांवर चर्चा करतानाही क्रिस्टा पाइकनं कोणताही संकोच दाखवला नाही.

"तिच्या चेहऱ्यावर किंवा आवाजात कोणताही वेगळा भाव नव्हता. ती त्याबद्दल अगदी साधेपणानं आणि सामान्यपणे बोलतात अगदी तसंच बोलत होती," असं रॉबर्ट्स म्हणाल्या.

त्यांनी सांगितलं की, तोपर्यंत क्रिस्टा पाइकनं मृत्युदंडाच्या कोठडीत आधीच 11 वर्षे घालवली होती. या काळात तिला एकांतात बराच वेळ मिळाला होता. या काळात तिनं आपल्या कृतींवर सखोल विचार केला होता आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.

रॉबर्ट्स यांच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टा तिच्या पूर्वीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल अशा प्रकारे बोलली, जणू आता ती एक वेगळीच व्यक्ती होती. क्रिस्टा पाइकनं सांगितलं की, कोलीनच्या हत्येच्या रात्री तिनं स्वतःवरील ताबा गमावला होता.

क्रिस्टाच्या शब्दांत सांगायचं झालं तर, "मला असं वाटत होतं की मी माझ्या शरीराच्या बाहेर आहे. मी काय करत होते हे मला कळत नव्हतं. जणू काही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं माझ्यावर ताबा मिळवला आहे."

क्रिस्टा पाइकनं रॉबर्ट्स यांना सांगितलं की तिला आपल्या कृतीचा तीव्र पश्चात्ताप होत आहे. पण, ती आता त्याबद्दल काहीही बोलली तरी त्या भयंकर घटनेमुळं झालेल्या नुकसानाची भरपाई होऊ शकणार नाहीये, याची तिला जाणीव आहे.

क्रिस्टा पाइकचं बालपण कसं होतं?

क्रिस्टा पाइक पश्चिम व्हर्जिनियाच्या दक्षिणेकडील बेकले या लहानशा गावात वाढली. तिचे आई-वडील, कॅरिसा हॅन्सेन आणि ग्लेन पाइक, दारूच्या व्यसनानं त्रस्त होते आणि त्यांनी आपल्या मुलीची पुरेशी काळजी घेतली नव्हती.

क्रिस्टा पाइकनं रॉबर्ट्सला सांगितलं की तिच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता होती. तिची आजी ही एकमेव व्यक्ती होती जिनं तिच्यावर प्रेम केलं. पण, पाइक 12 वर्षांची असताना कर्करोगामुळं आजीचंही निधन झालं.

या घटनेनंतर ती रागाने पेटून उठली आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.

"वयाच्या 11 व्या वर्षी तिच्यावर एका शेजाऱ्यानं बलात्कार केला. वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाला. एका अनोळखी व्यक्तीनं तिला जंगलात ओढून नेलं, असंही तिनं सांगितलं. तिच्या बालपणी आणि किशोरवयात तिला अनेकदा दुर्लक्ष आणि अत्याचाराचा सामना करावा लागला," असं रॉबर्ट्स म्हणाल्या.

पाइक एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जात राहिली. वयाच्या 18 व्या वर्षी, ती नॉक्सविल जॉब कॉर्प्समध्ये सामील झाली. ही तिच्यासाठी एक नवी सुरुवात ठरणार होती.

तिनं रॉबर्ट्सला सांगितलं होतं की नर्स होण्याचं तिचं स्वप्न होतं.

पाइकच्या वकिलांनी तिच्या फाशीला शेवटच्या क्षणी स्थगिती मिळावी या आशेनं 226 पानांची दयेची याचिका दाखल केली होती. मात्र, हे अपील फेटाळण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ज्ञांनीही फाशीला स्थगिती देण्याचं आवाहन केलं.

"अगदी शेवटपर्यंत तिच्या मनात आशा होती," रॉबर्ट्स म्हणाल्या.

त्यांच्या मते, पाइकला खात्री होती की कुणीतरी तिचं बालपण, मानसिक आरोग्य आणि त्याचा तिच्या आयुष्यातील निर्णयांवर झालेला परिणाम समजून घेईल आणि तिला मदत करेल.

"तिच्यासमोर फक्त दोनच पर्याय होते हे तिला माहीत होतं. ते म्हणजे मृत्यू किंवा जन्मठेप. पण तिला जन्मठेप आणि शांतपणे मृत्यू हवा होता," असे रॉबर्ट्स म्हणाल्या.

क्रिस्टा पाइकला तिच्या पालकांकडून दुर्लक्ष आणि छळाचा सामना करावा लागला (बालपणीचा फोटो)
फोटो कॅप्शन, क्रिस्टा पाइकला तिच्या पालकांकडून दुर्लक्ष आणि छळाचा सामना करावा लागला (बालपणीचा फोटो)

फाशीची शिक्षा जवळ आली आहे हे माहीत असूनही, रॉबर्ट्स यांनी गेल्या आठवड्याचं वर्णन "विचित्र आणि अविश्वसनीय" अशा शब्दात केलं.

त्या म्हणाल्या की, "बुधवारी, मी दिवसभर तिच्याच विचारात होते. तिच्यासोबत काय होत असेल, हा विचार सतत माझ्या मनात घोळत होता."

रॉबर्ट्स म्हणाल्या की, पाइकनं तिचं शेवटचं जेवण करणं नाकारलं होतं, अशा बातम्या त्यांनी वाचल्या होत्या.

त्या म्हणाली की, "त्यावेळी तिच्या मनात काय चाललं असेल, तिला कसं वाटत असेल आणि आपला मृत्यू होणार आहे हे माहीत असताना माणूस त्यासाठी स्वतःला कसं तयार करतो, याची मी कल्पनाही करू शकत नाही."

पाइक प्राणघातक इंजेक्शनमधून वाचला हे कळल्यावर रॉबर्ट्स यांना धक्काच बसला.

"हे एखादा भीतीदायक चित्रपट पाहण्यासारखं होतं," त्या सांगतात.

रॉबर्ट्स पुढे म्हणाल्या की, "मी या गोष्टी समजून घेऊ शकत नाहीये. हे खूपच अमानवीय स्वरूपाचं वाटतंय."

"विडंबना अशी आहे की सरकार तिला मारण्याचा प्रयत्न करत होतं आणि मग पुन्हा तिचा जीव वाचवण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आलं. हे सगळं प्रकरण आकलनापलीकडचं आहे," असं त्या म्हणाल्या.

पाइकनं रॉबर्ट्सचे आभार का मानले?

रॉबर्ट्स यांचा असा विश्वास आहे की, ख्रिस्टा पाइकचे खडतर बालपण हे तिच्या 1995 च्या गुन्ह्याला कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांपैकी एक होते.
फोटो कॅप्शन, रॉबर्ट्स यांचा असा विश्वास आहे की, ख्रिस्टा पाइकचे खडतर बालपण हे तिच्या 1995 च्या गुन्ह्याला कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांपैकी एक होते.

जेव्हा रॉबर्ट्सनं क्रिस्टा पाइकची मुलाखत घेतली, तेव्हा ती दिवसातून किमान 23 तास ​​तिच्या कोठडीत बंद असायची. काही दिवसांमध्ये, तिला फक्त एका तासासाठी फेरफटक मारण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी होती.

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये ती एकमेव महिला कैदी होती. त्यामुळे तिला इतर कैद्यांसोबत राहण्याची किंवा मिसळण्याची परवानगी नव्हती.

मात्र, रॉबर्ट्स यांच्या मते, पाइकनं स्वतःसाठी एक दिनचर्या ठरवून घेतली होती. पुस्तके वाचण्यात, दूरदर्शन पाहण्यात आणि मित्रांना पत्रं लिहिण्यातून त्याला दिलासा मिळत असे.

त्यांच्या भेटीनंतर लगेचच, रॉबर्ट्स यांना पाइककडून स्वत: हातानं तयार केलेलं कार्ड मिळालं, ज्यामध्ये मुलाखतीदरम्यानच्या त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले होते.

"मला आठवतंय, ते जांभळ्या रंगाचं फुलपाखराच्या आकाराचं कार्ड होतं," रॉबर्ट्स आठवून म्हणाल्या.

"त्याच्या आत तिनं लिहिलं होतं, 'माझ्याशी चांगलं वागल्याबद्दल, एक स्त्री म्हणून मला समजून घेतल्याबद्दल आणि माझा आदर केल्याबद्दल धन्यवाद.' तिनं फक्त एवढंच लिहिलं होतं."

"तो क्षण खूप भावनिक होता," असं त्या सांगतात.

2006 मध्ये क्रिस्टा पाइकला भेटल्यानंतर हेलन रॉबर्ट्स यांनी 'मोर' मासिकासाठी हा लेख लिहिला.
फोटो कॅप्शन, 2006 मध्ये क्रिस्टा पाइकला भेटल्यानंतर हेलन रॉबर्ट्स यांनी 'मोर' मासिकासाठी हा लेख लिहिला.

"मी क्रिस्टा पाइकबद्दल जे काही बोलले आहे, त्याद्वारे मी तिच्या गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीये," असं रॉबर्ट्स सांगतात.

त्या सांगतात की, "तिला तुरुंगातच असायला पाहिजे होतं. तिनं गुन्हा केला, एका तरुणीचा जीव घेतला आणि तिला त्याची शिक्षा व्हायलाच हवी होती."

मात्र, रॉबर्ट्स यांना वाटतं की एक प्रश्न नेहमीच त्यांच्या मनात येतो.

"तरीही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की, जर तिला गरजेच्या वेळी मदत मिळाली असती, तर ती जे करून बसली आहे, तेच तिनं केलं असतं का?" त्या सांगतात.

रॉबर्ट्स पुढे म्हणाल्या की, "मी भेटलेल्या त्या स्त्रीला विसरू शकत नाही. माझ्यासमोर बसलेल्या त्या स्त्रीसोबत जे नातं जुळलं, ज्या प्रकारे ती माझ्याशी बोलली आणि तिनं माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली, ते मी नाकारू शकत नाही."

ती म्हणाली की, "ती शेवटी एक माणूसच आहे. मी तिला भेटले असते आणि त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नसता, हे शक्यच नव्हतं."

रॉबर्ट्स यांच्या मते, पाइकला जाणीव झाली होती की तिनं आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे.

"मला वाटतं, तिला जाणीव झाली होती की तिनं आपलं आयुष्य वाया घालवलं आहे," त्या म्हणाल्या. "आणि मला वाटतं, तिला हेही माहीत होतं की ती तिच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी करू शकली असती, पण ती तसं करू शकली नाही."

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)