'नशेनं माझ्या 15 वर्षांच्या लेकराचा जीव घेतला', अल्पवयीन तरुण व्यसनाधीनतेकडे कसे वळताहेत?

फोटो स्रोत, kiran sakale
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"त्यानं नशा केली. नशा करुन त्यानं घरातल्या घरात गळफास घेतला."
परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आमची भेट दीपक शिंदे यांच्याशी झाली. दीपक शिंदे यांच्या 15 वर्षीय मुलानं जून महिन्यात आत्महत्या केली.
दीपक यांच्या मुलाला हार्डवेअरमधील एका वस्तूची नशा करण्याची सवय होती. परळी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.
दीपक शिंदे सांगतात, "कमीतकमी 30 % टक्के मुलं नशा करत्येत. रेल्वे पटरीकडं, रेल्वे कॉलनीकडं, तहसील नगरकडं, डंकिंन नगरकडं, सगळ्या एरियात नशा करणारी पोरं आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
परळीतल्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला नशेसाठी वापरण्यात येणारं साहित्य हमखास पडलेलं दिसतं. पण हे केवळ परळी या एका शहरापुरतं मर्यादित नाहीये.
छोट्याच नाही तर मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन तरुणांमधील व्यसनाधीनता हा प्रश्न अधिक गंभीर स्वरुप धारण करताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरच्या 'कॅनॉट' प्लेस या वर्दळीच्या भागातही आम्हाला नशेतली मुलं दिसून आली.
औषधी गोळ्यांपासून ते ड्रग्सपर्यंत
मराठवाड्यातील काही शिक्षकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, व्यसनाधीनतेची सुरुवात ही आकर्षणापोटी होते आणि मग नशेचा स्तर वाढत जातो.
कफ सिरप, औषधी गोळ्या, वेदनाशामक मलम, हुंगून नशा करता येईल असं द्रव्य, गुटखा, तंबाखू, सिगारेटपासून सुरू झालेलं हे व्यसन दारू, गांजा, ड्रग्सपर्यंत येऊन ठेपतं. याचं कारण सुरुवातीला नशेसाठी मिळणारं साहित्य सहज उपलब्ध होतंय.
छत्रपती संभाजीनगरमधील टपऱ्यांवर, किराणा दुकानांमध्ये हे साहित्य सहजपणे उपलब्ध असल्याचं दिसून येतं. स्थानिक भागात नशेसाठी लागणाऱ्या साहित्याला टोपण नावानं ओळखलं जातं. दुकानदाराला ते नाव सांगितलं की तो बरोबर ते साहित्य देतो.
छत्रपती संभाजीनगरमधील एका मैदानात भर दुपारी दहा ते बारा तरुण गांजाची नशा करत होते. यातल्या अनेकांना मिसरूडही फुटलेलं नव्हतं. मैदानावरील खड्ड्यात नशेच्या वस्तू जागोजागी पडलेल्या दिसल्या.

फोटो स्रोत, kiran sakale
शाळकरी मुलांमधील व्यसनाधीनता हा गंभीर प्रश्न बनल्याचं शिक्षक सांगतात.
त्यांच्या मते, व्यसन करण्याचा वयोगट 12 ते 13 वर्ष दिसायला लागलाय. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बॅग्जमध्ये नशेच्या वस्तू आढळून येत आहेत.
आपला मुलगा किंवा मुलगी व्यसन करते यावर पालकांना विश्वास बसत नाही. कालांतरानं पाल्याच्या वर्तनात बदल दिसायला लागला की पालक त्यांना उपचारासाठी घेऊन येतात, असं डॉक्टरांचं निरीक्षण आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी सांगतात, "एकाच घरातील 8 मुलं आमच्याकडे ॲडिक्ट होते. त्यातला एक मुलगा खूप व्हॉयलंट होत होता. त्याला आमच्याकडे उपचारासाठी आणलं. तेव्हा आम्ही त्याची हिस्ट्री पाहिली.
"मुलगा नीट झाला तेव्हा त्यानं कबुल केलं की, त्याला ही सवय वर्गामधी एका मुलानं लावली आणि मग आमच्या जॉईंट फॅमिलीत जी 6-7 मुलं आहेत तर त्या प्रत्येकाला ही सवय आहे असं त्या मुलानं सांगितलं."
'नशा करणं हे स्टेटस सिम्बॉल'
नशा करण्यासाठी अल्पवयीन तरुणांकडून मोकळी मैदानं, पडीक इमारती, रेल्वे स्टेशन्स अशा जागांचा वापर केला जातो. पण अल्पवयीन मुलं नशेकडे कशामुळे वळत आहेत? हा प्रश्न आहे.
क्राईम रिपोर्टर धनंजय अरबुने यांच्या मते, "आपण काहीतरी थ्रिल करावं, आपलं जीवन अतिशय संथ चाललंय त्यात काहीतरी सनसनी असावी, या उद्देशानं काही मुलं सुरुवातीला नशेकडे वळतात."
तर, अॅड. संगीता जाधव सांगतात, "व्यसनाधीनता ही एक साधारण कल्चरचा भाग म्हणून या तरुण किंवा पौगांडावस्थेतील तरुणांच्या जीवनपद्धतीमध्ये अंगभूत झालेली आहे."
नशा केली नाही तर मित्र आपल्याला 'कूल' समजत नाही किंवा कमी लेखतात, असंही काही उच्चभ्रू शाळेतल्या मुलींनी आमच्याशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, अंमली पदार्थांविषयीच्या चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाला सांगितलं की, "युवा पीढीमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन वाढतंय ही चिंतेची बाब आहे. शहरांमध्ये विशेषत: जिथं शाळा आणि महाविद्यालये आहेत, तिथल्या पानटपऱ्या किंवा ठेले यांच्यावर कारवाई करणं आणि लक्ष ठेवणं याचा प्रयत्न चालू आहे."

फोटो स्रोत, kiran sakale
अल्पवयीन तरुणांमधील व्यसनाधीनतेचा हा रिपोर्ट करत असताना आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील एका अल्पवयीन तरुणाला भेटलो. त्याला दारुसहित इतर अंमली पदार्थांचं व्यसन करण्याची सवय आहे.
आमच्याशी बोलताना तो म्हटला की, जास्तीत जास्त 2-3 दिवस तो नशा न करता राहू शकता. 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला तर मात्र त्याला इतरांना मारहाण करण्याची, तोडफोड करण्याची इच्छा निर्माण होते. पण सगळ्यात भयंकर म्हणजे, नशेसाठी किंवा अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तू पैसे कुठून आणतो, असं ज्यावेळेस आम्ही त्याला विचारलं, त्यावेळेस त्याचं उत्तर होतं की त्यासाठी तो चोऱ्या करतो.
क्राईम रिपोर्टर धनंजय अरबुने म्हणतात, "नशेचं साहित्य जोपर्यंत सहजपणे उपलब्ध होतं, तोपर्यंत क्राईम या बाबींना शिवत नाही. पण एकदा का नशा करण्यासाठीच्या वस्तू उपलब्धतेसाठीचा पैसा कमी पडायला लागला, एक-दोन-तीन मित्र असे मिळून छोट्या चोऱ्या करायला लागतात. बॅग पळवणं, पर्स पळवणं, मोबाईल चोरणं, अशा चोऱ्या ते करतात."
'जग सगळं माझ्याविरोधात आहे'
व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर परिणाम होतोय.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मेराज कादरी सांगतात, "मुलांच्या कामामध्ये अचानक डिस्टर्बन्स होतो. त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. झोप कमी होऊन जाते. चीडचीडपणा वाढून जातो. भूक कमी होऊन जाते, खूप राग येतो. कधीकधी त्यांच्या हातून गुन्हाही घडून जातो."
"कानात आवाज सुरू होऊन जातो. भास सुरू होतात, की जग सगळं माझ्याविरोधात आहे. माझ्याविरोधात प्लॅनिंग करताहेत लोकं. दोन लोक बोलले की त्यांना वाटतं आपल्याबद्दलच बोलताहेत," कादरी पुढे सांगतात.

फोटो स्रोत, kiran sakale
नशेखोर तरुणांमुळे सामाजिक सुरक्षेचा विशेषत: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.
छत्रपती संभाजीनगरमधील शारदा बाहेकर नोकरीनिमित्त दररोज बाहेर पडतात.
शारदा सांगतात, "रस्त्यानं येताना-जाताना लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्व मुलं नशा करताना आढळतात. जाताना-येताना एक महिला म्हणून असुरक्षित वाटतं. कारण ती मुलं जाताना-येताना एनीटाईम बसलेली असतात चौकांमध्ये आणि नशा करतात. सकाळी जो बसलेला आहे, तो संध्याकाळपर्यंत बसलेलाच असतो."
नशेमुळे उद्भवणारे सामाजिक प्रश्न
अल्पवयीन दिव्यांग मुलांनाही नशेला लावण्याचे प्रकार घडत असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे.
यामिनी काळे या छत्रपती संभाजीनगरमधील विशेष शिक्षिका आहेत. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
यामिनी काळे सांगतात, "परिस्थितीमुळे दिव्यांग मुलांचे आई-वडील दोघेही कामावर जातात आणि ही मुलं शाळाबाह्य राहतात. शिवाय या मुलांना कुणीही सांभाळायला तयार नसतं. मग ही मुलं दिवसभर गल्लीबोळात किंवा आसपासच्या परिसरात फिरतात. अशावेळेस त्यांना व्यसनाची चटक लावून त्यांच्याकडून विविध पद्धतीची कामं करुन घेतली जातात."

फोटो स्रोत, kiran sakale
परिसरात व्यसनाधीन तरुण असल्यास सुरक्षेच्या धाकापोटी मुलींचे लग्न लवकर म्हणजेच अगदी दहावी-अकरावीत करुन टाकण्यास प्राधान्य दिलं जातं, असं घरकाम करणाऱ्या महिलांनी आम्हाला सांगितलं.
अशास्थितीत स्थानिक प्रशासनाकडून अंमली पदार्थांचं सेवन व विक्री यावर निर्बंध घालण्यासाठी आणि अल्पवयीन तरुणांना नशा करण्यापासून रोखण्यासाठी काय पावलं उचलली जाताहेत?
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सांगतात, "अंमली पदार्थ विरोधी कारवाया करण्यासाठी अँटी-नार्कोटिक्स सेल स्थापन करण्यात आलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि स्वतंत्र अंमलदार दिलेले आहेत.
"या पूर्ण वर्षभरात फक्त एनडीपीएसचे जवळपास 324 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये 410 आरोपींना अटक केलेली आहे. आणि 90 लाखापेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. वेळोवेळी आमचे स्पेशल ड्राईव्ह्ज सुरू आहेत."

फोटो स्रोत, kiran sakale
"शाळा-कॉलेजेस-वसतिगृह या ठिकाणी आम्ही अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे कार्यक्रम विद्यार्थी आणि लोकांमध्ये वेळोवेळी राबवलेले आहेत. जे एनडीपीएसचे गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यात आम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज दोन्ही तपासून जे मूळ आरोपी आहेत तिथपर्यंत पोहचलेलो आहोत," स्वामी पुढे सांगतात.
ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांची संख्या झाली दुप्पट
संभाजीनगरमध्ये नुकतंच एका कारवाईत पोलिसांनी 2 किलो 473 ग्रॅम वजनाचं आणि 1 कोटी 23 लाख रुपये इतक्या किंमतीचं मेफेड्रॉन (MD) ड्रग्ज जप्त केलंय. याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
औषधी गोळ्या आणि इतर अंमली पदार्थांची वाहतूक ट्रॅव्हल्समधून होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर याबाबत एकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचंही पोलिसांनी आम्हाला सांगितलं.
दरम्यान, अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात 'मकोका'अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासाठीचं विधेयक सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मांडलं जाणार असून, ड्रग्ससंदर्भातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं देशभरातील अंमली पदार्थांच्या वापराचं प्रमाण समजून घेण्यासाठी एक सखोल राष्ट्रीय सर्वेक्षण केलं होतं, ज्याचा अहवाल 2019 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.
त्यानुसार, भारतात 10 ते 17 या वयोगटातील दारूच्या वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 30 लाख, गांजा वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 20 लाख, ओपियॉईड्स वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 40 लाख, सिडेटिव्ह वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 20 लाख, इनहेलंट वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 30 लाख, तर कोकेन वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 2 लाख एवढी होती.
The Narcotic Drugs & Psychotropic Substances Act या कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणांची संख्या 2018 मध्ये 230, 2019 मध्ये 252, 2020 मध्ये 272, 2021 मध्ये 411, तर 2022 मध्ये 464 एवढी होती. म्हणजेच ही संख्या भारतात पाच वर्षांत दुप्पट झाली आहे.
'तुमचं लेकरू गमावू नका'
शाळा आणि महाविद्यालयांत सायकोट्रॉपिक तसंच नार्कोटिक्स ड्रग्सची उपलब्धता रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. यात 'या' अशा ड्रग्सच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.
याशिवाय, देशभरात 'नशा मुक्त भारत अभियान' राबवलं जात आहे. व्यसनमुक्तीसाठी 14446 ही टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आलीय. या हेल्पलाईनद्वारे मदत मागणाऱ्या व्यक्तींना प्राथमिक समुपदेशन आणि इतर सेवा प्रदान केली जाते.

फोटो स्रोत, nmba.dosje.gov.in
जिथं पालकांचं दुर्लक्ष होतंय, तिथं मुलं नशा करताना दिसताहेत, हे वास्तव अनेक उदाहरणांमधून पुढे येतंय. मग यात गरीब, श्रीमंत असा कोणताही दुजाभाव नसल्याचं जाणकार सांगतात.
ज्या दीपक शिंदेंनी आपला मुलगा गमावलाय, ते म्हणतात, "माझी इतर पालकांना एवढी विनंती आहे की आपल्या लेकरायला सांभाळा आणि व्यसनापासून दूर ठेवा. लेकराची काळजी घ्या. मी माझं लेकरू गमावलं, तुम्ही तुमचं गमावू नका."

फोटो स्रोत, kiran sakale
आनंद मिळवण्यासाठी किंवा दु:ख दूर करण्यासाठी नशा हा पर्याय नाही, तसंच नशा करणं हे फॅशन किंवा स्टेटस सिम्बॉलही नाही, हे तरुणांच्या लक्षात आणून देणं गरजेचं असल्याचं शिक्षक सांगतात.
टीबी किंवा एड्सप्रमाणे व्यसनाधीनेच्या दुष्परिणामांबाबत सरकारी पातळीवरुन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तरुणांनी नशेपायी उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी 'से नो टू द फर्स्ट टाईम' म्हणजे पहिल्यांदाच नशेला नाही म्हणणं आणि पालकांनी आपलं पाल्य आणि त्यांच्या शिक्षकांसोबत सतत संवाद साधत राहणं, हाच उत्तम पर्याय असल्याचं जाणकारांचं मत आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारणांमध्ये व्यसनाधीनता हे एक मुख्य कारण म्हटलं जातं. त्यामुळे सरकारी यंत्रणांसमोर गुन्ह्यांचा दर कमी करण्यासाठी नशेखोरी रोखणं हे मोठं आव्हान आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











