किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर अटकेत, तपासात धक्कादायक माहिती आली समोर?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
सावकारी कर्जात अडकलेल्या एका शेतकऱ्याने किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. कृष्णाला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यानं स्वतःची किडनीही विकली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
डॉ. कृष्णाला व्यवसायात नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यानं स्वतः सोशल मीडियावर सर्च करून संपर्क केला होता. तसेच कंबोडियाच्या त्याच हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यानं स्वत:ची किडनी विकली आहे.
तो किडनी विक्रीसाठी एजंट म्हणून काम करत होता. त्यानं आतापर्यंत 10-12 लोकांना कंबोडियाच्या मिल्ट्री हॉस्पीटलमध्ये किडनी विक्रीसाठी पाठवले आहेत.
यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
काय घडलं?
रोशन कुळे असं 36 वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील मिन्थूर या गावी राहतो.
आपण सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलो असून त्यासाठी कंबोडिया या देशात जाऊन किडनी विकली असा आरोप शेतकऱ्याने केला.
त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी मिन्थूर येथील त्याच्या घरी पोहचलो.
यावेळी घरी पोलीस सुद्धा उपस्थित होते. त्याला बोलण्यासाठी आम्ही विनंती केली. पण पोलीस तपास करत आहेत मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही असं म्हणत त्यानं बोलायला नकार दिला.
पण त्याच्या वडिलांनी मात्र सावकारांचा कसा त्रास होता याबद्दल सांगितलं.
रोशन यांचे वडील शिवदास कुळे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले की, "माझ्या मुलाचा दुधाचा धंदा होता. पण कोरोना काळात आमचा धंदा डबघाईला आला. त्यानंतर लंपी आजारानं 6 गायी वारल्या.
गायीवर उपचार करण्यासाठी 2 सावकाराकडून प्रत्येकी 50 हजार असे एक लाख रुपयांचे कर्ज उचलले. ही घटना 2021 मध्ये घडली.
"पण या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतले. ब्रह्मपुरीत 6 सावरकरांची टोळी आहे. ते एकमेकांकडून कर्ज घेऊन परतफेड करायला सांगायचे."
सावकार घरी येऊन दमदाटी करायचे, शिव्या द्यायचे आणि मारायची धमकी द्यायचे. तसेच रोशन बँक ऑफ इंडिया मध्ये बिजनेस करसपॉन्डन्स म्हणून काम करायचा.
तिथे जाऊन सुद्धा कर्जासाठी शिवीगाळ करायचे. त्यामुळं त्याने जॉब सोडला असेही आरोप शेतकऱ्याचे वडील शिवदास यांनी केले आहेत.

एफआयआरनुसार, 1 लाख रुपये कर्जाचा बोझा 50 लाख रुपयांपर्यंत पोहचला. यासाठी शेतकऱ्याने शेती विकली. पाऊण एकर शेती सावकाराच्या नावाने करून दिली.
घरातील 6 तोळे सोनं विकलं. पण तरीही कर्ज पूर्ण झालं नाही. त्यामुळे स्वतःची किडनी विकायचं ठरवलं. आपण कंबोडिया या देशात जाऊन 8 लाख रुपयांत किडनी विकली.
"सावकारांनी किडनी विकून पैसे दे असं सांगितलं होतं. त्यामुळे मी किडनी विकली," असा आरोप रोशन कुळे या शेतकऱ्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सध्या 6 सावकारांना अटक केली आहे. मनिष पुरुषोत्तम घाटबांधे, किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदिप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, सत्यवान रामरतन बोरकर असे आरोपी सावकारांचे नाव असून त्यांच्यावर अवैध सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांना सावकार आणि शेतकऱ्यांमध्ये काही व्यवहार झाल्याचे पुरावे सुद्धा मिळाले आहेत.
या आरोपींना ब्रह्मपुरी कोर्टात हजर केले असता 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
डाव्या बाजूला किडनी नाही, वैद्यकीय अहवालातून स्पष्ट
स्थानिक माध्यमांना दिलेल्या व्हिडिओमध्ये शेतकरी रोशन कुळे सांगतात की सावकारी कर्जामुळे मी माझी किडनी विकली. 4 महिन्यापासून न्याय मागत आहे. पण कोणी तक्रार घेत नाही.
"मला फक्त माझे पैसे परत द्या," एवढीच त्यांची मागणी होती.
"आम्ही तक्रार दाखल करायला लावली आणि आता त्यानुसार तपास सुरू आहे," असे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बीबीसी मराठी सोबत बोलताना सांगितलं.
त्याने खरंच किडनी विकली का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याची बुधवारी 17 डिसेंबरला वैद्यकीय चाचणी केली.
यामध्ये त्याला डाव्या बाजूची किडनी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने चेन्नईतील एका डॉक्टरचं नाव घेतलं असून त्यानं किडनी विकायला मदत केल्याचं म्हटलं आहे.
तो डॉक्टर रोशन यांना कंबोडिया पर्यंत घेऊन गेला. पण आता त्या डॉक्टरची खरंच यामध्ये काही भूमिका आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.
तसेच त्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली की त्याच्या वैयक्तिक कामासाठी विकली? यामध्ये सावकाराचा काही दोष आहे का? किडनी विकण्याचे कुठले रॅकेट अस्तित्वात आहे का?
या रॅकेट मार्फत किडनी विकली गेलीय का? या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत अशीही माहिती सुदर्शन यांनी दिली.
आरोपीच्या नातेवाईकांचं म्हणणं काय आहे?
पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपीपैकी आम्ही संजय बल्लारपुरे यांच्या पत्नी सपना बल्लारपुरे यांना भेटलो.
त्या म्हणाल्या, "माझा नवरा बीअर शॉप चालवतो. कोणाला गरज असेल तर पैसे देतो. पण व्याजाने पैसे देत नाही. या रोशन नावाच्या व्यक्तीला त्यांनी पैसे दिले नव्हते. आरोपींमध्ये जे इतर लोक आहेत ते माझ्या नवऱ्याच्या दुकानात येईन बसायचे."
म्हणून त्यांचं सुद्धा नाव यात फसवलं आहे, असं सपना म्हणाल्या.
इतर आरोपींच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती आल्यावर अपडेट करण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











