'आधी सिगारेट आणि दारूची दुकानं बंद करा', असं खडसावून सांगणाऱ्या मुस्कान शर्मानं कसा जिंकला सौंदर्यवतीचा किताब?

 मुस्कान शर्मा तिच्या आईसोबत.

फोटो स्रोत, Muskan Sharma

फोटो कॅप्शन, मिस ऋषिकेश 2025, मुस्कान शर्मा तिच्या आईसोबत.
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुस्कान शर्माच्या कपड्यांवर, पोशाखावर वक्तव्यं करणाऱ्या पुरुषांचा तिनं निर्धारानं सामना केला. त्यानंतर तिनं फक्त लोकांची मनंच जिंकली नाहीत, तर एक सौंदर्य स्पर्धा देखील जिंकली.

उत्तराखंडच्या 23 वर्षांच्या मुस्कान शर्मानं गेल्या आठवड्यात 'मिस ऋषिकेश 2025' चा किताब जिंकला होता.

ती बीबीसीला म्हणाली, "भलेही ही स्थानिक पातळीवर छोटी स्पर्धा होती. मात्र माझ्यासाठी ती मिस युनिव्हर्सची स्पर्धा जिंकण्यासारखी होती."

ती मिस ऋषिकेश झाल्यावर भारतभर चर्चेत आली. यामागचं कारण होतं 4 ऑक्टोबरची घटना.

या स्पर्धेची तालीम सुरू असताना एका व्यक्तीनं मुस्कानच्या पोशाखावर वक्तव्यं केली होती.

मुस्कानला शालेय दिवसांपासूनच मॉडेल व्हायचं होतं आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा होता.

मुस्कान म्हणाली, "लंच ब्रेकमध्ये आम्ही बसलो होतो, बोलत होतो. त्याचवेळेस काहीजण आत आले."

या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमध्ये राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटनेचे जिल्हा प्रमुख राघवेंद्र भटनागर, मुस्कान आणि इतर स्पर्धकांनी घातलेल्या स्कर्ट आणि पाश्चात्य फॅशनच्या कपड्यांबाबत आक्षेप घेताना दिसत आहेत.

'आधी सिगारेट आणि दारूची दुकानं बंद करा'

व्हीडिओमध्ये भटनागर म्हणत आहेत, "मॉडेलिंग संपलं आहे. घरी जा. हे उत्तराखंडच्या संस्कृतीच्या विरोधात आहे."

यावर मुस्काननं रोखठोक उत्तर दिलं, "मग, ज्या दुकानांमध्ये हे कपडे (वेस्टर्न कपडे) विकले जातात, ती आधी बंद करत नाही?"

आत आलेल्या लोकांना मुस्कान म्हणाली की महिलांच्या कपड्यांपेक्षा वाईट असलेल्या गोष्टींवर तुम्ही तुमची ऊर्जा खर्च केली पाहिजे. मद्यपान आणि धूम्रपानासारख्या समाजातील वाईट गोष्टी तुम्ही थांबवल्या पाहिजेत.

मुस्कान म्हणाली, "बाहेर सिगारेट आणि दारूचं दुकान आहे. आधी ते बंद करा, मग मी हे कपडे घालणं बंद करेन."

मुस्कान इतर स्पर्धकांसमवेत

फोटो स्रोत, Muskan Sharma

फोटो कॅप्शन, मुस्कानचं म्हणणं आहे की तिचं कुटुंब नेहमीच तिच्या पाठीशी उभं राहिलं आहे.

यावर भटनागर म्हणाले की, काय करायचं आहे, हे मला शिकवू नका.

त्यावर मुस्कान म्हणाली, "जर तुम्हाला तुमची आवड जोपासण्याचा अधिकार असेल, तर तो आम्हालादेखील आहे. तुमचं मत जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आमचं मत देखील महत्त्वाचं आहे."

वाद वाढत गेल्यावर इतर स्पर्धक आणि आयोजकदेखील मुस्कानच्या पाठीशी उभे राहिले. शेवटी हॉटेलच्या व्यवस्थापकांनी भटनागर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना तिथून बाहेर काढलं. या लोकांनी कार्यक्रम थांबवण्याची धमकी दिली होती.

मिस युनिव्हर्स जिंकल्याची भावना

मुस्कान म्हणते की, राघवेंद्र भटनागर यांना देण्यात आलेले उत्तर ही त्यांची 'अगदी सहज स्वाभाविक प्रतिक्रिया' होती.

मुस्कान म्हणाली, "मला वाटलं, माझ्या डोळ्यांदेखत माझ्या स्वप्नांच्या चुराडा होतो आहे. त्यावेळेस माझ्या मनात फक्त एक प्रश्न येत होता की ही स्पर्धा होईल का? मला रॅम्पवर चालण्याची संधी मिळेल का? की माझी सर्व मेहनत वाया जाईल?"

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम झाला आणि मुस्कान शर्मानं 'मिस ऋषिकेश 2025' चा किताब जिंकला.

मुस्कान म्हणाली, "जेव्हा माझं नाव जाहीर करण्यात आलं, तेव्हा पहिले तीन सेकंद तर मी आश्चर्यचकितच झाले."

ती म्हणाली, "मात्र नंतर खूप आनंद झाला की मी स्वत:साठी आवाज उठवला आणि जिंकलीदेखील. हा माझ्यासाठी दुहेरी विजय होता. ही एका छोट्या शहरातील छोटी स्पर्धा होती. मात्र ती जिंकल्यावर मला मिस युनिव्हर्ससारखं वाटलं."

ग्राफिक कार्ड

मुस्कान म्हणाली की ऋषिकेशमध्ये महिलांच्या कपड्यांवरील अशी वक्तव्यं किंवा आक्षेप ऐकायला मिळत नाही.

हिमालयाच्या पायथ्याशी आणि गंगेच्या किनाऱ्यावर हे शहर वसलेलं आहे. ऋषिकेश तिथले आश्रम, योग आणि ध्यान केंद्रांसाठी प्रसिद्ध आहे. ते एक पवित्र हिंदू स्थळ मानलं जातं. तिथे दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक आणि यात्रेकरू येतात.

बीटल्स बँडच्या चाहत्यांसाठीदेखील ही जागा विशेष महत्त्वाची आहे. कारण 1968 मध्ये 'फॅब फोर' इथेच एका आश्रमात अनेक आठवडे राहिले होते.

मुस्कान म्हणाली, "इथे परदेशी पर्यटक नेहमीच पाश्चात्य कपड्यांमध्ये दिसतात आणि कोणालाही काहीही आक्षेप नसतो."

आई-वडिलांचा पाठिंबा

सौंदर्य स्पर्धा महिलांकडे एखाद्या वस्तूसारखं पाहतात आणि त्यांच्याबद्दलच्या जुन्या धारणांना प्रोत्साहन देतात, अशी टीका जगभरात सौंदर्य स्पर्धांवर होत आली आहे.

मात्र, भारतात 1994 पासून या स्पर्धांची लोकप्रियता कायम आहे. याचवर्षी सुष्मिता सेननं मिस युनिव्हर्सचा आणि ऐश्वर्या रायनं मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

या दोघीही नंतर बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री झाल्या. त्यांनी पुढील पिढ्यांना या क्षेत्रात जाण्याची प्रेरणा दिली.

मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर सुष्मिता सेन इतर स्पर्धकांसमवेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर सुष्मिता सेन.

नंतरच्या वर्षांमध्ये प्रियंका चोप्रा, डायना हेडन आणि लारा दत्ता या सौंदर्य स्पर्धांच्या विजेत्या झाल्या. त्यांच्या यशानं भारतीय तरुणी सौंदर्य स्पर्धा जिंकू शकतात, विशेषकरून छोट्या शहरातील तरुणींना यात 'यश कमावता येऊ शकतं' हा विश्वास आणखी दृढ झाला.

मुस्कान म्हणाली की तिचे आई-वडील नेहमीच तिच्या पाठीशी उभे राहिले. व्हायरल झालेल्या व्हीडिओत ती भटनागर यांना सांगते आहे की "जर माझ्या आई-वडिलांना माझ्या कपड्यांबद्दल आक्षेप नाही, तर त्यावर वक्तव्यं करण्याचा अधिकार तुम्हाला कसा काय आहे?"

महिलांच्या पेहरावाला असणारा विरोध नवा नाही

भारतात पाश्चात्य कपड्यांना असलेला विरोध नवा नाही. इथे अनेकदा महिलांच्या पेहरावावरून वाद होत असतात. पितृसत्ताक समाजव्यवस्थेत अनेकजण पाश्चात्य कपडे, विशेषकरून जीन्सकडे तरुणांचं 'नैतिक अध:पतन' म्हणून पाहतात.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी ड्रेस कोड निश्चित केले जातात. अनेकदा गावातील वडिलधारे संपूर्ण समुदायातील मुलींना जीन्स घालण्यास बंदी घालतात.

बीबीसीनं आधीदेखील, मुली आणि महिलांचा त्यांच्या कपड्यांवरून अपमान केल्याच्या अनेक घटनांचं आधीदेखील वृत्तांकन केलं आहे.

शाळेतील मुली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींच्या पोशाखाबद्दल नियम आहेत.

काही वर्षांपूर्वी आम्ही आसाममधील एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीची बातमी दिली होती.

ती विद्यार्थिनी शॉर्ट्स घालून परीक्षा देण्यास आली होती आणि शिक्षकांनी विरोध केल्यावर तिला तिच्या पायावर पडदे गुंडाळण्यास भाग पाडण्यात आलं होतं.

आणखी एका प्रकरणात, एका किशोरवयीन मुलीनं जीन्स घातल्यामुळे तिच्या नाईवाईकांनी कथितरित्या तिची हत्या केली होती.

द हिंदुस्तान टाइम्सच्या कॉलम लेखिका नमिता भंडारे लिहितात की ऋषिकेशमध्ये मिस्टर ऋषिकेश स्पर्धेवर कोणालाही काहीच आक्षेप नसतो. तिथेदेखील स्पर्धकांनी अंगावर खूपच कमी कपडे घातलेले असतात.

मुस्कान शर्मा इतर स्पर्धकांबरोबर फोटो घेत असताना

फोटो स्रोत, Muskan Sharma

फोटो कॅप्शन, मुस्कान शर्मा इतर स्पर्धकांबरोबर फोटो घेत असताना.

त्यांनी लिहिलं आहे की मुस्कान आणि इतर स्पर्धकांच्या कपड्यांवरील आक्षेप 'निव्वळ एकतर्फी' आहे.

त्या लिहितात, "मुद्दा कपड्यांचा नाही. मुद्दा स्वातंत्र्य आणि आकांक्षांचा आहे. या तरुणींची अशा व्यासपीठावर उभं राहण्याची हिंमत कशी झाली, जे त्यांना जगासमोर आणू शकतं? पितृसत्ताक समाजानं त्यांच्यासाठी घालून दिलेल्या मर्यादा आणि लाजेच्या सीमारेषा त्यांनी कशा काय ओलांडल्या?"

भंडारे यांनी लिहिलं आहे की भारतात महिला खासदार आणि न्यायाधीशांची संख्या जास्त नसताना, एका छोट्या शहरातील तरुणींनी केलेला अशाप्रकारचा विरोध 'कौतुकास्पद' आहे.

मुस्कान म्हणाली की योग्य गोष्टींसाठी उभं राहण्यास तिला आईनं शिकवलं आहे. ती म्हणाली, "हा किताब जितका माझा आहे, तितकाच तो माझ्या आईचादेखील आहे. जर ती नसती, तर आज मी इथे नसते."

ग्राफिक कार्ड

तिला वाटतं की तिच्या कहाणीमुळे आता इतर महिलांनादेखील त्यांच्या हक्कांसाठी, योग्य गोष्टींसाठी आवाज उठवण्याची हिंमत मिळेल.

ती म्हणाली, "त्या क्षणी मलादेखील भीती वाटत होती. मात्र जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही योग्य आहात, तर तुम्ही लढूदेखील शकता."

मुस्कान म्हणाली, "माझ्या हा किताब जिंकणं एक भाग होता. खरा उद्देश होता तो महिलांनी अन्यायाच्या विरोधात उभं राहावं आणि योग्य गोष्टीसाठी उघडपणे बोलावं यासाठी प्रेरणा देण्याचा."

पुढे काय करणार असं जेव्हा मुस्कानला विचारण्यात आलं, तेव्हा ती हसून मिळाली, "पुढील वर्षी मी मिस उत्तराखंड स्पर्धेत भाग घेऊन आणि मग मिस इंडिया स्पर्धमध्ये. त्यानंतर आयुष्य कुठे घेऊन जातं ते पाहूया."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.