'स्वप्नात मला पुरात वाहून गेलेली जमीन आणि जनावरं दिसतायत, मला चिंत्या रोग झालाय'

"लय अवघड झालंय आमचं. माणसं म्हणतात कशाला रडतोस, पण ज्याचेत्यालाच यातना होतात. प्रपंच उद्ध्वस्त झालाय सायेब. आज आम्ही सोसलं. पण आमची लेकरं-बाळ सोसतील का हे असं रान वाहून गेल्यावर? आता माझं वय 55-60 वर्षं झालंय."
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या केवड गावचे दत्तात्रय धर्मे हे सीना नदीच्या पुरानंतर त्यांच्या शेतीच्या दुरावस्थेविषयी सांगत होते.
पुराच्या आठवणी सांगताना धर्मे यांच्या डोळांतून अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
आम्ही त्यांच्या शेतात बसलो होतो, पण शेतातली माती वाहून गेल्याने तिथं भकास दृश्यं होतं आणि मन उदास झाल्यासारखं वाटत होतं.
सप्टेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात कमी काळात जास्त पाऊस पडला. त्यामुळे सीना नदीला पूर आला. एकदा नाही तर तीनदा आला.
पुराचं पाणी इतकं वाढलं की सीना नदीने आपलं पात्र बदललं आणि ती थेट धर्मे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतात घुसली.
दोन आठवडे शेतातलं पाणीच हटलं नाही. पुराचं पाणी जेव्हा ओसरलं तेव्हा मात्र दत्तात्रय धर्मे यांनी लहान लेकरासारखा हंबरडा फोडल्याचं त्यांच्या पत्नी सांगतात. कारण त्यांच्या शेतातली माती खरडून वाहून गेली होती.
शेतात 10 फुटांहून जास्त खोल खड्डे पडले होते.
धर्मेंच्या शेतात ऊस होता. पुढच्या दोन महिन्यात कारखान्याला गेला असता तर पाच एकरातील ऊसाचे जवळपास 5 लाख रुपये आले असते.

स्वत:च्या आईप्रमाणे मातीवर प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या मनावर पुराच्या हाहाकारामुळे मोठा आघात झालाय.
नैसर्गिक आपत्तींमुळे डोळ्यांसमोर तुमचं घर वाहून जातं, शेत, जंगल, डोंगर नष्ट होतात, तेव्हा सभोवतालच्या पर्यावरणात मोठा बदल होतो.
आपण जिथे लहानाचे मोठे झालो, तोच परिसर आता ओळखीचा वाटत नाही. आजूबाजूचे बदल इतके खोलवर भिडतात की लोकांना भीती, वेदना आणि स्वतःच्याच घरी परकेपणाची भावना जाणवते. यालाच वैज्ञानिक भाषेत 'सोलास्टॅल्जिया' म्हणतात.
ऑस्ट्रेलियन पर्यावरण तत्त्वज्ञ ग्लेन अल्ब्रेक्ट यांनी ही संकल्पना मांडलीय. 'आपण घरातच राहतोय, पण तरीही घर आणि परिसर हरवल्यासारखं वाटणं,' असा या संकल्पनेचा अर्थ होतो.
याविषयीचा बीबीसी मराठीचा हा खास ग्राउंड रिपोर्ट.

आपल्या घराच्या किंवा परिसराच्या बदललेल्या रूपामुळे निर्माण होणारा एकाकीपणा, आधार हरवण्याची भावना आणि त्यातून होणारा मानसिक त्रास हा सोलास्टॅल्जियाचा प्रकार आहे.
हा कोणताही आजार नसून नैसर्गिक आपत्तींमुळे वाटणारी एक मानसिक वेदना आहे.
केंद्र सरकारच्या 2024 मधील एका अहवालात भारतात हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या लोकांपैकी जवळपास 50 टक्के लोक पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) या मानसिक आघाताच्या त्रासाला सामोरे जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
2015 ते 2020 या कालावधीत केवळ पुरामुळेच भारतात 21.8 कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले.
दुसरीकडे सोलास्टॅल्जिया हा आजार म्हणून ओळखला जात नाही, तर पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे निर्माण होणारी मनाची एक अवस्था आहे. त्यामुळे त्याची ठोस आकडेवारी दिली जात नाही.
आपल्याच ठिकाणी हरवल्यासारखं का वाटतं?
सोलास्टॅल्जियासारख्या घटना फक्त सोलापुरातील केवड गावातच घडल्या नाहीयेत. तर संबंध ग्रामीण भारतात दरवर्षी पूर, दुष्काळ, भूस्खलन आणि अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांच्या मनात राहत्या ठिकाणीच परकेपणाची भावना वाढत आहे.
2025मध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम, तामिळनाडू याठिकाणी अभूतपूर्व पूर आले. संपूर्ण खेडी पाण्यात गेली, घरं-शेती उद्ध्वस्त झाली आणि शेकडो लोकांना विस्थापित व्हावं लागलं.
काही ठिकाणी तर नदीने आपला मार्ग बदलून शेजारच्या शेतात घुसण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण आशियात आणि विशेषत: भारतात मान्सून म्हणजे पावसाळा हा बेभरवशाचा आहे, लहरीपणाचा आहे. त्यामुळे इथली शेती शाश्वत मानली जात नाही. त्यामुळे इथला शेतकरी हा कायमचा चिंतेत राहिलाय. पण आता क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलांमुळे शेतीवरची संकटं वाढू लागली आहेत.

या सगळ्या भौतिक नुकसानीच्या पलीकडे एक शांत, पण गंभीर संकट उभं राहत आहे, ते म्हणजे, 'मानसिक आघाताचं.'
विशेषतः वयोवृद्ध लोकांना काय घडलं हे समजून घेणं कठीण जात आहे. कारण आजवर त्यांनी उभ्या आयुष्यात असं संकट पाहिलं नव्हतं. पण आता त्यांना अभूतपूर्व गोष्टी दिसू लागल्या आहेत.
तज्ञ सांगतात की, या आपत्तीतून वाचलेल्या अनेक लोकांमध्ये 'सोलास्टाल्जिया'ची लक्षणं दिसत आहेत. या प्रकाराला पर्यावरणाचं संतुलन ढासळ्याने होणाऱ्या वेदना (Ecological Grief) असंही म्हटलं जातं.
गेल्या काही वर्षांपासून पूर आणि अतिपावसानं यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घायकुतीला आणलं आहे. अशा घटनांमुळे लोकांचं केवळ आर्थिक नुकसान होत नाहीये. तर त्यासोबत अशा घटनांचा त्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम होतोय.
'माझं शेत स्मशानभूमी वाटतंय'
अमृता लटके या केवड गावातील एक यशस्वी आणि प्रगतशील शेतकरी मानल्या जातात. त्यांच्या शेतात केळी आणि ऊसाची लागवड करण्यात येते.
त्यांच्या शेताजवळून सीना नदीने नागमोडी वळण घेतलं आहे. या नदीच्या काठावर त्यांची केळीची बाग होती. पण आता तिथे पाहिलं तर फक्त नदीतून वाहत आलेल्या वाळूचे थर दिसतात. बाकी काहीच नाही.
आम्ही त्यांच्या शेतात भेट दिली. पण त्यांना शेताकडे येण्याची हिम्मत झाली नाही.
त्यांच्या घरी गेल्यावर त्या म्हणाल्या, "शेतात गेल्यावर एखाद्या स्मशानभूमीत गेल्यासारखं वाटतंय. इतकं बेकार झालंय. बघू आणि जाऊसुद्धा वाटत नाही तिकडं."

आम्ही अमृता लटके यांच्या शेताला भेट दिली. नदीकाठी असणाऱ्या या जमिनीत खरंच आधी शेती व्हायची का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण तिथं गेलं की आता एकदम भकास आणि ओसाड वाटतं.
दुसरीकडे, बीबीसी मराठीशी बोलताना पूरग्रस्त शेतकरी दत्तात्रय धर्मे आपली उद्ध्वस्त झालेली शेती सांगताना अश्रू थांबवूच शकत नव्हते.
"माझ्या शेतीचा बांध कुठं हाय, हेच कळंनासं झालंय. इथं आता काहीच पहिल्यासारखं वाटत नाही. कुठंतरी जाऊन मरावं असं वाटतं… लय उदास वाटतंय. आमचा बांध राहिला नाही, चिंचेचं झाडही नाही. सगळं पूर्वीसारखं असतं आम्ही माणसं टवटवीत राहिलो असतो," असं धर्मे सांगत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ग्लेन आल्ब्रेक्ट ऑस्ट्रेलियातील पर्यावरण तत्त्वज्ञ ग्लेन आल्ब्रेक्ट यांनी सोलास्टॅल्जिया ही संकल्पना जवळपास 25 वर्षांपूर्वी मांडली आहे.
त्याविषयीचे खोलवर संशोधन हे विकसित देशांत सर्वाधिक झालेलं दिसतं. पण हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका हा विकसनशील देशांना सर्वाधिक बसलेला दिसतो. त्यामुळे याठिकाणी जास्त काम होणं गरजेचं असल्याचं अल्ब्रेक्ट सांगतात.
त्यांना आम्ही दत्तात्रय धर्मे यांची मुलाखत दाखवली, धर्मे यांची बाजू पाहिल्यानंतर ते म्हणाले, तुम्ही जे मला दाखवलं त्यामध्ये शेतकऱ्याला (दत्तात्रय धर्मे यांना) जगण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टीच पुरात वाहून गेल्या आहेत. अशा गोष्टी ज्यावर त्यांचं कुटुंब तग धरून होतं. शेतातली अवजारं गेली, ज्यावर त्यांची शेती अवलंबून होती. हे खूपच वेदनादायी आहे. मला वाटतं, ही अवस्था आता 'सोलास्टॅल्जिया'पेक्षाही पुढे गेलेली आहे.

कारण मी ज्या संकल्पनेविषयी चर्चा करत आहे त्यामुध्ये बदल झालेल्या गोष्टी आपण पुन्हा सावरू शकतो आणि दुरुस्त करू शकतो. पण पुरामुळे त्या (धर्मे) व्यक्तीच्या अस्तित्वालाच घाला घातला आहे. जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वाहून गेल्या. हे फारच वेदनादायी आहे."
या सर्व प्रकारातून केवड गावात पूर ओसरला असला तरी त्याचे मानसिक आघात अजून ओसरल्याचं दिसत नाही.
महिलांना तुलनेने जास्त हरवल्यासारखं वाटतं?
नदीकाठच्या शेताला भेट देऊन आल्यावर आम्ही धर्मे यांच्या दोन खोल्यांच्या घरी आलो. तेव्हा दत्तात्रय धर्मे यांच्या पत्नी गंगा धर्मे, साडीच्या पदराने डोळे पुसत सांगत होत्या, "झोप लागत नाही. जेवण जात नाही पोट सारखं गच्च भरल्यासारखं वाटतंय. पोट गच्च भरल्यासारखं वाटतं सारखं."
त्यांच्या शेजारीच बसलेले दत्तात्रय धर्मे पुढे सांगतात, "डोक्यात विचार येतात. डोकं दुखतं. झोप लागत नाही. कायबी मनात स्वप्न येतात. सगळं इचार येतात. पहिलं असं नव्हतं होत. सगळं विचार वाईट येतात. बोलू वाटत नाही. चालू वाटत नाही. लेकरांना बायकांना काय बोलावं? .... झोपेत सगळं पहिल्यासारखं झाल्यासारखं वाटतं. जनावरं वाचल्यासारखी वाटतात. मला चिंत्या रोग झालाय"
भारतामध्ये अनेक धार्मिक गोष्टी या नदी, जंगल, झाडी यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश दिसतो. जागतिक हवामान बदलांमुळे या साधनसंपत्तीवर विपरीत परिणाम होतायत. त्याचा फटका महिलांना सर्वाधिक बसल्याचंही तज्ज्ञ सांगतायत.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक नरसिंग कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "गावात महिलांच्या धार्मिक आचारांचा थेट संबंध नदी-नाल्यांशी, झाडाझुडपांशी आणि देवस्थानांशी जोडलेला असतो. पण या नैसर्गिक जागांमध्ये अचानक बदल झाला, तर त्यांचा सोलास्टॅल्जियाचा अनुभव अधिक तीव्र होऊ शकतो. त्यांच्या अस्तित्वाच्या भावना आणि जिव्हाळ्याच्या नात्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो."
दत्तात्रय धर्मे यांच्या पत्नी गंगा धर्मे सांगतात की, पूरानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्यच विस्कळीत झालंय. धर्मे यांना दोन मुले आहेत. दोघांचीही लग्ने झाली नाहीत. आधीच शेतकऱ्यांच्या पोरांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आता शेतातली जमीन वाहून गेल्याने ही मुले भविष्यात काय कमवणार हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोप लागत नाही. डोळे मिटले की नको तेच स्वप्न पडतात. सगळ्या जुन्या आठवणी, भीती, वाईट विचार मनात घोळत राहतात, असं त्या सांगतात.
पूर्वी असं काहीच नव्हतं, पण आता कुणाशी बोलावंसं वाटत नाही, उठून चालावंसंही वाटत नाही. लेकरांना काय सांगावं, कसं समजावं हेच कळत नाही, असं त्या हतबलपणे म्हणतात.
दुसरीकडे काहीवेळ झोपल्यानंतर पडलेल्या स्वप्नांत सगळं पुन्हा पहिल्यासारखं झाल्यासारखं वाटतं. शेतजमीन, घर, जनावरं सगळी सुरक्षित आहेत, असं भासतं. पण जाग आली की वास्तव पुन्हा अंगावर येतं आणि मन अधिकच खचतं, असं गंगा धर्मे हुंदके देऊन सांगत होत्या.
हवामान बदल आणि मानसिक आरोग्य
केवड गावात पूर ओसरून तीन महिने झाले तरी शेतजमीन आणि जनावरं वाहून गेल्यानंतर उरलेलं आयुष्य कसं उभं करायचं, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे.
पाणी ओसरलं असलं, तरी भीती, असुरक्षितता आणि उदासीनता मनातून जात नाहीये. रात्री झोप न लागणं, वारंवार तोच प्रसंग डोळ्यांसमोर येणं, भविष्यात पुन्हा असं काही होईल का याची धास्ती, अशी लक्षणं आजही अनेकांमध्ये दिसत आहेत.

अशा घटना फक्त केवड गावापुरत्या मर्यादित नाहीत, असं शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारे आणि शिवार हेल्पलाईनचे संस्थापक विनायक हेगाना सांगतात.
मराठवाडा आणि आसपासच्या अनेक भागांतून अशाच स्वरूपाचे फोन येत असल्याचं ते नमूद करतात.
ज्या भागाने कायम दुष्काळ बघितला, त्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी लोकांसाठी मानसिक धक्का देणारं होतं.
या शेतकऱ्यांना अशा महापुराला कसं तोंड द्यायचं, याचा कुठलाही पूर्वानुभव नव्हता. त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या आठवणीत असा प्रसंग कधीच घडलेला नव्हता. महापूराच्या दरम्यान आणि त्यानंतर शेतकऱ्यांकडून आलेल्या फोनमधूनच या गोष्टी समजल्याचं हेगाणा सांगतात.
ते पुढे म्हणाले, "काही लोक फक्त रडत होते, काही जण गप्प होते, तर काहींचा आवाज थरथरत होता. नुकसान किती झालं यापेक्षा 'आता पुढे काय?' हा प्रश्न जास्त बोचरा होता."
हवामान बदलामुळे भविष्यात अशा घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने ज्या पद्धतीने कोरोना काळात टास्क फोर्स स्थापन करून संकटाला तोंड दिलं होतं, त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तींनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावा, असंही हेगाणा यांनी सुचवलं.

पूरानंतरही ही मानसिक अवस्था लगेच बदलत नाही. या शेतकऱ्यांना पुरानंतर काही प्रमाणात मदत मिळाली, नुकसानभरपाई जाहीर झाली तरी मात्र मनातली भीती आणि अस्थिरता तशीच राहते.
त्यामुळे अशा आपत्तींनंतर फक्त आर्थिक मदत नाही, तर मानसिक आधार आणि समुपदेशनही तितकंच गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
सोलास्टाल्जियावर उपाययोजनांविषयी अधिक माहिती देताना प्रा. ग्लेन म्हणाले, "जोपर्यंत माणूस या समस्येच्या मुळ कारणांना सामोरा जात नाही, तोपर्यंत ही वेदना आणि दु:ख सार्वत्रिक होत राहणार. आज त्यांची वेदना उद्या माझी, तर परवा सगळ्यांचीच वेदना होईल.
"कारण ही समस्या आता जगाच्या एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही वेदना मानवी जीवनाचा एक भाग बनत आहे, जी जगात कुठेही, कोणालाही भेडसावू शकते. त्यामुळे मानवजातीने एकत्र येऊन यावर काय आणि कसे काम करायचे, याचा विचार करणे गरजेचे आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











