'मी 15 वर्षे पतीपासून वेगळी राहतेय, तरी आम्ही आनंदी आहोत'; जोडप्यांमध्ये वेगानं वाढणारा 'LAT' ट्रेंड काय आहे?

मार्गारेट लंडनला जाण्याआधी विमानतळावर पीटरबरोबर

फोटो स्रोत, Margaret Murphy

फोटो कॅप्शन, मार्गारेट लंडनला जाण्याआधी विमानतळावर पीटरबरोबर
    • Author, एमिली हॉल्ट
    • Role, बीबीसी न्यूज

मार्गारेट आणि त्यांचे पीटर पती वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात. ते गेली 15 वर्षे अशाप्रकारे वेगवेगळे राहत आहेत.

मार्गारेट राहतात युकेमध्ये तर त्यांचे पती राहतात ऑस्ट्रेलियामध्ये. दोन्ही देशांमधील प्रवासाचा वेळ लक्षात घेता, मार्गारेट आणि पीटर यांना वर्षातून एकदा किंवा 18 महिन्यांनी एकदा एकमेकांना भेटता येतं.

दोघांमधील अंतर आणि दोन भेटींमधील कालावधी मोठा असूनही, हे दोघेही म्हणतात की त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि ते आनंदी जोडपं आहे.

"माझे अनेक नवीन मित्र झाले आहेत आणि लंडनमधील आरामदायी अपार्टमेंटमध्ये मी एकटीच राहते आहे. त्यामुळे विवाहित असूनही मी सर्व केलं आहे, हा एक अद्भूत अनुभव आहे," असं मार्गारेट यांनी बीबीसीच्या वुमन्स अवरला सांगितलं.

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत राहण्याऐवजी वेगळ्या घरात राहणं ही काही तितकीशी वेगळी किंवा नवीन गोष्ट नाही. अशाप्रकारे राहणाऱ्या जोडप्यांना एलएटी म्हणतात. म्हणजे लिव्हिंग अपार्ट टूगेदर.

मात्र, अधिकृत आकडेवारीनुसार, अशाप्रकारे वेगळं राहणाऱ्या विवाहित लोकांचं प्रमाण खूपच कमी आहे. ते जेमतेम 3 टक्के आहे.

अनेक हायप्रोफाईल जोडपी आहेत एलएटी

मार्गारेट यांना वाटतं की, जरी तुम्ही एकाच घरात राहत नसलात तरीदेखील तुम्ही एक सुखी, समाधानी वैवाहिक आयुष्य जगू शकता.

अनेक हाय प्रोफाईल जोडपीदेखील उघडपणे वेगळं राहण्याच्या त्यांच्या निर्णयांबद्दल बोलली आहेत.

अभिनेत्री ग्विनेथ पाल्ट्रो आणि तिचा पती, लेखक-दिग्दर्शक ब्रॅड फाल्चुक हे त्यांच्या विवाहानंतरची सुरुवातीची काही वर्षे वेगळे राहिले होते. यावर पाल्ट्रोचं म्हणणं होतं की त्यामुळे त्यांचं नातं टिकून राहण्यास मदत झाली.

अनेक वर्षे ॲश्ले ग्राहम न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या, तर चित्रपट निर्माता असलेला त्यांचा पती लॉस एंजेलिसमध्ये राहत होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक वर्षे ॲश्ले ग्राहम न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या, तर चित्रपट निर्माता असलेला त्यांचा पती लॉस एंजेलिसमध्ये राहत होता

मॉडेल ॲश्ले ग्राहम आणि तिचा पती जस्टिन एर्विन हे दोघेही अनेक वर्षे वेगळे राहिले. हीच गोष्ट अभिनेत्री हेलेना बॉनहॅम कार्टर आणि दिग्दर्शक टिम बर्टन यांच्याबाबतीत देखील आहे. हे दोघेदेखील 13 वर्षे वेगळे राहिले.

अलीकडेच ॲबॉट एलीमेंटरी या मालिकेतील अभिनेत्री शेरील ली राल्फ यांनी खुलासा केला होता की त्या आणि त्यांचा पती गेल्या जवळपास 20 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. ते दोघेही अमेरिकेच्या दोन विरुद्ध किनाऱ्यांवर राहत आहेत.

कारण शेरील अभिनेत्री असल्यामुळे त्यांना हॉलीवूडमध्ये राहावं लागतं. तर त्यांचे पती पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर असल्यामुळे त्यांना पेनसिल्व्हेनियात राहणं आवश्यक असतं.

मार्गारेट यांनी दुसऱ्या देशात वेगळं राहण्याचं का ठरवलं?

15 वर्षांपूर्वी मार्गारेट यांचं आयुष्य खूपच वेगळं होतं. त्या ऑस्ट्रेलियात राहत होत्या. त्या घराबाहेर काम, नोकरी करत नव्हत्या. त्यांनी चार मुलांचं संगोपन केलं. तर त्यांचे पती, पीटर हे पूर्णवेळ डॉक्टर होते आणि कुटुंबाचा आर्थिक बाजू तेच सांभाळत होते.

वयाच्या 57 व्या वर्षी मार्गारेट पुन्हा कॉलेजमध्ये गेल्या आणि त्यांनी अप्लाईड लिंग्विस्टिक्स म्हणजे उपयोजित भाषाशास्त्रात पीएचडी केली.

मार्गारेट यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि त्यांची मुलंदेखील घराबाहेर पडल्यावर त्यांना वाटलं की ही आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची वेळ आहे. त्यामुळे त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.

"त्यावेळेस मला आणि पीटरला हे स्पष्ट झालं की आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्यांची ध्येय, आकांक्षा वेगवेगळ्या होत्या. पीटरला घरी राहून काम करायचं होतं. तर मला बाहेर एक संधी मिळाली," असं मार्गारेट म्हणाल्या.

त्या आता रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समध्ये शिक्षण अधिकारी आहेत.

कोणत्याही वयोगटात स्वत:च्या मर्जीनं जगण्याचा प्रयत्न

मार्गारेट पुढे म्हणतात, "ज्या वयात लोक निवृत्त होण्याचा विचार करतात त्या वयात मी एकेक पदं चढत गेले. हो, जर तुमची इच्छा असेल तर वयाच्या 60 व्या वर्षीदेखील तुम्हाला पूर्णवेळ नोकरी मिळू शकते."

"हो, तुम्ही दुसऱ्या देशात राहू शकता आणि सर्व रोमांचक गोष्टी करू शकता. तुम्ही अगदी दुसऱ्या खंडातदेखील जाऊ शकता."

मात्र मार्गारेट या गोष्टीवर देखील भर देतात की त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पतीसाठी सर्वकाही छान छान किंवा आनंददायी नव्हतं.

त्या पुढे म्हणतात, "वैयक्तिक पातळीवर, पीटरसाठी असणारे तोटे म्हणजे, तो अजूनही ब्रिस्बेनमधील त्याच घरात राहतो. तो स्वत:हून समाजात फारसा मिसळत नाही. तिथे तो थोडासा एकटा पडतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर जोडीदाराच्या सहवासाचा अभाव ही समस्या आहे. मला इथे जोडीदार नाही."

ब्रॅड फाल्चुक आणि ग्विनेथ पाल्ट्रो लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रॅड फाल्चुक आणि ग्विनेथ पाल्ट्रो लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होते

मार्गारेट म्हणतात की हे सगळं यशस्वी करण्याची, सुरळीतपणे चालू देण्याची गुरुकिल्ली म्हणजे दोघांनी एकमेकांशी नियमितपणे बोलणं.

"मी पीटरला लंडनमधील माझ्या आयुष्याबद्दल सर्वकाही सांगते. माझी नोकरी, माझे नवे मित्र, माझा प्रवास या सर्वांनाबद्दल सांगते. त्यामुळे आयुष्याला एक आयाम मिळाला आहे. तसाच तो माझ्या आयुष्यालाही मिळाला आहे. तो लंडनला आला की त्याला ते आवडतं," असं मार्गारेट म्हणतात.

'याप्रकारे प्रत्येकालाच जगता येत नाही'

वुमन्स अवर या कार्यक्रमाच्या श्रोत्या असलेल्या केरी म्हणतात की, त्या त्यांच्या जोडीदाराबरोबर तीन वर्षांपासून राहत होत्या. त्या दोघांनी सुरुवातीला, एकमेकांचं स्वातंत्र्य आणि मोकळीक टिकवून ठेवण्यासाठी कधीही पती-पत्नीप्रमाणे एकत्र न राहण्याचं ठरवलं होतं.

केरी म्हणतात, "आम्ही दोघांनी जवळ जवळ घरं विकत घेतली. घराच्या मॉर्गेजसाठी इतर लोकांबरोबर जागा शेअर केली."

अखेर त्यांनी विवाहबद्ध होण्याचा ठरवलं आणि केरी म्हणतात, तरीदेखील त्यांची जीवनशैली, जगण्याची पद्धत बदलणार नाहीत.

त्या म्हणतात, "हे आम्हा दोघांसाठी खूपच सुखकारक ठरतं आहे. परिणामी, आम्हाला आमचं नातं आणखी घट्ट झाल्यासारखं वाटतं."

आयुष्यात उशीरा करियरची सुरुवात केल्यानंतर मार्गारेट यांच्या मनात काहीतरी 'साध्य केल्याची छान भावना' आहे

फोटो स्रोत, Margaret Murphy

फोटो कॅप्शन, आयुष्यात उशीरा करियरची सुरुवात केल्यानंतर मार्गारेट यांच्या मनात काहीतरी 'साध्य केल्याची छान भावना' आहे

अमांडा मेजर रिलेटमध्ये क्लिनिकल क्वालिटी संचालक आहेत. रिलेट ही जोडप्यांचं समुपदेशन करणारी सेवा आहे. अमांडा म्हणतात की ही व्यवस्था प्रत्येकासाठीच नसते. असं प्रत्येकालाच करता येत नाही. मात्र जी विवाहित जोडपी वेगळं राहण्याचा निर्णय घेतात, त्यांना याचे फायदे असू शकतात.

अमांडा म्हणतात, "याप्रकारे राहण्यात प्रत्येकालाच त्याची मोकळीक मिळते, स्वातंत्र्य मिळतं, तसंच परतण्यासाठी एक जागा असते, जिथे ती व्यक्ती स्वत:चे हितसंबंध, नाते, ओळख जपू शकते."

"मी तुझ्याशी लग्न केलेलं असूनही माझं स्वतंत्र, वेगळं आयुष्य आहे. माझे स्वत:चे हितसंबंध आहेत आणि मला जेव्हा योग्य वाटतं, तेव्हा मला माझ्या जोडीदाराबरोबर राहता येतं, असं वाटणाऱ्या लोकांसाठी याप्रकारे राहणं, जगणं उपयुक्त किंवा योग्य ठरू शकतं."

अमांडा यांनी काही सल्ले दिले आहेत, ते खालीलप्रमाणे :

  • वेगळं राहण्याचा निर्णय दोघांनाही खरोखरंच हवा आहे, याबद्दल ठाम असलं पाहिजे. हा निर्णय घेताना त्यांनी तो दबावात घेता कामा नये. दोघांपैकी एकाला तो योग्य वाटतो किंवा सोयीचा आणि दुसऱ्याला नाही, असं घडता कामा नये.
  • दोघांनी वेगळं राहताना काही मूलभूत नियम ठरवून घेतले पाहिजे. त्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे.
  • याप्रकारे वेगळं राहूनदेखील दोघांमधील नातं अजून टिकून आहे, याची नियमितपणे खात्री करा.
  • यात तुम्ही एकत्र घालवलेल्या दिवसांबद्दल बोलू शकता, लैगिंक संबंध सांभाळण्याबद्दल बोलू शकता किंवा जर मुलं असतील तर त्यांची काळजी घेण्याबद्दल बोलू शकता.
  • तुमच्या जोडीदाराबरोबर नेहमी स्पष्ट संवाद ठेवा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)